काल एका मित्राचा फोन आला होता. म्हणाला, ‘काय मग, कसा काय आहे तुमच्या मुंबईचा मौसम?’ हाच प्रश्न मी जेव्हा इतरांना विचारतो तेव्हा ते ‘ठीकठाक’ किंवा ‘बेक्कार’ या दोनपैकी एक उत्तर देतात. मुळात आपल्यालाही अमुक डिग्री थंडी आहे, तमुक सेल्सियस गर्मी आहे किंवा ढमुक मिलिमीटर पाऊस पडला अशा उत्तराची अपेक्षा नसते. तुम्हा-आम्हां सर्वांनाच पक्के ठाऊक आहे की, डिग्री, सेल्सियस, मिलिमीटर यांचा आणि वातावरणाचा काही संबंध नाहीये, हे सारे मौसम विभागाचे चोचले आहेत!
पण ‘तुमच्याकडे मौसम कसा आहे?’ असा प्रश्न जेव्हा मला कुणी विचारतं तेव्हा माझं एकच उत्तर असतं ‘झकास’. मग मौसम कुठलाही असू दे. कुडकुडवणारी थंडी असुदे, घामाच्या धारा लागणारी गर्मी असुदे की जनजीवन ठप्प करणारा पाऊस असुदे. माझ्यासाठी सगळे मौसम नेहमी झकासच असतात. गुलाबी थंडीत किंवा रिमझिम पावसाच्या दिवसांत, झकास या उपाधीला मी आणखी एक शब्द जोडतो… झकास रोमँटिक!
‘झकास रोमँटिक’ हा ठरलेला गुळगुळीत फील-गुड प्रतिसाद देण्याची ही कला मी आदरणीय विश्वगुरुंकडून शिकलो आहे. भले एकीकडे आपण रोज नव्या थापा मारीत असू, दुसरीकडे एखाद्या राज्यात ईडीची भीती दाखवून आमदार फोडून सरकार पाडण्याच्या प्रयत्नात असू, तिसरीकडे एखाद्या राज्याची जीएसटीची देणी थकवून त्यांना जेरीस आणण्याची सेटिंग करीत असू, चौथीकडे प्रक्षोभक वक्तवे करणार्यांना पाठीशी घालत असू पण जेव्हा केव्हा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मंचावर जाहीर वक्तव्य करण्याची वेळ येते तेव्हा त्यांचा प्रतिसाद ठरलेला असतो की, आम्ही गांधीजींच्या मार्गाने चालणारी माणसे आहोत!
गुलाबी थंडीचा किंवा रिमझिम पावसाचा मौसम मला रोमँटिक का वाटत असेल, असा प्रश्न मी व्हॉट्सअप विद्यापीठातील सायकॉलॉजी विषयाचा डॉक्टर असलेल्या एका मित्राला विचारला. तर तो म्हणाला की, आपल्याला जी गोष्ट सहजसहजी लाभलेली नसते, किंवा ती गोष्ट लाभावी असं आतल्या आत मनाला एक भुंगा कुरतडत असतो, त्या न लाभलेल्या गोष्टीच्या वारंवार उच्चारानेच आपण स्वतःचं समाधान करीत असतो. उदा. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पुढे मजल न गेलेले सतरंजीबहाद्दर कार्यकर्ते आपल्या राजकीय वजनाच्या गजाली रंगवतात. सुकड्या अंगाचा गडी आपल्या तरुणपणीच्या पेहेलवानीचे किस्से मीठमसाला लावून सांगत असतो. भित्रे भागुबाई असलेले लोक पोराटोरांना आपण पाहिलेल्या भुताखेतांच्या गोष्टी सांगून घाबरवतात, साहेबांचा ओरडा खाऊन केबिनबाहेर येणारे लोक साहेबांना तोंडावर सुनावल्याची लोणकढी थाप मारीत सुटतात…
मित्राचं हे मत मला काही पूर्णतः पटलं नाही. ‘रोमान्सचं सुख आपल्याला फारसं लाभलं नाही’ हे कबूल करून अब्रू घालवायची की ‘रोमान्सचे बनावट किस्से सुनवून’ आपल्या इज्जतीचा भाजीपाला करायचा इतकाच पर्याय माझ्यासमोर होता. तसाही आजकाल, द्वेष करणे हेच राष्ट्रकार्य ठरल्यामुळे प्रेम करणे हा आपल्याकडे गुन्हा झालाय. त्यामुळे मित्राचं वरील मत मला पटलेलं नसलं तरी ते खोडून काढण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा धो-धो कोसळणारा पाऊस पाहत गॅलरीत आपल्या आवडीचे पेय घेऊन आपल्याच तंद्रीत बसणे मी पसंत केले.
