‘हिंदू धर्माचे माझ्यावर संस्कार झाले आहेत’, हे वाक्य मला अधिक भावले. मुस्लिम असूनही सर्वसमावेशक अशी भूमिका मांडली. हे ध्यानात घेऊन विचार मंथन चालू झाले. लाल गंधाचा कपाळावर टिळा लावणे हे हिंदूंचे प्रतीक आहे. ‘हिंदुस्थानी राष्ट्रपती‘ या मथळ्याला साजेसे, लाल टिळा हे योग्य प्रतीक वाटले. डॉ. अब्दुल कलाम यांनी भारताला क्षेपणास्त्रात शक्तिशाली बनविले. यासाठी तो टिळा साधासुधा न ठेवता क्षेपणास्त्राच्या आकारात चितारण्यात आला.
– – –
संधी, फुलपाखरासारखी भिरभिरत, हवेत फेर धरत, अलगद हातातून निसटणारी, तरीही आनंद देणारी… वादळात सापडलेल्या प्रचंड लाटांवर हेलकावे खाणारी… दाट जंगलातून मार्गस्थ होणारी काटेरी वळणा- वळणाची वाट… अचानक कड्याच्या टोकावर थांबणारी…खोल दरीचा अंदाज घेणारी… सिंहाच्या जबड्यात लपलेली… थुई-थुई नाचणार्या मोराच्या पिसार्यासारखी कल्पनातीत आनंदमयी भविष्याचा वेध घेणारी… अचूक वेळ आणि वेध यांचा ताळमेळ चुकल्याने जिवाच्या आकांताने पळणार्या श्वापदाची धडपड… हताशा… निराशेने गलितगात्र झालेलं मन आणि देह. तरीही काही क्षणांत दुसर्या संधीचे आडाखे बांधणारे मन… पहिल्या अपयशात काळाच्या गुहेत लपलेल्या यशाची बीज पेरलेली असतात, या उक्तीला ध्येय समजून मार्गक्रमण करणारे, आकाश पेलणारे… काहीतरी दैदिप्यमान, आलौकिक, उठावदार करून समाजाची दिशा बदलण्याची ईर्ष्या… इप्सित कार्याला बगल देऊन, ओंजळीत पडलेल्या नवीन संधीची तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणूक करून, त्यामधून नवतेचा माग काढीत दाही दिशा चित करणारे अनेक रथी-महारथी…
ज्या कोका-कोलाने जगभर अनेक पिढ्या पोसल्या, ज्याच्या स्वाद व चवीवर कोट्यवधी लोक आजही बेभान होऊन आनंद साजरा करताहेत, त्याचा संशोधक, वैद्यकीय रसायनशात्रज्ञ, फार्मासिस्ट, अमेरिकास्थित, जॉर्जियन जॉन स्टीथ पेमबेर्टोन. स्थानिक सैन्याचाही थोडासा भार सोसणारा… अमेरिकेत १८६५ साली गृहयुद्ध (सिविल वॉर) झाले. कोलंबसबरोबर झालेल्या युद्धात ते जबर जखमी झाले… वेदनांचा दाह कमी करण्यासाठी मॉर्फीनसेवन करू लागले. मॉर्फीनच्या आहारी जातोय व आपले आयुष्य बरबाद होईल या जाणिवेतून मॉर्फीनच्या व्यसनातून बाहेर पडण्याची ते संधी शोधू लागले. अनेक प्रयोग करून त्यांनी नवीन पेय तयार केले. थोडीशी दारू व कोकेन वापरून तयार केलेल्या पेयातून शरीरावर विपरीत परिणाम होऊ लागला. काही दिवसात कोकेन आणि दारूचा अंशही त्या पेयातून काढून टाकावा लागला. एक नावीन्यपूर्ण स्वादाच्या शीतपेयाची निर्मिती झाली. आनंदून त्याच्या मित्राने त्याचे नामकरण केले ‘कोका-कोला’’. फार्मासिस्ट आणि शीतपेयांची निर्मिती यांचा दूरान्वयानेही संबंध नसताना इच्छेविरुद्ध मार्ग बदलून जागतिक पातळीवर शीतपेयांच्या उद्योगाचा तो जनक ठरला. कोका-कोला कंपनीचे सर्व हक्क दुसर्या कंपनीला विकून तो या जगातून मार्गस्थ झाला.
