• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

कातळशिल्पे

- सई लळीत (विचारवंतीण)

Nitin Phanse by Nitin Phanse
June 9, 2022
in मी बाई विचारवंतीण
0

परवा कुडोपीची कातळ शिल्प बघायला गेलो. भरदुपारी कडाडत्या उन्हात दोन वाजता निघालो. आमच्या बरोबर कातळशिल्पांवर स्केचेस काढणारे क्षीरसागर नावाचे चित्रकार होते. जाताना तर्‍हेतर्‍हेच्या विशेषतः राजकारणावर गजाली मारल्या. राजकारणावर एवढं बोललो की जसं काही एखादा मुद्दा राहिला असता तर आम्हाला गाडीतून उतरताच आलं नसतं!
तासाभरानंतर कुडोपीला येवून पोचलो.. गाडी लावली.. आणि रस्ता तुडवत, चढाव मागे टाकत माळावर जावून पोचलो. आता माळावर साधारण अरधा तास चालायचं. माळावर मऊशार चमकदार करड.. म्हणजे एक सोनेरी गवत! किती झाडं असतील ही? एक कोटीभर असतील.. किंवा पाचशे हजार कोटी… साधारणपणे! यातलं पाव गुंठ्यावर असलेलं गवत जर मंगळावर उगवून आलं असतं तर किती कौतुक झालं असतं. शास्त्रज्ञांनी प्रत्येक काडी मोजली असती.असो.. आईला खूप गृहित धरण्याची आपली वृत्ती आहेच.
काश्मीरला आखीव रेखीव सुंदर गुलाबाच्या बहरलेल्या बागा पाहिल्या आहेत.तरीपण ते एक प्रकारचं कृत्रिम सौंदर्य! असा गवताने लहरत असलेला चमकदार निरोगी माळ… आपलं शरीर आणि मनही निरोगी करुन टाकतो. माणसाने आठवड्यातून एक दिवस निव्वळ निसर्गात राहावं.. तो आपलं प्रदूषित शरीर आणि मन निकोप करुन टाकतो. आपल्या मनात तो अशी झाडू मारतो की ताणतणावांचं निर्मूलन होवून जातं. कधीकधी आपलं मन म्हणजे वाढवलेली जट असते… ती योग्यवेळी कापली नाही तर मळाचे तेलाचे थर त्यावर बसून एक किळसवाणं विकृत ओंगळवाणं रुप तयार होतं! त्यामुळे मनाला कापून, विंचरुन अधूनमधून ऊन दाखवायलाच हवं!
तर मग चालत चालत चालत आम्ही कातळशिल्पांकडे पोचलो. साधारण साठ कातळशिल्पं आहेत. ही आदिमानवाने रेखलेली आहेत. आपल्या तहानभुकेव्यतिरिक्त असं काहीतरी त्याला सुंदरपणे व्यक्त व्हावसं वाटलं, हेच किती छान. ही एक कलाक्षेत्रातली पहिली कोवळी पावलं होती.
सतीश लळीत यांनी कुडोपीच्या कातळशिल्पांबाबत पहिलं संशोधन केल्यामुळे त्यांना त्याबाबत विशेष आत्मीयता आहे. त्यामुळे त्या चित्रांमधल्या प्रत्येक रेषेबाबत त्यांच्या चर्चा सुरु झाल्या. फोटो घेणं सुरु झालं. मी आपली सगळं टकामका बघत होते.
मातृदेवतेचं चित्र अतिशय सुंदर आहे. रेषा अगदी फाईन आहेत. ही जाण थक्क करणारी आहे. चित्रांमधे प्रमाणबद्धता आहे. माशांची चित्रं पण छान आहेत. हत्तीचं छोटं (तरीपण मोठं) बाळ आहे (बेबी एलिफंट). त्यातली प्रमाणबद्धता आवर्जून लक्षात येते. काही ओळखीची तर काही अनोळखी चित्रं आहेत. काही अमूर्त शैलीतली चित्रं आहेत.त्यांनी ती मुद्दामच गूढ काढली की काढता काढता गूढ होत गेली.. (माझ्या चित्रांप्रमाणे) हा एक प्रश्न माझ्या मनात नुस्ता खणखणत राहिला.
