परवा टीव्हीवर नव्या सुरांच्या सांगीतिक कार्यक्रमाच्या ऑडिशन बघत बसले होते… खरं म्हणजे ऐकत बसले होते असं म्हणायला हवं; कारण ऑडिशनमध्ये ऑडिओ अपेक्षित आहे, पण टीव्हीवर बघणं आणि ऐकणं हे दोन्ही होतं.
कुठल्याही प्रकारच्या ऑडिशन बघायला मला खूप आवडतात (हे म्हणजे फळापेक्षा सालच जास्त आवडण्यासारखं आहे)- अभिनय असो, गाणं असो, नृत्य असो, कॉमेडी तर असोच असो. (बाय द वे स्टँडअप कॉमेडीच्या ऑडिशन बघून कैक युगं उलटलीत, किती सरळ, खुसखुशीत असतात ह्या ऑडिशन…!). एकतर आपली सर्वोत्कृष्ट कला यावेळी कलाकार सादर करतात. त्यामुळे अगदी निवडक आणि दर्जेदार पेशकश बघायला मिळते. कधीतरी मनाच्या हावरटपणाने वाटतं की खूप वेळ द्या प्रत्येक स्पर्धकाला. त्याला मनापासून जे जमेल ते मुक्तपणे सादर तरी करु दे. घडीघडी कुठे यायला गावतंय एवढ्या मोठ्या स्टेजवर? कदाचित परत कधीच शक्य होणार नाही या रोजरहाटीच्या धबडग्यात! गाण्याची कशी तयारी केली हे पण विचारा आस्थेने! घरातले सगळे डोळे लावून बसले आहेत त्यांच्या टीव्हीवरच्या दर्शनासाठी… बघू दे त्यांना मनभरून दोन मिन्टं तरी. मला खूप आवडतं त्यांचं कल्पनांचे पंख लावून येणं.
बर्याच वेळेला सगळीकडे रिअॅलिटी शोजना नावं ठेवली जातात. पण माझ्या मते तळागाळातलं टॅलेंट वर येण्यासाठी ही एक सुवर्णसंधी असते. आपण किती पाण्यात उभे आहोत हे कळतं. पुढे समजा अंतिम तीनमध्ये नाही येता आलं, तरी लाखो लोकांपर्यंत एकाच वेळी पोहोचता येणं ही काय साधीसुधी गोष्ट नाही. शिवाय सतत सिरिअली बघून मनं कळसलेली असतात, ती मग चिंचमिठाने घासल्यासारखी उजळतात. त्यांच्या संघर्षाच्या कहाण्या अनेकांना प्रेरक ठरतात. फक्त नृत्याचे कार्यक्रम हल्ली नजाकतीपेक्षा जोरदार कसरतींचे झालेले आहेत. त्यामुळे त्यातला गोडवा हरपलेला आहे. परफॉर्मन्स खूप वेळ मनात रेंगाळायला हवा. तो हुसकावून लावला जाता नये. तेवढं जरा सांभाळायला पाहिजे.
साधारण सोळा ते तीस वयोगटातील ही सर्व तरूण मंडळी असतात. इथवर तर मजल मारलीय असे रत्नखचित भाव सगळ्यांच्या चेहर्यावर असतात. सगळ्यांच्या मनात गाणं रुणझुणत असतं. किती गोड दिसत असतात सगळी जणं! द्वेष-मत्सर-राग लोभ बिचारे लांब कुठेतरी अडगळीत खाचपटीत जावून पडलेले असतात.
अख्खा महाराष्ट्र इथे एकवटलेला असतो. रूप-रंग-भाषा, पेशकश, गाण्याची निवड, चेहर्यावरचा आत्मविश्वास, निवड झाल्यावर झालेला पराकोटीचा आनंद आणि पुढच्या वेळी अजून तयारी करुन या असं म्हटल्यावर स्वत:ची घातलेली पराकोटीची समजूत… सगळच बघण्यासारखं. गाणी तर एवढी एकाहून एक सुंदर असतात… भावगीत, लोकगीत, प्रेमगीत, नाट्यगीत… दणक्यात झालेलं आधीचं गाणं पुसून तिथे आपला ठसा उमटवायचा… सोपं नसतं ते… कारण गाणं म्हटल्याबरोबर हवेतल्या प्रत्येक कणावर लिहिलं जातं.