बसल्या बसल्या मी विचार करीत होतो की, पूर्वी पाऊस कसा शहाण्या बाळासारखा ७ जूनला हजर व्हायचा. पुढे पुढे, पावसाचा गणितातील ‘क्ष’ झाला, म्हणजे आपण सगळे त्याला गृहीतच धरायला लागलो. म्हणून हल्ली त्याने ७ जूनला न येण्याची बंडखोरी केली असावी. कुणी असं गृहीत धरायला लागलं की आतला बंडखोर जागा होऊन काहीतरी आततायी पाऊल उचलण्यासाठी पावसाने राजकीय नेते असायला हवे असे काही नाही.
आजकाल पावसाळा आणि इतरही मौसम इतक्या वेगाने बदलू लागले आहेत, बेईमान होऊ लागले आहेत की ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, एकदम ओक्के’ म्हणणार्या आमदारांनाही शरम वाटावी. पूर्वी पाऊस पुस्तकातल्या समाजवादासारखा असायचा, सगळीकडे सारखाच पडायचा. हल्ली मलबार हिलला धो-धो पाऊस असेल तर धारावीत पावसाची केवळ भुरभुर सुरु असते आणि कल्याण-डोंबिवलीचे लोक टेरेसवर उन्हात कपडे वाळवत असतात. आपण निसर्गाशी खेळ करतो म्हणून निसर्गही आपल्याशी लपाछपीचा खेळ करू लागला असावा. एकीकडे धुवांधार पावसाने जनजीवन विस्कळीत होते तर दुसरीकडे लोकांना प्यायलाही पाणी मिळत नाही. मी तर म्हणतो, मोदीजींना सांगून सगळ्यांचं आधार कार्ड पावसाशी लिंक करायला पाहिजे. म्हणजे ज्याच्या त्याच्या वाट्याचा पाऊस ज्याच्या त्याच्या खात्यातच जमा होईल.
आजूबाजूला पाहिलं तर, पाऊस पडत नाही म्हणून कुरकुर करणारे लोक आहेत आणि पाऊस खूप झाला म्हणून डोळ्याला पूर आणणारेही लोक आहेत. पण मी सकारात्मक विचार करणारा माणूस असल्याने मी बाहेरच्या मौसम-बदलाचा माझ्या आतील मौसमावर फारसा फरक पडू देत नाही. ‘पाऊस पडत नाही’ अशी तक्रार करण्यापेक्षा ऐन पावसाळ्यात कपडे लवकर वाळताहेत ह्यात आपल्याला आनंद मानता आला पाहिजे. अपयशाला कुणीच वाली नसतो, मात्र यशाला शेकडो बाप असतात, हे आपल्याला ठाऊक आहेच. यावर्षी पाऊस उशिरा सुरु झाला, त्याची जबाबदारी घेणारं कुणीच नाही. मात्र पावसाची पहिली सर येताच ‘सगळ्यात पाfहला पाऊस आपल्याच वॉर्डात पाडेन या वचनाच्या वचनपूर्तीबद्दल वॉर्ड क्रमांक १०चे धडाडीचे नगरसेवक मा. श्री. अमुकतमूक ह्यांचे हार्दिक अभिनंदन!’ असा फ्लेक्स बॅनर आमच्या नाक्यावर लागला तरी मला आश्चर्य वाटणार नाही.
एकेकाळी कष्टाळू म्हणून ख्याती असलेले आपण, ‘कष्ट-टाळू’ होऊ लागलो आहोत. त्यात पावसाळ्याचा मौसम म्हणजे कांदाभजीचा, अपेयपानाचा आणि ऑफिसला दांड्या मारण्याचाही मौसम असतो. पण कितीही पाऊस, वादळवारा असला, प्रवासात कितीही त्रास सहन करावा लागला तरीही मी मात्र ऑफिसला जातोच जातो. याचा अर्थ मी खूप कामसू आणि समर्पित (सोप्या मराठीत म्हणायचं तर वर्कोहोलिक आणि डेडिकेटेड) वगैरे अजिबात नाहीये. फक्त माझ्यावाचून कंपनीचं काहीच अडत नाही, हे त्यांच्या लक्षात येऊ नये हीच माझी एक प्रामाणिक इच्छा-कम-धास्ती असते!
