शिवसेनाप्रमुखांना लोकमान्य टिळकांविषयी फार आदर. त्यांच्या कुंचल्याने लोकमान्य कायम ‘जिवंत’ चितारले. मात्र, लोकमान्यांच्या पत्रकारितेचा वारसा सांगणारा ‘केसरी’ सत्तेच्या ऊबेला जाऊन बसला, तेव्हा ते हळहळले आणि संतापले. लोकमान्यांचे नातू जयंतराव टिळक यांच्या काळात केसरी सत्तापक्षाचे मुखपत्रच बनला. साहजिकच त्याच्या विरोधाची धार बोथट झाली. त्यावर भेदक भाष्य करणार्या या १९८१ सालातील मुखपृष्ठावर लोकमान्य जयंतरावांना विचारतात की केसरीचा केसरी म्हणजे सिंह गुरगुरत कसा नाही? आज लोकमान्य नाहीत, जयंतरावही नाहीत आणि बाळासाहेबही नाहीत. आज वृत्तपत्रसृष्टीची स्थिती पाहिल्यावर त्यांच्या मनात काय विचार आले असते. लोकमान्यांपासून प्रबोधनकारांमार्गे बाळासाहेबांपर्यंत अनेकांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, समाजजागृतीचं माध्यम म्हणून वर्तमानपत्रं चालवली होती. ते व्रत होतं. साखळी वर्तमानपत्रांच्या रूपाने या बेडर वाघसिंहांच्या जागी मांजरांनी घेतली आणि मोदीकाळात तर ती ताटाखालची मांजरं बनून गेली. आज शिवसेनाप्रमुखांच्या कुंचल्यातून पत्रकारितेच्या र्हासाबद्दल हळहळ कशा प्रकारे व्यक्त झाली असती?