• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

निंदकाचे घर…

- सॅबी परेरा (कहीं पे निगाहें...)

Nitin Phanse by Nitin Phanse
October 6, 2022
in कहीं पे निगाहें...
0

स्वतःचं घर बांधण्याच्या किंवा विकत घेण्याच्या भानगडीत मी कधी पडलोच नाही. आजवर, मी वेगवेगळ्या ठिकाणी भाडे करारावर राहत आलोय. दर अकरा महिन्याला आम्ही घर बदलतो. मी माझ्या एजंटला सांगूनच ठेवलंय. बाबा रे, डिपॉझिट थोडं जास्त द्यावं लागलं तर चालेल. भाडंही बाजारभावापेक्षा जास्त असलं तरीही हरकत नाही. घरमालक कटकटी करणारा असला तरीही आम्ही चालवून घेऊ. पण आम्हाला शेजारी मात्र चांगले मिळाले पाहिजेत. शेजार्‍यांना आमच्या खाजगी आयुष्यात इंटरेस्ट असला पाहिजे. आम्ही काय खातो, काय पितो याबद्दल त्यांना उत्सुकता असली पाहिजे. आम्हा नवरा-बायकोचे संबंध कसे आहेत याबद्दल त्यांना कुतूहल असलं पाहिजे. आमच्या मुलांच्या शालेय आणि शाळाबाह्य कर्तृत्वाची खडानखडा माहिती काढण्याची त्यांची तयारी असली पाहिजे. आम्ही कधी, कुणासोबत बाहेर जातो, बाहेर नक्की काय करतो, किती वाजता, कुणासोबत आणि कुठल्या अवस्थेत घरी येतो, याबद्दल त्यांना काळजी असली पाहिजे. आमच्या पाठीमागे आमच्याविषयी गॉसिप करून आमची तथाकथित गुपितं ‘कुणाला सांगू नको, आपल्याला काय करायचंय!’ या बेसिसवर सगळ्यांना सांगण्याचा त्यांना उत्साह असला पाहिजे…
कळविण्यास आनंद होत आहे की, वरील बाबतीत आमच्या एजंटने आणि आजवर आम्हाला लाभलेल्या शेजार्‍यांनी आम्हाला या शेजारसुखाच्या बाबतीत कधीच निराश केलेले नाहीये. सुदैवाने आम्हाला आजवर लाभलेले सगळे शेजारी सुखवस्तू असले तरी, कधी रात्री उशिरा पाहुणे आलेत म्हणून चहापुरतं दूध हवंय, रात्रीच्या पार्टीला उतारा म्हणून पहाटे पहाटे लिंबू हवंय, विरजण लावण्यापुरते दही हवंय, आमचा डेटा संपलाय म्हणून तुमच्या वायफायचा पासवर्ड हवाय अशा मागण्या घेऊन वेळी-अवेळी आम्हाला त्यांच्या सेवेची संधी आणि त्यायोगे पुण्यप्राप्तीचा लाभ देतच असतात. आपण मात्र कधीतरी चुकून एखाद्या वेळी शेजार्‍याकडे बर्फ मागायला जावे, तर चार-सहा बर्फाच्या खड्यांच्या बदल्यात शेजारचे काका हक्काने आपल्या व्हिस्कीत भागीदार होतात.
काही वर्षांपूर्वी आमच्या शेजारी एक काका राहत. ते निवृत्त शासकीय कर्मचारी असल्याने वर्तमानपत्र विकत घेऊन वाचणे त्यांच्या तत्वात बसत नसे. ते रोज सकाळी आमच्याकडे यायचे. आमची विचारपूस करायचे. चहा प्यायला आम्हाला सोबत द्यायचे आणि ‘शून्य मिनिटांत तुमचा पेपर परत करतो’ म्हणत आमच्या घरातील वर्तमानपत्र घेऊन जायचे. त्यांचं ‘शून्य मिनिट’ कधीकधी तास-दोन तास पुरायचं. सकाळी वाचून झालेला पेपर ‘काहीतरी वाचायचं राहिलंय’ असं सांगून ते दुपारी पुन्हा घेऊन जात आणि तो पेपर आमच्या घरी परत येत नसे. याद्वारे माझ्या छोट्याशा घरात अडगळ होऊ नये ह्याची ते काळजी घेत असत. महिनाअखेरीस ते सगळे पेपर रद्दीवाल्याला विकून माझ्यासारख्या सज्जनाने पैशाच्या मोहाला बळी पडू नये म्हणून त्या रद्दीचे पैसे, काका स्वतःकडेच ठेऊन घेत असत.