ऑडिशन बघताना जाणवत राहते त्यांची कसोशी. आपण छान तयार होवून या अद्भुत जगात आलोय, आपल्याबरोबर यक्ष-गंधर्व मंडळी आहेत. तज्ज्ञ रसिक परीक्षक आहेत. गोड सुंदर निवेदिका आहे. बस, अजून काय पाहिजे?
काल एका मुलीने ‘हसले मनी चांदणे’ हे गाणं एवढं देखणं सादर केलं. किंचीत अनुनासिक स्वर असल्यामुळे ते मला कृष्णधवल रंगात दिसायला लागलं. पु. ल. देशपांडेंचं संगीत आहे. मला गुणगुणायला झेपेल असं वाटतंय. कधीपण यूट्यूबवर टाकू शकते- सावध कान टवकारून आणि सांभाळून राहा. नंतर एका मुलीने ‘एकाच या जन्मी जणु फिरुनी नवी जन्मेन मी’ सादर केलं. व्यंगावर मात करून तिने केलेली यशस्वी धडपड आता महाराष्ट्राला माहित झालीय. शिशिरातही उगवेन मी… असं तिने म्हटल्यावर सगळ्यांच्याच मनात एक दुर्दम्य जिद्दीची लहर लहरून गेली असणार. परीक्षकांनीही त्यावर शिक्कामोर्तब केलं…
हे झालं सुरात गाणार्या लोकांविषयी. पण मग आमच्यासारखी काही मंडळी असतात, ज्यांना फक्त स्वत:लाच वाटत असतं की आपण सुरात गातोय असं; ज्यांना घरी फारसं प्रोत्साहन मिळत नाही. आवाज जरा मोकळा सोडला की बस ना आता, किती रियाज करतेस? घसा फाटेल… अशी काळजी व्यक्त केली जाते. मग घरात कोण नसलं की दारंखिडक्या बंद करून गावं लागतं. अशा लोकांसाठी एक ‘सूर नवा ध्यास जुनाच’ असा एखादा कार्यक्रम घ्यायला काय हरकत आहे? तुफान प्रतिसाद मिळेल. अशी एकाहून एक वरचढ गाणी म्हणतील ना सगळी की अतोनात करमणूक होईल सगळ्यांची. कठीण कठीण गाणी गायला दिली तर स्पर्धेतील रंगत बेसुमार वाढू शकते. कारण आम्ही असे लोक आहोत की आम्हाला त्या उंच तानेच्या जागा दिसत असतात. ती… ती तळपणारी शिखरं आम्हाला चांगलीच माहित आहेत- खोटं कशाला बोलायचं? पण तिथे पोचता येत नाही. जिथे आवाज उभट हवा तिथे जरा तो पसरट लागतो आणि पसरट हवा तिथे एकदम शापच निमुळता लागतो. कधी आवाज मध्येच रस्ता खचल्यासारखा खचतो किंवा मग बारीक किंकाळी फोडल्यासारखा येतो. ती खंत तळमळ आणि धडपड रसिक मायबाप श्रोत्यांना बर्यापैकी जाणवेल अशी आशा वाटते. शेवटी धडपड जी आहे ती महत्त्वाची..
पण यासाठी नव्याने ऑडिशन घ्यायला हव्यात. सुरुवातीलाच या स्पर्धेतून बाहेर पडलेले परत येवू शकतात. त्यांना हवं तर एवâ गुण आधिक द्या. या कार्यक्रमाचे दोन फायदे होतील. धुपछांव साडी किंवा लहरी रंगाची साडी बघितलीय का? तिच्यात दोन रंग दिसतात. तसा एकाच वेळ जबरदस्त गाण्याचा आणि तुफान विनोदी असा हा दणदणीत कार्यक्रम होवू शकतो. रसिक श्रोत्यांना आपणच तिथे गाणं म्हणतोय असा प्रत्यकारी भास होवू शकतो.
