देशावरील प्रत्येक संकटात महाराष्ट्र सर्वात आधी धावून जातो (फोटोशॉप करून अस्तित्त्वात नसलेल्या ठिकाणी धावून गेल्याचे फॉरवर्ड तयार करतात ते प्रसिद्धीजीवी वेगळे); म्हणून हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला, असे म्हटले जाते. पण महाराष्ट्रावर आपत्ती आली तेव्हा मदतीला कोण आले होते? इथल्या सूर्याजी पिसाळांच्या अवलादी तर दिल्लीकडे तोंड करून जिभल्या चाटत बसल्या होत्या.
– – –
मुंबईसह महाराष्ट्र अखेर मास्कमुक्त झाला, निर्बंधमुक्त झाला, ही फार मोठी घटना आहे. गेल्या दोन वर्षांत आपण काय काय सोसले, आपल्या मुलांवर काय काय परिणाम झाले, या सगळ्याचा अंदाज यायलाही अजून बराच काळ जावा लागेल. एक मात्र निश्चित आहे, कोविडकाळात आपण महाराष्ट्रात होतो आणि महाराष्ट्रात ठाकरे सरकार होते, याबद्दल महाराष्ट्रीय जनतेने परमेश्वराचे आभारच मानले पाहिजेत, अशी अव्वल कामगिरी आपल्या राज्याने करून दाखवली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कुटुंबप्रमुखाची भूमिका विशेष चर्चिली गेली. राष्ट्रीय नेतृत्त्वाने कधीही टीव्हीवर उगवून धक्कादायक निर्णय जाहीर करायचे, नाट्यमय भाषणबाजी करायची, टाळ्याथाळ्या वाजवण्यासारख्या भंपक कल्पना मांडायच्या हे पाहण्याची सवय झालेल्या मराठीजनांसाठी उद्धव ठाकरे यांचे टीव्हीवरील आश्वासक, धीरोदात्त आणि दिलासादायक संबोधन फारच वेगळे आणि कौतुकास्पद ठरले.
कोविड परिस्थितीतून बाहेर पडत असताना आठवते आहे ती मे २०२१च्या मे महिन्यात युवासेनाप्रमुख आणि महाराष्ट्राचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी सीएनबीसी या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या नॅन्सी हंगरफोर्ड आणि तनवीर गिल यांना दिलेली एक छोटीशी मुलाखत. महाराष्ट्रातील कोविड परिस्थिती हा मुलाखतीचा विषय होता. मुलाखतीत आदित्य ठाकरे म्हणाले होते की महाराष्ट्रातील कोविड परिस्थिती उद्धवजींच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रभावीपणे हाताळली, याचे सुप्रीम कोर्टानेही कौतुक केले असले तरी हा धोका संपूर्णपणे टळेपर्यंत आम्ही सजग राहणार आहोत. आदित्य यांनी अतिशय आत्मविश्वासाने अस्खलित इंग्लिशमध्ये कोविडसोबतच्या लढाईसाठी आणि लसीकरणासाठी महाराष्ट्र कसा सज्ज आहे, हे सविस्तर सांगितले होते त्या मुलाखतीत. महाराष्ट्राचे उगवते नेतृत्त्व किती प्रगल्भ, परिपक्व आणि विनम्र आहे, याचे दर्शन त्या मुलाखतीतून घडते.
कोविड काळातली जागतिक परिस्थिती आणि भारतातील परिस्थिती यांच्यात जमीन अस्मानाचे अंतर होते. जगातील इतर देशांत कोरोनाबाधितांचे प्रमाण जास्त असलेल्या शहरांना, राज्यांना केंद्रीय सरकारांनी प्रचंड मदत केली. न्यूयॉर्कसाठी अमेरिकेने आरमारातील सुसज्ज तरंगते हॉस्पिटल किनारपट्टीवर आणले होते. चीनच्या केंद्र सरकारने कोरोनाचे जागतिक केंद्रस्थान असलेल्या वुहान शहरात दहा हजार आरोग्य कर्मचारी विशेष विमानातून निव्वळ एका दिवसात पाठवले आणि मी वुहानसोबत आहे असा संदेश प्रत्येक चिनी नागरिक देत होता. इटलीसोबत सगळा युरोप एकदिलाने उभा राहिला होता. महाराष्ट्रात मात्र हक्काची मदत देखील मिळण्यात अडचणी येत होत्या. दिल्लीची थुंकी झेलणारे इथले कणाहीन महाराष्ट्रद्रोही विरोधक कोविडकाळात मुख्यमंत्री निधीत द्यायची मदत बेहिशोबी आणि खासगी स्वरूपाच्या फंडासाठी पंतप्रधानपदाचा थेट गैरवापर करणार्या पीएम केअर्स फंडात देत होते. केंद्राचा असहकार आणि जणू काही महाराष्ट्रानेच (म्हणजे महाविकास आघाडी सरकारनेच) हा विषाणू जगात आणला असे भयंकर विषारी आरोप करणारे विरोधक, अशा परिस्थितीत सरकारने कोरोना संकटाशी लढण्याची तयारी केली. देशावरील प्रत्येक संकटात महाराष्ट्र सर्वात आधी धावून जातो (फोटोशॉप करून अस्तित्त्वात नसलेल्या ठिकाणी धावून गेल्याचे फॉरवर्ड तयार करतात ते प्रसिद्धीजीवी वेगळे); म्हणून हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला, असे म्हटले जाते. पण महाराष्ट्रावर आपत्ती आली तेव्हा मदतीला कोण आले होते? इथल्या सूर्याजी पिसाळांच्या अवलादी तर दिल्लीकडे तोंड करून जिभल्या चाटत बसल्या होत्या.