बर्‍याचदा सकाळी काकांनी पेपर वाचून झाल्यावर त्यांचा अडीच वर्षाचा नातू त्या पेपरचा योग्य तो वापर करायचा. अशावेळी ते काका, इमानदारीत आमच्याकडे येऊन पेपर परत करता येत नसल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त करीत असत आणि माझ्या सोयीसाठी त्यांनी वाचलेल्या पेपरमधील महत्वाच्या बातम्या आणि अग्रलेखाचा सारांश मला सांगून माझ्या मौल्यवान वेळेची बचत करत असत. आपल्याला एकही दिवस वर्तमानपत्राशिवाय राहावे लागू नये म्हणून माझ्या दीर्घायुष्यासाठी ते काका रोज प्रार्थना करतात असेही मला त्यांच्या बायकोने एकदा सांगितले होते. असेलही.
आपल्याला शेजार्‍यांचा अनुभव नेहमी वाईटच येतो अशातला भाग नाहीये. क्वचित कधीतरी आपल्या मनासारख्या घटनाही घडतात. पावसाळ्याच्या दिवसांत, एकदा कपडे वाळविण्यासाठी दोरी बांधावी म्हणून लाकडी स्टूल आणि दोरी घेऊन मी गॅलरीत गेलो होतो. तेव्हा मी आत्महत्या करणार आहे असे वाटून, नव्यानेच शेजारी राहायला आलेली एक सुबक ठेंगणी काकुळतीने म्हणाली होती, ‘अहो, असा अविचार करू नका हो, मी विचार करून सांगते!’
खोटं का सांगू! त्या दिवसापासून माझं गॅलरीत जाणं वाढलं.
लॉकडाऊनच्या काळात तर मी ऑफिसच्या कामाच्या निमित्ताने लॅपटॉप घेऊन आमच्या गॅलरीतच बसू लागलो. दिवसभर काही ना काही कारणांनी ती सुबक ठेंगणी त्यांच्या गॅलरीत यायची, तेव्हा आमची नजरानजर होत असे. तुम्हाला सांगतो, आपण मांजरासारखे कितीही डोळे मिटून दूध पीत असलो तरी घरच्या एसीपी प्रद्युम्नच्या नजरेतून ही बाब सुटणे अशक्यच असते. असंच एकदा आमच्या गॅलरीत बसून समोरच्या गॅलरीत पाहत, ‘चलाओ ना नैनो से बाण रे..’ या गाण्याचा रियाज करीत असताना एसीपी प्रद्युम्नने आम्हाला रंगेहात पकडले आणि म्हटले, ‘तिच्यापेक्षा मी सुंदर आहे… खोटं वाटत असेल तर तिच्या नवर्‍याला विचारा!’ हा असा गुगली होता की त्यानंतर दोन दिवसांत मी काळ्या काचेच्या तावदानाने आमची गॅलरी कायमची बंद करून टाकली.
त्या दिवसापासून मी स्वतःहून गॅलरी हा विषय माझ्या अभ्यासक्रमातून बाद करून टाकला. फक्त एके दिवशी काय झालं की, मला एका मित्राचा फोन आला आणि मी घरी न सांगता घाईघाईने बाहेर निघून गेलो. तिथून यायला मला जरा उशीरच झाला. दरम्यानच्या काळात आम्ाच्या त्या सुबक ठेंगणीवाल्या शेजार्‍यांच्या फ्लॅटमधून हसण्या-खिदळण्याचा आवाज येत असल्याचे ऐकून बायकोने रागारागाने त्यांच्या फ्लॅटची बेल वाजवून, आदळआपट करून त्यांना दरवाजा उघडायला लावला आणि त्यांच्या घरात मी कुठे नाहीये ना ह्याची खात्री करून घेतली. त्या कृत्याबद्दल नंतर बायकोने त्यांची आणि माझी माफीही मागितली. पण मला त्यात माझ्या बायकोची काही चूक होती असं वाटत नाही. कुणीतरी म्हटलं आहेच की, जेव्हा आपला बोकड हरवतो, तेव्हा शेजार्‍याच्या घरातल्या बिर्याणीचा वास संशयास्पद वाटणे साहजिक आहे.