प्राथमिक स्वरुपातील सुमार चित्रं ही त्यांनी सुरवातीला काढली असतील (रफ काम). आणि चांगली चित्रं ही नंतर सरावाने काढलेली असतील असं नवर्‍याचं मत पडलं. पण मला वाटलं की माझ्यासारख्या एखाद्या कलाकाराने ती चित्र कदाचित खूप सरावाने पण काढली असतील. नाही असं नाही.
यातली काही स्मरणचित्रं आहेत, तर काही काल्पनिक.. एक चित्र तर काहीच न कळल्यामुळे खूपच उच्च दर्जाचे झालेलं आहे.
एका ठिकाणी एक संपूर्ण पाय खोदलेला आहे. सुंदर आकाराचा.. एक पाय फक्त… सोबतीला दुसरा पायही नाही.
माझ्या मनात आलं की त्या काळच्या स्त्रियांनी काढलं असेल का एखादं चित्र? सहज… परवानगी वगैरे न घेता? तेव्हा कदाचित स्त्री पुरुष समानता असल्यामुळे तिचं खास करुन कौतुकही झालं नसेल..
कातळशिल्पं रेखणं हे कलेइतकचं थोडंसं शक्तीचंही काम आहे. तेव्हाच्या स्त्रिया नाजुक साजुक नसतील… दणकावून खोदून टाकलं असेल एखादं चित्र… तरीपण स्त्रीसुलभ असं चित्र म्हणजे फुलाचं वगैरे मला दिसलं नाही. कितीही आदिम काळ असला तरी फुलं फुललेली असणारच.
बहुतेक ते कोरलेले दोन मासे एखाद्या स्त्रीने काढलेले असावेत, असं वाटलं.
ती चित्रं खोदताना ही बाकीचं गुहाकाम चुकवतेय म्हणून बाकीच्या वैतागल्या असतील का, असा एक प्रश्न माझ्या मनात तरळून गेला एवढंच!
बाकी सर्व ठीक. हनुमान चालिसा हा एक शब्द सोडला तर.
हनुमान चालिसा कुणाला कितीशी पाठ येतेय, हा संशोधनाचा विषय आहे. लोकप्रतिनिधी आपला कामधंदा टाकून, लोकांचे प्रश्न समजून घ्यायचे, सोडवायचे सोडून हे सगळं जोडीजोडीने मिरवणुका काढतायत… किती हास्यास्पद वागणं चाललंय… हा चिंतेचा विषय आहे.
हनुमान ही शारीरिक आणि मानसिक ताकद देणारी देवता आहे.. तिची ही थट्टाच चाललीय असं वाटतं. त्यात आणि त्यांच्या तोंडावर जे दिव्य भाव दिसताहेत, त्याला तोड म्हणतात ती नाहीच आहे. आपणच हनुमानाला दर्शन देतोय असे ते निरागस भाव आहेत! आपण साक्षात सीतामाई असून रामरायांच्या जोडीने आपण दंडकारण्यात फिरत आहोत, असे भाव फुल मेकअप केलेल्या चेहर्‍यावर दिसत आहेत. हनुमान आपला भक्त आहे असंही मधेच त्यांच्या चेहर्‍यावर झळकून गेलं तर काही नवल नाही.
कॅमेरा आपल्या प्रत्येक अ‍ॅक्शनवर रोखलेला आहे, याची जाणीव त्यांना एवढ्या लहान वयात आहे. हे केवढ्या वैचारिक प्रगल्भतेचं लक्षण आहे. अरे किती घासाल ती हनुमान चालिसा. खरंच जर एवढी भक्ती असेल तर प्ाहाटे उठून मनोभावे करा पूजापाठ (अर्थात आंघोळ करुन) आणि लागा कामाला. ती खरी पूजा आहे हो.. चमकेगिरी करणार्‍यांनो..! किती आरत्या ओवाळून घ्याल..! किती मिरवाल? तुमचं काम कधी दिसणार जनतेला? (गंमत म्हणजे तिथे त्यांनी बेरोजगारीबद्दल साकडं घातल्याचं अचानक त्यांना आठवलं) आता तरी ठिकाणावर या.. नाहीतर जनतारुपी हनुमानाने एक शेपटीचा फलकारा जरी मारला तरी उठणं कठीण होवून जाईल.
