कधीकाळी गुहेमधला माणूस बाहेर येऊन जीवन शोधू लागला. त्याच्यामध्ये उत्क्रांती होऊ लागली. तो समाजामध्ये वावरू लागला. त्याला स्वत्वाची जाणीव होऊ लागली. थंडी-ऊन पावसापासून संरक्षण करण्यासाठी घराची कल्पना त्याला आली. लज्जा-प्रेम काम क्रोध, राग-लोभ या षड्रिपूंची त्याच्यामध्ये जाणीव होऊ लागली. तो लाजेस्तव व ऊनपावसापासून संरक्षणासाठी अंगभर वस्त्र परिधान करू लागला. देव, धर्म, जात, रुढी पंथ यांचा पाईक झाला. साहजिकच एकमेकांमध्ये चढाओढ, स्पर्धा, उच्च-कनिष्ठ, द्वेश, मत्सर, आक्रमण इत्यादी अवगुणांचा प्रभाव सामाजिक सुधारणा बरोबर माणसांवर पटू लागला. धर्माचा पगडा वाढू लागला. १५ व्या शतकात ख्रिश्चन धर्माची धार्मिक सुधारणा चळवळ युरोपमध्ये सुरु झाली, रोमन कॅथॉलिक चर्चपासून जे वेगळे झाले, त्यांना एकत्रित करण्याकरिता प्रोटेस्टंट पंथाची स्थापना केली. रोमन कॅथॉलिक व प्रोटेस्टंट यांची धर्मावर वर्चस्व गाजविण्यासाठी चढाओढ निर्माण झाली आणि त्याची परिणीती १६ व्या शतकात रोम कॅथॉलिक व प्रोटेस्टंट यामध्ये युद्ध झाले. त्याला `फ्रेंच धार्मिक युद्ध’ असे संबोधण्यात आले.
केवळ धार्मिक बंधने, रुढी, परंपरा, राजा धर्मगुरु यांचा अनुनय केल्यानेच जनतेचा आधुनिक विकास होईल या भावनेला तडा जाऊ लागला. त्यासाठी त्याकालीन राज्यकर्त्यांनी जनतेला बरोबर घेऊन त्यांना राजकारभारात समावून घेण्यासाठी संधी उपलब्ध केल्या. जागतिक पातळीवर लोकशाहीचे वारे वाहू लागले. दुसर्या महायुद्धानंतर नवस्वतंत्र झालेल्या आशिया-आफ्रिकी राष्ट्रांनी लोकशाही आधुनिक शासन प्रकाराचा स्वीकार केला. या युद्धानंतर आंतरराष्ट्रीय रचनेत बदल होत असतांना पारंपारिक राज्यशास्त्राचा अभ्यास मागे पडून आधुनिक राज्यशास्त्राने मुसंडी मारली. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. इंग्रजांच्या कचाट्यातून सुटका झाली. १९५० साली भारताने प्रजासत्ताक पद्धतीचा अवलंब करून लोकशाहीचा पुरस्कार केला. पण, अल्पावधीतच अनेक वाईट वृत्ती, समाजविघातक, देशविघातक धार्मिक उचापतीखोर, गुंडपुंड यांनी लोकशाहीच्या पवित्र मंदिरात प्रवेश करते झाले. राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले.
सोबतचे व्यंगचित्र राजकारण्यांची दांभिकता दाखविणारे आहे. नेहमीच राजकीय नेते आमचा कोणत्याही समाजविघातक व्यक्तीशी वा धर्माशी संबंध नाही असे जाहीर विधान करतात. लोकांना मूर्ख बनविण्यासाठी. परंतु आतून त्यांची घट्ट मैत्री असते. हे अनेकवेळा सिद्ध झाले. आता तर गुन्हेगार व राजकारणी हे उघड-उघड गळ्यात गळे घालू लागले आहेत. त्याचे समर्थन करताना राजकीय धुरीण असा युक्तिवाद करतात की, जोपर्यंत एखाद्या व्यक्तीवर त्यांनी केलेला गुन्हा न्यायालयात सिद्ध होत नाही तोपर्यंत तो गुन्हेगार नाही. `मग बलात्कारी, भ्रष्टाचारी, दरोडेखोर, खुनी वा चोर असो. एकेकाळी एखाद्या व्यक्तिवर गुन्हेगारीचा फक्त संशय असला तरीही त्याला कोणत्याही पक्षात प्रवेश वा निवडणुकीचे तिकीट मिळत नव्हते. पण, आता काय चित्र आहे? २०१७ साली सरकारी आकड्यानुसार उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुकीत ४०२ आमदारांपैकी १४३ आमदारांवर खून, दरोडे, बलात्कार असे भयंकर गुन्हे दाखल झाले होते. भारतीय संसदेतील खासदारांचे गुन्हेगारीकरणाचे प्रमाण आजकाल विधानसभेच्या आमदारांपेक्षा गुन्हेगारी प्रकरणात अनेकदा आश्चर्यकारक व खेदजनक असते.
