कर्नाटकातील हासन जिल्ह्यातील होळेनरसीपूर मतदारसंघ हा १९६२पासून दोन अपवाद वगळून माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि त्यांचे पुत्र रेवण्णा यांना सतत निवडून देणारा मतदारसंघ. खरेतर अशा बालेकिल्ल्यात विरोधी पक्षाला उमेदवार देखील सापडत नाहीत, पण इतक्या अभेद्य मतदारसंघात देखील लढण्यास भारतीय जनता पार्टीला पेशाने वकील असलेले जी. देवराज गौडा हे उमेदवार म्हणून मिळाले. कर्नाटकात जी. देवराज गौडा ओळखले जातात ते या मतदारसंघात एच. डी. रेवण्णा यांना कडवी झुंज देणारे २०२३च्या विधानसभा निवडणुकीतला भाजपा उमेदवार म्हणून. पक्षासाठी इतकी मोठी लढत देणारा आमदारकीचा उमेदवार कार्यकर्ता भाजपाचे क्रमांक दोनचे नेते अमित शहांना माहिती नसेल, अशी शक्यता फार कमी आहे. त्यामुळेच त्या कार्यकर्त्याने एका महत्त्वपूर्ण विषयावर पत्र लिहून लेखी लक्ष वेधले असताना ते पत्र अमित शहांना पोहोचले नसण्याची शक्यता धूसर आहे. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू आणि जनता दल सेक्युलर पक्षाचे युवा नेते प्रज्वल रेवण्णा हे शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार करत आहेत, इतकेच नव्हे तर हा विकृत इसम शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार करताना त्याचे व्हिडिओ देखील बनवले गेले आहेत (ते ब्लॅकमेल करण्यासाठी केलेले असावेत), असे देवराज गौडा यांनी डिसेंबर २०२३मध्ये एक पत्र लिहून अमित शहांना कळवले होते, ज्याची प्रत समाजमाध्यमांवर आली आहे. या पार्श्वभूमीवर जेडीएस या पक्षाशी युती करू नये अशी विनंती देखील त्या पत्रात केलेली आहे. इतर पक्षांतील असलेल्या नसलेल्या भानगडींची कानोकान खबर ठेवणार्या शहांनी या पत्राची कशी दखल घेतली? उठता बसता नारी सन्मानाच्या बाता मारणार्या त्यांच्या पक्षाने त्यावर काय केलं? देशाचे गृहमंत्री असलेल्या शहा यांनी या अत्यंत गंभीर अशा लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाची तातडीने दखल घेणे आवश्यक होते आणि सर्व उच्चाधिकार वापरून ताबडतोब त्या असहाय्य महिलांना न्याय देणे गरजेचे होते. इतका मोठा गुन्हा माहिती पडल्यावर कर्नाटक सरकारला सजग करायला हवे होते आणि कर्नाटक सरकारने कारवाई केली नसती, तर थेट सीबीआय चौकशी लावायला हवी होती. त्यात तर ते फारच पटाईत आहेत. पण, शहा यांना हे पत्रच मिळाले नसावे (अशीच सफाई आता लवकरच दिली जाईल). ते पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचल्यावर डोळेझाक केली गेली असेल, तर मात्र ती आपल्या पदाच्या प्रतिज्ञेशी आणि प्रतिष्ठेशी प्रतारणा ठरेल. पक्षाचा एक कार्यकर्ता हे गलिच्छ प्रताप सांगत असताना शहा यांच्या अत्याचारी समर्थक पक्षाने केवळ निवडणुकीची गणितं लक्षात घेऊन या विकृत नेत्याशी हातमिळवणी केली असेल, तर आता त्यांचे वॉशिंग मशीन फक्त भ्रष्टाचारच धुवून काढत नाही, तर ते बलात्कार, महिला अत्याचार देखील धुवून साफ करते, असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल.
या प्रकरणी अमित शहा यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेहमीच्या कोडग्या शैलीत मातृशक्ती आणि नारीशक्तीचा अपमान भाजपा सहन करणार नाही हे घोटीव, गुळगुळीत वाक्य फेकले. शिवाय, कायदा आणि सुव्यवस्था ही कर्नाटक राज्याची जबाबदारी म्हणत हातही झटकले. यांचे हे एक बरे आहे, यांना हवे असेल तेव्हा (कुणाच्याही खानपानात नाक खुपसणार्या यांच्या समर्थकांप्रमाणे) हे राज्याच्या कायदा सुव्यवस्थेत अनावश्यक हस्तक्षेप करतात. कंगना रणौत ही सिनेनटी मुंबईत राहून मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करते, म्हणून राज्य सरकार कारवाई करणार तर त्याआधीच हे तिला वाय दर्जाची सुरक्षा देतात, खासदारकीचे तिकीटही देतात. पण, आग बुडापाशी येते तेव्हा कायदा राखायची जबाबदारी राज्यावर टाकून मोकळे होतात.