असेच काही महान अवलिये भारतभूमीवर तळपून गेले. आपल्या मूळ उद्दिष्टाला बाजूला ठेवून- इच्छेने वा अनिच्छेने- मिळालेल्या संधीचे सोने करणारे. दक्षिण आप्रिâकेत वकिली करणारे मोहनदास करमचंद गांधी, केवळ काळा वर्ण म्हणून त्यांना रेल्वेतून बाहेर फेकले गेले. त्या अपमानाचा बदला न घेता, ती संधी समजून वकिलीचा कोट फेकून देऊन अंगावर केवळ पंचा नेसून स्वातंत्र्यसंग्रामाची मशाल हातात धरली आणि महात्मा झाले.
बाबा आमटे, बीएएलएलबी, प्रचंड श्रीमंत, ऐषारामी, सर्व सुखं हात जोडून सेवेसाठी उभी असलेले, गांधीजींची क्विट इंडिया चळवळीची हाक ऐकून स्वातंत्र्यसंग्रामाची दगड-धोंडे, काटे-कुटे, चिखल-खाजणाने माखलेली वाट तुडवत मार्गस्थ झाले; कालपरत्वे समाजसेवेचे पाईक बनून गरीब, सामाजिक बहिष्कृत, आदिवासी, अनपढ खेडूत आणि महारोग्यांचे मसीहा बनले… लोकांचे ‘बाबा’ झाले.
बाळासाहेब ठाकरे, मूळ व्यंगचित्रकार, पण मराठी माणसाच्या उद्धारासाठी राजकीय पटलावर अनभिषिक्त सम्राटासारखे वावरले. एमजीआर, एनटीआर दोघांनीही रुपेरी पडद्याची शान वृद्धिंगत केली आणि त्याच हिंमतीने राजकीय पटलावर तळपत राहिले. एम. के. करुणानिधी, उत्तम लेखक, ज्यांनी शंभर पुस्तके लिहून नंतर राजकीय इतिहासाच्या पुस्तकात स्वतःचे नाव अजरामर करून ठेवले. अशा अनेक जणांनी आवडत्या कार्यक्षेत्रात काम करायची संधी हुकल्याने, हिरमुसलेपणाला तिलांजली देऊन पदरात पडलेल्या संधीचे सोने केले.
असाच एक ध्येयवेडा तरुण लढाऊ विमानाचा वैमानिक बनून आकाशाला हात लावायची स्वप्ने पाहत होता. वैमानिकाची परीक्षा देऊन उत्तमरीत्या उत्तीर्णही झाला. पण वैमानिक होण्याची संधी अल्पशा कारणाने हुकली. मनात चर्रर्रर्रर्र झाले. ज्या खात्यात भरती होणार होती त्या ठिकाणी फक्त आठच जागा भरावयाच्या होत्या. दुर्दैवाने या तरुणाचा नंबर होता नऊ… निराशेचा काळा गडद पडदा फेकून तो संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) या संस्थेमध्ये शात्रज्ञ म्हणून रुजू झाला. हुशारी, संशोधक आणि समर्पण करण्याची वृत्ती, आदर्शवत वागणूक या गुणांच्या जोरावर ते भारताचे ‘प्रतीक’ बनले. त्यांचे नाव डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम.