पूर्वी गुन्हेगार व राजकारणी यांची भेट एखाद्या अडगळीच्या वा वस्तीपासून अतिदूर ठिकाणी गुपचूप, चोरून व्हायच्या. परंतु आज गुन्हेगार व त्यांचे मित्र, राजकारणी एकमेकांना समाजातील उच्चभ्रू समजायला लागलेत (कारण त्यांच्या मते त्यांच्यावरील आरोप अजून सिद्ध झालेले नाही.) त्यांच्या भेटीगाठी मोठमोठ्या हॉटेल्समध्ये, लग्न समारंभांत, हाय-फाय पार्ट्यांमध्ये होऊ लागल्यात. या दोन्ही वृत्ती समाजविघातक असूनही स्वत:ला उच्चभ्रू समजतात. त्याचे प्रतीक म्हणून स्नूकर हा खेळ खेळताना दाखविला आहे. स्नूकर हा खेळ श्रीमंत उच्चभू्र राहाणीमान असलेल्या लोकांमध्ये खेळला जातो. स्नूकरचे आयताकृती मोठाले टेबल असून त्याला पॉकेटस् असतात. एकूण २२ रंगीत बॉल असतात. त्यातील एक सफेद बॉल-स्ट्रायकर १५ लाल बॉल असतात व ६ अनेक रंगाचे बॉल असतात स्नूकर, पूल, बिलियर्ड हे जरी दिसायला एकसारखे वाटले, तरी प्रत्येकाचे नियम वेगवेगळे आहेत.
गुन्हेगार व राजकारणी स्वतः सत्तेसाठी संपत्तीसाठी, व आसुरी आनंदासाठी धर्माचा उपयोग एकमेकांवर आदळवून स्वार्थासाठी कसा करतात, त्यातून देशाचे अहित कसे करतात, हे दाखविण्यासाठी स्नूकरच्या बॉलना हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन इत्यादी धर्मांची प्रतीके लावलेली आहेत. त्यासाठी त्या त्या धर्माच्या प्रतीकात्मक रंगाचा वापर सदर बॉलवर केला आहे. `आम्ही त्यातले नाही’ म्हणणार्या राजकारण्यांचे सत्य बाहेर काढण्यासाठी, खोटेपणा दाखविण्यासाठी वैयक्तिक संबंधातून खेळण्याचा खेळ दाखविला आहे. त्यासाठी ब्रश, पेन व रंग याचा वापर केला आहे.
२००६ साली जर्मनी येथे दरवर्षी आयोजित केल्या जाणार्या `फ्रॅन्टफर्ट बुक फेअर’ने `इंडिया अॅट अ ग्लान्स’ या सदरासाठी व्यंगचित्र प्रदर्शनात सदर व्यंगचित्र माझ्या आठ व्यंगचित्रासह प्रदर्शित केले आहे. सुरेश सावंत, विन्स, शि. द. फडणीस, रंजन जोशी, अरुण इनामदार इत्यादींनी त्यात भाग घेतला होता. बुक फेअरमधील व्यंगचित्र प्रदर्शनातून भारतीय संस्कृतीचीही नव्याने ओळखही जर्मन लोकांना झाली. हा आनंदसोहळा जर्मन लोकांनी एक महिना अनुभवला.