आयुष्यात खाल्लेल्या ठेचांवरून मी माझे स्वतःचे पावसाळ्याबद्दल काही ठोकताळे बनविले आहेत. नवीन घर घ्यायचं असेल तर ते पावसाळ्यात बघायला जावं, म्हणजे त्या घरात येणारी ओल, गळणारं छप्पर, खिडकीतून दिसणारं निसर्गदृष्य आणि परिसरात तुंबणारं पाणी अशा त्या घराच्या सगळ्या अधिक-उणे बाजू समजतात आणि खरेदीचा निर्णय घेणे सोपे होते. याउलट, लग्नासाठी मुलगी बघायचा कार्यक्रम पावसाळ्यात अजिबात करू नये, असं माझं प्रामाणिक मत आहे. होते काय की, जेमतेम बरी दिसणारी मुलगी देखील पावसाळ्यात अप्रतिम सुंदर दिसते. भाबडा माणूस ‘हो’ म्हणून बसतो आणि फसतो. आपल्यासारखं इतर कुणी असं फसू नये हीच एक प्रामाणिक इच्छा, बाकी काही नाही!
गेली कित्येक वर्षे टीव्हीवर क्राइम पेट्रोल पाहत असल्याने माझा स्वभाव सर्वच बाबतीत खूपच सावध आणि सतर्क झालेला आहे. एखाद दिवशी वातावरण कुंद दिसलं, कुठल्याही क्षणी पाऊस सुरु होण्याची शक्यता आहे असं वाटलं की मी खबरदारीचा उपाय म्हणून टेरेसवरील वाळवणं घरात आणतो, पावसाची झड येईल अशा खिडक्या-दारे बंद करतो, घरात पुरेसं बेसनाचं पीठ आणि कांदे असल्याची बायकोला खात्री करून घ्यायला सांगतो, कपाटातील काचेच्या बाटल्यांचा अंदाज घेतो आणि न विसरता, पावसाळी कवितांच्या भीतीने सोशल मीडियावरील सर्व यमकहराम कविलोकांना ब्लॉक करून टाकतो. उगीच रिस्क कशाला घ्या!
बाहेर पाऊस सुरु होतो तेव्हा माझ्या मनात मोर नाचू लागतो. आवडत्या खाद्य आणि पेय पदार्थांचा आस्वाद घेत मी टीव्ही सुरु करतो. टीव्हीवरील अँकर जिवाच्या आकांताने केकाटत असतो… ‘तुमच्या घराभोवती हे जे साचलेले किंवा तुंबलेले पाणी जे आहे, त्या पाण्याची खोली जी आहे आणि हातातला ग्लास जो आहे तो खाली ठेवून तुमचा मोबाईल जो आहे तो घेऊन तुम्ही ज्या हिमतीने हा फोटो खेचून इथे अपलोड केलेला आहे त्या तुमच्या मुंबई स्पिरिटला दाद जी आहे ती द्यावीच लागेल. पण पावसाचा जोर जो आहे आणि ज्या वेगाने तुमच्या घराभोवती हे जे पाणी साचत आहे त्यामुळे तुमच्या जीविताला धोका जो आहे तो धोका येथे निर्माण होण्याची शक्यता जी आहे ती शक्यता इथे निर्माण होऊ शकते…’ माझ्याच्याने तो टीव्ही अँकर बोलत असलेली, ‘ज’ ची बाराखडी ऐकवत नाही. मी टीव्हीचा गळा आवळतो आणि डोळे मिटून, बाहेर पडणार्या पावसाचे माझ्या अंतरंगात उमटणारे तरंग न्याहाळू लागतो…
या पृथ्वीवरील जीवन फुलवणारा पावसाळा देखील आपल्याला आपल्या मर्जी आणि सोयीप्रमाणे हवा असतो. आपण घरात सुरक्षित असताना किंवा पिकनिकला गेलो असताना आपल्याला पाऊस हवाय. शहराला पाणीपुरवठा करणार्या तलावाच्या क्षेत्रात पाऊस पडायला हवाय. पण कामाच्या निमित्ताने घराबाहेर असताना आपल्याला पाऊस नकोय. एकंदरीत, आपल्या स्वार्थी, सुशेगाद, असहनशील जीवनशैलीची घागर डुचमळेल असा मौसम आपल्याला नकोय. मी मलाच समजावतो की, बदल हीच एकमेव शाश्वत गोष्ट आहे. त्यामुळे निसर्गातील असो की वैयक्तिक आयुष्यातील असो, मौसम बदलत असेल तर त्याबद्दल बरं, वाईट किंवा आश्चर्य वाटून घेण्याचे काम नाही. मौसम चांगला असो की वाईट, ‘हेही दिवस जातील’ हा मंत्र आपण कायम लक्षात ठेवायला हवा. वाईट मौसम जाऊन चांगला मौसम येणे हे निसर्गापेक्षा आपल्या मनोधैर्यावर जास्त अवलंबून असतं. आयुष्यात, शिशिरातली पानगळ आपोआप येते. पण पावसात मोहोरणारं जीवन आणि वसंतातला बहर आपोआप येत नाही, तो आणावा लागतो…!
तर असा आहे आमच्याकडील मौसम! आता तुम्ही सांगा, तुमच्याकडे कसा आहे मौसम?