मी समीक्षक नसलो तरी एक चांगला प्रेक्षक आहे असं मला वाटतं.. कारण मी जगभरातला चांगला कंटेंट नेहमी बघत असतो.. आणि या क्षेत्राशी निगडित असल्यामुळे त्यातून शिकत देखील असतो. त्यामुळे जरा अपेक्षेने चित्रपटगृहात गेलो आणि काही खटकलं तर वाईट वाटतंच..
दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा ‘सरसेनापती हंबीरराव’ हा एक नवा सिनेमा… त्यांचा एक स्वतःचा प्रेक्षकवर्ग तयार झाला आहे जो त्यांचे सिनेमे आवडीने बघतो. ‘मुळशी पॅटर्न’सारखा एक वेगळाच विषय जेव्हा ते प्रेक्षकांसमोर आणतात तेव्हा माझ्यासारखा प्रेक्षकसुद्धा त्यांना भरभरून प्रतिसाद देतो. चित्रपटाची कथा काल्पनिक असल्यामुळे त्यामध्ये हवी ती लिबर्टी घेता येते. त्याचा फायदा तरडे यांना खूप चांगल्या प्रकारे घेता येतो. परंतु एक ऐतिहासिक सिनेमा बनवताना ती खरी गोष्ट आहे हे दिग्दर्शक मंडळी विसरतात का? आणि असा सिनेमा बनवताना बाहुबली वगैरे सिनेमांचे रेफरन्स का घेतले जातात? बाहुबली ही एक काल्पनिक गोष्ट आहे.. जिथे तुम्ही ‘स्टॅच्यू ऑफ सिनेमॅटिक लिबर्टी’ उभारु शकता.. हवे तेवढे फूट पात्राला उडवू शकता.. नारळाची झाडं वाकवून दहा सैनिक उडू शकतात.. काहीही म्हणजे काहीही, मनाला वाटेल ते करू शकता.. पण जेव्हा गोष्ट खर्या इतिहासाची येते तेव्हा भान राखायला पाहिजे..
छत्रपती शिवाजी महाराज हे फिल्मी सुपरहिरो नाहीत… वेगवेगळ्या नीती वापरून त्यांनी स्वराज्य उभं केलं… हवेत उड्या मारून नाही.. रोहित शेट्टी काल्पनिक चित्रपट बनवून लिबर्टी घेतो.. इतिहासाला हात घालत नाही.. ‘सरसेनापती हंबीरराव’ बघताना असं वाटलं की ‘मुळशी पॅटर्न’ हा सिनेमाच ऐतिहासिक स्वरुपात बनवलाय..त्या यमकवाल्या डायलॉग्जचा इतका भडिमार झालाय की भावनिक प्रसंगात लोक ‘हसले’. मुळशीतला नन्याभाई हंबीररावांचं सोंग घेऊन ‘या बाणाला ज्याचं रक्त, तो औरंग्याच्या भक्त’ असे हास्यास्पद डायलॉग मारतोय.. तेच तेच कलाकार दिसतात.. अनाजीपंत सोडता एकही भूमिका मनाला भिडली नाही… बुधभूषण, नायिकाभेद, सातसतक असे संस्कृत आणि ब्रज भाषेत ज्यांनी ग्रंथ लिहिले, असे संभाजी महाराज ‘संभाजी शत्रूला एकदाच माफ करतो, दुसर्यांदा साफ करतो’ असे टपोरी छाप संवाद म्हणतात… सिरीयसली?? अहो ते छत्रपती संभाजी महाराज आहेत.. मुळशीतला गुंड राहुल्या नाहीत.. ‘चाळण-गाळण’, ‘पाठीव-छातीव’, बिकट-तिखट’ असं काहीतरी संपूर्ण सिनेमाभर चालू होतं..