हे लिहिता लिहीता माझ्या मनात आलं… आपुन कुठल्याही भूमिकेत शोभून दिसू शकू. बेताल गाण्यात आपण उजवे ठरूच, पण परीक्षक म्हणून पण आपण नेत्रदीपक अशी कामगिरी करू शकतो. पण ही आयडिया एखाद्या चॅनेलला पसंत पडायला हवी एवढीच तीव्र इच्छा आहे. फक्त सँडविच खावून आपण एखादा दिवस राहतो, तसा फक्त ऑडिशनचा एखादा बहारदार कार्यक्रम घेवून टाकायचा. या आत्यंतिक इच्छेपोटी आपल्यासमोर या माध्यमातून मी मन जे आहे ते मोकळं केलंय. आता मला खूपच हलकं वाटतंय… मनावरची दगडांची रास हटवल्यासारखी वाटतेय.
केवळ मी हा विचार मांडला तर एवढं हलकं वाटतंय, मग जेव्हा मी माझा बुलंद आवाज लावून भावगीत म्हणेन किंवा किनर्या आवाजात राष्ट्रभक्तीपर गीत म्हणेन तेव्हा लोकं- आय मीन रसिक प्रेक्षक किती भारावून जातील, याची मी कधीच आयुष्यात कल्पना करू शकत नाही आणि करणारही नाही. हे माझं ध्येयच समजा ना!
बाकी सर्व ठीक.
राकट देशा कणखर देशा
दगडांच्या देशा
बकुळफुलांच्या प्राजक्ताच्या दळदारी देशा
असं आपल्या महाराष्ट्रगीतात वर्णन आलेलंच आहे. त्यामुळे महाराष्ट्र हा दगडांचा देश असल्यामुळे मनावर ठेवायला सढळपणे दगड गावतात. बाकी दुसर्या राज्यांमध्ये किती पंचाईत होत असेल. दगडासाठी वणवण भटकावं लागत असेल. किती किलो किंवा टन वजनाचा दगड हे ‘त्यांनी’ विषद केलं नसलं (यु नो) तरी पदानुसार हा मणांचा हिशेब असावा.
बाकी आपुन सर्वच मनावर दगड ‘धोंडे, विटा, चिरे, तुकडा दगड, (तुकडा काजूप्रमाणे) गारगोट्या, कूपीतर दगड ठेवत असतोच. हे दगड जर सर्वांनीच हटवायचे ठरवले तर प्रत्येकाच्या घरासमोर दगडांचे ढीग तयार होतील. शहरात डंपिंग ग्राऊंड तयार करावी लागतील. युनो… आणि कित्येक बांधकामं त्यातूनच सुखाने पार पडतील. याचा पण कुठेतरी गांभीर्याने विचार होणं गरजेचं आहे. काय समजलाव?
बाय द वे, सहज म्हणून दगडांच्या देशा असा उल्लेख आलाय तर म्हटलं महाराष्ट्रगीत पण ऐकू या. मग तरातरा युट्युबवर गेले. युट्युबवर चालीची शेपटी पिरगळल्यासारखी चाल ऐकून घोर असं समाधानाच समाधान झालं. प्राजक्ताला मोठ्या प्रेमाने प्राजक्ती म्हटलं आहे. हे गाणं म्हणणार्या मुलींनी जीन्स टॉपवर नथ आणि मोठं कुंकू लावलंय आणि मुलांनी धोतर नेसून पोनी घातलीय असं उगीचच डोळ्यासमोर येत राहिलं. तुम्ही पण बघा ऐकून… म्हणजे पाहूनसुद्धा!