अशी आहे ग्रहस्थिती
राहू वृषभेत, रवी-मंगळ सिंहेत, बुध-शुक्र कन्येत, केतू वृश्चिकेत, शनी-प्लूटो (वक्री) मकरेत,
गुरू-नेपच्यून (वक्री) कुंभेत, चंद्र आठवड्याच्या सुरवातीला मिथुन, त्यानंतर कर्क, सिंह, कन्येत.
दिनविशेष : ३ सप्टेंबर रोजी अजा एकादशी, ६ सप्टेंबर रोजी दर्श अमावस्या.
मेष – व्यावसायिकांना चांगले आर्थिक पॅकेज मिळण्याचे योग जुळून येत आहेत. बँकेत कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर त्यासाठी चांगला काळ आहे. नोकरदारवर्गाला देखील या आठवड्यात चांगली फळे मिळतील. खासकरून प्रमोशन, पगारवाढीची शक्यता आहे. राशिस्वामी मंगळाचे पंचम स्थानातले भ्रमण विद्यार्थीवर्गास अनुकूल आहे. संततीबाबत शुभवार्ता समजतील. विवाहेच्छुकांचे लग्न जमण्याचे योग जमून येत आहेत, त्यामुळे त्यांच्या चेहर्यावर आनंद झळकेल.
वृषभ – अतिशय जोरदार शुभफळे मिळण्याचा योग आता जमून येत आहे. मनासारखे काम झाल्यामुळे तुमचा आठवडा खुशीत जाईल. राशीस्वामींचे पंचमातील भ्रमण हा एक प्रकारे नीचभंग राजयोग. सर्व कार्यांत सकारात्मक बदल होताना दिसतील. विद्यार्थीवर्गाला हा आठवडा लाभदायी जाणार आहे. नवीन अभ्यासक्रमात प्रवेश घ्याल, शिक्षणपद्धतीत बदल होईल. आर्थिक धोरणाबाबत हा आठवडा चांगला जाणार आहे. शेअर बाजार, फंड, या क्षेत्रात चांगले आर्थिक लाभ पदरात पडतील.
मिथुन – नव्या घराच्या खरेदीसाठी नियोजन करत असाल तर आगामी आठवडा त्यासाठी खूप मस्त आहे. राशिस्वामी बुधाची बलवान स्थिती आणि पराक्रमस्थानातील रवी-मंगळ यांचे चांगले लाभ मिळतील. एखादी मौल्यवान वस्तू खरेदी कराल. गृहसौख्य लाभेल. कामानिमित्त प्रवास होतील. खासकरून प्रवासात वस्तूंची काळजी घ्या, अनोळखी व्यक्तींपासून लांब राहा.
कर्क – काही आठवड्यांपासून बदलत चाललेली स्थिती या आठवड्यात आणखी सकारात्मक झाल्याचे दिसेल. व्यवसायात चांगले उत्पन्न प्राप्त होईल. कुणाशीही संवाद साधताना सभ्यता बाळगा. फार टोकाची भूमिका, बोचणारे शब्दप्रयोग करू नका. सप्तमातील वक्री शनी-प्लुटोमुळे कौटुंबिक नात्यात मोठे वादळ उठेल, त्यामुळे संयमाने काम करा. सहा सप्टेंबरची अमावस्या चिंता वाढवेल, त्यामुळे योग्य काळजी घ्या.
सिंह – लग्नातील दोन प्रबळ अग्नितत्वाचे ग्रह रवी आणि मंगळ हे १७ सप्टेंबरपर्यंत बरोबर राहणार आहेत. त्यामुळे सिंह राशीच्या मंडळींनी आणि सिंह राशी-लग्न असणार्या मंडळींना स्वभावात शीतलता ठेवावी लागणार आहे. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर हे तत्व पाळले तर कुठे वादवितंड होणार नाहीत. तोल ढळू देऊ नका, अन्यथा आपणच आपले काम बिघडवाल. लाभाधीपती आणि धनाधिपती बुधाचे धनस्थानातील भ्रमण आर्थिक बाजू सांभाळेल. कौटुंबिक वाद टाळा.