सगळ्या नव्याने निवडून आलेल्या लोकांचं सारवलेल्या जमिनीवर बसवून एक शिबीर घ्यायला हवं (आणि दुपारी मग पत्रावळीवर आमटी भात भाजी वाढायची. आमटी वाहून जावू नये म्हणून भाताचं अळं करायला शिकवायचं). लोकांचं जीवनमान चांगल्या अर्थाने उंचावण्यासाठी आपल्याला किती चांगली संधी आहे, हे बजावून सांगायला हवं. माझा खूप तडफडाट होतो असली सोंगं ढोंगं बघून… तुम्हाला काय वाटतं? फक्त मिरवायचंच असेल तर फिल्म लाइनलाच राहायचं.
हे असं वागणं म्हंजे आम्हा जनतेला शापच खुळ्यात काढल्यासारखं वाटतं बाई मला! एकदम कानकोंडं झाल्यासारखं वाटतं. मग कितीही ग्लास सोलकढी घेतली तरी असल्या गोष्टींचं पचन होत नाही. तुम्ही काय करता? हसून सोडून देता की काय? तसं करु नका.. गंभीरपणे सुंठ घालून चहा प्या. म्हणजे घसा शेकून विचार व्यक्त करायला बळ येईल. विचारांचे मंथन जे आहे ते करण्याची वेळ आता आलेली आहे. असं म्हटलं तर वावगं ठरु नये.
अरे.. नंतर खरी मजा आली (मजा कसली डोंबलाची!). दिल्लीहून आल्यावर (जसं काही दिल्लीला मोठा पराक्रम गाजवला होता) ऑलिंपिकमधे उंच उडीत सुवर्णपदक मिळाल्यासारखा भव्य सत्कार झाला (करणार्‍यांची आणि घेणार्‍यांची दोघांची पण भव्य दया आली.) मग साधारणपणे दहा अजगर एकत्र होतील एवढ्या लांबी-रुंदीचा (कदाचित अकराही होवू शकतात.. अजगर) भला टोणगा अजगरी हार त्यांना जेसीबीने घालण्यात आला. फुलांचा मारा दणकून सुरु होताच. तेव्हा जे कृतकृत्यतेचे भाव सडकून त्यांच्या तोंडावर दिसत होते, ते बघून हसावं की रडावं ते कळेना. मग मी अत्यंत केविलवाणेपणे हसले.
हे परमेश्वरा… एवढे दोनच शब्द मी तोंडातल्या तोंडात भव्यपणे पुटपुटले. बस.. यापरते काहीच नाही. खरी इटंबना तर नंतरच झाली. नंतर दोघांनाही दुग्धाभिषेक करण्यात आला (त्या तीर्थाचं पुढे काय केलं.. पत्त्या लागला नाही). दोघांचेही चेहरे कृतकृतकृत्यतेने माखलेले होते. याबद्दल मीडियाने प्रश्न विचारल्यावर ‘आम्ही हा अभिषेक आमच्या घरात केला, त्याला कोणीच आक्षेप घेवू शकत नाही,’ असं अत्यंत निर्भीडपणे स्वाभिमानाने तेजस्वीपणे ताडकन् उत्तर दिलं! जणू काही अशा अत्यंत खोचक प्रश्नाची ते चाणाक्षपणे वाटच बघत होते.
आणि मग पुढे काय होणार? माझी अचानक दातखीळ बसली आणि मी बसल्या जागी दिग्मूढ काय म्हणतात ती झाले!

Previous Post

उठाओ सायकल, चलो, चल पडो!

Next Post

स्मूदी : सोपं, सुटसुटीत, ताजं!

Next Post

स्मूदी : सोपं, सुटसुटीत, ताजं!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.