एक पोरगी अरुणा इराणी फिल्मी इंडस्ट्रीतल्या चारसो बीस लोकांच्या जाळ्यात सापडते ती ‘ग्लॅमर’ला भुलून. धर्मा नि शर्मा तिला इतके ‘गोलमाल’ बनवतात की ‘अरुणा’ घरच्या लोकांचं ‘इराणी’ हॉटेल बनवते. ‘कोई भी माल उठाव’ याप्रमाणे तिजोरीतली हाती येईल ती रक्कम नि जडजवाहीर घेऊन ती शर्मा-वर्मा कंपनीला भेटते ती आपल्या भविष्यकाळाचा विचार करून. पण तिला कुठं माहीत असतं की शर्मा-वर्मा आपल्या भविष्यकाळाच्या तरतुदीचा विचार करताहेत ते? त्यात अरुणाने घरून लंपास केलेल्या डबोल्यावर शर्मा-वर्मामध्ये मोठी फाईट होते नि एक कर्मा मरतो नि एक नायिकेच्या ‘वर्मा’वर घाव घालण्यासाठी तिचा पाठलाग करतो. कारण खून झालेला तिने पाहिलेला असतो. खून होऊनही पोलिसांचा संबंध येत नाही. डाकू कंपनी अरुणाचा पाठलाग करतात नि ती तर ‘बॉम्बे टू गोवा’ या बसमध्ये बसलेली असते. पण तिचा होणारा पतिराज मोटारबाईकवरून तिचा पाठलाग करतो नि बसमध्ये बसतो. शर्मा कंपनीही मागे असतेच नि या बसच्या प्रवासात त्यांचा निकाल लागतो. हा आराखडा. ष्टोरी अशी खास नाहीच. कशाला पाहिजे? कारण मन रमेल त्याप्रमाणे भरकतट नेलेली. यात जास्त जोर दिलाय तो बसमध्ये बसणार्या व्यक्ती नि त्यांच्या व्यक्तिरेखा यावर नि त्यातून जो जो विनोद निर्माण करता येईल तो केलाय नि लोकांना हसायला लावलंय. हाच फक्त उद्देश!
‘गुड्डी’, ‘आनंद’, ‘आशीर्वाद’, ‘मेरे अपने’सारखी वेगळी चित्र निर्माण करणार्या एन. सी. सिप्पी यांनी हे चित्र प्रोड्युस केलंय. हे चित्रही त्यांना कमाई करून देईल यात शंका नाही. कारण यात करमणूक झकास आहे. दिग्दर्शक जरी रामनाथन आहेत नि ‘जॅकपॉट’ फेमस राजेंद्रकृष्ण यांनी ष्टोरी डॉयलॉग लिहिलेले असले तरी त्यात मेहमूदचा ‘ब्रेन’ बराच वापरला गेलाय. एकच गोष्ट. शेवटची धमाल चालू असताना पोलिसांना मेहमूद बोलावून आणतो, एका उंच कड्यावर ते उभे आहेत. हा म्हणतो ‘वो देखो हमारे पॅसेंजर को गुंडा लोक सताते हैं’ इन्स्पेक्टर आपल्या तुकडीला ऑर्डर देतो. ‘तुम इधरसे जाव, तुम इधरसे जाव’ त्यावर मेहमूद कड्याच्या खाली बोट दाखवून इन्स्पेक्टरला म्हणतो, ‘तुम इधरसे जाव’ अशी अनेक चटकदार पोट दुखवणारे विनोद यात आहेत.
लंबूस अमिताभ बच्चन यातला हिरो आहे. ‘आनंद’मध्ये आपल्या संवादाच्या उच्चाराने एक ‘अॅटमॉसफिअर’ निर्माण करणार्याला यात तोंडाने ‘शूऽऽऽ’ शिट्टी वाजवून फायटिंग करायला लावलीय. जितेंद्र टाईप नाचायला लावलंय. खुदा उसका भला करे! बाकीच्या प्रत्येक आर्टिस्टने आपली जबाबदारी ओळखलीय. कारण बंधन कसलंच नाही. त्यातही शत्रूघ्न सिन्हा झकास. जसे ‘ट्रीप’ला जाताना लोक झाडाझुडपाची पर्वा न करता वाटेल तेथे पाणी सोडतात. नव्हे… काय सांगणार? ओळखा तुम्हीच! — करतात. हाच प्रकार येथे घडलाय. पण तीही करमणूक मानली जाते. त्यातलाच हा प्रकार!
चित्रपटातली डोळ्याला आनंद देणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाल मिस्त्री यांची आर्टिस्टीक फोटोग्राफी. बसमधले ‘शॉट्स’ चांगले घेतलेत. फक्त उतारूंच्या बसण्याच्या जागेतली ‘कंटीन्युटी’मध्ये गफलत आहे. पण ‘गफलती’वर बोलायचं कशाला? एवढंच पाहायचं की दिसेल ते गोड मानलं तर अडीच तास कसे गेले ते समजणार नाही हे मात्र खरं.
थोडक्यात, इलेक्शनच्या धामधुमीत तकलीफ न देणारं नि मनाची करमणूक करणारं झकास चित्र. हे आपलं मत!