निसर्गाचे वरदान लाभलेल्या माड- फोफळी, पानाफुलांनी बहरलेल्या, चारही बाजूंनी समुद्राचे हिरवट-निळे स्फटिकासारखे पाणी, त्यातून उसळणार्या अवखळ लाटांचा किनार्यावर होणार अभिषेक, रात्रीच्या निरव शांततेत ऐकू येणारी समुद्राची गाज, बाजूच्या परिसरातून आध्यात्मिकतेची जाणीव करून देणार्या मंदिरांच्या घंटांचा नाद, अशा वातावरणात तामिळनाडू राज्यातील रामेश्वरममधील पाम्बन बेटावरील तामिळ मुस्लिम कुटुंबात १५ ऑक्टोबर १९३१ साली कलमांचा जन्म झाला. पूर्वज अतिश्रीमंत व्यापारी, जमीनदार. कालांतराने दुर्दैवाच्या फेर्यात अडलेल्या कुटुंबाला गरिबीचे चटके बसू लागले. वडील रामेश्वरम ते धनुष्कोडीपर्यंत होडीतून भक्तांची ने-आण करण्याचा व्यवसाय करीत होते. आई-वडील, चार भाऊ व एक बहीण असा, वादळात सापडलेल्या फुटक्या जहाजाप्रमाणे परिस्थितीशी सामना करीत असणारा परिवार. डॉ. कलाम शेंडेफळ असल्यानं आईच्या मायेची उब त्यांच्या वाटेल अधिक. आईबद्दल ते म्हणतात, आई मला जे अन्न वाढत होती, तेवढे मी फस्त करीत होतो. भांड्यात काहीही शिल्लक राहिले नाही… आई उपाशी राहिली… मोठ्या भावाने मला बाजूला घेऊन तो प्रसंग सांगितला… मी थरारलो, हललो… तिला घट्ट मिठी मारून पदराखाली मुसमुसत राहिलो.
शालेय अभ्यासात ते उत्तम नव्हते. पण गणितात त्यांना अधिक रुची. गणिताची शिकवणी घेणारे स्वामियार नावाचे शिक्षक होते. अंघोळ करून पहाटे चार वाजता त्यांच्या घरी जावे लागे. अंघोळ केली नाही तर प्रवेश नाही. नंतर साडे पाच वाजता नमाज आणि कुराण शरीफ अरेबिकमधून शिकविण्यासाठी वडील घेऊन जात. त्यानंतर दुसर्या महायुद्धामुळे रामेश्वरम रेल्वे स्टेशनवर न थांबणार्या, मद्रास-धनुष्कोडी रेल्वेमधून प्लॅटफॉर्मवर फेकलेला वर्तमानपत्राचा गठ्ठा गोळा करून घरोघरी वर्तमानपत्र वाटप करीपर्यंत सकाळचे आठ वाजायचे. चार पैसे खिशात पडायचे.
रामनाथपुरम येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या विद्यापीठातून वैमानिक अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. डीआरडीओमध्ये डॉ. विक्रम साराभाई यांची साथ आणि मार्गदर्शन लाभले. त्यानंतर डॉ. कलामांच्या यशाचा घोडा चौफेर उधळू लागला. इस्रोमध्ये प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून बदली करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पहिले रोहिणी एसएलव्ही अवकाशात झेपावले व त्यापाठोपाठ पृथ्वी क्षेपणास्त्रही. क्षेपणास्त्रांचे सामर्थ्य वाढवून भारताला आण्विक क्षेत्रांत बळकट केल्याने त्यांना ‘मिसाइल मॅन ऑफ इंडिया’ ही उपाधी प्रदान करण्यात आली.
पोखरण-२ आण्विक परीक्षण यशस्वी झाल्यानंतर डॉ. कलाम यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. २००२ साली भारताचे राष्ट्रपती होण्याचे भाग्य त्यांना मिळाले. आतापर्यंतचे सर्व राष्ट्रपती काटकोन-चौकोनात वावरणारे.सरळ रेषेत कार्यकाळ व्यतीत करणारे डॉ. कलाम विरळाच.
ज्या व्यंगचित्रासाठी वरील शब्दपेरणी केली आहे ते व्यंगचित्र होते मार्मिक साप्ताहिकाचे मुखपृष्ठ. ‘हिंदुस्थानी राष्ट्रपती‘ असा त्याचा मथळा. ज्यावेळी डॉ. कलाम यांच्या नावाची भारताचे राष्ट्रपती अशी घोषणा झाली, त्यावेळी त्यांची पहिली प्रतिक्रिया… ‘मी जरी जन्माने मुस्लिम असलो तरीही मी संस्कृतचा अभ्यास केला आहे, भगवद्गीतेचा मी व्यासंगी आहे. रामेश्वरमच्या पुण्यभूमीत माझा जन्म झाल्याने हिंदू धर्माचे माझ्यावर संस्कार झाले आहेत. मी सर्व धर्माचा आदर करतो.’
