(इघनपुरात प्रचारसभेचा मांडव टाकलेला. पुढं एकदोन खुर्च्या टाकलेल्या. स्टेजवर साताठ सोफे टाकलेले. त्याच्यावर गब्बर चारपाच टगे बसलेले. नाकापासून लावलेलं कुकू पार अर्ध्या कपाळात घालून काहींनी स्वतःचं ‘सौभाग्य’ वाढवलेलं. मागं मोराच्या पिसार्यातला हुकूमचंदांचा फोटो. सभेची दिलेली येळ उलटून वर घड्याळ दोनदा कोकलून थंडावलेलं. आयोजक, संयोजक, कार्यवाहक म्हणून जे जे जबाबदार असतील त्यांची पार धांदल उडालेली. पण एवढा येळ उलटून बी चार पत्तेबाजांशिवाय मांडवात कुणी आलेलं नाही. ते बी यायला कारण आजचे समालोचक श्री ईशीनाथबापू कोयमारेच! त्यांनीच निदान चार टाळकी मांडवात राहावी नि हुकूमचंदांची लाज झाकावी म्हणून केलेली ही यशस्वी शिष्टाई! कुणी त्यांना बखोट धरून चार टोपडे आणताना पाह्यलं असतं तर त्याला दांडगाईबी म्हणू शकलं असतं, पण ते बी असो. वायरमन कम इंजिणेर पिन्या वायरीच्या जंजाळातून माईक खेचत वर आणतोय, आणि तो सेट करायला झटतोय. तर एक बाजूला पुढल्या कोपर्यावर ईशीनबापूसह, विर्या, सुम्या असली चारेक पोरं उभी.)
ईशीनाथबापू : अय, विर्या! अरे काय झाली माणसं? तू तर म्हणला होता, गावात सकाळी सभा घ्या! नाही पब्लिक जमली तर मिश्या भादरा म्हणून? कुठंय पब्लिक?
विर्या : (निर्लज्जपणे) नव्हतीच जमणार पब्लिक. त्यात काय?
ईशीनाथबापू : पाह्यलं का पोरांयहो? हे असं अडबंगात निघतं. आता मी खरंच याच्या मिश्या भादरावा का?
विर्या : भादरा ना! तश्याबी पार्ची म्हणती लई टोचात्या. तेच तुम्ही फुकटात भादरून दिल्यात तर पन्नास रुपडे वाचतील आणि माझ्या कवातरी कामाला याल. काय? भादरत्या ना मग?
ईशीनाथबापू : पहाय सुम्या! तू म्हणतो, हे बेणं लई औषधी आहे. जपा त्याला! पण ते असं अंगभर उभरतं. ठिउन करायचं काय सांग अश्यानं? सुम्या उपत्याच्या चार दोन टोळ्या बोलवून घे. त्यांचा आजचा रोज लावून पैशे देऊ. काय? आणि कोणाला तरी पाठवून ट्युशनची पोरं बोलवून घ्या. आणि त्या कोपर्यावर बुटीपार्लरचा क्लास भरतो, तिथं पोरी र्हात्या, विर्या निदान त्यांना बोलवून आण. आपल्याला पंधरा वीस मिनिटात इथं पब्लिक दाखवावा लागंल! आवरा पटपट!
विर्या : इथं रोज चार चकरा मारून बी तिथल्या पोरी लवशीप देईना. त्या सभेला येतील व्हय?’
ईशीनाथबापू : झाली का तुझी कुटकूट सुरू? तुला एक काम धड जमत नाही. येड्या, तुला पोरी पटवायला नाही पाठवत! त्यांना सभेला बोलवायला लावलंय. तुह्या लग्नाचं आवत्नं द्यायला नाही पाठवलं? काय? जाय व्हय! (विर्या आणि सुम्या ताणंताणं जात्या.)
पिन्या : बापू जोडल्या बघा वायरी!
ईशीनाथबापू : उपकारच केला बाबा तू! आधी त्ये कुलर लाव! नेते म्हशींवानी तापलेत. जनावरं असते तर पाण्यात पोव्हडून आणले असते. बघतो काय? लाव पटकन कुलर! (तो कुठलंएक बटण दाबीतो. तसा कोपर्यातला फॅन अचानक फुल्ल स्पीडमधी फिरतो, तश्या सगळ्या नेत्यांच्या काळ्या-शेंदरी टोप्या उडून मांडवाच्या बाहेर जात्या.) ये, येड्या! बंद कर. कोणचे बटणं दाबू र्हायला तू? बरा तो साधा फॅने. जर का बेदाण्याच्या शेडवरला फॅन असता तर एखादा नेता स्टेजवरून घरंगळत गेला असता. गोटीवानी.
