हे संपादकीय लिहिले जात असताना सोशल मीडियावर एक फोटो प्रसृत झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे नंबर २चे नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह हे मुंबईच्या भेटीवर आलेले असताना त्यांनी एका प्रसिद्ध मंडळाच्या गणेशोत्सवात जाऊन श्री गणरायांचे दर्शन घेतल्याचा हा फोटो आहे… यावेळी चाटुकार मराठी माध्यमांनी ‘शाह यांच्याकडून गणेशाचे दर्शन घेतले जाईल’ अशी गणरायांना दुय्यम स्थान देणारी बातमी झळकवून लोचटपणाची हद्द गाठली, तो वेगळा विषय. या फोटोत अमित शाह यांच्याबरोबर मुख्यमंत्री, एक उपमुख्यमंत्री (जे राज्याचे आजवरचे सर्वात अपयशी गृहमंत्रीही आहेत), राष्ट्रीय पदाधिकारी विनोद तावडे आदी मंडळी दिसत आहेत… गणेशोत्सवाच्या उत्साही वातावरणात गणेशदर्शन केल्यानंतर या सर्वांच्या चेहर्यावर जी भक्तिभावाची प्रभा उजळायला हवी, जी शांतता नांदायला हवी, तिचा लवलेशही इथे दिसत नाही… किंबहुना, श्री गणरायांनी सोंडेने सगळ्यांचे गाल ‘प्रेमाने’ थापटले असावेत, असे पडलेले चेहरे आहेत सगळ्यांचे…
विचार करा, राज्याची सत्ता या एक घरफोड्या आणि दोन ईडीग्रस्त लबाड यांनी जबरदस्तीने बळकावलेली आहे, राज्याच्या तिजोरीतून स्वप्रचारासाठी वारेमाप उधळपट्टी चालवलेली आहे, सगळ्या सरकारी यंत्रणा सरकारची, पर्यायाने या महायुतीची भलामण करण्यासाठी जुंपलेली आहे, लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे… बहिणीचं मतपरिवर्तन व्हायला वेळ मिळावा, दाजी खूष व्हावेत, यासाठी निवडणूक आयोगावर दबाव आणून निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत, राज्यातल्या नगरपालिकांवर राज्य सरकारचा अंकुश ठेवण्यासाठी तिथल्या निवडणुकाही घेतल्या गेलेल्या नाहीत… राज्यातल्या लोकशाहीचा पुरता बट्ट्याबोळ वाजवल्यानंतरही या सगळ्यांच्या चेहर्यावर तेज नाही, विश्वास नाही, टेन्शन आहे… कारण, या सगळ्यांना माहिती आहे की यंदाच्या गणेशोत्सवानंतर दसरा-दिवाळी साजरे झाल्यावर या सरकारचं विसर्जन नक्की आहे… राज्यातल्या जनतेने तसा निर्धारच केला आहे.
…म्हणूनच गणेशदर्शनाच्या आधी शहा महोदयांनी राज्यातली सत्ता बेकायदा बळकावलेल्या महायुतीच्या बैठकीत सगळ्यांना कानपिचक्या दिल्या. एकमेकांमधले मतभेद जनतेसमोर आणू नका, असं बजावलं.
