यावर्षी कसलाच संपल्क करायचा नाही. हाच संपल्क मी केला होता. (फारच घासून गुळगुळीत नाहीय ना हे वाक्य? ठीक आहे… तुम्ही मंदपणे हसू शकता. कारण विनोदी लेख हसर्या चेहर्याने वाचायचे असतात… रीतच आहे तशी…)
संपल्क करणं ही सामान्य गोष्ट आहे… किंवा अतिसामान्य गोष्ट आहे. न करणं ही असामान्य गोष्ट आहे. पण मी अजून डोकं चालवलंय… मी संकल्प दहा जानेवारी (संकल्प शब्द मी अचूक लिहिलाय… कंटाळा आला चुकीचा लिहून! चुकीचं वागण्याचा मला कंटाळाच आहे. बरं चुकीचा लिहून त्यातून फार मोठा विनोद साधला जातोय असंही वाटेना. विलाज नाही!) पासूनच अमलात आणायचा ठरवला. त्यामुळे पहिले दहा दिवस मी रिलॅक्स राहिले. यू नो… असं डोकं लढवल्याशिवाय आयुष्य सोपं जात नाही. आयुष्याचा पेपर सोपा जाण्यासाठी अशा अनेक क्लृप्त्याज लढवाव्या लागतात.
कोण कोण एकच संकल्प करतात आणि तो पहिल्या दीड दोन दिवसात फेल गेला की तास दोन तास काहीच सुधरत नाही आणि मग गेल्या वर्षी सारखेच जगायला लागतात. फक्त सालाची (?) तारीख बदलते एवढंच!
म्हणून संकल्प करतानाच खूपसे घसघशीत करावेत. किमान इथे तरी कंजुषी नको. अजून तरी मनातल्या विचारांना कुठेही टॅक्स लावला जात नाही.
समजा चार पाच संकल्प केले आणि हळुवारपणे मोडत गेले तरी किमान दोन महिने पुरतात. मग काय फक्त दहाच महिने काढायचे असतात. आपणा सगळ्यांना नऊ महिने आरामात ढकलायची सवय आईच्या पोटात असल्यापासूनच लागलीय. ही गोष्ट कोणीच नाकारू शकत नाही. त्यामुळे राहता राहिला एक महिना… तो काय जातो असा तसा निघून. इतकी वर्ष जन्मल्यापासून पसार झाली. मग एक महिन्याचं काय..!
कधीकधी वाढत्या वयाबरोबर आपल्या निष्काळजीपणामुळे किंवा आळशीपणामुळे वय वाढत चाललंय अशीही शंका यायला लागते. तेव्हा चक्क दुर्लक्ष करायचं. मनाची समजूत घालत राहायची नाही. मनाला लय लाडावून ठेवायचं नाही. हे मी लहानपणीच ठरवून टाकलंय.
आमच्याशेजारी एक नव्वदीच्या आजी आहेत. त्यांना त्यांचा साठीचा भाचा म्हणाला, आते, तू शंभरी पार करणार नक्की!
दहा वर्षं काय अश्शी आत्ता जातील. आजी हसत हसत हसत अडकित्त्याने सुपारी फोडत खूष होत म्हणाली. याच अडकित्त्याने ती खारका पण फोडून खाते… (आतेला सगळं नीट ऐकू आलं, ही पण कौतुकाची गोष्ट) काळालाच तिने अडकित्यात पकडलंय असं मला वाटून गेलं! आता नव्वद वर्षं अश्शी सहज पार पडल्यामुळे हा आत्मविश्वास त्यांना आलेला असणार. पण तो आत्मविश्वास बघून भाचा गप्पच राहिला. अरे, आपणाला पुढचे दहा दिवस अस्से पटकन जातील, असं म्हणता येत नाही. (अॅक्च्युअली दहा तास) ही एवढी भरीव सकारात्मकता येते कुठून?
भरीव सकारात्मकता हा मी नव्याने केलेला शब्दप्रयोग आहे. जी आपण इकडून तिकडून लेख वाचून तात्पुरती मिळवतो ती अभरीव सकारात्मकता. आणि जी आपल्या अंतकरणात अंदरून स्थित असते ती भरीव सकारात्मकता… जी कोणीही कितीही टोमणे मारले तरी कमी होत नाही… उलट वाढतच राहते (नको तितकी असं नाही).
