मध्यंतरी ओमशी गप्पा मारताना माझ्या अकोल्याच्या दिवसांच्या आठवणी निघाल्या, घरापासून दूर राहण्याची माझी ती पहिलीच वेळ. हवामान, भाषा, चालीरीती, खाण्यापिण्याच्या पद्धती सगळंच एकदम वेगळं होतं माझ्यासाठी. अर्थात तुलनेचा किंवा चांगल्यावाईटाचा विषय नसला तरी त्यावेळी तो सगळा बदल अंगवळणी पाडून घेणं माझ्यासाठी नक्कीच सहजशक्य नव्हतं. आईबाबा कायम पूर्ण प्रयत्न करायचे की माझं तिथलं राहाणं सुसह्य व्हावं. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे दरवेळी घरून निघताना बाबांनी आणलेला अलिबाग-विशेष खाऊ व आईच्या हातचा लाडू चिवडा. चिवड्यात पर्याय नसायचा पण लाडू मात्र त्या त्या ऋतुमानानुसार बदलायचे!! कधी रव्याचे तर कधी बेसनाचे, मात्र थंडीच्या चार महिन्यांत मात्र नक्कीच डिंकाचे!! सुक्यामेव्याचे आगार असलेले, चवीला अफलातून लागणारे ते लाडू म्हणजे जणू शब्दश: तहानलाडू भूकलाडू असायचे… संपेपर्यंत!! एक लाडू खाऊन पाणी प्यायले की पोट जास्ती भरायचे का मन हे सांगणे अवघड आहे आता!!
आजही हिवाळ्यात आवर्जून बनवले जाणारे हे डिंकाचे लाडू एकप्रकारे लाडूंचा महाराजा ठरतात नाही का? आजारपणात शरीराची झालेली झीज असो वा बाळंतिणीला लागणारी जास्त उर्जा असो, आपल्याकडे पिढ्यानुपिढ्या डिंकाच्या लाडवांना पर्याय नाहीये. चवीला म्हणाल तर तेवढाच मस्त!! आजकाल बर्याच हलवायांच्या दुकानातही दिसतात हे लाडू विकायला, आमच्या चितळेंच्या लाडवांची सर नाही अर्थात कोणालाच!! वेळेचा प्रश्न असेल तर खुशाल आणावेत विकत; मात्र थोडा वेळ असेल तर हे लाडू बनवणं नक्कीच आनंददायी ठरतं!!
मेथीची पूड कमीतकमी तीन ते जास्तीत जास्त सात दिवस साजुक तुपात भिजवून ठेवायची, लाडू करण्यापूर्वी. चांगला म्हणजे एकसारख्या आकाराचा व कमी भुकटी असलेला डिंक घ्यायचा, भुकटी जास्त असेल तर ती तळताना जळते व एकसारखे खडे असले की ते छान सारखे तळले जातात, लहानमोठे खडे असले की मोठे आतून कच्चे राहतात, तर लहान करपतात! बाकी खारकेची पूड, सुक्या खोबर्याचा ताजा कीस, बदाम, काजू, बेदाणे, खसखस, गूळ अशा सगळ्या साहित्याची जुळवणी झाली की तसा फार कठीण नाही हा पदार्थ! सगळ्यात आधी डिंक साजुक तुपात मध्यम आचेवर तळून घ्यायचा, आजकाल मायक्रोवेव्ह ओव्हनमध्येही छान फुलवता येतो डिंक, तळण्याऐवजी. मग थोड्या तुपावर खोबर्याचा कीस परतून घ्यायचा, त्याच गरम कढईत बंद आचेवर खारकेची पूड परतायची, जळत नाही मग. काजू-बदामाची भाजून केलेली भरड व निवडलेले बेदाणे घ्यायचे, थोडीशी भाजलेली खसखस आणि वेलदोड्याची पूड घ्यायची. हे सगळं म्हणजे फुललेल्या डिंकाचा चुरा, सुकामेवा, भिजवलेली मेथीपूड, सगळं मिळून जेवढं होईल तेवढाच गूळ घ्यायचा आणि तो चमचाभर तुपावर टाकून मंद आचेवर विरघळू द्यायचा. पाक अजिबात करायचा नाही. ह्या पातळ गुळात सगळं मिश्रण घातलं की छान मिसळून घ्यायचं नी लाडू वळायचे.
एक गंमत सांगतो ह्या लाडवांची, वरच्या साहित्याखेरीजही जे मिसळू त्याला आपलंसं करतात हे लाडू. अगदी कणिक असो किंवा गोडांबी. थोड्या तुपावर परता नी मिसळा, गुण तर वाढतातच पण चवही छान येते! कडू मेथी असो वा चवदार सुकामेवा, सर्व चवींना समाविष्ट करणारा हा लाडू नक्कीच मार्गदर्शक ठरतो!
आपल्यातल्याच गुणदोषांना पारखायचं म्हटलं तर नाना कळा जाणवतात, एकदा का स्वत:च स्वत:च्या गुणदोषांना स्वीकारलं की एक सर्वसमावेशक असं व्यक्तिमत्व साकारतं. स्वत:ला स्वीकारतानाच नकळत आजूबाजूच्या लोकांना, परिस्थितीला स्वीकारण्याची बुद्धी लाभते. मनाच्या वाढलेल्या या व्याप्तीबरोबरच नकळत मन:शांतीही विस्तारते. मेथी कडू आहे म्हणून तिला अव्हेरण्यापेक्षा आपला गोडवा तिला दिला तर तिच्या पौष्टिकतेचे वरदान जसे लाडवाला लाभते, तसेच प्रत्येकातच गुणदोष असले तरी अखेरीस प्रत्येकजण त्या परमात्म्याचेच प्रतिबिंब आहे ही भावना मनाला दिलासा देते. एकीचं बळ कायमचं फायदेशीर असतं नाही का? उसाची मोळी मोडता येत नाही एकदम कोणाला; मात्र एकेक ऊस वेगळा केला तर सहज तुटतो. माणूसपणाच्या या वाटचालीत ही सर्वसमावेशकता अत्यंत लाभदायी ठरते. माताजी श्री सारदादेवी ह्या सर्वसमावेशकतेचे मूर्तिमंत रूप होत्या, अमजद नावाच्या डाकूलाही तेवढ्याच प्रेमानी जेवू घालणार्या! जसा माझा शरत तसाच माझा अमजद म्हणायच्या त्या. मार्ग समाजमान्य नसला तरी पोटासाठी चोरी करणार्या अमजदची तुलना स्वामी सारदानंदांशी करण्याची व्यापकता माताजीच दाखवू जाणोत! मात्र काही अंशी जरी आपण ही समसमानबुद्धी अंगिकारली तर प्रगतीचा वेग दुणावतो हे नक्की! ठाकूर म्हणजेच श्री रामकृष्ण परमहंसांनीही सर्वधर्मापंथांचा अभ्यास केला व त्या त्या मार्गाने ईश्वरप्राप्ती केली, अंतिम सत्य एकच आहे या त्यांच्या ज्ञानानुभवातूनच पुढे रामकृष्ण मठाची सर्वसमावेशक तत्त्वं आखली गेली आणि त्याच बळावर ही संस्था अविरत विस्तारतेय. तुमच्या माझ्या प्रगतीसाठी, आनंदासाठी व निर्मळ मन:शांतीसाठी मनोमन बाळगू हीच सर्वसमावेशकता आणि या परिपूर्ण आयुष्याचं सार्थक करू.