निवडणुका जवळ आल्यावर वेगवेगळी सर्वेक्षणं केली जातात, पोलिसांपासून इतर यंत्रणांच्या मार्फत गुप्त अहवाल मागवले जातात. काही सर्वेक्षणं खोटी असतात. राज्यात आपलीच सरशी होणार आहे, असं लोकांना भासावं यासाठी गोदी मीडियाला हाताशी धरून ती करून घेतलेली असतात. जी अंतर्गत सर्वेक्षणं असतात, ती अनेकदा बाहेर येतच नाहीत. कारण, आज कोणत्याही पक्षाने केलेल्या सर्वेक्षणातून हेच दिसून येतंय की लाडकी बहीण, लाडके दाजी (खरा अर्थ एकच : लाडके कंत्राटदार) वगैरे कोणतीही योजना आणली तरी तिचा काहीएक फायदा होणार नाही. हरयाणा आणि जम्मू काश्मीरप्रमाणेच महाराष्ट्रातही सत्तापालट होणार, भारतीय जनता पक्षाची अवस्था न घर का, न घाट का अशी होणार आणि या निवडणुकांनंतर नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्रातल्या एनडीए सरकारच्याही अखेरच्या घटका मोजायला सुरुवात होणार, हे आता पुरेसं स्पष्ट आहे. तेच सगळी सर्वेक्षणं सांगतायत. या मंडळींचे चेहरेही तेच सांगतायत. आता आजचं मरण उद्यावर ढकलण्यासाठी काय करता येईल, याच्या चर्चा करण्यापलीकडे यांच्या हातात काहीच उरलेलं नाही.
काही काळापूर्वी लाडकी बहीण योजनेचे ढोल वाजायला लागले, तिचं क्रेडिट घ्यायला एक उपमुख्यमंत्री आणि त्यांचा अख्खा पक्ष नको त्या वयात, तसा स्वभाव नसताना गुलाबी रंगात रंगूनही होऊन गेला, तेव्हा आता सगळ्या माताभगिनी रांगा लावून आपल्यालाच मतदान करतील, अशी गोड गुलाबी स्वप्नं ही मंडळी पाहू लागली होती. पण, इकडे दीड हजारांची ओवाळणी (तीही बहिणींच्या पर्स आणि भावोजींची पाकिटं यांच्यावरच हात मारून) घालत असताना तिकडे बदलापुरात चिमुरडी भाचीही सुरक्षित राहण्याची शक्यता नाही, हे बहिणींना दिसलं नसेल का? जिथे सरकारने लोकक्षोभ लक्षात घेऊन आरोपीला जेरबंद करायचं, तिथे त्याला वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न झाले, शाळेच्या पदाधिकार्यांचा बचाव झाला आणि अत्याचाराची तक्रार घ्यायला अनुत्सुक असलेले पोलीस उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करताना मात्र तत्पर असल्याचं दिसलं, हे बहिणींनी पाहिलं नसेल का?
पाठोपाठ उद्घाटनजीवी आणि फोटोजीवी नेत्याच्या प्रसिद्धीच्या राक्षसी हव्यासापोटी महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हाही तीच गुर्मी आणि तीच चापलुसी? तिघांनी एकत्र येऊन छत्रपतींपुढे नाक घासलं असतं तरी जनतेने माफ केलं असतं. पण, ती अक्कल सुचायलाही दोघांना उशीर झाला. तिसर्यांना अजून तशी बुद्धी झाली नाही. पंतप्रधानांनी माफी मागितली ती महाराष्ट्रावर उपकार केल्याच्या थाटात.
महाराष्ट्राच्या डोळ्यांवर जी काही झापडं लोकानुनयी योजनांमुळे आली असतील, ती दूर करण्याचं काम या दोन घटनांनी केलं. गणेशोत्सवात कोकणात आपापल्या गावी रस्त्याने जाताना २० तास प्रवासात घालवलेल्या, खड्ड्यांमध्ये हाडं शेकलेल्या कोकणवासीयांनाही लोकसभा निवडणुकीत आपण वâाय चूक करून बसलो, हे कळलं असेलच.
आपल्या राज्याचे दिव्य शिक्षणमंत्री महोदय पुतळा पडल्याच्या घटनेनंतर म्हणाले होते, वाईटातून कधी कधी चांगलं निघतंच…
आता लक्षात येतंय की त्यांचं बरोबर आहे… निवडणुका केव्हाही लावा, यांचं कायमचं विसर्जन होणार आहे, याचंच भाकीत नियतीने त्यांच्या तोंडून वदवून घेतलेलं आहे.
गणपती बाप्पा मोरया!