वयाची चाळीशी पार झाली की माणसं अंतर्मुख व्हायला लागतात. अरे बापरे, आपलं अर्ध आयुष्य संपलं, मला करायच्या होत्या अशा कितीतरी शिल्लक गोष्टी राहिल्या, असे विचार मनात येतात. करीयरमध्ये एक उंची गाठल्यावर कामात तोचतोचपणा येतो. या वयात आर्थिक घडी बसलेली असते, त्यामुळे म्हातारपण येण्याच्या आधी आयुष्य रंगतदार बनविण्यासाठी धडपड सुरू होते. या भावनिक बदलांसोबत मैत्रीची व्याख्या देखील बदलू लागते. चाळीशीत डोकावणार्या ‘मिड लाईफ क्रायसिस’वर विवेक बेळे लिखित आणि आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘अलीबाबा आणि चाळीशीतले चोर’ हा चित्रपट गमतीदार पद्धतीने भाष्य करतो. मूळ याच नावाच्या नाटकाचे माध्यमांतर होऊन ही कथा चित्रपटाच्या माध्यमातून मांडली गेली आहे.
ही गोष्ट आहे अनेक वर्षांची घट्ट मैत्री असलेल्या सात मित्रांची, शलाका (मधुरा वेलणकर-साटम)-वरुण (आनंद इंगळे), सुमित्रा (मुक्ता बर्वे)-डॉक्टर (अतुल परचुरे), पराग (सुबोध बावे)-अदिती (श्रुती मराठे) ही तीन जोडपी आणि अविवाहित असलेला अभिषेक (उमेश कामत). हे सात मित्र एका वीकेंडला एकत्र फिरायला गेलेले आहेत. पार्टी रंगात आलेली असताना अचानक लाइट जाते, त्या क्षणी अंधाराचा गैरफायदा घेत कुणीतरी कुणाचं तरी चुंबन घेतं आणि ती दुसरी व्यक्ती त्या व्यक्तीच्या कानशिलात लगावते. लाईट आल्यावर मात्र हे सारं कुणा दोघांत घडलं ते कळत नाही आणि ज्या दोघांत हे घडलं ते कबूल होत नाहीत. त्यामुळे प्रत्येकालाच आपल्या बायकोवर आणि नवर्यावर संशय येतो. यानंतर प्रत्येकाचे एकमेकांशी वागणे, बोलणे बदलते.
दरम्यान कुणीतरी या घटनेवर एक ब्लॉग तयार करतो आणि त्या घटनेच्या अनुषंगाने अनेक गोष्टी या ब्लॉगवर लिहिल्या जातात. यामुळे या सातही मित्रांच्या जीवनातील गुंतागुत अधिकच वाढते. चुंबन नक्की कुणी कुणाचं घेतलं याचा शोध लागतो का आणि या सात मित्रांच्या आयुष्यात घोंघावणार्या वादळाचे पुढे काय होतं हे समजून घ्यायला तुम्हाला अलीबाबाच्या गुहेत म्हणजेच सिनेमागृहात जावं लागेल.
आपल्या समाजात स्त्री-पुरुष संबंधांबद्दल बोलणं टाळलं जायचं. गेल्या काही वर्षांत समाजमाध्यमांत याबाबत उघडपणे लिहिलं जात असलं तरी या नात्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अजूनही गॉसिपिंग करणाचा असतो. या नाजूक विषयावर चित्रपट लिहिताना तो अश्लीलतेकडे झुकणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. ही बाब चित्रपटाचे लेखक डॉ. विवेक बेळे यांनी लीलया पेलेली आहे.
संवाद खुसखुशीत आणि खुमासदार झाले आहेत. आपल्या मित्राच्या बायकोला लोक वहिनी म्हणायचं सोडून नावानं हाक मारायला लागले ना, तेव्हाच तिसर्या महायुद्धाची बीजं रोवली गेली, असं अविवाहित असलेला अभिषेक म्हणतो; तर अभिषेकशी घट्ट मैत्री असलेल्या बायकोला, बेस्ट फ्रेंड म्हणून तुला मित्रच का हवा आहे, मैत्रीण का चालत नाही, असं पराग विचारतो तेव्हा, ज्या बायकांना चांगले मित्र मिळत नाहीत, त्या बायका मैत्रिणींवर समाधान मानून घेतात असं अदिती ठणकावून सांगते. त्या किसचा किस्सा घडल्यावर ही घटना पहिल्यांदा झाली आहे, या वाक्यावर, ते पहिल्यांदा पकडलं गेलंय असा प्रतिवाद येतो. किस एखाद्या बाईने घेतला असेल आणि मुस्कटात एका पुरुषानं लगावलेली असेल, असा वेगळा दृष्टिकोनही मांडला जातो. एकाच घटनेकडे सातही व्यक्तिरेखा वेगवेगळ्या पद्धतीने पाहतात, त्यांचे विचार मांडतात, तेव्हा सर्वांचे दृष्टिकोन पटायला लागतात, प्रसंग ओळखीचे वाटू लागतात आणि नकळत आपण सिनेमात गुंतत जातो.
दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी या सिनेमाची गती राखून तो कंटाळवाणा होणार नाही याची काळजी घेतली आहे. गोष्ट सुरू असताना अनेक सिंबॉलिक गोष्टी दिग्दर्शक दाखवतो. उदा. चुंबनाच्या घटनेचे महाभारत सुरू असताना परागच्या गाडीची नेमप्लेट निखळलेली दिसते आणि त्या घटनेचे कोडे उलगडल्यावर ती नेमप्लेट फिक्स झालेली दिसते. एक घटना मध्यभागी ठेवून त्याविषयी सातही पात्रं चर्चा करतात, या नाटकी रचनेमुळे हा सिनेमा जरा अधिकच ‘बोलपट’ बनला आहे. पण सातही कलाकार उत्तम असल्यामुळे तो शब्दबंबाळ न वाटता श्रवणीय होतो. या मल्टिस्टारर चित्रपटात प्रत्येक कलाकाराला योग्य तो अवकाश दिला गेला आहे. आपल्याला मिळालेल्या पात्राची ठरावीक मानसिकता आणि शैली, त्या भूमिकेतील मुक्ता बर्वे, मधुरा वेलणकर, श्रुती मराठे, उमेश कामत, सुबोध भावे, अतुल परचुरे, आनंद इंगळे या सातही कलाकारांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे.
लग्न झालेली किंवा लग्न करायचेच नाही असं म्हणत चाळिशी गाठलेली आणि तिशीत मिड लाईफ क्रायसिसचा अनुभव घेणारी हल्लीची तरुण पिढी या सिनेमाशी रिलेट करू शकेल. शेवटाकडे जाताना हा सिनेमा गैरसमजाची सबब वापरून ताकाला जाऊन भांडं लपवत नाही, तर खुल जा सिम सिम असं म्हणत हा अलीबाबा आजच्या समाजाचा आरसा दाखवतो, हे या सिनेमाचे यश म्हणता येईल.