• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावर शंकराचार्यांचे शिक्कामोर्तब

- प्रशांत कदम (दिल्ली दिनांक)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 25, 2024
in कारण राजकारण
0

ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य मुंबईत आले, ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटले, ठाकरेंनी त्यांचा विधिवत मानसन्मान केला. त्यानंतर शंकराचार्य काही बोलले. एरव्ही खरंतर या गोष्टीची फारशी राजकीय चर्चा झाली नसती. धर्मसत्ता आणि राज्यसत्ता वेगवेगळ्याच मार्गाने चालत असतात. त्यांचा एकमेकांच्या वाटांवर अतिक्रमण न करण्याचाच संकेत असतो. पण एकमेकांचा आदर आणि साहचर्य ठेवून दोन्ही आपापल्या मर्यादांमध्ये राहिले तरच ते अधिक उचित ठरतं. शंकराचार्यांच्या ‘मातोश्री’ वरच्या भेटीला मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाची बदलती पार्श्वभूमी आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न होत असतानाच शंकराचार्यांनीच त्यांच्या हिंदुत्वाला एकप्रकारे क्लीन चिट दिली. त्यामुळे या भेटीचे महत्त्व राजकीयदृष्ट्या सुद्धा वेगळं आहे. भाजपची साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याचा आरोप भाजपकडून केला जात होता. सभेत ते आता पूर्वीप्रमाणे ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू-भगिनींनो’ म्हणत नाहीत, बाळासाहेबांची शिवसेना असती तर काँग्रेससोबत कधीच गेली नसती, असं म्हणत ठाकरेंचं हिंदुत्व आता पूर्वीसारखं कणखर नसल्याची प्रतिमा बनवली जात आहे.
खरंतर भाजपच्या आणि शिवसेनेच्या हिंदुत्वात पहिल्यापासून फरक आहेच. युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्याबाबत जी विधानं केली त्यातूनही हा फरक लोकांपर्यंत पोहोचायला सुरुवात झाली. शेंडी जानव्याचं हिंदुत्व नको, तर अठरापगड जातींना एकत्रित बांधणारं हिंदुत्व हवं आहे; थाळ्या आणि घंटा बडवणारं हिंदुत्व नको, तर अतिरेक्यांना कंठस्नान घालणारं हिंदुत्व हवं आहे, असं ते जाहीर सभांमध्येही सांगत होते. भाजपने मात्र या मुद्द्यावर पद्धतशीरपणे अपप्रचार चालू ठेवला होता. राजकीय मैदानातून त्यावर भूमिका मांडल्या गेल्या असल्या तरी शंकराचार्यांनी या मुद्द्यावर बोलणं हे या वादाला एक प्रकारे पूर्णविराम दिल्यासारखं मानायला हवं.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद तसेही परखड वाणीसाठी प्रसिद्ध आहेत. हिंदू धर्माचे शंकराचार्य असले तरी धर्माचे राजकारण करणार्‍यांना सुनावण्यास ते कमी करत नाहीत. शंकराचार्यांनी जेव्हा ‘मातोश्री’च्या भेटीनंतर राजकीय विधाने केली, ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्याचं महाराष्ट्रातल्या जनतेला पाहायचं आहे असं विधान केलं, तेव्हा या विधानावर टीका होऊ लागली. शंकराचार्यांनी राजकारणात पडण्याची काय गरज, त्यांनी राजकीय मुद्द्यांवर बोलू नये, मुख्यमंत्रिपदासाठी कोण योग्य, कोण अयोग्य हे सांगणं त्यांचं काम नव्हे अशी टीका सुरू झाली. पण टीकेचा समाचारही त्यांनी घणाघाती भाषेत घेतला. राजकारण्यांनी धर्मावर बोलणं सोडावं, आम्ही धार्मिक लोकं राजकारणावर बोलणं सोडू, हे त्यांचं विधान अनेकांची बोलती बंद करणारं होतं.
नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनात भाजप म्हणजे हिंदू समाज नव्हे मोदी म्हणजे हिंदू समाज नव्हे हे राहुल गांधींचे थेट विधान गाजलं होतं. त्याच्याही आधीपासून हीच भूमिका उद्धव ठाकरे यांनी कायम मांडली आहे. ‘मातोश्री’वर अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आले. उद्धव ठाकरेंसोबत दगाबाजी झाली आहे दगाबाजी करणारा हिंदू असू शकत नाही, दगाबाजी सहन करणारा हिंदू असतो, असं शंकराचार्य या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले.
गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा दगाबाजीचा मुद्दा चर्चेत आहे त्यावरून दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप होत असताना शंकराचार्य ठाकरेंच्या बाजूने उभे राहिले. ‘मातोश्री’वर त्यांचा विधिवत सन्मान होत असल्याची छायाचित्रे भाजप आणि त्यांच्या तमाम कार्यकर्त्यांसाठी जळफळाट निर्माण करणारी ठरली. भाजपच्या विरोधात बोलतात म्हणून शंकराचार्यांनाच हिंदू धर्मविरोधी ठरवण्यापर्यंत या कार्यकर्त्यांची मजल गेली आहे. मोदींच्या नेतृत्वानंतर नेत्यांच्या भक्तीचा जो संप्रदाय निर्माण होत चालला आहे त्याचीच ही फळं.
अविमुक्तेश्वरानंद ‘मातोश्री’वर येण्याच्या एक दिवस आधी अंबानींच्या लग्नामध्ये आमंत्रित होते. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्यांच्या समोर नतमस्तक झाले होते. पण त्याच शंकराचार्यांनी काही भूमिका मांडली की ती मात्र पचवायला जड जाते. त्यामुळे पंतप्रधानांचं नतमस्तक होणं हा केवळ देखावा होता का असाही प्रश्न निर्माण होतो.
खरंतर कुणाच्याही हिंदुत्वाला भाजपच्या प्रमाणपत्राची गरज नाही. हिंदुत्व ही कोणाची मक्तेदारी असू शकत नाही. पण गेल्या काही वर्षांपासून आपणच हिंदू समाजाचा ठेका घेतल्याप्रमाणे भाजपा आणि मंडळींचे वर्तन सुरू आहे. भाजपकडे हिंदुत्वाचा ठेका असता तर लोकसभा निवडणुकीत प्रभू श्रीरामाच्या अयोध्येतच भाजपचा दारुण पराभव झाला नसता. केवळ अयोध्याच नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामाचे वास्तव्य त्या सगळ्याच ठिकाणी भाजपचा पराभव झाला आहे. अयोध्या, रामेश्वरम ते नाशिक… एकही जागा अशी नाहीय जिथे भाजपचा विजय झाला. देशातल्या चारपैकी दोन शंकराचार्यांनी राम मंदिराच्या उद्घाटनात होत असलेल्या राजकारणाला विरोध करण्याचं धारिष्ट्य दाखवलं होतं. मंदिर पूर्णच नाहीये तर त्याच्या आधी प्राणप्रतिष्ठा कशी काय होऊ शकते हा त्यांचा सवाल होता. अविमुक्तेश्वरानंद हे पण त्या विरोधकांपैकी एक होते. जे धर्मशास्त्रात बसत नाही ते करण्याचा घाट केवळ राजकारणापोटी का घातला जातोय हा त्यांचा सवाल होता. अर्थात त्यांच्या या विरोधाकडे राजकीय भूमिकेतूनही पाहिलं गेलं. मोदींच्या विरोधात जो बोलेल तो अगदी शंकराचार्य असला तरी हिंदूविरोधीच या न्यायाने भक्तगण त्यांच्यावर उसळले.