कन्या – हा आठवडा विशेष स्मरणात राहणारा आहे. राशिस्वामी बुधाचे स्वराशीतील भ्रमण, त्याचबरोबर राश्याधिपती आणि भाग्यकारक शुक्राचा नीचभंग राजयोग यामुळे तुम्हाला चांगली फळे मिळतील. चार आणि पाच सप्टेंबर रोजी होणार शुक्र-बुध चंद्रलाभ योग धनवर्षावाचा राहील. अमावस्या कालावधीत प्रवासाचे योग आहेत, वाहने जपून चालवा. रवी-मंगळाचा विपरीत राजयोग १७ सप्टेंबरपर्यंत फायद्याचा राहील. व्यावसायिक वादविवाद सुरू असतील किंवा न्यायालयीन लढाई सुरू असेल तर नक्की यश मिळेल.
तूळ – येत्या आठवड्याच्या सुरवातीला होणारा नवपंचम योग चांगला फलदायी राहणार आहे. राशीस्वामी शुक्राचे व्ययातून आणि नवम स्थानाचा अधिपती बुधाचे व्ययातले भ्रमण दूर देशाच्या प्रवासासाठी फायदेशीर राहील. त्यासाठी काही प्रयत्न करत असाल तर हमखास यश मिळेल. एखादया धार्मिक ठिकाणाला भेट देण्याचा योग संभवतो. लाभातील रवी-मंगळाची पंचमावर दृष्टी, पंचमात वक्री गुरू यामुळे अनपेक्षित लाभ होतील. विद्यार्थीवर्गासाठी प्रेरणादायी काळ राहील.
वृश्चिक – एखादे जुने काम प्रलंबित असेल किंवा नवीन काम सुरू झालेले नसेल तर आता ते विनाविलंब धसास लागेल. १७ सप्टेंबरपर्यंतचा काळ अनुकूल आहे. गुरू-चंद्र नवपंचम योग आणि गुरू-रवी-मंगल समसप्तक योग यामुळे समाजातील पतप्रतिष्ठा वाढणार आहे. सरकारी क्षेत्राशी सबंधित मंडळींना हा आठवडा लाभाचा राहणार आहे. राशीस्वामी मंगळाचे दशमातले भ्रमण, स्वराशीचा बुध सप्तमस्थानाचा कारक शुक्र नीचभंग राजयोगात, त्यामुळे हा आठवडा चांगला जाईल.
धनू – व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. जोडधंदा सुरू करण्यासाठी किंवा पार्टनरशिपसाठी काही व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील. त्याचा नक्की विचार करा. भविष्य उज्वल राहील. नोकरी करत असाल तर चांगले लाभ मिळतील. भाग्यस्थानातील रवी-मंगळ अध्यात्मिक प्रगतीसाठी अनुकूल. परदेशातील कामे मार्गी लागतील. प्रेमप्रकरणात यश मिळेल. सामाजिक पतप्रतिष्ठा वाढीस लागेल.
मकर – साडेसाती सुरू असली तरी भाग्यवर्धक काळ. योगकारक शुक्राचा भाग्यस्थानात होणारा नीचभंग राजयोग. हा आठवडा आयुष्यात आमूलाग्र बदल घडवणारा राहणार आहे. नोकरीत बदलीचे योग. परदेशात कामासाठी जाण्याचे योग जुळून येत आहेत. लाभातील केतू, पंचमातील राहू यामुळे अनपेक्षित बदल घडताना दिसतील. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आलेल्या संधीचा फायदा घ्या, म्हणजे झाले.
कुंभ – वक्री शनीच्या व्ययातील भ्रमणामुळे खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. सप्तमातील रवी-मंगळाचे भ्रमण, बुधाचे स्वराशीतील भ्रमण व्यावसायिक हितसंबंध नोकरी करणार्यांसाठी समाधानकारक राहतील. साडेसातीमधील त्रास कमी होतील. कुंडलीतील नवपंचम योग आणि रवी-गुरू-मंगळाचे समसप्तक योग अडचणीतून तारून नेतील. विद्यार्थीवर्गासाठी अनुकूल काळ आहे.
मीन – राशीस्वामी गुरूचे वक्री भ्रमण व्ययस्थानातून, त्यामुळे व्यावसायिक खर्च वाढतील. प्रवास होतील. संपर्कक्षेत्राचा विस्तार होईल. गाठी-भेटी यशस्वी होतील. जनसंपर्क वाढेल, जनमानसात प्रतिमा उंचावेल. षष्ठ स्थानातल्या मंगळाच्या भ्रमणामुळे शारीरिक त्रास वाढतील. त्यामुळे आरोग्याची नीट काळजी घ्या. कौटुंबिक सौख्य लाभेल.