मला आपलं वाटतं… विशेषतः जेव्हा मी क्षितिजाकडे टक लावून बघत असते. यू नो… तेव्हा लक्षात आलं की जी लोकं सोशल मीडियावर कमी राबत असतात… किंवा कमी निढळाचा घाम गाळतात. त्यांच्याकडे भरीव सकारात्मकता जास्त असते. कारण ते प्रत्यक्ष जीवनानुभव घेत असतात. ऊन-वारा पाऊस अंगावर घेत असतात. म्हणून जुन्या पिढीतली लोक ज्यांना मोबाईलचा वारा लागलेला नाही, त्यांच्या मनाची दुष्टी होत नाही.
समजा आपण चुलीवर भात शिजत ठेवलाय… तो आपण सारखा ढवळतोय… झाकण उघडतोय, पाणी घालतोय किंवा भरली वांगी भरून ठेवलीत… ती नीट वाफेवर शिजवण्याऐवजी आपण वारोवार उलटी पालटी करतोय… झाकण काढतोय… ठेवतोय… तर विचकाच होणार ना… देठाकडून दडदडीत राहणारच (याचा अर्थ मन देठाकडून दडदडीत राहतंय असं नाही). तसं सोशल मीडियाच्या आहारी गेलं तर वारोवार मनाची दुष्टी होत राहते. आपण तन्मयतेने अगदी भान हरपून फार क्वचित एखादं काम करतो. मला वाटतं जगाचं मानसिक आरोग्य नीट राहायला हवे असेल तर इंटरनेटचा वापर कमीतकमी व्हायला हवा. ही व्यसनाधीनता हल्ली वाढत चाललीय. हल्ली आमदार-खासदार मंत्रीमहोदय बसमधे रेल्वेत किंवा एका एका शहरात प्रâी इंटरनेट देतात… तेव्हा अक्षरशः धडधडतं…! असल्या नको त्या सुविधा नका देऊत बाबांनो… तरूण पिढी भरकटत राहील आणि मग घराबाहेर उन्हाळा आहे की पावसाळा आहे हे पण त्यांच्या लक्षात येणार नाही… आणि जोपर्यंत माणूस निसर्गाशी जोडलेला असतो तोपर्यंत तो अगदी फिट असतो. असं माझं प्राचीन मत आहे. बघा तुमास्नी पटतंय का!
या वर्षी आम्ही एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारीला एका गाजलेल्या दशावतारी कलावंताच्या सानिध्यात होतो. दशावतारी नाटक ही एक कोकणातली पारंपारिक लोककला आहे ज्यात पौराणिक कथानक असतं. बरेचसे प्रयोग देवळात होत असल्यामुळे पुरुषच स्त्रीची भूमिका नजाकतीने सादर करतात. या नाटकात तीन लेडीज रोल होते. एक महाराणी, दुसरी एका राजकुमाराची तरूण बायको आणि तिसरी होती सिद्धी… जी गणपतीच्या बरोबर सुरुवातीला येऊन नाटकाला शुभ सुरुवात करते… आणि नाटक शेवटाकडे जाताना आरतीचं तबक प्रेक्षकांमधे फिरवून स्वेच्छेने पैसे जमा करते.
सिध्दीची भूमिका करणारा जो माणूस होता, तो असेल तीसएक वर्षांचा… ठेंगू, किरकोळ शरीरयष्टी आणि एक डोळा किंचित तिरळा असूनही तो एवढा समरसून नटत होता. आपलं महत्त्व या नाटकात आहे. आपण कोणतरी आहोत. त्यांचं इतर कोणाकडेही लक्ष नव्हतं. नाटकातले सगळे महत्त्वाचे रोल करणारे राजा, राणी, राक्षस, युवराज नारद जेवढे काळजीपूर्वक नटत होते, तेवढाच सिरिअसली हा सुद्धा नटत होता.
सुंदर भरजरी साडी नेसून, भरपूर दागिने, घालून भरघोस केस पाठीवर मोकळे सोडून तो स्टेजवर प्रसन्नचित्ताने आला. नाटकाला शुभ सुरुवात करून दिली आणि मग शेवटी प्रेक्षकांमधे तबक घेऊन आला. तेवढाच प्रसन्न आणि हसतमुख!
राजा राणी आणि राक्षस महत्त्वाचे असले तरी फक्त तिघे हे नाटक करु शकत नाहीत. हा सगळा डोलारा ओढण्यासाठी अनेकांचे हात हवे असतात. तरच पूर्ण नाटक प्रेक्षकांना एक अविस्मरणीय अनुभव देवू शकतं. हे त्याने नकळत जाणलं होतं. त्यामुळेच तो जास्त सुंदर दिसत होता.
हे जग सुंदर आहे… बस… फक्त प्रत्येकाने आपली भूमिका आवडीने प्रामाणिकपणे स्वत:ला अजिबात कमी न समजता समरसून केली पाहिजे!