तुम्ही तुमच्या अनेक कामांमध्ये चालढकल करता का हो? तुमचं तुम्हाला माहीत, पण आमचे नानिवडेकर काका मात्र चालढकल करतात. एक उदाहरण पाहा. तेच सांगत होते की त्यांच्या घरी साफसफाई करायची आहे. अडगळ काढून टाकायची आहे. पण ते काम ते करतच नाहीयत. नानिवडेकर काका एकटेच राहतात. या कामी त्यांना मदत करायला कोणी नाही. कोणीतरी बाहेरची माणसं पैसे देऊन लावावी तर तेवढी काकांची आर्थिक स्थिती बरी नाही. त्यामुळे ते काम काकांनाच करायचं आहे. पुढच्या रविवारी करूया असं काका ठरवतात. परंतु एवढं सगळं साफसफाईचं काम, अडगळ काढण्याचं काम त्यांची दमछाक करणारं आहे, त्यामुळे त्यांना ते नकोसं वाटतं. काका ते काम टाळायला लागतात. पुढच्या रविवारी करूया असं मात्र ते ठरवतात. पण पुढच्या रविवारीसुद्धा ‘ये रे माझ्या मागल्या’ होतं. गेले कित्येक महिने नानिवडेकर काकांचं हे असंच चाललं आहे. आता काका स्वतःवर वैतागत राहतात. हे सफाईच काम केलं पाहिजे असं त्यांना वाटतं. परंतु या कामात होणारी शारिरीक दमछाक त्यांना नकोशी वाटते. हे काम त्यांना अप्रिय आहे. हे काम ते टाळत राहतात.
नानिवडेकर काकाच असं करतात असं नाही, तर शेजारचा तन्मय, जो कॉलेजात शिकतो आहे, तोही अभ्यासात चालढकल करतो. अभ्यास करायचा कंटाळा करतो. पुस्तकं वाचायचा, नोट्स काढायचा कंटाळा करतो. उद्या करू, परवा करू असं म्हणत अभ्यास करणे टाळत राहतो. परीक्षा जवळ आली की मात्र त्याची धांदल उडते. घाईघाईत नोट्स काढणं, घाईघाईत अभ्यास करणं यातून जेमतेम पास होण्यापुरते मार्क्स त्याला मिळतात. खरं तर तन्मयने रोज थोडा थोडा अभ्यास केला तर त्याची ही अशी घाई गडबड होणार नाही. तो बरे मार्क्स मिळवू शकेल. अभ्यासात प्रगती करू शकेल.
तन्मयप्रमाणेच आमचा एक मित्र किशोर देशमुख, जो एका सरकारी कार्यालयात नोकरी करतो, त्याला लेखन करायचं आहे. किशोरला पूर्वीपासून लेखनाची आवड आहे. त्याने छोट्या मोठ्या गोष्टी लिहिल्या आहेत. लेख लिहिले आहेत. त्याला एक पुस्तक लिहायचं आहे. त्याचा तो संकल्पच आहे. पण त्याच्या या संकल्पाला बरीच वर्ष लोटली आहेत. मी हे करणारच, हे पुस्तक मला करायचंच आहे, असं तो म्हणतो. परंतु प्रत्यक्षात त्याच्या हातून ते होत नाही, ते काम सुरू करणे त्याला शक्य होत नाहीये. करू, पुढच्या महिन्यात करू, त्या पुढच्या महिन्यात करू, या वर्षभरात तर मी करणारच आहे असं तो सतत म्हणतो आहे त्याला अनेक वर्षे लोटली आहेत. आपल्याकडून काम होत नाही याचं त्याला वाईटसुद्धा वाटत आहे, परंतु तो सुरुवात करण्यासाठी मांडी ठोकून बसतही नाही, हेही खरं आहे.
पण मंडळी, आपण नानिवडेकर काका, तन्मय आणि किशोरचंच का बोलतो आहोत? तुमच्या-माझ्याकडून पण अशी चालढकल होत नाही का? आपणही असं करतो ना? आपल्यालाही काही गोष्टी करण्याचा कंटाळा येतो ना? अगदी आपल्या आवडीच्या गोष्टीही आपण तातडीने करत नाही, असं होतं ना? मंडळी, जे काम करायचं आहे ते आपण नाही केलं तर कोण करणार? प्रत्येक माणसाला काही कंटाळवाणी कामं करावी लागतातच ना? अन् आपण ती करत नाही तेव्हा आपल्याला सतत त्याची टोचणी लागते ना?
