अभिनेता माधव अभ्यंकर यांचा चेहरा चित्रपट रसिकांव्यतिरिक्त कुणाच्या चटकन लक्षात येणार नाही, पण अण्णा नाईक म्हटलं की खुनशी डोळ्यांचा तो तिरसट माणूस लोकांना लगेच आठवतो. झी मराठी वाहिनीवर ‘रात्रीस खेळ चाले’चा तिसरा भाग नुकताच सुरू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर थेट अण्णांशीच केलेल्या मनमोकळ्या गप्पा…
——————–
माधवजी, ‘रात्रीस खेळ पुन्हा आलाय… काय सांगाल या नव्या भागाबद्दल?
– या मालिकेचा पहिला भाग 2016 साली आला होता. त्याचाच आता हा तिसरा सिक्वल आहे. पहिल्या भागात अण्णा गेले तेव्हापासून मालिका सुरू झाली. मग नेनेंचा खून, सर्वांवर संशय, मोठ्या सुनेला अटक वगैरे सगळं होतं. त्यानंतर काय झालं हा प्रश्न या तिसऱ्या भागात आम्ही दाखवणार आहोत. हे घर कसं हळूहळू अस्ताला गेलं, मग पुन्हा हे कुटुंब एकत्र झालं का हे सगळं यात येणार आहे.
ही मालिका हॉरर अशी झालीच नाही. आता तरी काही हॉरर असेल का?
– हो. काहीसं तसं झालं खरं… पण आता या तिसऱ्या भागात प्रेक्षकांना थोडं हॉरर वाटेल असं कथानक आहे. याचा अंदाज तुम्हाला पहिले दोनतीन एपिसोड पाहून आलाच असेल. सुरुवातच अण्णा चितेवरून उठल्याचं दाखवून त्यांचं वास्तव्य त्या वाड्यात असणार याची कल्पना आली होती. मग अण्णा त्या बिल्डरचा पाहुणचार कसा थरारकपणे करतात ते आपण पाहिलं. त्यामुळे पुढेही अण्णांचे असेच प्रताप पाहायला मिळणारच आहेत.
आता नव्या भागात नेमके काय वेगळेपण पाहायला मिळणार आहे?
– आता हे घर उध्वस्त झालं. जो तो आपापल्या मार्गाने गेला. सर्वात हुशार असलेला प्रोफेसर माधव वेडा झालाय. तुम्ही पाहिलंच असेल. दत्ताही घर सोडून गेला आहे. अभिराम बंगळुरूला सेटल झालाय. सुशल्याचं लग्न झालंय. पण आता ती काय करते? हे यात पाहायला मिळेल. सुशल्या काही रिव्हेंज वगैरे घेते का हा उत्सुकतेचा भाग आहे. निर्माते काय ठरवतात तो त्यांचा लुक आहे.
तुम्ही आलात म्हणजे शेवंताही दिसणारच ना?
– हो. नक्कीच. अण्णा नाईक हा इमोशनल वगैरे असा माणूस कधीच नव्हता. त्याच्या आयुष्यात अनेक स्त्रिया येऊन गेल्या आहेत. त्यामुळे शेवंता व इतर स्त्रिया यांचा उल्लेख नव्या भागातही मधेमधे होणारच आहे. शेवंता गेल्यानंतर मालिका लगेच आवरती घेण्यात आली. पण काही प्रसंग अजूनही दाखवता येऊ शकले असते असा प्रेक्षकांचा रोख होता. त्यावर आता निर्मात्यांनी, चॅनल काहीतरी ठोस पावलं उचलली असावीत. शेवंता असो नाहीतर इतर कुणी, ते भुताच्या रूपात किंवा आठवणीच्या रूपातच पाहायला मिळणार आहेत. जिवंत कॅरेक्टर्स उध्वस्त दाखवत आहेत.
ऑडियन्सचा रिस्पॉन्स कसा आहे?
– खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय. मुळात ही मालिका लोकांना आवडली आहे. अण्णा हे कॅरेक्टरही वाईट असलं तरी लोकांना आवडतंय. त्यात चॅनेलने कॅन्पेनिंगच इतकं जबरदस्त केलंय की लोक आवर्जून रात्री 11 वाजता टीव्ही लावणारच. अण्णा परत येणार यातच लोकांना प्रचंड आनंद वाटतोय. आतापर्यंत असंख्य मेसेजेस, फोन्स, सोशल मीडियावर पोस्ट्स यांचा धुमाकूळ सुरू आहे. मी कुठेही गेलो तरी अण्णा नावानेच मला हाका मारतात. महाराष्ट्रातच नाही, तर बाहेरही… मधे मी बेळगावात गेलो होतो. तेथेही ‘ते पाहा अण्णा नाईक’ असंच लोक संबोधत होते. कर्नाटकात हुबळीपर्यंत या मालिकेचा प्रेक्षकवर्ग आहे. गुजरात आणि गोव्यातही अण्णांचे चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत.