संगीतविषयक काही कार्यक्रम लागले आणि त्यात कोरस असला की बस… माझं मनरुपी पोट किंवा पोटरुपी मन निस्तं तुडुंब भरुन जातं…
आपल्यासमोर भरगच्च पदार्थांनी भरलेलं ताट आहे, तर पोळी आणि भात या मुख्य पदार्थापेक्षा आपलं लक्ष भाज्या कोशिंबीरी चटण्या कुरड्या यांच्याकडे जातं… तसंच समजा हवं तर!
कालच टीव्हीवर एका कार्यक्रमात एका मुलाने ‘एकवीरा आई तू डोंगरावरी’ हे गाणं मस्त अॅक्शनमधे सादर केलं. आणि त्याला जो सहकलाकारांनी कोरस दिला तो असा दिमाखदार आणि जोश वाढवणारा होता की काय सांगू महाराजा? अरे, पायाखाली माती असती तर तिचं गुलालामधे रुपांतर झालं असतं.. असा कोरस. यामधे कधी कधी त्यांचे स्पर्धक असतात. कोणाचं गाणं कधी पडलेलं असतं, कोणाचं खूपच उंचीवर गेलेलं असतं. पण सगळे असा जीव ओतून कोरस देत होते की ते गाताना सगळ्यांच्याच मनाचा पन्हा मोठा लांब रुंद होत असावा!
मी आपले त्यांचे चेहरे न्याहाळत होते. सगळेजण निखळपणे गाण्याचा आनंद घेत होते. किती छान निर्मळ वाटत होतं.. बघायलाही!
गाणं म्हणताना प्राणायाम होतो असं म्हणतात. कारण बरोबर आहे… श्वास कुठे लांबवायचा, कुठे सोडायचा यावर गाणं अवलंबून असतं (नाय.. चुकत असेल तर पष्टपणे सांगा). तर असं दिलखुलासपणे गाणं म्हणत उत्तम कोरस देणं. मुख्य गाण्याला झगमगतं नव्हे तर साजेल असं कोंदण देणं. ही काय सोपी गोष्ट आहे का? मोठमोठ्या कार्यक्रमांत कधीकधी वेगळीच माणसं कोरस देत असतात. त्यासाठी पण ऑडिशन घेतात का? चौकशी करुन ठेवायला हवी. कुठेतरी कोरसमधी गायची संधी मिळाली तर मिळाली. लोकांना नाही कळलं तरी चालेल (तशी मी सगळ्यांना सांगत सुटीनच), पण त्यात मिसळलेला एक सुर माझा होता, हे समाधान माझ्या मनाला नव्हे नव्हे जीवनाला पुरुन उरेल… (यु नो…)
परवा युट्युबवर माझ्या मुलाच्या शुभेंदुच्या तुफान आग्रहामुळे एक रॉक संगीताचा कार्यक्रम ऐकला. तो ट्रिब्युट होता एका अकाली गेलेल्या महान पाश्चात्त्य ड्रमरला. टेलर हॉकिन्स. पण त्यांच्यात गाण्यासाठी गोड आवाज हवा असं काही नसतं वाटतं. गळ्यात खडीसाखर बिडीसाखर असं काही नाही. सगळीजणं मुक्तपणे गात होती. चांगला झाला कारेक्रम.
बाय द वे मी पुढच्या जल्मी गायिका (भारतीय संगीतात, म्हणजे मी पुन्हा भारतातच जन्म घेणार हे तुम्ही ‘वोळखलं’ असेलच) व्हायचं फिक्स करुन टाकलंय. बघा माझी दूरदृष्टी! भरपूर रियाज बियाज लहानपणापासून म्हणजे पाळण्यात असल्यापासून करणार. तुम्ही काही ठरवलंय की नाही? म्हटलं या जन्मी काही कारणास्तव (९९९ कारणे आहेत. मी ती सवडीने डिक्लेअर करीन. सध्या बोलायला टायम नाय) आपलं म्हणजे माझं करिअर विलक्षण विस्कळीत झालं यू नो…! (विनोद हा प्रतिकूल परिस्थितीत फुलतो असं वाचलंय कुठेतरी.. हे काय दरवेळी मी सांगायलाच पाहिजे असं नाही..!) त्यामुळे या जन्मात आधीच दक्षता घ्यायची ठरवली आहे.
तर मला विलक्षण आवडतात ते त्यांच्या चेहर्यावरचे भाव. कोरसवर सतत कॅमेरा नसतो. तरी पण त्यांची ती तन्मयता सद्भावना मनाला स्पर्शून जाते. आणि म्हणूनच दुसर्याला सहजतेने मोठं करणारी माणसं मला नेहमीच ग्रेट वाटतात. गवगवा नाही. कवकवा नाही. टवटवा नाही. कीर्तनात बघा. तेव्हासुद्धा मागे अर्धवर्तुळाकार असलेली किती आवडीने नाचून गाऊन कीर्तनकाराला साथ देत असतात. ना त्यांचं कधी नाव प्रसिद्ध होत, ना त्यांना हारतुरे भेटत. पण नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी… ही भावनाच माणसाला समृद्ध करुन जाते.पोवाडा म्हणणारे म्हणा किंवा ‘कोर्ट’ सिनेमात सुरवातीला जो जलसा सादर होतो, त्याची काय ओजस्वी फेक आहे.. आणि सहगायकांनी कसला सणसणीत कोरस दिलाय! मनातल्या निखार्यांवर कसली जोरदार फुंकर मारली जाते. हा जलसा ऐकून माणूस जाग्यावर बसून राहूच शकत नाही.
पण हल्ली काहीवेळा समाजात नको तिथे पण कोरस देतात. कधीकधी पर्यावरणाचा प्रश्न असतो. जर दुष्टांना म्हणजे पर्यावरणाचा नाश करणार्यांना साथ दिली तर सगळ्याचा सत्यानाश होण्याची वेळ जवळ येत जाते! हे केवळ आपलं नुकसान नाहीये तर जन्माला ज्या पिढ्या येणार आहेत त्यांचं घोर नुकसान आहे. जेव्हा ती मुलं मोठी होतील आणि त्यांना कळेल की पृथ्वी खूप सुंदर देखणी होती… आणि आपल्या माणसांनी तिची वाट लावलीय.. तेव्हा कसं वाटेल त्यांना? नेतृत्वाला घाबरुन बर्याचवेळा कोरसमधे होकार दिला जातो. नको तिथे दूरदृष्टी दाखवून लांबवरचे फायदे बघितले जातात आणि म्हणतात तसा विनाशाला आरंभ होतो.
बँकेमधले घोटाळे, रस्ता बांधणीमधला भ्रष्टाचार, शैक्षणिक क्षेत्रामधले घोटाळे हे कोरसशिवाय अशक्य आहेत. शिक्षण क्षेत्रातला भ्रष्टाचार मला सर्वात भेसूर वाटतो. कारण मग उद्याच्या समाजाकडून फारशी आशा ठेवता येत नाही. मी कोरस याचा अर्थ सहअनुमोदन किंवा सुरात सुर मिळवणे, हो ला हो म्हणणे अशा अर्थाने घेतेय. यामुळे अशा अभद्राची ताकद वाढत जाते. हे मला सांगायचं आहे. कारण जमावाला अक्कल नसते. जमावाला चेहरा नसतो असं आपण सर्रास म्हणतो. म्हणून समाजापुढे कोणतरी चांगली माणसं असणं आवश्यक आहे. त्या भाबड्या जीवांसमोर कोणीतरी चांगली माणसं असू देत.
