संतोषराव, तुमचा काय अंदाज, यंदा कोणाची सरशी होईल?
– नारायण बेडकीहाळ, बेळगाव
का पार्टी बदलायची आहे का? नारायणराव… बेडकीप्रमाणे उड्या मारू नका… (तुमच्या आडनावात बेडकी आहे म्हणून म्हटलं…)
तुमचा मोबाइल फोन शलाका वहिनी अधून मधून तपासतात का हो? माझी बायको माझा फोन तपासताना सांगते की सगळ्या मोठ्या माणसांच्या बायका असंच करतात, म्हणून विचारलं.
– विकास देशमुख, नांदेड
मोठ्या माणसांप्रमाणे उद्योग आणि धंदे करू नका. मोठ्या माणसांना एकापेक्षा जास्त मोबाईल आणि बाईल ठेवणं परवडतं ते आपल्याला झेपेल काय, याचा विचार करा. इतर कोणत्याही बाईल आणि मोबाईलपेक्षा लग्नाची बायको महत्त्वाची आहे… असा भास निर्माण करा… आणि बघा बायकोच्या हातात स्वत:हून मोबाईल दिलात तरी ती मोबाईलकडे ढुंकून बघणार नाही. (हा आमचा अनुभव तुम्हाला सांगतोय. त्यासाठी आम्ही काय केलंय ते मात्र विचारू नका. ते आमच्या सौला कळलं तर दुसरी बाईल काय, दुसरा मोबाईलही आम्हाला परवडणार नाही… इतकी वर्ष रिपेअर करून करून वापरतोय… मोबाईल!
संसारिक तापांपासून शांतता मिळवण्यासाठी लोक हिमालयात जातात. मग हिमालयातले संसारी लोक शांतता मिळवण्यासाठी कुठे जातात?
– रेणुका बर्वे, सदाशिव पेठ, पुणे
का? तुम्हाला त्यांचा तपोभंग करायला जायचंय का? त्यांना कुठे जायचंय तिथे जाऊ दे ना.. लक्षात ठेवा शांततेच्या शोधात जाणारे साधू बनतात.. पण त्यातले बरेच संधीसाधू असतात. उगाच मेनका बनायला जाऊ नका… आपल्या साधू-मुनींचे प्रताप माहिती आहेत ना?… (त्यांच्या कोपाबद्दल बोलतोय मी) एकदा का ते तापले… (म्हणजे कोपले) तर लवकर शांत होत नाहीत… कारण त्याच शांततेच्या शोधात ते फिरत असतात.
सगळ्या धर्माच्या लोकांना इतर धर्मांची काहीच माहिती नसताना आपला धर्म सगळ्यात भारी आहे, असं कसं कळत असेल?
– रेहाना तांबोळी, मालवण
माकड काय म्हणतो… (या म्हणीचा शब्दश: अर्थ घेऊ नका… तरीही त्रास झाला तर तुम्हीसुद्धा सगळ्या धर्मातील ‘तशाच’ लोकांसारखे आहात असं खुशाल समजा.. आणि ‘आपला तो बाळ्या दुसर्याचा ते कार्टं’ या म्हणीचा अर्थ शोधा, तुम्हाला उत्तर मिळेल.
आंबा पिकतो, रस गळतो, कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो… या बालगीताचा अर्थ समजावून सांगा ना काका!
– श्रेया शेंडगे, लातूर
आधी मला सांगा तुम्ही आंबा कापून खाता? की चुपून खाता…? म्हणजे मला तसं उत्तर देता येईल. (तुम्ही मला काका बोलून मामा बनवत असाल तर?? मला बनायचं नाहीये म्हणून विचारतोय.)
दादा कोंडके आज हयात असते आणि त्यांनी निवडणूक प्रचाराची ही सध्याची पातळी पाहिली असती, तर त्यांनी त्यावर काढलेल्या सिनेमाला काय नाव दिलं असतं?
– नितीन आडारकर, दादर
तू ये मी घेतो (पक्षामध्ये), तुमचे खोके आमचे ठोके (हृदयाचे), कोणाच्या मांडीवर कोणाची पोरं (उमेदवार), (टीप : कंसातले शब्द मुद्दाम क्लिअर केलेत.. उगाच कोणीतरी संस्कृतीरक्षक वाद घालायला उठायचा… अशांशी वादावादी करायला आपण दादा नाही ना…)
अडाणी माणसं एखाद्या वाईट माणसाच्या नादी लागतात, तेव्हा समजू शकतं; शिक्षण घेतलेले लोक जेव्हा महामूर्ख आणि विकृत विचारांचं समर्थन करू लागतात, तेव्हा ते कसं समजून घ्यायचं?
– अतुल शेजवळ, पाटण
अडाणी माणसाने नादी लावलेल्या, विकृत विचार असलेल्या माणसाच्या नादी लागलेले, सुशिक्षित महामूर्ख असतात ते… असं समजायचं… (आता तरी समजलं? एवढं समजावूनही ज्यांना समजूनच घ्यायचं नसतं ते विकृत विचारांचे समर्थन करणारे सुशिक्षित अडाणी असतात, असं समजायचं.)
मला अर्जंट ५० हजार रुपयांची गरज होती. तुमच्याकडे माणूस पाठवू कॅश कलेक्ट करायला की स्कॅनर पाठवू यूपीआय आयडीचा?
– दिवाकर पोतदार, सटाणा
तुम्ही स्वतः या.. येताना हे पन्नास हजार मनी ट्रेलिंगचे नाहीत अशी क्लीन चिट ईडीवाल्यांकडून घेऊन या.. तोवर एकाकडून माझे १५ लाख रुपये यायचे आहेत, ते आलेच तर त्यातले ५० हजार आनंदाने घेऊन जा…