आपलं चॅनेल लोकप्रिय व्हावं, ते अधिकाधिक लोकांनी पाहावं, ही या दोघांची इच्छा आहेच. पण, त्यातून निव्वळ पैसे कमावणं हा हेतू नाही. आपण एरवीही जे हौसेने, आनंदाने आणि पॅशनने करत होतो, तेच वेगळ्या माध्यमात करावं आणि आपल्याला मिळणारा आनंद इतरांपर्यंत पोहोचवावा, ही त्यामागची भूमिका आहे.
—-
पुणे तिथे काय उणे असं म्हणतात… ते वेगवेगळ्या बाबतीत खरं आहे, पण महाराष्ट्रीय खानपानाच्या बाबतीत सगळ्यात जास्त खरं आहे… सगळ्या महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती एकवटलेलं हे राज्यातलं एकमात्र शहर असावं… इथे खानदेशी शेवभाजी मिळते, कोल्हापुरी तांबडा/ पांढरा रस्सा मिळतो, रस्त्यावर निलंगा राइस मिळतो, लोणी स्पंज डोसा मिळतो, शेगावची कचोरी मिळते, नागपुरी मटण मिळतं, खास बोलाईचं मटण मिळतं, भंडारी पद्धतीच्या खानावळी आहेत, समुद्र जवळ नसताना ताजी मासळी देणारी हॉटेलं आहेत, मिसळी तर किती तरी प्रकारच्या मिळतात. त्याचबरोबर कुठे सिंधी मंडळींनी आणलेलं खास त्यांचं खानपान आहे तर कुठे दक्षिण भारतीय इडली, डोसे सांबाराची बहार आहे. पुण्यातल्या माणसाने नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण रोज वेगळ्या ठिकाणी करायचं ठरवलं तरी त्याला आयुष्य पुरणार नाही बहुतेक. या पुण्यातल्या खानपानाची रंगतदार ओळख करून देणारं ‘लवंगी मिरची’ हे यूट्यूब चॅनेल नुकतंच सुरू झालेलं आहे आणि अल्पावधीतच लोकप्रियही झालं आहे. त्याचे कर्तेधर्ते आहेत आशिष चांदोरकर आणि विश्वनाथ गरूड हे पत्रकार.
आपण अनेक वर्षांपासून डिजिटल माध्यमांमध्ये काम करतोय, तिथे यूट्यूब, फेसबुक, अशा समाजमाध्यमांचा प्रयोगशील वापर करत आलो, आपण जो कंटेंट तयार करत होतो, त्याचं समाजमाध्यमांतलं रेटिंग उंचावण्याचं कामही आपण केलेलं आहे. मात्र, हे सगळं पडद्यामागे राहून करत होतो, बिनचेहर्याने करत होतो, आता पडद्यामागून पुढे आलो आहोत, अशी या दोन पत्रकार मित्रांची हे चॅनेल सुरू करण्यामागची भूमिका आहे. आशिष हा फूडी म्हणजे खवय्या. अनेक वर्षांपासून वर्तमानपत्रातल्या सदराच्या माध्यमातून त्याने पुणेकरांना वेगवेगळ्या हॉटेलांचीच नव्हे तर रस्त्यांवरच्या भुर्जीपाव, भजीपावाच्या गाड्यांचीही ओळख करून दिली आहे. या पदार्थांच्या चवीत असं काय खास आहे, जे इतरांच्यात नाही, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. तोच प्रयत्न फूडी आशिषच्या या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मांडायचा, असं त्याने आणि विश्वनाथ यांनी ठरवलं.
आजकाल अशा प्रकारे वेगवेगळ्या हॉटेलांची, खानपानाची, गाड्यांची ओळख करून देणारे असंख्य यूट्यूबर आहेत. त्यातले बरेच लोकप्रियही आहेत. त्यांचे चॅनेल आणि तुमचा चॅनेल यात फरक काय, तुमची खासियत काय, असं विचारल्यावर आशिष सांगतो की सहसा यूट्यूबर एखाद्या फूड जॉइन्टवर जे अनेक पदार्थ मिळतात, त्या सगळ्यांविषयी बोलतात. आमचा अॅप्रोच वेगळा आहे. प्रत्येक ठिकाण हे एका कोणत्या तरी पदार्थासाठी सर्वात जास्त प्रसिद्ध असतो. कोणाचा वडा अफलातून असतो, कोणाची मिसळ भारी असते, कोणाची कचोरी न्यारी असते. आम्ही त्या निवडक एक किंवा दोन पदार्थांवरच लक्ष केंद्रित करतो, तो कसा बनतो, ते जमल्यास प्रेक्षकांना दाखवतो, त्याची खासियत काय आहे, ते टिपून सांगण्याचा प्रयत्न करतो. इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो.