पण घडले भलतेच. देशभरात राम मंदिराच्या मुद्द्यावर आपण राजकीय लाभ उठवू अशा भ्रमात असलेल्या भाजपला खुद्द अयोध्येनेच झटका दिला. २०२४च्या निकालाचा सगळ्यात मोठा संदेश याच्यापेक्षा वेगळा काय असू शकतो? सध्याचे जे शंकराचार्य आहेत त्यापैकी सर्वात तार्किक भूमिका मांडणारे शंकराचार्य म्हणूनही अविमुक्तेश्वरानंद यांच्याकडे पाहिलं जातं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद स्वीकारलं, तेव्हा देखील अविमुक्तेश्वरानंद विरोधात होते. एक संन्यासी या पदावर कसा काय येऊ शकतो हा त्यांचा प्रश्न होता.
देशात चार ठिकाणी शंकराचार्यांची पीठे आहेत. हिंदू धर्मात या पीठांना सर्वोच्च स्थान आहे. त्यापैकी उत्तराखंडमधल्या ज्योतिर्मठाचे शंकराचार्य कधीच भाजपच्या वळचणीला राहिलेले नाहीत. अविमुक्तेश्वरानंद यांचे गुरू स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे देखील बेधडक विधानांसाठी प्रसिद्ध होते. या पार्श्वभूमीवर अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी ‘मातोश्री’वर येऊन ठाकरेंना आशीर्वाद देणे ही निर्भीडतेची परंपरा कायम ठेवल्याचं निदर्शक होतं. शंकराचार्यांनी देशाच्या चार कोपर्‍यात चार पीठे स्थापन करून एक प्रकारे देशाला राष्ट्रीय एकात्मतेत बांधण्याचा पहिला प्रयत्न केला होता. उद्धव ठाकरे यावेळी जाहीर सभांना संबोधित करताना माझ्या तमाम देशभक्त बंधू भगिनींनो असा उल्लेख करत होते… शंकराचार्यांच्या वारसांनी उद्धव ठाकरेंची भेट घेणं यातून हिंदुत्व आणि एकात्मता या दोन्ही मुद्द्यांवर ठाकरे एक प्रकारे योग्य मार्गावर असल्याचीच ग्वाही आहे असंही म्हणता येईल.
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिमांच्या मतांमुळेच जणू आपला पराभव झाला असं चित्र रंगवण्याचं काम महायुतीकडून सुरू आहे. आपला पराभव झालाच नाही हे दाखवण्यासाठी वेगवेगळ्या टक्केवारी आणि गणितांची स्पर्धा चालू आहे. काँग्रेससोबत गेले या एका मुद्द्यावर लगेच ठाकरे हे हिंदूविरोधी ठरवले गेले. पण जे शिवसेना संपवायला निघाले त्यांना शरण न जाता त्यांच्यासमोर स्वाभिमानाने लढणं ही बाळासाहेबांचीच शिकवण नाही का? दिल्लीसमोर न झुकता ताठ मानेनं लढत राहणं हेच बाळासाहेबांना आवडलं नसतं का? महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर फेक नॅरेटिव्ह हा शब्द चर्चेत आहे. आपल्या अपयशाचं सगळं खापर हे या फेक नॅरेटिव्हवर फोडण्याचं काम चालू आहे. पण शिवसेना फोडून आमच्यासोबत असलेली शिवसेना हीच खरी शिवसेना सांगत सुटणं हेच खरं तर सगळ्यात मोठं फेक नॅरेटिव्हवर नाही का? लोकसभा निवडणुकीच्या निकालाने त्याचा पैâसला जनतेच्या दरबारात झाला आहेच. कोण असली कोण नकली याचा कौल मतदारांनी मतपेटीतून दिला आहेच. शंकराचार्यांच्या मातोश्रीवरच्या उपस्थितीने हे फेक नॅरेटिव्ह जनतेसमोर अधिक काळ पसरवणं आणखी जड जाणार हे निश्चित.

Previous Post

खर्‍या हिंदुत्वाचे खणखणीत नाणे!

Next Post

शाहीर केशवाचे पोवाडे

Next Post

शाहीर केशवाचे पोवाडे

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.