एकंदरीत काय सगळ्या क्षेत्रांमधे काहीतरी चांगले आदर्श निर्माण होणं गरजेचं आहे. एकेकाळी गाडगे महाराज समाज ढवळून काढत होते. दिवसभर गावांची, गल्ली बोळांची साफसफाई आणि रात्री कीर्तनातून लोकांच्या मनाची सफाई. सुप्रसिद्ध लेखक गो. नी. दांडेकर गाडगेबाबांच्या सफाई खात्यात काही काळ कामाला होते (आजकाल अशी नि:स्वार्थ भारलेली खाती गोठली गेली आहेत). त्यांनी लिहिलंय सकाळी उठल्याबरोबर आपल्या शेकडो अनुयायांबरोबर झाडू हातात घेवून ते गावंच्या गावं लोटून काढत लख्ख करत असत (आणि आपण स्वत:च्या घरातला कचरा काढला तरी चार टायम बोलून दाखवतो), कोण पाया पडायला आलं तर खाडकन कानसुलात मारीत (आणि आता बरीचशी नेते मंडळी सगळ्यानी पाया पडावं म्हणून किती आसुसली असतात..सगळ्या नेत्यांनी रोज पहाटे उठून गाडगेबाबा अभ्यासले पाहिजेत, साधारण पाच ते सहाएक तास).
दुपार उलटल्यावर कुठेतरी झाडून स्वच्छ केलेल्या पाणी शिंपडलेल्या रस्त्यावर पंगती बसत. जेवून माणसं लगेच कामाला लागत. अन्नाचा एक कण खाली पडलेला नसे. गाडगेबाबा एका स्वच्छ खापरात तुरीचं वरण, बहुधा वरणाचं पाणी आणि भाकरी खात. बाकी काही नाही. रात्री कीर्तन असे. कुठल्यातरी गिरणीच्या दरवाजावर खडूने किंवा पडक्या घराच्या भिंतीवर वाकड्या तिकड्या अक्षरात लिहिलेले असे. गाडगेबाबाचं कीर्तन सात वाजता अमुक ठिकाणी.हजारो माणसांचे थवे चारी वाटांनी जमत. बैलगाड्या जुपून माणसं येत. सगळे कष्टकरी गोरगरीब लोक. देवकीनंदन गोपालाचा गजर होई आणि बाबा हसत खेळत अंधश्रध्दांवर प्रहार करीत. कीर्तन संवादरुपी असे. कीर्तनाची लय वाढत वाढत एका समेवर आदळे.. आणि देवकीनंदन गोपालाचा गजर सुरु होई.
आचार्य अत्र्यांच्या लोणावळ्याच्या बंगल्यावर आपल्या अनुयायांसह गाडगेबाबा एकदा आले होते. भाकरतुकडा खावून थोड्या गप्पा गोष्टी करुन ते आवारातच झोपले. कुणाच्याही घरात ते मुक्काम करत नसता. प्रखर वैराग्य त्यांनी स्वीकारलं होतं. पहाट होताच देवकीनंदन गोपालाचा गजर करुन त्यांनी आवार झाडायला सुरवात केली. अत्रे लिहितात की ते बघून डोळ्यातलं पाणी रोखणं मला अशक्य झालं.
बाय द वे, गाडगेबाबांवरचा ‘देवकीनंदन गोपाला’ सिनेमा लावा कधीतरी टीव्हीवर. लय उपकार होत्याल. सतत तेच तेच ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ नाय तर ‘हळद रुसली कुंकू हसलं’. मेलो हसून हसून. बस की आता! जगू द्या आम्हाला थोडसं! ‘कुंकू’, ‘माणूस’सारखे सिनेमा अधूनमधून लोकांना दाखवायला हवेत. अजूनही किंबहुना आता अधिक गरज आहे अशा सिनेमांची!
बाकी सर्व ठीक. गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सुरु आहेत.पुण्याच्या मंडईच्या गणपतीसमोर मनोरोगाच्या विळख्यात गुरफटलेली तरुणाई या विषयावर रांगोळी रेखाटन सुरु आहे. तरुण मुलं-मुली भान हरपून रांगोळी घालताहेत. हे गणराया, या तरुणाईचं भान चांगल्या कामामधे असंच हरपलेलं राहू दे ही तुझ्या चरणी प्रार्थना!