आपलं चॅनेल लोकप्रिय व्हावं, ते अधिकाधिक लोकांनी पाहावं, ही या दोघांची इच्छा आहेच. पण, त्यातून निव्वळ पैसे कमावणं हा हेतू नाही. आपण एरवीही जे हौसेने, आनंदाने आणि पॅशनने करत होतो, तेच वेगळ्या माध्यमात करावं आणि आपल्याला मिळणारा आनंद इतरांपर्यंत पोहोचवावा, ही त्यामागची भूमिका आहे.
ही हौस आजची नाही, २०१८पासूनची आहे. आशिष आणि विश्वनाथ हे दोघेही फिरस्ते. संधी मिळाली की मोटरसायकलीला टांग मारून प्रवासाला निघण्याची दोघांनाही आवड. तेव्हा दोघेही नोकरीत होते. फावल्या वेळात दोघेही चांगले खाद्यपदार्थ ‘हाणायला’ जायचे. तेव्हा आवड म्हणून मोबाइलवर शूट करायचे. त्याला काही कॉमेंट्रीही नसायची. मित्रमंडळींमध्ये ती क्लिप फिरवता फिरवता व्हायरल व्हायची. एकदा ते सोलापूरला गेले असताना तिथे सीख कबाब कसे तयार होतात, याचा त्यांनी एक व्हिडिओ केला होता, तो चांगला व्हायरल झाला होता. औरंगाबादमध्ये केलेला समोश्याचा व्हिडिओ अनेकांनी पहिला होता. तेव्हा नोकरी सुरू होती, त्यामुळे हे जे काही सुरू होते ते निव्वळ आनंद द्विगुणित करण्यासाठीच.
कोरोनाकाळात दोघांच्याही नोकर्या गेल्या. आता पुढे काय करायचे हा विचार डोक्यात सुरू झाला. गेल्या वर्षी हॉटेल्स बंद होती, त्यामुळे ‘लवंगी मिरची’चं काम थांबलंच होतं. हळुहळू लॉकडाऊन उठू लागला, तसा या कामाने पुन्हा वेग पकडला. या संकल्पनेचा विस्तार करण्यासाठी त्यांनी थेट मुंबई गाठली आणि अडीच लाख रुपयांचा एक व्हिडिओ कॅमेरा खरेदी केला. त्यामुळे चित्रिकरणांचा दर्जा सुधारला आणि चांगल्या व्हिडिओची निर्मिती होऊ लागल्याचे विश्वनाथने सांगितले.
एखाद्या पदार्थाचा पहिला घास खाल्यानंतर काही क्षणात त्याची चव कशी आहे, हे सांगून तो पदार्थ खवय्यांपर्यंत पोहचवण्याचे काम आशिष अनेक वर्षांपासून त्याच्या ब्लॉगच्या माध्यमातूनही करत आहे. एका न्यूज टीव्ही चॅनेलसाठी काम करत असताना निवडणुकांच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती सुरू होती, तेव्हा निरनिराळ्या ठिकाणांना भेटी देताना, त्या ठिकाणचे फूड जॉइंट शोधायचे, तिथे जायचे, पदार्थाची चव घ्यायची, असे सुरू होते. ते फेसबुकवर चांगले पॉप्युलर झाले होते. पुढे त्यामध्ये सातत्याने वाढ होत गेली. ब्लॉगच्या माध्यमातून आशिष ते मांडत राहिला. त्यामधून नवीन ठिकाणे कळत गेली आणि त्यामधूनच ‘लवंगी मिरची’मध्ये फूडी आशिषची एन्ट्री झाली. आम्ही चालवत आहोत तो चॅनेल ही आमची हॉबी आहे, घर चालवण्यासाठी आम्ही अन्य चार कामे करून त्यामधून पैसे मिळवतो, असे आशिष सांगतो. तो म्हणतो, माझे आजोळ बडोद्याचे, ईटीव्हीमध्ये नोकरी करत होतो तेव्हा दोन वर्षे हैद्राबादमध्ये राहिलो होतो. मित्रांबरोबर फिरायची आवड असल्याने नवनवीन व्हेज-नॉनव्हेज पदार्थांची चव चाखत राहिलो.
पुण्यापासून सुरुवात झाली आहे, आता महाराष्ट्रातल्या विविध भागांत तयार होणारे पदार्थ खवय्यांपर्यंत पोहोचवायचे आहेत, त्यादृष्टीने काम सुरू आहे, येत्या एक-दोन वर्षात हा उद्देशही तडीस नेण्याचा या दोघांचा मानस आहे.
– सुधीर साबळे
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)