अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली तेव्हा देशातील श्रीराममय वातावरण पाहता २०२४ची लोकसभेची निवडणूक भारतीय जनता पक्षाने जिंकल्यातच जमा आहे; किंबहुना गेल्या वेळेपेक्षा जास्त जागा जिंकून हा पक्ष राजीव गांधी यांचा विक्रम मोडणार, अशी हवा मोदीचरणी लीन असलेल्या प्रसारमाध्यमांनी केली होती. प्रभू रामचंद्रापेक्षा मोदींचेच अधिक भक्त बनलेल्यांना तर हर्षवायू व्हायचाच बाकी होता. ‘अब की बार चारसौ पार’ या घोषणेचे शिवधनुष्य उचलण्याचा आचरटपणा त्याच गैरसमजुतीतून केला गेला असणार… तेव्हा भाजपच्या हे लक्षात आलं नसावं की अयोध्येत विराजमान होताच रामलल्लांनी भाजपचेच रावणराज्य उचलून फेकण्याची तयारी सुरू केली आहे…
…अयोध्येतील ‘इव्हेंट’नंतर अवघ्या साडे तीन महिन्यांनी लोकसभेच्या निवडणुकीचे तीन टप्पे पार पडता पडता अशी परिस्थिती होऊन बसली आहे की चारशे सोडा, तीनशेचाही आकडा कोणी भाजपेयी तोंडातून काढत नाही. भाजप सोडा, एनडीए तरी बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचेल का, याबद्दल शंका आहे. खुद्द राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्तुळात २३०-२४० जागा भाजपला मिळतील, अशी अंतर्गत सर्वेक्षणातून मिळालेली माहिती चर्चेत आहे. म्हणजे सरकारस्थापनेसाठी भाजपला किमान ४०-५० अन्यपक्षीय खासदारांचे पाठबळ लागेल. मोदींच्या दोन टर्म्समध्ये जो ‘हम करे सो कायदा’ छाप एककल्ली कारभार चालला होता, तो चालणार नाही. मोदींसारखा अहंमन्य नेता युती सरकारचा कारभार हाकूच शकणार नाही. ईडी आणि सीबीआयचा वापर करून मोदींनी गोळा केलेले ठिकठिकाणचे नेते निवडणुकीनंतर सुटकेचा निश्वास सोडून स्वगृही परत जायला निघाले, तर आहे ते संख्याबळही टिकण्याची शक्यता नाही. म्हणजेच, भाजपला २०० पेक्षा जास्त पण बहुमतापेक्षा बर्याच कमी जागा मिळाल्या तर भाजपमधला सर्व मित्रपक्षांना सांभाळून घेणारा, विरोधकांना योग्य तो सन्मान देणारा सर्वांना मान्य होईल असा कोणी चेहरा पुढे आणावा लागेल. हा चेहरा भक्तांनी हवा भरून लार्जर दॅन लाइफ बनवून ठेवलेल्या मोदींचा असू शकत नाही आणि मोदींच्या सत्तेचा बुलडोझर हौसेने चालवणार्या अमित शहांचाही असू शकत नाही; योगी आदित्यनाथ यांच्या नावाची चर्चा असली तरी त्यांची कट्टरता आणि ते प्रतिमोदी व अतिमोदी बनण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनाही बाजूलाच ठेवावे लागेल.
थोडक्यात निवडणुकांमधले सध्याचे वातावरण पाहिले, तर मोदींची सेवानिवृत्ती अटळ झालेली आहे. ज्या मोदींनी दोन निवडणुकांच्या आधी आपण काळजीवाहू पंतप्रधान आहोत, याचीही फिकीर बाळगली नव्हती, ते आता निवडणुकीचे काही टप्पे बाकी असताना मावळते पंतप्रधान बनून बसले आहेत… अगदी एनडीएचं सरकार आलं तरी.
मोदी नाहीत तर आहेच कोण, येणार तर मोदीच, मोदी हेच आधुनिक राष्ट्रपिता आहेत, खरे स्वातंत्र्य मोदींनीच आणले, अशा वल्गना करणार्या भक्तगणांची अवघ्या तीन महिन्यांत वाचा बसली आहे. खुद्द मोदी हे तर गेल्या १० वर्षांतल्या स्व-रूपाची हललेली आणि फिकुटलेली झेरॉक्स कॉपी वाटावेत, इतके दिशाहीन भरकटलेले दिसत आहेत. निवडणुकीतल्या वास्तविक कथ्याला (नॅरेटिव्ह) ट्विस्ट करून भलते वळण देण्यात मोदी कायमच वाकबगार होते. त्या कौशल्याच्या बळावर त्यांनी अनेक हरलेल्या निवडणुकांमध्ये बेसावध विरोधकांवर भलतेच बाँब फोडून भाजपचे विजयोत्सव साजरा केले. पण अलीकडे मोदींचे हे बाँब त्यांच्याच पायाखाली फुटू लागलेले आहेत.
काँग्रेसचा जाहीरनामा काँग्रेसला कधीही प्रचारात आणता आला नसता, तो मोदींनी मुसलमान, मटण, मंगळसूत्र वगैरे भलत्याच गोष्टींची उठाठेव करून चर्चेत आणला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं उत्तम काम करत असलेलं सरकार पाच वर्षं राहिलं तर भाजपची खासदार संख्या एक आकडी होईल, हे ओळखून मोदींनी कपटाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पायउतार केलं, त्यांचा पक्ष फोडला आणि गद्दारांना मूळ पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं. त्याच उद्धव ठाकरे यांच्यावर संकट आलं तर आपण धावून जाऊ, असे उद्गार मोदींनी काढले. गंमत म्हणजे त्यानंतर काही दिवसांतच मोदींना उद्धव हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची ‘नकली संतान’ आहेत, असा साक्षात्कार झाला. हे होते ना होते तोच त्यांनी उद्धव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसबरोबर न जाता आपल्याबरोबर यावे, असे आवाहनही केले… ‘पडोसन’ सिनेमातील ‘एक चतुर नार’ या गाण्यात शेवटच्या टप्प्यात मन्नाडेच्या आवाजात मेहमूद किशोर कुमारला म्हणतो, या घोडा बोलो, या चतुर बोलो, ये घोडा चतुर घोडा चतुर क्या कर रहा है? त्यातलाच हा प्रकार आहे. उद्धव नकली संतान आहेत तर तुम्हाला त्यांचा पुळका कशाला आणि ज्यांना नेस्तनाबूत करायला पक्ष फोडला त्या शरद पवारांना लबाडाघरचं आवतण कशाला?
मोदी हे सगळे परस्परविसंगत प्रकार का करत आहेत?
त्यांना भेसळयुक्त मश्रूमचा पुरवठा होतो आहे की काय?
नाही. चुकून भाजपच्या बहुमताचे सरकार आलेच, तर मोदींचा पंतप्रधानपदावरचा दावा कायम राहणार आहे. मात्र, भाजप, बहुमताखाली अडकला आणि मिलीजुली सरकार बनवण्याची वेळ आली, तर विरोधकांच्या मनधरण्या करण्यातही आपण कमी पडणार नाही, हे ते संघधुरीणांना दाखवत असावेत.
अर्थात, मुळात देशात इंडिया आघाडीला मिळणारा तडाखेबंद प्रतिसाद पाहता मोदींचा हा मानभावी सौजन्य-सराव वायाच जाणार आहे म्हणा!