या परिस्थितीवर महाराष्ट्राने आणि मुंबईने जिद्दीने मात केली. मुंबई महानगरपालिकेने राबवलेल्या धारावी मॉडेलचे तर जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले आणि त्याचा पुरस्कार केला. सरकारने नेमलेल्या अकरा तज्ञ डॉक्टरांच्या समितीने आखून दिलेली उपचारसंहिता (कोविड प्रोटोकॉल) जगभर मान्य केली गेली. पहिल्या लाटेने मुंबईला मोठा हादरा दिला तर दुसर्याग लाटेने पुणे आणि इतर महाराष्ट्र विळख्यात घेतला. दुसरी लाट महाभयंकर होती आणि त्या लाटेने दिल्लीसह उत्तर प्रदेशाला देखील हादरा दिला. त्या, काहींच्या कल्पनेत ‘झपाट्याने विकसित झालेल्या’ राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले. मृतदेहांची काळजीपूर्वक, सन्मानपूर्वक विल्हेवाट लावण्याची यंत्रणाही कोलमडून पडली. या राज्यात गंगेच्या किनारी प्रेतांचा खच पडला होता, त्यावेळी महाराष्ट्रात मात्र जवळपास प्रत्येक रूग्णावर उपचार झाले आणि दुर्दैवी मृतांचे अंतिमसंस्कार कोविडचे नियम पाळून, नातेवाईकांच्या उपस्थितीत केले गेले. शिवतीर्थावरून उत्तर प्रदेशच्या सरकारचे भाडोत्री पोवाडे गाणार्यांनी आणि महाराष्ट्रातील जनतेला सचोटीचे आणि प्रामाणिकपणाचे उपदेशामृत कोरड्या भाषणातून पाजणार्यांनी आधी महाराष्ट्रात जे चांगले झाले आहे त्याला चांगले म्हणायची प्रामाणिक दानत एकदा तरी दाखवायला हवी.
महाराष्ट्रातील जवळपास सात टक्के म्हणजेच तब्बल ८० लाख जनतेला अधिकृतपणे कोविडची लागण झाली आणि त्यातील एक लाख ४७ हजार लोकांना मृत्यूने गाठले. या संख्येत चौदा देश महाराष्ट्राच्या पुढे आहेत. म्हणजेच महाराष्ट्र राज्य असूनही देशांच्या क्रमवारीत कोविड प्रभावितांच्या यादीत पंधराव्या स्थानावर आहे. भारतातील कोविडबाधितांपैकी १८ टक्के रूग्ण महाराष्ट्रात होते म्हणजे देशातल्या पाच रुग्णांपैकी एक मराठी होता. कारण, जागतिक प्रवासी आणि मालवाहतुकीचे महाराष्ट्र हे देशातील प्रमुख केंद्र आहे. मुंबई हेच गेटवे ऑफ इंडिया आहे. केंद्र सरकारने राजकारण आणि प्रचारबाजीसाठी वेळेवर आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांवर काटेकोर कोविड निर्बंध जारी न केल्यामुळे कोविडचा विषाणू भारतात आला, तो मुंबई आणि महाराष्ट्रात शिरला आणि पसरला. भारतातील इतर कोणत्याही मोठ्या राज्याने ८० लाख कोविड रुग्णांवर उपचार केले नाहीत, ते महाराष्ट्राने केले, ही महाविकास आघाडी सरकारसाठी आणि मराठीजनांसाठी अभिमानाची बाब आहे.
महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रावर आलेले हे प्रचंड मोठे संकट होतेच, पण हे जागतिक संकट होते. सतत दोन वर्षांहून जास्त काळासाठी एका संकटाशी अहोरात्र सामना करण्याची वेळ महाराष्ट्रावर कधीच आली नव्हती. याच काळात ताशी १०७ किमी वेगाच्या दोन चक्रीवादळांनी महाराष्ट्रातील किनारपट्टीवर धडक दिली. महाविकास आघाडी सरकारने या संकटातूनही महाराष्ट्र राज्याला सहीसलामत बाहेर काढले आणि देशाचा आर्थिक कणाही मजबूत ठेवला, त्याला इजा होऊ दिली नाही. यावर विरोधी पक्षाचे नेते किंवा त्यांचे केंद्रीय नेते यांनी कधी तोंडभरून कौतुक केल्याचे ऐकिवात नाही.
कोरोनाचे संकट थोपवण्यासाठी सर्वात आघाडीवर लढणारे महाराष्ट्रातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारीवर्ग यांचे उपकार महाराष्ट्राने कधीच विसरू नयेत. ते अहोरात्र जीव धोक्यात घालून राबले नसते, तर महाराष्ट्र वाचला नसता. पोलीस खात्याने काटेकोरपणे लॉकडाऊन राबवला म्हणून कोरोनाचा प्रसार रोखला गेला. महाराष्ट्रातले सर्व खात्यांचे अधिकारी कोविड संकटाचा मुकाबला एकदिलाने करत होते. ऑक्सिजन पुरवठ्याची जबाबदारी पाहणारे सिंचन विभागाचे अधिकारी आणि कोविड केंद्राचे व्यवस्थापन पाहणारे महानगरपालिकेचे इंजीनियर यांनी कधीही ‘हे आमचे काम आहे का,’ अशी सबब दिली नाही. केवळ कर्तव्य म्हणून नाही तर कोविडवर विजय मिळवण्याच्या ध्येयाने हे सर्वजण एकदिलाने काम करत होते.
कोविडकाळात ‘मार्मिक’मध्येच प्रकाशित झालेले एक पत्र आठवते. प्लाझ्माची गरज असलेल्या एका रुग्णासाठी त्याच्या नातेवाईकाने सर्व पक्षांचे दरवाजे ठोठावले. सगळ्यांनी मदतीचं आश्वासन दिलं. पण प्रत्यक्षात मदत मिळाली नाही. शिवसैनिकांशी संपर्क झाला आणि त्या नातेवाईकाला उलट चार फोन आले, तुम्हाला काय मदत हवी आहे, कुठे हवी आहे, आमच्या अमुक शाखेतून तमुक माणूस ती व्यवस्था करेल आणि तशी व्यवस्था झाल्यावरच शिवसैनिक स्वस्थ बसले. सळसळत्या चैतन्याने भरलेल्या शिवसैनिकांनी रुग्णवाहिकांबरोबर अन्य सर्व प्रकारची मदत अहोरात्र केली. शिवसेना ही सामाजिक संघटना आहे, सत्ता मिळाली की ती सामाजिक दायित्व विसरत नाही, याची साक्ष शिवसैनिकांनी दिली.
या महामारीत अनेकांनी जवळचे लोक गमावले. महामारीच्या काळातही क्षुद्र राजकारण कोण करत होते आणि लाखमोलाचे जीव वाचवण्यासाठी कोण झटत होते, हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेले आहे. उत्तर प्रदेशातील जनता निर्बंधमुक्त होण्याआधीच रस्त्यांवरून करावी लागलेली पायपीट विसरली, आपल्याच राज्यात प्रवेश करायला झालेली चोरी विसरली, मैदानांत, उघड्यांवर धडाडलेल्या चिता विसरली आणि गंगेत वाहिलेली प्रेतेही विसरली… फुकटच्या रेशनला भुलताना या रेशनचा स्वयंपाक करायला लागणारा गॅस परवडणार आहे का आणि बाकीचं सामान महागल्यावर रेशनचा उपयोग काय, हेही तिच्या लक्षात आले नाही. समाजाचे प्राधान्यक्रम इतक्या वाईट पद्धतीने चुकल्यामुळेच अजूनही तिथल्या माणसाला उदरनिर्वाहासाठी महाराष्ट्राचा आणि मुंबईचा रस्ता धरावा लागतो… कोविडकाळात चेहर्याचा एक भागच बनून गेलेला मास्क उतरवताना आणि मोकळ्या निर्बंधमुक्त हवेत श्वास घेताना मराठी माणूस मात्र ठाकरे सरकारची त्या संकटकाळातली अव्वल कामगिरी विसरू शकणार नाही.