व्हिज्युअली सिनेमातले काही प्रसंग चांगले दिसतात… मेहनत दिसते… काही ठिकाणी कलादिग्दर्शन खूप आवडलं… पण भव्यदिव्य म्हणतात ते कुठंय.. औरंगजेब.. बादशाह न वाटता एखादा साधा मुघल सरदारच वाटला.. मोहन जोशींसारखे एक आवडते अभिनेते या भूमिकेत शोभलेच नाहीत.. ना जरब ना कुशाग्र बुद्धी..
आपल्याकडे ऐतिहासिक सिनेमांची लाट आली आहे आणि त्यामधील अनेक चित्रपटांचं काही कास्टिंग बर्याचदा इतकं गंडतं की सिनेमा बघवत नाही.. सर्वात खटकते ते परदेशी सैनिकांचं कास्टिंग.. पावनखिंडमधले इंग्रज असो की हंबीररावमधले पोर्तुगीज.. अक्षरशः विनोदी वाटतात.. दोन तीन जरा गोरे दिसणारे घ्यायचे आणि त्यांना सोनेरी केस लावून उभं करायचं.. बास्स संपलं.. ‘पावनखिंड’मध्ये सिद्धी जोहरच्या भूमिकेसाठी एखादा आफ्रिकन वंशाचा अभिनेता नाही का मिळू शकत? हॉलीवूडमध्ये छोट्या छोट्या भूमिकांसाठीसुद्धा परदेशी अभिनेते कास्ट केले जातात आणि १५ कोटींच्या सिनेमामध्ये मला वाटत नाही की परदेशी अभिनेते घेणं महागात पडलं असतं… मराठी सिनेमांचं बजेट कमी असतं, हे खरंच आहे… पण ‘तुंबाड’ची व्हिज्युअल्स आठवतात ना? तो सिनेमा फक्त ‘६ कोटींमध्ये’ बनलेला आहे.. पण सिनेमा तंत्र कसं वापरायचं, ते राही बर्वेंना चांगलं माहितेय… ‘हंबीरराव’मध्ये पोर्तुगीज आणि मराठे यांच्या युद्धातल्या सीनमध्ये पोर्तुगीज तुलनेने जास्त संख्येने होते असं कुठे वाटलंच नाही… २०-२५ पोर्तुगीज १००-२०० मराठ्यांविरुद्ध लढतायत असं वाटलं..
सोयराबाईंचे सीन अक्षरशः सीरियल सारखे मेलोड्रॅमॅटिक केले गेलेले वाटले.. एखादी व्यक्ती गेल्यावर दिवा विझतो किंवा देवाची माळ पडते.. हे असं काहीतरी सगळ्याचं ऐतिहासिक मराठी चित्रपटांमध्ये दिसलं.. आता सध्या प्रेक्षक जगभरातला कंटेंट बघतायत.. त्यांना हे सगळं बघताना खूप क्रिंजी वाटतंय.. उगाचच्या उगाच महाराज ओरडतायत.. हंबीरराव ओरडतायत.. का? कशासाठी?.. यापेक्षा ‘भारत एक खोज’मधली शिवरायांची कथा त्या काळाच्या मानाने जास्त अपीलिंग वाटली होती. कथेमध्ये खरेपणा हवाय.. परिस्थिती खर्याखुर्या दिसायला हव्यात.. काळ खरा वाटायला हवा.. पात्रांसाठी ओळखीचे अभिनेते नसले तरी चालतील पण ते भूमिकेत जाणारे हवेत.. असं सारखं वाटतं..
प्रवीण तरडेंनी इतिहासावर आधारित परंतु ‘काल्पनिक कथा’ घेऊन बाहुबलीसारखा सिनेमा बनवावा… कारण त्यांच्यामध्ये ते व्हिजन आहे.. पण खर्या कथेवर ऐतिहासिक सिनेमा अशा प्रकारे बनत राहिले, तर येणार्या पिढीला हाच इतिहास वाटेल अशी भीती वाटते.