निवडणुकीच्या गणितासाठी युती अपरिहार्यच होती, असं मान्य करायचं तर जसे आज महाराष्ट्रात मिंधे व अजितदादांना उमेदवार बदलण्यास भाग पाडले जाते, तसे जेडीएसवर प्रज्वल रेवण्णासारखा विकृत उमेदवार नको असा दबाव टाकून थोडीफार तरी नैतिक जबाबदारी भाजपाला पार पाडता आली असती. युतीच्या राजकारणाची मर्यादा म्हणा, भाजपाची एकेक जागेसाठी चाललेली दमछाक म्हणा किंवा तथाकथित राष्ट्रीय पक्षाची लाचारी म्हणा; त्यांना हा उमेदवार मान्य करावाच लागला. वर पंतप्रधानपदाची गरिमा गुंडाळून ठेवून पक्षाचे निरर्गल प्रचारमंत्री बनलेल्या पंतप्रधानांनी स्वतःचा आब न ठेवता या लिंगपिसाट नराधमाचा प्रचार केला, त्याचे कौतुकही केले आणि त्याला मोदी का परिवारचा सदस्य बनवले (त्याच्याशेजारी बाहुबली, अत्याचारी बृजभूषणचा पाट, मुलाच्या उमेदवारीखाली झाकून मांडला आहेच). भाजपवर नेमकी काय वेळ आली आहे की या एका जागेसाठी मोदींकडून स्वतःची (माध्यमनिर्मित) प्रतिमा पणास लावली गेली. मोदी परिवाराला देवेगौडा परिवाराची इतकी काय गरज?
भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आज वयाची नव्वदी ओलांडून गेले आहेत. एका राजकीय पक्षाच्या माध्यमातून कर्नाटकातील गोरगरीब व शेतकरी जनतेची त्यांनी सेवा केली, असा थोडाफार इतिहास त्यांच्याविषयी लिहिला जावा, अशी एक प्रदीर्घ राजकीय कारकीर्द त्यांच्या नावावर नक्की आहे. पण त्याहून मोठा आहे तो भ्रष्टाचाराचा शिक्का! १९६२मध्ये वयाच्या ऐन तिशीत आमदार झाल्यावर अपघाताने देशाच्या पंतप्रधानपदी पोहोचलेले देवेगौडा राजकारणात कधीही हार न मानणारे आहेत. १९८९ला देवेगौडांचा तत्कालीन पक्ष विधानसभेतील २२२पैकी फक्त दोन जागा जिंकून जवळपास स्वतःची राजकीय दिवाळखोरी जाहीर करण्याच्या जवळपास आला होता. स्वतःची आमदारकी देखील राखता न आल्याने देवेगौडा संपले अशीच परिस्थिती होती. तेच देवेगौडा पुढच्या सात वर्षांतच देशाचे पंतप्रधान होतात, हा राजकीय चमत्कार म्हणावा लागेल. नव्वदी गाठल्यानंतर तरी अशा योद्ध्याने स्वतःला सन्मानपूर्वक निवृत्त करणे योग्य ठरले असते, पण तसे झाले नाही. मागील निवडणुकीत भाजपाकडून कर्नाटक निसटले आणि त्यानंतर आता लोकसभेत देखील मोठा फटका बसायची शक्यता होती. हे हेरून २०२४ला परत एकदा सत्तेसाठी मोदी व शहा जोडगोळीने देवेगौडांना व कुमारस्वामींना आमिष दिले, ज्याला हे घराणे सदैव बळी पडतेच. स्वतःची समाजवादी विचारधारा खुंटीला टांगून त्यांनी भाजपासोबत हातमिळवणी केली, त्यात नवीन काहीच नाही. अर्थात राजकारणात तग धरण्यासाठी देवेगौडांनी आजवर संघर्ष कमी आणि तडजोडीच जास्त केल्या असल्यामुळेच त्यांनी केलेली युती फारशी वावगी नव्हती. पण भाजपाने मात्र इतकी लाचारी दाखवायला नको होती. पण जेडीएसची व्होटबँक वापरून स्वतःची डुबती नय्या पार करणे, ही काळाची गरज असावी.
या प्रज्वल रेवण्णानी स्वतःचे व्हिडिओ बाहेर येऊ नयेत म्हणून कोर्टात आधीच दाद मागितली होती; कारण त्याचा सतरा वर्षांपासूनचा ड्रायव्हर कार्तिक याच्यासोबत त्याचे बिनसले होते. प्रज्वल रेवण्णांच्या लैंगिक विकृतीच्या साधारण दोन ते अडीच हजार व्हिडिओंचं रेकॉर्डिंग केलेला एक पेन ड्राइव्ह कार्तिककडे होता अशी खबर आहे. जो त्याने तिसर्या व्यक्तीला दिला आणि नेमके निवडणुकीच्या तोंडावर दोनेकशे व्हिडिओ हासन मतदारसंघात व्हायरल झाले. ताबडतोब हे प्रकरण देशपातळीवर पोहोचले व प्रज्वल रेवण्णा निरव मोदीसारखा परदेशी पळून गेला. यात भाजपाचे नाव देखील जोडले गेले, तेव्हा प्रज्वल रेवण्णाला पक्षातून निलंबित केले गेले.