पिन्या : (घाईनं बटणं दाबीत) नाही हो! हे बघा, मघा चेंडू तात्याच्या लहाण्याला निळी वायर दोन लंबरच्या सॉकेटीत घाल म्हणलं. तर तेनी इथं झक मारून ठेवलीय.
ईशीनाथबापू : झक त्यानी नाही. मी मारलीय. तुला काम देऊन. आलरेडी सभा दोन घंटे उशिरा होऊ राहिली, पण अजून तुझ्या वायरी फिट्ट झाल्या नाही. जर सभा येळेत भरती तर येधळून पोहतूर पांगापांग व्हती. मग अशा येळी काय सभा संपल्यावर मागून आवाज काढता काय?
पिन्या : (काळजीने कळवळत) बापू तुम्ही चिडू नका ना! एकतर तुमचा बीपी तवाच हाय होतो अन् गोळ्या न्यायला चैतीबरुबर माला अख्खा मॉल पालथा घालावा लागतो. लय खर्च होतो हो!
ईशीनाथबापू : पण गोळ्या तर कोपर्यावरल्या मेडिकलात मिळत व्हत्या ना? अन् माझी गाडी असताना तुला काय गरज पडली?
पिन्या : बापू तुमच्याशी अख्ख्या पब्लिकची इमोशनल अटॅचमेंट आहे ना? एक आपलं तुमच्याशी, तुमच्या फॅमिलीशी, तुमच्या चैतीशी रिलेशन तयार झालंय. त्यातून अशी इनवोल्व्हमेंट होत र्हाती. ते महत्त्वाचं नाहीचे. आता करू का कुलर चालू?
ईशीनाथबापू : तू आधी माईक चालू कर बरं! आलीय चारदोन डोकी तर घेऊ दे सभा! (तसा तो परत बटणं दाबीतो. आणि ईशीनाथबापूच्या हातचा माईक खरखरू लागतो. ईशीनाथबापू माईकला फू फू करून पाहू लागत्या. तोच एक गांधी टोपी घातलेलं तिरसट म्हातारं ऐन स्टेजला खेटून ईशीनाथबापूच्या समोर उभं रहातं. वर कपाळाला आडवा हात लावून निरखून पाहू लागतं.)
पिन्या : बापू बघा, व्हॉल्युम बरोबरे का?
ईशीनाथबापू : (माईकमधी पण समोरल्या म्हातार्याकडं बघत) सर्व उपस्थित नागरिकांनी मागं जाऊन बसून घ्यायचंय. कुणीही उभं र्हाहू नका. काय? (तरी ते म्हातारं ढिम्म हलत नाही.) ओ, बाबा मागं बसा!
म्हातारं : का रे बाबा! जाऊ का काय घरी? तुला मी काही सहन व्हयना काय?
ईशीनाथबापू : तसं नाही बाबा. पण तुम्ही बसून घ्या! सगळे मागं बसू र्हायले ना?
म्हातारं : ज्याला बसायचं त्याला बसू दे ना! मला हे स्टेजवर कोण कोण बसलंय, ते बघायचं होतं. म्हणून माr इथं आलो.
ईशीनाथबापू : म्हणजे तुम्हाला भाषणं ऐकायची नाही का?
म्हातारं : हा आता ध्यानानी बोलणार असतील तर आयकीन ना!
ईशीनाथबापू : मग बसून घ्या बाबा! मागच्या लोकांना दिसू द्या!
म्हातारं : हां, त्यांना काय अडतंय? मी पार तुह्या पायापही उभाय. तुझा चेहरा, अख्खा तू नीट दिसशील. इथं काय अडतं?
ईशीनाथबापू : पण बाबा असं उभं बरं दिसतं का?
म्हातारं : मग तुझं असं काय बरं दिसतं का तू उभाय? र्हाऊ दे की मला उभा! आवर कर सुरू! परत घरी जाऊन म्हातारीला सरपण तोडून द्यायचंय.
ईशीनाथबापू : (काहीशा तिरिमिरीत) तर स्टेजवर उपस्थित अवमान्य नेतेगण यांच्या साक्षीने आपण आज श्री श्री हुकूमचंद यांच्या प्रचारार्थ ही भव्य सभा घेतोय. (तोच पुढलं एक कारटं मोठा भोंगा पसरवीत, गळणारी पॅन्ट दोन्ही हातांनी वर वढत जातं.) आज सगळ्या पंचक्रोशीत हुकूमचंदांनी गावाचं नाव वाढवलंय…!
म्हातारं : बाब्या! नाव वाढविलं म्हणजे केलं काय तेंनी? ते सांग! का आधी इघनपूर नावाचं गाव असल्याचं कुणाला ठाऊक नव्हतं का?
ईशीनाथबापू : (त्रासिक चेहर्याने) बाबा! तुम्ही बसून घ्या ना! मी बोलतोय ना? माझं भाषण चालुय हो!
म्हातारं : चालू दे की भाषण! लोकं ऐकत्याल! त्यांना बी कळंल, तुझाबी प्रचार होईल! काय?
ईशीनाथबापू : (मोठ्याने) आपल्या हुकूमचंदांनी गावचं नाव आणि वजन एवढं वाढवलं की नुस्त्या त्यांच्या शब्दावर त्या तालुक्याबाहेरच्या गावचं अन् तालुक्याच्या मोठ्या गावचं भांडण थांबवून दाखवलं होतं…!
म्हातारं : पोरा, हा हुकूमचंद लई अवघड, खौट, दादा असता की नाही? तर उत्तरेचा बरड बळकवणार्या ‘सचिन्या’ बेण्याला पाहून भिऊन थरथर कापला नसता! इथं कुणी हुकूमचंदासमोर नुस्त्यं उत्तरेतला ‘उ’ उच्चारला तरी याचीच दातखीळ बसती.
ईशीनाथबापू : ओ, काही काय? पंचक्रोशीतले सरपंच हुकूमचंदांना बैठकांना बोलवित्या, ते काय उगाच?
म्हातारं : बाळ्या, तो ज्या खुर्चीवर, गादीवर बसलाय ना? त्या स्थानावर कधी मोठ्ठाले माणसं बसून काम करून गेलीत, हा मान त्यांच्यामुळं मिळतोय. जसं यडधड्या वारसदाराला केवळ बापजाद्याच्या नावामुळं, पुण्याईमुळं समारंभात मानपान मिळतो, तसलाच प्रकार हा!
ईशीनाथबापू : पण तुम्ही विसरताय, त्यांनी गावाला प्रगतीपथावर नेलं, म्हणून त्यांना विशेष गांवगुरु म्हणून ओळखत्या…!
म्हातारं : (छद्मी हासत) वेस इकून नेसुचं घेणार्याची कसली आलीय प्रगती? छानछौकीत राहण्यासाठी प्रॉपर्टी विकणार्याला, विडीकाडीसाठी चीजवस्तू गहाण ठेवणार्याला ‘प्रगती’ शब्द कळत तरी असंल का? आणि प्रगती केलीय कशात? बोलणार्यांची तोंडं बंद करण्यात? गावच्या वस्त्या जाळण्यात? चुली विझवून गावकरी उपाशी ठेवण्यात? का जनावरातला देव शोधत माणसातला राक्षस जागवण्यात?
ईशीनाथबापू : (काकुळतीला येत) ठिके मानलं, तुमचं खरं! पण मग चार गावचे लोकं त्यांना बोलावून त्यांचा आदरसत्कार का करतात? काहीतरी असंलच ना?
म्हातारं : असतं ना, बाबा त्याच्यामागं कारण! आता हेच बघ, व्येही कसाही असला तरी लग्नायेवात त्याला धोतरपान, टॉवेल, टोपी देऊन त्याचा आब राखत्या ना? का? तो दारू पिऊन कारेक्रम खराब करू नयी म्हणून देत्या? तसं नसतं! व्याह्याला दिलेला मान घरात लग्न करून आणलेल्या पोरीचा हुरूप वाढवतं तर लग्नं लावून दिलेल्या पोरीला आधार देतं. तसलंच आहे हे! इथून त्या गावी गेलेल्या किंवा त्या गावाहून आपल्या गावी आलेल्यांसाठी ही उठाठेव र्हाती. आता तुला आणि तुझ्या हुकूमचंदाला या गावसंबंधाच्या गोष्टी कळायच्या नाहीच. पण बाबा, यावेळी गावकरी टोपल्यातल्या भाकरी आणि हाताला काम ह्या दोन गोष्टीवरच मतं देतील, हे ध्यानी ठेव! नाहीतर उगाच तुझा हा बेडूक फुगवायला जाशील अन् ऐन इलेक्षणात त्याचा बार व्हायचा! (अचानक त्याचं लक्ष मागे मोकळ्या मांडवावर जातं.) अर्रर्रर्र! इथं तर आलेली चारदोन डोकी पण निघून गेली की रे! चल मी बी जातो!