आध्यात्मामध्ये त्यांना रस होता. स्वामीनारायण संप्रदायाचे प्रमखं स्वामी हे त्यांचे गुरु. ‘हिंदू धर्माचे माझ्यावर संस्कार झाले आहेत’, हे वाक्य मला अधिक भावले. मुस्लिम असूनही सर्वसमावेशक अशी भूमिका मांडली. हे ध्यानात घेऊन विचारमंथन चालू झाले. लाल गंधाचा कपाळावर टिळा लावणे हे हिंदूंचे प्रतीक आहे. ‘हिंदुस्थानी राष्ट्रपती‘ या मथळ्याला साजेसे, लाल टिळा हे योग्य प्रतीक वाटले. डॉ. कलाम यांनी भारताला क्षेपणास्त्रात शक्तिशाली बनविले. यासाठी तो टिळा साधासुधा न ठेवता क्षेपणास्त्राच्या आकारात चितारण्यात आला. डॉ. कलामांचे अर्कचित्र चितारताना त्यांचे निरागस हास्य, हसताना लक्ष वेधून घेणारे त्यांचे दात, फिल्मी अभिनेत्यासारख्या लांबट पण विचित्र केसांची ठेवण. त्यांचे नैसर्गिक बिनधास्त वागणे इत्यादीचे ध्यान ठेवावे लागले. सदर व्यंगचित्राला कॅरिकेचर बेस्ड कार्टून म्हणता येईल. इथे कॅरिकेचरला प्रथम स्थान असून कल्पनेला दुय्यम स्थान आहे. चित्रासाठी अॅक्रेलिक रंगांचा वापर केला आहे. छपाईनंतर हे रंग अधिक उठावदार दिसतात, मुखपृष्ठही आकर्षक होते. चित्रात राष्ट्रपती भवन चितारले आहे चित्र अधिक अर्थपूर्ण होण्यासाठी.
राष्ट्रपती असूनही अत्यंत साधी राहणी, घरामध्ये टीव्ही, फ्रिज, गाडी, एअर कंडिशन काहीही नाही, पुस्तके सोडून. एरोस्पेस इंजिनिअरिंग (वैमानिक अभियांत्रिकी) या विषयात प्राविण्य असल्याने देशात आणि परदेशात या विषयावरची त्यांच्या व्याख्यानांचे कार्यक्रम अनेक विद्यापीठांत विद्यार्थ्यांच्या तुडुंब गर्दीत संपन्न होत. त्यासाठी कधीही त्यांनी मानधन घेतले नाही. स्वसंरक्षणाची फिकीर न करता जनतेमध्ये ते सहज मिसळून जात, विशेतः विद्यार्थ्यांमध्ये. म्हणूनच त्यांना ‘तरुणांचे हिरो‘ ही पदवी मिळाली. गरिबीचा त्यांनी कधीही बाऊ केला नाही. तामिळमध्ये कविता करणे हा त्यांचा छंद होता. वीणावाद्यावर त्यांची बोटे अगदी सहज झंकार करीत.
त्यांना अनेक महत्वाचे मानसन्मान मिळाले. भारत सरकारने भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण यांनी अलंकृत केले. जागतिक नावाजलेल्या संस्थांनी त्यांच्यावर चाळीस ‘डॉक्टरेट’ पदव्यांचा वर्षाव केला. शेवटी मिळालेल्या संधीचे सोने करीत २०१५ साली शिलाँगमध्ये आपल्याकडील असलेली ज्ञानाची पुंजी विद्यार्थ्यांबरोबर रिती करता-करता ‘लोकांचे राष्ट्रपती‘ ही प्रेमाची चादर पांघरून इहलोकांची यात्रा संपवून परलोकात ज्ञानामृत पाजण्यास निघून गेले…
संधी हुकली किंवा इप्सित संधी मिळाली नाही याचे दुःख न करता, छोटी वा मोठी संधी याचा विचार बाजूला ठेवून मिळालेली संधी वरदान समजून त्यामध्ये झोकून देणे, सर्वांच्या भल्याचे…