नासिर हुसेन यांचं नवं चित्र ‘यादों की बारात’ पाहिलं. खूप हसू आलं. तसं चित्र विनोदी नव्हतं, पण केवळ चित्र काढण्याची एक ‘खुजली’ आहे, म्हणून काहीतरी करायचं यातलाच हा प्रकार. एक आठवा पाहू. ‘प्यार का मौसम’ या चित्रात हाच मसाला येऊन गेलाय. भारत भूषण म्हणतो एक थीम साँग ‘तुम बिन जाऊ कहां’ त्याचा मुलगा ३ वर्षांचा. दुष्मन लोक त्याचं घर जाळतात. पुढे भारत आणि त्याची बायको निरुपा रॉय यांची ताटातूट. पोराला एक इसम पळवतो. भारताला वाटतं निरुपा मेली. तो वेडा होतो. एकूण तिघाजणांना तीन वाटा मिळतात. मासळी बाजारात कोळणी जशा कोलंबीचे ठरावीक वाटे करतात नि विकतात तसेच नासिर हुसेन यांनी आपल्या नव्या चित्रात आईवडिलांना ठार मारून आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे तीन वाटे तीन भावांना करून दिलेत आणि सवयीप्रमाणे त्यांच्या तोंडात आपल्या आईने गायलेलं ‘यादों की बारात’ हे गाणं कोंबायला ते विसरले नाहीत. कारण शेवटी तीन भावांना एकत्र आणण्यासाठी, खूण पटवण्यासाठी हे गाणं हा एकुलता एक पुरावा असतो ना! आता ठरवलं त्याप्रमाणे होणारच!
मोठा पोरगा शंकर (पडद्यावर धर्मेंद्र) आपली एन्ट्री छान घेतो. पण त्याला जे गायब केलं जातं ते मध्यंतरानंतर दर्शन घडतं. कारण दुसरा भाऊ विजय अरोरा झीनत अमानबरोबर प्रेमाचा हैदोससुद्धा घालत असतो. म्हणजे पहिला नायक कोरडा ठेवलाय. गुडू तिसरा भाऊ हॉटेलमध्ये स्पॅनिश गिटार घेऊन ‘झ्यँग झ्यँग झ्यँग झ्यँग’ करत असतो आणि १५ वर्षांपूर्वीचं गाणं म्हणत आपल्या भावांची तलाश करत असतो. म्हणजे तिघा भावांना तीन कामं दिलीत. एकाला आईवडिलांच्या खुनाचा बदला घ्यायचा. दुसर्याला फक्त श्रीमंत पोरींवर प्रेम-मौज करायची आणि तिसर्याला नुसतं झिंगझ्यांग करत गायचं.
आश्चर्य वाटतं ते असं की मुंबईच्या बड्या हॉटेलांत शस्त्रधारी अनेक सैनिक बाळगणारा, गुप्त दरवाजांचे तुरुंग आणि अनेक उचापती, केव्हाही खून, लुटालूट करणारा डाकू राहातो आणि पोलीस डिपार्टमेंट फक्त तंगड्या वर करून बसतं! याचा अर्थ असा निघतो पोलीस खातं याला सामील आहे. लाचखोर आहे. तसं नसतं तर अशा चित्रपटांना सेंसॉरनं प्रदर्शनाची पावती दिली नसती.
असो. धर्मेंद्रने त्याला मिळालेलं काम झकास केलंय. इंग्रजी अॅक्टरच्या तोडीचा ‘स्मॉशिंग नि डॅशिंग’ काम करणारा हा एकटाच अॅक्टर आहे नि पुन: तो फर्मात आहे. पण त्याला मध्ये गायब करून एक विनोदच केलाय. झीनत अमानने ठीक केलंय काम. (कमी कपड्यात). विजय अरोरा सुधारतोय. पण त्याच्या डोळ्यांकडे पाहिलं की आंधळा वाटतो. काय कुणास ठाऊक! आर्डी बर्मनच्या ठरावीक वेस्टर्न छाप संगीताने डोकं उठलं. त्यातल्या त्यात समाधान म्हणजे ‘यादों की बारात’ हे गाणं! एक दुष्मन, घर जळतंय, तीन व्यक्ती वेगळ्या करायच्या नि त्यांना गाण्यानं एकत्र आणायचं हाच नासिरखानी फार्म्युला! तेव्हा हे चित्र ‘यादों की बारात’ (वरात) आहे की अकलेची वरात आहे हे तुम्हीच सांगा. काय?