आतापर्यंत दोन मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांवर दबाव आणून, उमेदवारी मागे घ्यायला लावून एका ठिकाणी निवडणूक बिनविरोध जिंकल्याचा हिडीस फार्स उभा करणार्या भाजपावर आपल्या युतीचा एक उमेदवार निकालाआधीच निलंबित करण्याची नामुष्की आली. करावे तसे भरावे, म्हणतात ते उगाच नाही.
इतके झाल्यावर आता मात्र आम्ही मातृशक्तीचा अपमान सहन करणार नाही, नारीशक्तीचा अपमान सहन करणार नाही म्हणून गळे काढता? निर्भया प्रकरणातले बलात्कारी समाजकंटक होते, त्यांचा काँग्रेस पक्षाशी संबंध देखील नव्हता; तरी देखील भाजपने केलेल्या विखारी प्रचारामुळे सरकारविरोधात देश नाहकच पेटून उठला होता. इथे तर तुमच्याच युतीचा उमेदवार अत्याचार करतो आहे मग जबाबदारी कशी झटकता? स्टुडिओत कॅमेरासमोरून
फिक्सिंग केलेल्या मुलाखतींतून वरवर निषेधाची जी बात करता, त्या फक्त बाता आहेत; कारण जे अत्याचार कानी येताहेत ते ऐकल्यानंतर इतकी निवांत मुलाखत फक्त निर्ढावलेले, गेंड्याच्या कातडीचे राजकारणीच देऊ शकतात. एका स्वयंपाकघरात काम करणार्या सत्तरीतल्या माऊलीला या नराधमानी सोडले नाही, अशी भयंकर क्रूर बातमी आहे. ज्या माऊलीने माजी पंतप्रधानांना जेवू घातले, त्या माऊलीला व तिच्या मुलीला त्यांनी विनवणी करून, हात जोडून देखील याने सोडले नाही, हा मोदींचा परिवार? या गुन्हेगाराचे तुम्ही जाहीर कौतुक करता? त्याचा प्रचार करता? मग दुसरीकडे मातृशक्तीचे पोकळ ढोल का वाजवता?
या मातृशक्तीने व नारीशक्तीने कलम ३५४खाली गुन्हा नोंदवला आहे, त्यावर विश्वास ठेवून तरी ही घृणास्पद युती तोडा. हे प्रकरण दडपण्यात येईल असे संकेत देणारी एक घटना आता समोर येते आहे एच.डी. रेवण्णा आणि त्यांचा सहकारी सतीश बाबण्णा यांच्याविरोधात अपहरण आणि इतर कलमाखाली एक गुन्हा दाखल केलेला आहे, ज्यातील एफआयआरनुसार सदर घटना २९ एप्रिलची आहे. बेपत्ता झालेली महिला रेवण्णा यांच्या फार्महाऊसवर घरकाम करत होती. सहा वर्ष तिने रेवण्णा यांच्या घरी काम केले. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी हे काम सोडून ती पुन्हा गावात रोजंदारीवर काम करू लागली. ती देखील एक पीडिता असल्याचे बोलले जाते. या अपहरणानंतर व दहशतीनंतर बर्याच पीडित महिला पुढे येण्यास धजावत नाहीत. त्या कंगना आणि पार्थ अजित पवार यांना सुरक्षा देऊन थोडीफार वाय सुरक्षा शिल्लक असेल आणि जनाची नाही तर मनाची लाज शिल्लक असेल तर आधी ती वाय सुरक्षा या पीडितांना द्या, कारण त्यांच्यावर हे प्रकरण मिटवून टाकण्यासाठी प्रचंड दबाव टाकला जातो आहे.
हे तुमच्या ढोंगी भाषेतले मातृशक्ती व नारीशक्तीच्या ‘अपमाना’चे भोंगळ प्रकरण नाही, इथे शेकडो बलात्कार घडले असण्याची शक्यता आहे. असेच घृणास्पद कृत्य कुस्तीगीर महिलांच्या बाबतीत करणार्या आरोपीच्या पुत्राला भाजपाने तिकीट दिले. बलात्कारी घराणेशाही चालवणारा हा भंपक पक्ष आहे. हिंदुत्वाच्या बाता मारणार्या आणि एकपत्नीव्रती श्रीरामाचा आदर्श सांगणार्या पक्षाला हे शोभतं का? महिला व बालकल्याण विभागाच्या फायरब्रँड, तोंडाळ मंत्रीण बाई स्मृती इराणी यांची या प्रकरणी दातखीळ बसली आहे का? एक महिला असल्याची तरी चाड बाळगा. संजय राठोड प्रकरणी यू टर्न घेणार्या भाजपच्या महिला आघाडीच्या चित्रा वाघ यांनी निषेध केला का? रुपाली चाकणकर, नीलम गोर्हे या का गप्प आहेत?
प्रज्वल रेवण्णा, एच. डी. रेवण्णा, बृज(भी)षण सिंह यांच्या मांडीला मांडी लावून भाजप बसणार असेल, तर मग देशातील जनतेलाच आता इंद्राय स्वाहा व मग तक्षकाय स्वाहा म्हणत याचा न्याय करावा लागेल.