आता या समस्येवर उपाय काय तर आपण ज्या कामाला वेळ देत नाही त्याला वेळ द्यायचा. ते काम करायचं. त्या कामाची डेड लाईन ठरवायची. ते काम संपवण्याचा दिवस, वेळ ठरवायची अन् ते संपवून टाकायचं. रखडलेलं काम होण्यासाठी एक युक्ती इथे सांगतो. अनेक दिवस आपल्याकडून जे काम होत नाहीये ते काम फक्त पाच मिनिटांचं आहे, असं ठरवायचं. पाचच मिनिटं ते काम करायचं आहे, असंठरवायचं. म्हणजे प्रत्यक्षात फक्त पाच मिनिटांत ते काम होईलच असं नाही. पण पाच मिनिटंच ते काम करून आपण ते थांबवू शकतो, असा अधिकार आपण स्वतःला द्यायचा. म्हणजे आता काम सोपं झालं… फक्त पाचच मिनिटं तर ते काम करायचं आहे. ज्या कामाचा कंटाळा आला आहे, जे काम आपण करतच नाही, जे काम आपल्याकडून होतच नाही, ते काम आपण सुरू करू आणि पाच मिनिटांनी थांबवून टाकू. असं जर आपण केलं तर निदान ते काम सुरू होईल. पाच मिनिटांनी ते थांबवलं तरी पाच मिनिटात थोडसं तरी काम झालेलं असेल. बाकीचं काम आपण उद्या, परवा कधीही पाच पाच मिनिटं करत तडीस नेऊ.
बर्याचदा हे पाच मिनिटं करायला घेतलेलं काम आपल्याकडून दहा मिनिटे होण्याची शक्यता आहे. पंधरा मिनिटे होण्याची शक्यता आहे. अर्धा तास, एक तास सुद्धा होण्याची सुद्धा शक्यता आहे. आपलं काम थोडं थोडं पुढे सरकत राहील.
मंडळी, काम करणं सुरू होणं हे महत्त्वाचं असतं. ते एकदा सुरू झालं की आपल्याकडून पुढे जाऊ शकतं. पूर्ण होऊ शकतं. नानिवडेकर काकांनीही एका-एका दिवशी पाच-सात मिनिटांत होईल तेवढा एखादा कोपरा स्वच्छ करावा आणि दुसर्या दिवशी दुसरा कोपरा, दुसरी कुठली तरी जागा, जिथली अडगळ पाच मिनिटात काढून टाकणं आणि स्वच्छता करणे शक्य आहे ते करावं. असं करता करता रोज त्यांनी त्या कामासाठी पाच मिनिटे दिली तर ती पाच मिनिटे, दहा-पंधरा मिनिटे होऊन एक आठवड्यात किंवा दोन-तीन रविवारमध्ये घर स्वच्छ होऊन जाईल, लख्äख होऊन जाईल आणि काकांना प्रसन्न वाटेल. तन्मयने सुद्धा असं ठरवलं की पाच मिनिटं वाचूया, पाच मिनिटं नोट्स काढूया, त्यानंतर नोट्स काढणं थांबवून टाकूया, नंतर आपण आपल्याला जे काही आवडतं ते करूया; तर निदान काहीवेळ तरी तो अभ्यासाला बसेल.
किशोरने सुद्धा ठरवलं की लिहायला तर घेऊया. सुरुवात तर करूया. पाच मिनिटात जेवढं होईल तेवढं करूया. पाच मिनिटानंतर थांबू. अशाने किशोर पाच मिनिटं लिहायला लागेल. उद्या तो दहा, पंधरा मिनिट असं करत करत काम मार्गी लावेल.
मित्रहो, ही सुरुवातीची पाच मिनिटं महत्त्वाची असतात. त्यावेळेला जर नेटाने काम सुरू केलं तर ते पुढे जातं. अवघड वाटत नाही. आपण आपलं काम करत आहोत या विचारामुळे काम चालू ठेवायला आपल्याला आपल्याकडूनच प्रोत्साहन मिळतं. उत्तेजन मिळतं. एखादं आपलं वागणं, कृती पक्की होण्यासाठी आपणच आपल्याला दिलेल्या उत्तेजनाचा खूप उपयोग होतो. काम तडीस जातं.
आपण कोणतही काम पुढे ढकललं किंवा त्या कामात चालढकल केली तर त्या कामातून आपण तात्पुरती सुटका करून घेतो; पण आपण आपलंच नुकसान करून घेत असतो. त्या क्षणी आपल्याला आळस करणं, आराम करणं प्रिय वाटतं. पण त्या कामानंतर जो आनंद मिळणार आहे, जे यश मिळणार आहे त्यापासून आपण वंचित राहतो. आत्ता मिळणार्या तथाकथित आनंदापेक्षा, सुखापेक्षा, करमणुकीपेक्षा दूरवरच्या फायद्याचा विचार करणे अधिक योग्य असतं याचा नीट विचार केला, मनात रुजलेली चालढकल करण्याची सवय मोडली तरच आपण प्रगती करू शकू. तेव्हा चालढकल करणं सोडू. पाच मिनिटं तर करायचं आहे असं ठरवून कामाला लागू.
तर मग काय मंडळी? तुमच्या रखडलेल्या कामाबद्दल, राबवून पाहताय ना ही पंचमिनिट योजना?