निष्ठा या शब्दावर उभे राहिलेले राजकारण साम-दाम-दंड-भेद या नीतीवर स्वार झाले. जिंकणे हाच पर्याय, त्यातून बहुमत मिळवणे यासाठी चलाख-स्वार्थी लोकांनी गावगुंड, गुन्हेगार यांना जवळ केले. त्यांच्यातर्फे मतदारांवर दबाव टाकून मतांची बेगमी करण्यात आली. धर्मांमध्ये वितुष्ट येईल अशी वक्तव्य करणे. ठराविक धर्मांची मते मिळवण्यासाठी दुसर्या धर्माची निंदा-नालस्ती करणे, त्यामुळे विशिष्ट धर्माबद्दल समाजमन विरोधी जाईल, यासाठी गावगुंड वा गुन्हेगार यांचाही वापर केला जातो. लव्ह जिहाद पण त्यातलेच एक अस्त्र.
आपला देश सर्वधर्मसमभाव मानणारा आहे. ही संकल्पना वेदांमध्येही आहे, असे म. गांधी म्हणायचे. भारतामध्ये रामकृष्ण परमहंस व स्वामी विवेकानंद यांनी जातीधर्मामध्ये सलोखा राखण्याचा प्रयत्न केला. पुढे महात्मा गांधी यांनी इंग्रजांविरुद्ध एकीचे बळ दाखविण्यासाठी हिंदू-मुस्लिमांमध्ये सर्वधर्मसमभाव ही संकल्पना उपयोगात आणली. ब्रिटीश सत्ता हालवून हाकलून देण्यासाठी.
पीडित दीनदुबळ्यांना मदत करणे, ही माणुसकीची लक्षणे प्रगतीच्या ओझ्याखाली दबली गेली. माणूस माणुसकी विसरला. लोक जात, धर्म पंथ यांच्या जाळ्यात अडकले, समाजात दरी निर्माण झाली. याचाच फायदा सत्तेच्या हव्यासासाठी व संपत्ती जमविण्यासाठी राजकारणी लोकांनी राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले. त्यामुळे दाऊद इब्राहिम, पप्पू यादव, भाई ठाकूर, पप्पू कलानी इत्यादीसारखे अट्टल गुन्हेगार राजकारणात आले किंवा राजकारणांचे मसिहा बनले. सर्वसामावेशक राजकारण हिंदू, मुस्लीम, पारशी, ईसाई, जैन इत्यादी धर्म गुण्यागोविंदाने नांदण्याचे दिवस कालकुपीत गडप होत आहेत. निवडणूक जिंकणे हाच राजकारण्यांचा मंत्र आहे. भारतातला सर्वात मोठा राजकीय पक्षाचे सभासदत्व `मिस्ड कॉल’ देऊनही मिळविता येते. त्यामुळे प्रत्यक्ष ती व्यक्ती कोण आहे, याचा थांगपत्ता लावण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना निवडणुकीत तिकीट देऊ नये म्हणून सामाजिक संस्थांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. परंतु गुन्हेगारांना तिकीट देऊ नये अशी राज्यघटनेत तरतूद नसल्याने न्यायालयाने देखील हात वर केले. सध्याचे राजकारण दुटप्पी, भ्रष्ट, लोकशाहीचे धिंडवडे काढण्यात लोकांचे झाले आहे. भ्रष्टाचारात बुडाला आहे म्हणून एखाद्या व्यक्तीवर आरोपांचे भोंगे लावायचे- समाजात, सभांमध्ये वा संसदेतही. परंतु तीच व्यक्ती त्यांच्या पक्षाला मदत करत असेल, तर त्याला पक्षाने तयार केलेली सत्ता व स्वार्थमिश्रित पावडर हौदामध्ये घालून स्नान घातले जाते. ती व्यक्ती स्वयंप्रकाशित झाली असे मानून त्याला आपल्या पक्षात प्रवेश दिला जातो. असे लोकशाहीचे राजरोसपणे वस्त्रहरण होत असतांना सर्वोच्च न्यायालयाने `गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना तिकीट देऊ नये, असा कायदा करा’ असे सुचविले. परंतु कोणत्याही पक्षाने त्याकडे लक्ष दिले नाही. धर्मांधता, सत्तेचा माज, गडगंज संपत्ती मिळविणे हेच ध्येय, भ्रष्टाचार आणि वंशवाद यांचे रक्त ज्यांच्या धमन्यांमधून वाहते ते गुन्हेगारांना राजकारणातून हद्दपार करतील? तेच तर त्यांच्या सत्तेच्या खुर्चीचे चार पाय आहेत.