एकदा माझी बायको काही दिवसांसाठी माहेरी जाऊन आली तेव्हा तिला दारातच थांबवून शेजारच्या काकूंनी, तू माहेरी असताना तुझ्या नवर्‍याला भेटायला क्ष दिवशी, य वाजता, अमुक वर्णाची, तमुक उंचीची, अशी-अशी दिसणारी, ढमुक रंगाचा ड्रेस घातलेली, अलाण्या भाषेत बोलणारी आणि फलाण्या प्रकारे चालणारी एक बाई आली होती, हे इतकं डिटेलवार वर्णन करून सांगितलं की त्या वर्णनावरून ‘सीआयडी’मधला मंदबुद्धी फ्रेड्रिक्स देखील गुन्हेगाराला शोधून काढू शकेल. नवर्‍याची लफडी पकडण्याच्या बाबतीत बायकांचा इंटेलिजन्स डोवाल लेव्हलचा असतो. त्यामुळे माझी चोरी पकडली गेली हे तर स्पष्टच आहे. त्याबद्दल घरात जे काही रामायण घडायचं तेही साग्रसंगीत घडलं. इतकेच नव्हे तर त्या काकूंच्या तुलनेत, सोसायटीत येणार्‍या लोकांचे तपशील कॅप्चर करण्यात आपण कमी पडतो असा न्यूनगंड येऊन आमच्या सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याने आत्महत्या केली.
पहिल्या मजल्यावर राहणारी आणखी एक काकू, आपल्या दुखणार्‍या गुढघ्यांची पर्वा न करता, लिफ्ट बंद असतानाही आशा पारेख समकक्ष जिद्दीने, जिन्यावरून बारा मजले चढून आमच्या फ्लॅटमधे आली आणि ‘तुमचा नवरा सोसायटीच्या बाजूच्या रस्त्यावर कुणातरी बाईशी गुलूगुलू बोलत होता. पण मला लांबचं नीट दिसत नसल्याने ती बाई कोण होती ते कळले नाही’ अशी अत्यंत महत्वाची, तातडीची आणि विस्फोटक बातमी आमच्या गृहखात्यापर्यंत पोहोचवून, मलईदार दुधाचा, अद्रक-वेलची युक्त चहा ढोसून निघून गेली. त्यानंतर कित्येक दिवस मला घरचा बिनदुधाचा चहादेखील मिळाला नाही. केवळ शारीरिक व्यंगामुळे कुणाला आपल्या ईश्वरदत्त कर्तव्यापासून मुकावे लागू नये असं माझ्या बायकोचं मत आहे. म्हणूनच, वरील घटनेनंतर आठवडाभराने बायकोने सोसायटीतील समस्त म्हातार्‍या बायकांना हळदीकुंकवासाठी घरी बोलावले आणि वाण म्हणून उत्तम दर्जाच्या महागड्या दुर्बिणी भेट दिल्या.
तुकाराम महाराजांनी म्हटले आहे की, निंदकाचे घर असावे शेजारी! मला तुकारामाच्या जीवनाबद्दल, त्यांनी लिहिलेल्या वॉटरप्रूफ अभंगाबद्दल आणि महाराज पुष्पक विमानात बसून सदेह वैकुंठाला गेले तेव्हा त्यांना एयर माइल्सचे किती पॉईंट्स मिळाले असतील याबद्दल प्रचंड कुतूहल आहे. त्यामुळे भाड्याचं नवीन घर घेताना त्याचं भाडं किती आहे? ते फर्निश्ड आहे की अनफर्निश्ड? तिथे व्हेंटिलेशन किती आहे? मच्छी-मार्केट आणि दारूचं दुकान किती जवळ आहे? तिथे व्होडाफोनला रेंज येते का? यापेक्षा तिथे पुरेसे निंदक शेजारी आहेत की नाहीत या गोष्टीला मी प्राधान्य देतो.
