‘बॉबी’ या राज कपूरच्या चित्राबद्दल अपेक्षा, आकांक्षा उंचावल्या नाहीत, तर नवल! या चित्राबद्दल खास दोन ‘अॅट्रॅक्शन्स’ होती. एक राजेश खन्नाशी नुकतीच शादी केलेली ‘डिम्पल’ ही षोडशीवर्षी कापडियाकन्या पडद्यावर प्रथमच येणार होती आणि दुसरं एक कारण म्हणजे तरुण म्हणून म्हातार्या हिरोचा चेहरा पडद्यावर दिसणार नव्हता.
‘बॉबी’ आली. तरुण तरुणींच्या मनात एक जबरदस्त आकर्षण तिनं निर्माण केलं. ‘डिम्पल’नं ‘डिम्पल स्कॉच’लाही आपल्या बेमिसाल अभिनयानं पुरं लाजवून टाकलं. तिचा अभिनय पाहून एक विचार येतो, तिनं एवढ्या लवकर शादीच्या बेड्यात का अडकवून घेतलं? यामागे काही राज (रहस्य) आहे का राज (कपूर) आहे हे समजत नाही! कारण तिचं ‘आर्टीस्टीक करियर’ नुकतंच कुठं सुरू झालंय.
आता चित्राचा विचार केला नि ‘ष्टोरी’च्या चष्म्यातून पाहिलं तर राज कपूरने काहीही विचार दिलेला नाही. याला जबाबदार आहे ष्टोरी रायटर के. ए. अब्बास. यांनी आतापर्यंतची आर.के. पिक्चर्सच्या ष्टोर्या हाताळलेल्या. ते कम्युनिस्ट असल्यामुळे त्यांच्या चित्राची सुरवात होते श्रीमंतापासून. यात दाखवलेला मुद्दा असा- श्रीमंत घराण्यातल्या मुलाला काही कारणावरून आईवडिलांचं प्रेम मिळालं नाही म्हणून तो लहानपणीची शिक्षिका ‘आंटी’च्या नातीवर ‘बॉबी’कडे प्रेमाची याचना करतो! पटतं का तुम्हाला? सांगा? केवळ ही सिनेमा ष्टोरी आहे म्हणून कुठंतरी जमवायचं म्हणून जुळवलं. आपण थोडंसं डोकं चालवलं तर कळून चुकेल की ही सारी राजच्या अनेक चित्रांची सुरुवात आहे. छोडो! अब्बाससाहेबांनी प्रेम करणार्या तरुण तरुणींना पुढे संदेश काय दिलाय तर मिळेल तिथं आवळा, नाहीतर आईबापांना सोडून स्कूटर असेल तर पळून जा. अगदीच मवाली लोकांशी दोन हात करण्याची ताकद नसेल तर शेवटी कड्यावरून पाण्यात उडी मारा. बाप आणि सासरा पोहणारा नसला तरी ते तुम्हाला वाचवतील, कारण शेवट सुखाचा हवाय.
ही काय ‘ष्टोरी’ झाली? याला सिर्फ अब्बास जबाबदार आहेत असं मी म्हणणार नाही. कारण? कारण तसंच आहे. एक गोष्ट नजरेआड करू नका. जरा मागे जा… ‘बरसात’, ‘आवारा’, ‘श्री ४२०’ यात राज कपूर नर्गिस यांचं प्रेमप्रकरण सर्वांना माहीतच आहे. नर्गिस शादीशुदा होऊन गेली, बालबच्चेवाली झाली. पण राजच्या मनातून त्या प्रेमप्रसंगाची याद मात्र गेली नाही. जाणार नाही. म्हणून त्यानं ‘हम ना सही हमारा बेटा सही’ या उक्तीने (युक्तीने) ते प्रेमप्रसंग पडद्यावर दाखवण्याचा हट्ट केलाय. कपूर घराण्याचं नशीब थोर! राजने आपल्या मुलाला राजू बनवलं. बेलबॉटममध्ये त्याला आपल्यासारखं चालायला लावलं. हिरॉईन कोवळी मिळाली. तीही नर्गिससारखी थोडीशी दिसणारी, मग काय राजचा पूर्वइतिहास उफाळून बाहेर आला तो ‘बॉबी’ म्हणून. खरं म्हणजे त्याच्या डोळ्यात ‘नर्गिस’ हेच नाव असावं. (हे खरं ‘सायकॉलॉजिकल स्टेटमेंट’ आहे.)
म्हणूनच प्रेमप्रसंग दाखवण्यात राज कुठेही तोकडा पडलेला नाही. ‘बॉबी’चं चित्रण पाहात असताना त्याचं स्वत:चं जीवन चरित्र तो पाहतोय. एवढ्यासाठीच हा सारा खटाटोप. चित्राची ‘टेक्निकल’ साईड एकदम ‘टॉप’! चित्राची गाणी एल.पी.नी तयार केलीत, लिहिलीत आनंद बक्षीनी. आर.के.ला काय पाहिजे हे एल.पी.ला माहीत आहे. कारण त्यांनी पूर्वीची आर.के.ची गाजवलेली चित्र वाजवलेली आहेत. त्यांनी आपलं काम चोख बजावलंय. चिंटू ऊर्फ ऋषीने आपल्या वडिलांची उचलेगिरी करताना आपल्या काकाच्या (शशी) ष्टाईलने काम केलंय. प्राणने नेहमीप्रमाणे कामात प्राण ओतला नसला तरी प्रेमनाथने आपल्या ‘ढांसू’ कामाने प्रत्येकात प्रेम निर्माण केलंय यात वाद नाही. दुर्गाबाई खोटे यांच्या कामात खरेपणा भरपूर आहे. प्रेम चोपडाला उगाच पावावरच्या मस्क्यासारखा चोपडून ठेवलाय. इथे चमन्या शेट्टीही चालला असता.
थोडक्यात, या चित्राचा तरुणांनी करमणूक म्हणून अर्थ घेतला तर ठीक आहे, पण जर ‘बाप से बेटा सवाई’ असा घेतला तर कित्येकांची जिंदगी बरबाद होईल. पण मला वाटते की, राज कपूरच्या चित्राविषयी तरुण इतके ‘जागरूक’ नाहीत. नाहीतर त्यांनी त्याच्या ‘थीम’कडे दुर्लक्ष केलं नसतं, म्हणून तर ‘बॉबी’ हे चित्र तरुणांनी एका डोळ्याने पाहावं नि दुसर्या डोळ्याने सोडून द्यावं यातच त्यांचं भलं आहे.
– शुद्ध निषाद