गेले वर्षभर मी ‘इतिहास्य’ ही लेखमाला ‘मार्मिक’ या हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख आणि थोर व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या लोकप्रिय साप्ताहिकात लिहित आहे. गेल्या पन्नास वर्षांत हजारो व्यंगचित्रे, हास्यचित्रे, चित्रमाला, कथा चित्रे, पुस्तके व मासिकांची कव्हर्स यज्ञाला बसल्यागत रेखाटत राहिलो. ‘इतिहास्य’च्या निमित्ताने इतिहासात जमा झालेल्या भूतकाळाचे सिंहावलोकन करताना त्या त्या काळात काढलेली व्यंगचित्रे हास्यचित्रे ‘आय विटनेस’ म्हणून उपयोगी पडली. या काळात होत गेलेले सामाजिक बदल, २५ लेखांमध्ये काव्य, शास्त्र, विनोद, संगीत, सिनेमा, ज्येष्ठ श्रेष्ठ कलावंत, भेटलेली विविध क्षेत्रातली माणसे… प्रसंग एक एक करून आठवत गेलो. लेखनाचा व व्यक्त होण्याचा हा प्रवास मोठा सुखकर होता. शिवाय नव्याने काही चित्रे पुन्हा रेखाटावी लागली. त्यात आनंदाचा भाग इतकाच की फेसबुकवरील अनेक गुणीजनांनी माझ्या या मालेतल्या लेखांवर वेळोवेळी उत्तम भाष्य केले. झटपट पोचपावती मिळण्याचा हा एकमेव कट्टा. विश्वासाने लिहिते करायचे काम ‘मार्मिक’चे आहे.
‘टायटॅनिक’ ही बोट खडकावर आपटली आणि शेकडो लोकांचे प्राण गेले. ही घटना इतकी वर्षं झालीत तरी लोक विसरू शकलेले नाहीत. दुर्दैवाचा तो लँडमार्क म्हणता येईल… अशीच एक आठवण पुढची अनेक वर्ष सगळं जग विसरू शकणार नाही. कोरोनाने घेतलेले लाखो लोकांचे बळी ही अक्षम्य चूक सो-कॉल्ड शास्त्रज्ञांच्या शोधाची आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात प्लेगची साथ आली होती. ती फक्त भारतापुरती मर्यादित होती. त्यावेळी शोधही फारसे प्रगत नव्हते.
आज माणूस चंद्र आणि मंगळावर पोहोचलाय, तरीही कोरोनाला आवर घालता घालता लाखो निरपराध लोक बळी गेले. व्हॅक्सिनचा शोध लागता लागता जग जेरीस आले होते. एखादा ट्रक रस्त्यावर कलंडतो. त्यातल्या वस्तू रस्ताभर विखरून पडतात. त्या पळवण्यासाठी जाणार्या-येणार्यांची झुंबड उडते. तसेच औषध शोधणारे, विक्रेते, महानगरपालिका हॉस्पिटलवाले अडलेल्या व्यथित पेशंटला लुटत होते. केंद्र सरकारने पुढाकार घेऊन लाखो लोकांचे प्राण वाचवले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारनेही भरीव काम केले. मात्र रोजचे जनजीवन खूपच विस्कळीत आणि हालअपेष्टांचे झाले होते. घरोघर पेशंट्स, औषधाला पैसे नाहीत. हॉस्पिटल्समध्ये जागा नाही. मुले माणसे बेकार होऊन घरी बसली होती. शाळा बेमुदत बंद होत्या. तरी कॉलेज व क्लासेसवाल्यांनी हात धुवून घेतला. ‘स्लीपिंग ब्युटी’ कॉमिकसारखं सर्व गाव. निद्रिस्त स्मशानवत शांततेचे वाटे. वेळीअवेळी अॅम्बुलन्सचे भयावह भोंगे घाबरवून सोडत. घरातल्या ज्या व्यक्तींवर आपण जिवापाड प्रेम करायचो, ती हॉस्पिटलमध्ये दगावली तर बेवारस अवस्थेत जाळली वा दफन केली जायची. आपला जीव आपल्यालाच प्यारा असल्याने त्यांचे दुरूनही अंत्यदर्शन घेतले जात नव्हते. यज्ञात विघ्न आणणार्या राक्षसांप्रमाणे कोरोना दीड दोन वर्षे छळत होता. देवांनीही मंदिरांची कवाडे बंद ठेवली होती. सगळे स्त्री-पुरुष घरीच असल्याने प्रजनन किती झालं याचे आकडे कधी ऐकायला मिळाले नाहीत. ‘वर्क फ्रॉम होम’चा अर्थ ज्याने त्याने सोयीने घेतला. मात्र जे जगले ते खरेच नशीबवान म्हणायला हवेत.
‘महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळी राहती’ असे अनेक गरीब दुबळे औषधपाण्यावाचूनही जगले हे सत्यही नाकारता येणार नाही. अर्थात अनेक सेवाभावी डॉक्टर्स, परिचारिका, त्यांचा स्टाफ, लष्करी जवान, पोलीसही कोरोनाशी लढता लढता प्राणास मुकले, हे तसे त्यांच्या कुटुंबीयांसाठी दुर्दैवाचेच मानावे लागेल. अशांना सरकारी आधार कितपत मिळाला देव जाणे? मात्र या दोन वर्षांच्या काळात अनेक कलावंतांनी त्यांच्या परीने लोकांचे मनोरंजन केले. महाराष्ट्राच्या हास्यजत्रेने तर चॅनलवर २४ तास नवेजुने कार्यक्रम दाखवून लोकांना खुश ठेवले. माझ्यासारख्या अनेक व्यंगचित्रकारांनी व्हॉट्सअप आणि फेसबुकवर अनेक व्यंगचित्र काढून कोरोनाची तीव्रता कमी करायचा प्रयत्न केला. त्यातली काही चित्रे चिमटा घेणारी तर काही मनोरंजन करणारी होती. काही चित्रांचे नमुने पहा… आता ‘सोशल डिस्टन्सींग’ या बाईमुळे अडलेय… ‘वर्क अॅट होम’ जरा लफड्याचं दिसतं. पूर्वी रस्ते वाहनांनी अडायचे, आता फक्त अॅम्बुलन्सने… घरात बसून ग्रॅज्युएट व्हायची संधी मुलांना चुकून मिळाली. मास्क न वापरण्याची शिक्षा भाजीपेक्षा महागडी… एका क्षणी कोरोनाचे बळी संपले, पण शेतकर्यांच्या आत्महत्यांचं काय? असे प्रश्न निर्माण झाले.
हॉस्पिटल्समध्ये जागा नसायची, ऑक्सिजन मिळायचा नाही, बिल्डर लोकांनी फ्लॅट्स विकण्यासाठी नवी शक्कल काढली ती पाहण्यासारखीच आहे. कोरोनाच्या या अडचणीच्या काळात अनेक रतन टाटा, अझीम प्रेमजी यांच्यासारखे अनेक उद्योगपती, विराट कोहलीसारखे क्रिकेटपटू, अक्षयकुमार, सलमान, आमीर खान अशा अनेक नटांनी देशाला कोटी कोटीत मदत केली. त्यातले काही अंगचोर उघडेसुद्धा पडले. हळूहळू जग पुन्हा नव्याने उभे राहिले. कारण ‘जन पळभर म्हणती हाय हाय’ हेच कटू सत्य आहे. हेच ‘इतिहास्य’ आहे.