मी नवीन ठिकाणी राहायला गेलो रे गेलो की रोज संध्याकाळी मला भेटायला आजूबाजूचे शेजारी एकेकटे येतात आणि आपापल्या मगदुराप्रमाणे माझ्यासोबत चहा, सरबत, बिअर किंवा व्हिस्की घेताघेता उर्वरित सर्व शेजार्‍यांच्या काळ्या कर्तृत्वाचा पट माझ्यासमोर मांडतात. त्यामुळे आठवडाभरातच मला नवीन सोसायटीची पूर्ण ओळख होते. अशाच प्रकारे दुपारी बायकोला भेटायला सोसायटीतील बायका येऊन आपल्या स्वतःव्यतिरिक्त इतरांच्या घरात काय घडते आहे याचा अपडेट देत असतात. रोजच्या रोज येणारी एक आजी दोन दिवस दिसली नाही म्हणून माझी बायको तिला भेटायला गेली तेव्हा कळले की ती आजीबाई तापाने फणफणून अंथरुणाला खिळली होती. माझ्या बायकोने तिला, तिसर्‍या मजल्यावरच्या डॉक्टरांची पोरगी ड्रायव्हरसोबत पळून गेल्याची खबर दिली तेव्हा ती म्हातारी, संजीवनी बुटी खाल्ल्यागत लगेच अंथरुणात उठून बसली.
यापुढे वयोमानामुळे आपल्याला दर अकरा महिन्याला घर बदलण्याची दगदग सहन होणार नाही असे मला वाटते. म्हणून मी तळेगावला एकमेकांशेजारी असे तीन रो-हाऊसेस विकत घेतले असून त्यापैकी मधल्या रो-हाऊसमधे आम्ही स्वतः राहावे आणि दोन्ही बाजूचे दोन रो-हाऊसेस भाड्याने द्यावे अशी माझी योजना आहे. अगदी कमीत कमी डिपॉझिट आणि महिन्याचे नाममात्र एक रुपया भाडे या तत्वावर ही दोन्ही रो-हाऊसेस भाड्याने द्यायचा माझा विचार आहे. अट एकच की, त्यात राहणार्‍या भाडेकरूंना आमच्या खाजगी आयुष्यात इंटरेस्ट असायला हवा. आमच्याबद्दल विविध मार्गाने माहिती काढण्यासाठी साम-दाम-दंड-भेद असे सर्व मार्ग अवलंबिण्याची त्यांची तयारी हवी आणि त्यांच्याकडे या कामासाठी पुरेसा फालतू वेळ हवा. विविध मार्गाने आमच्याविषयी मिळविलेली माहिती प्रत्यक्ष भेटून, टेलिफोनद्वारे आणि सोशल मीडियाचा वापर करून योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवून कळ लावण्याची तसेच ती माहिती सर्वदूर पोहोचविण्यासाठी लागणारे कष्ट घेण्याची त्यांची तयारी असावी. वरील अटींच्या अधीन राहून, तुम्हाला कुणाला आमच्या शेजारच्या या रो-हाऊसमधे भाड्याने राहण्याची इच्छा असेल तर मी जेवत असताना, बाथरूममधे असताना किंवा दुपारी एक ते चार वामकुक्षी घेत असताना आमच्या रो-हाऊसच्या दरवाज्यावरील बेल नॉन-स्टॉप वाजवावी ही विनंती.

[email protected]

Previous Post

चिंतनशील विचारवंताचा नाट्यआलेख!

Next Post

गोडवा आणणारा दिवाळी फराळ

Next Post

गोडवा आणणारा दिवाळी फराळ

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.