• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मोदींना नोटीस कधी पाठवणार?

- मर्मभेद

Nitin Phanse by Nitin Phanse
April 26, 2024
in मर्मभेद
0

शिवसेनेच्या मशाल गीतामधून हिंदू धर्म आणि जय भवानी हे उल्लेख काढावेत, अशी नोटीस निवडणूक आयोगाने बजावली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ती साफ धुडकावून लावली आणि हे शब्द अजिबात काढणार नाही, असं बजावलं, हे बरं झालं. देशात उघडपणे राम मंदिराच्या नावावर मतं मागणं सुरू आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी जय बजरंगबली बोलून मतदान करा, असं थेट धार्मिक आवाहन करतात, तेव्हा निवडणूक आयोग याच्यावर ते ठेवून निवांत झोपलेला असतो. आचारसंहितेचा भंग करणारी कितीतरी पोस्टर देशभरात सार्वजनिक ठिकाणी लागली आहेत, तेही निवडणूक आयोगाला दिसत नाही. विरोधी पक्षांपुरतेच हे नियम आहेत का? पंतप्रधानपदावरील व्यक्ती धादांत खोटं बोलून एका धर्माबद्दल नफरत निर्माण करत आहे, त्याचं काय? त्यांना नोटीस कधी धाडली जाणार?
खोटं बोला पण रेटून बोला, ही भारतीय जनता पक्षाची गोबेल्सनीती आहे, असं या पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे त्यांच्या दिलखुलास रांगड्या शैलीत बोलून गेले होते. खोटं आणि रेटून बोलण्याचा अभ्यासक्रम निघाला तर तो शिकवणार्‍या विद्यापीठाचे कुलगुरू, कुलपती, मुख्य अध्यापक हे सगळंच पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, इतकी त्यांची या विषयात मास्टरी आहे. संसदेत, लाल किल्ल्यावर, (आधीच स्क्रिप्ट लिहून दिलेल्या) मुलाखतीत, टेलिप्रॉम्प्टर लावून केलेल्या भाषणात, मन की बात या कार्यक्रमात- सगळीकडे ते सराईतपणे थापा मारतात. निवडणुकांच्या प्रचारांच्या भाषणात त्यांचा हा क्रॉनिक आजार तर बळावतोच, पण शिवाय त्याला विखारीपणाची जोड मिळते.
राजस्थानात एका सभेत बोलताना त्यांनी हेच केले. यावेळी त्यांनी पंडित नेहरूंना थोडी रजा दिली, पण, ते माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर घसरले. नेहरूगंडाप्रमाणेच मोदींना डॉ. मनमोहन सिंग गंडानेही ग्रासले आहे. मुळात मोदींना उच्चशिक्षितांबद्दल न्यूनगंड आहे. पंडित नेहरू आणि मनमोहन सिंग हे जागतिक राजकारण, अर्थकारण, समाजकारण यांची सखोल समज असलेले विद्वान नेते होते. मोदी त्यांच्या पासंगालाही पुरत नाहीत. त्यांचे एकंदर आकलन सुमार आणि वरवरचे आहे. त्यामुळे कर्तबगार पूर्वसुरींच्या सखोल मांडणीतला एखादा सोयीने फिरवण्याजोगा मुद्दा उचलायचा, तो कादर खानने संवाद लिहिले असावेत अशा सवंग भाषेत घोळवायचा आणि ‘भाईयो और बहनों’ अशी साद घालत अडाणी जनतेवर भिरकावायचा, ही मोदींची प्रचारशैली. तोच प्रयोग त्यांनी राजस्थानात केला.
मोदी भाषणात म्हणाले की डॉ. मनमोहन सिंगांनी देशातल्या संसाधनांवर मुसलमानांचा अधिकार आहे, असं म्हटलं होतं; ते तुमची (म्हणजे हिंदूंची) संपत्ती काढून ज्यांची मुलं जास्त आहेत, त्यांना देणार होते. आता काँग्रेसच्या जाहीरनाम्यात तुमच्या आयाबहिणींच्या सोन्याचा हिशोब होणार आहे आणि ती संपत्ती मनमोहन सिंग ज्यांचा अधिकार देशाच्या संपत्तीवर आहे असं सांगत होते त्यांना (म्हणजे मुसलमानांना) देण्याचं वचन दिलेलं आहे. या सगळ्याच्या सगळ्या चलाखीने मारलेल्या थापा आहेत.
मुळात डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यांच्या २००६ साली केलेल्या भाषणात देशापुढचा प्राधान्यक्रम फार अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडला होता. शेती, सिंचन, जलसंधारण, आरोग्य, शिक्षण, ग्रामीण पायाभूत संरचनेमध्ये गुंतवणूक आणि सर्वसामान्य पायाभूत संरचनांमध्ये गुंतवणूक हा तो प्राधान्यक्रम होता. त्याचबरोबर अनुसूचित जाति/ अनुसूचित जनजाति, इतर मागास वर्ग, अल्पसंख्याक, महिला आणि मुलांच्या उत्थानासाठी कार्यक्रम याचीही जोड त्यांनी दिली होती. देशातल्या अल्पसंख्याकांचे आणि खासकरून मुस्लिमांचेही उत्थान व्हायला हवे. देशाच्या संसाधनांवर उपरोल्लेखित सर्वांचा (फक्त मुसलमानांचा नव्हे) पहिला दावा (पहिला अधिकार नव्हे) असला पाहिजे, असं डॉ. मनमोहन सिंग म्हणाले होते. अनुसूचित जाति, जनजाति, समाजाचे इतर मागास घटक, अल्पसंख्याक, महिला आणि मुले या सगळ्यांबद्दल ते बोलत होते, हे स्पष्ट आहे. मोदी यांचं प्रक्षोभक, धर्माधर्मात भेद करणारं भाषण जसं व्हायरल झालं, तसं डॉ. मनमोहन सिंग यांचं ते भाषणही तेवढ्याच वेगाने व्हायरल झालं. कारण, देशाचा कर्तबगार आणि जबाबदार पंतप्रधान कसा असतो, कसा बोलतो, कोणते शब्द वापरतो, आपल्या पदाची गरिमा कशी राखतो, याचं दर्शन सिंग यांच्या भाषणातून घडलं. मोदींनी या भाषणातल्या पाच टक्के गोष्टींचा जरी अभ्यास केला आणि त्यांची अंमलबजावणी केली, तर त्यांच्या नावावर देशासाठी खरोखरच भरीव असं काही काम केल्याची नोंद जोडता येईल. ते करण्याऐवजी या भाषणाचा ते अपप्रचारासाठी वापर करत आहेत.
कदाचित पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं भाषण इंग्लिशमध्ये असल्याने त्यात त्यांनी नेमकं काय म्हटलं होतं, हे मोदींना नीटसं कळलं नसावं. मोदींच्या दुर्दैवाने नेहरू काय किंवा गरीब घरात जन्मून मोठे झालेले, पण, मतांसाठी त्याचा डांगोरा कधीही न पिटलेले डॉ. सिंग काय, हे इंग्लिशमध्ये पारंगत होते. आणि इंग्लिश ही भाषा ही काही मोदींची स्ट्रेंग्थ (अचूक स्पेलिंगसह) नाही. भविष्यात अशा गफलती होऊ नयेत आणि हसे होऊ नये, यासाठी मोदीजींनी एन्टायर इंग्लिश भाषेचा एक क्रॅश कोर्स करून टाकावा!

Previous Post

हुकूमचंदांची प्रचारसभा

Next Post

प्रबोधनाची जीवनक्रान्ति

Next Post

प्रबोधनाची जीवनक्रान्ति

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.