आपल्याला प्रिन्स फिलिप माहित आहेत. दिवंगत राणी एलिझाबेथ यांचे पती. ते १९७७ ते २०११ एवढा काळ केंब्रिज युनिव्हर्सिटीचे चॅन्सेलर होते. त्यांचा पुतळा केंब्रिज शहराच्या मोक्याच्या जागी बसवायचं पालिकेनं ठरवलं. तसा ठराव झाला, उरुग्वेतले एक शिल्पकार पाब्लो एच्युगेरी यांना कंत्राट दिलं. १.५० लाख पाऊंड मेहनताना देण्यात आला.
२०१४ साली पुतळा केंब्रिजमध्ये पोचला, तेव्हा केंब्रिज पालिकेच्या कला विभागाचा अधिकारी नाराज झाला. त्यानं नोंद केली की पुतळ्याचा दर्जा चांगला नाहीये, पुतळा लोकांसमोर येणं मला योग्य वाटत नाही.
ब्रिटन म्हटलं की चर्चा आलीच. पालिकेत चर्चा झाली. पुतळा ‘कुरूप’ आहे असं काहीसं मत पडलं. पुतळा आणलाच आहे, तर बसवणं भाग आहे म्हणून युनिव्हर्सिटीच्या इमारतीसमोर तो चौथर्यावर ठेवण्यात आला. पेपरात टीका झाली. पुतळ्याच्या चौथर्यावर प्रिन्स फिलिप यांचं नाव असलं तरी पुतळा आणि प्रिन्स यांच्यात साम्य नाही, सबब पुतळा काढून टाकावा असं काही लोक म्हणाले. त्यांच्या मते केंब्रिजमधले प्राचीन पुतळे कसे हुबेहूब असत, हा पुतळा हुबेहूब नाही. त्या काळात प्रिन्स फिलिप जिवंत होते. पण हा मामला त्यांच्याकडे गेला होता की नाही ते कळायला मार्ग नाही.
चर्चेअंती पुतळा युनिव्हर्सिटीसमोरून हलवून गावात न्यायचं ठरवलं. गावात बसवला. गावातल्या काही लोकांनी आक्षेप घेतला. एकानं तक्रार केली की लहान मुलं पुतळा पाहून घाबरतात.
पेपरात पुन्हा चर्चा. अनेक लोकांनी शिल्पाची शैली आधुनिक आहे, तशा शैलीचाही आपण आदर केला पाहिजे असं म्हटलं, पुतळा ठेवायला हरकत नाही असं त्यांचं मत पडलं. एकानं पत्र लिहिलं की गावात एका मोक्याच्या ठिकाणी एक अस्वलाचं शिल्प ठेवलंय; अस्वल चालतं तर प्रिन्स फिलिप का चालू नये?
शेवटी परवा परवा, म्हणजे २०२०च्या मार्च महिन्यात पालिकेनं निर्णय घेतला की पुतळा चौथर्यासकट हलवावा आणि कुठेतरी दूरवर नेऊन ठेवावा. गेली १० वर्षं आणि साधारणपणे बरेच वेळा केंब्रिज पालिकेत लेबर पक्षाचं बहुमत असतं. केंब्रिजमधले आणि एकूण ब्रिटनमधले कंझर्वेटिव आणि इतर पक्षवाले म्हणाले की पुतळा हटवण्याचा निर्णय लेबर पक्षाच्या सवंग लोकप्रियतेच्या हव्यासापोटी झालाय. लेबर पार्टीला राजवाडा पसंत नसतो, राजेशाही जावी असं अनेक लेबरवाल्यांचं म्हणणं असतं. राणीचा पुतळा एक वेळ ठीक आहे पण तिच्या नवर्याचा पुतळा कशाला, असं काही लेबरवाले म्हणाले. फिलिपच्या आधी अनेक चॅन्सेलर झाले, त्यांचे पुतळे उभारलेत? असंही लोक विचारू लागले. चर्चेनं राजकारणी रंग घेतला.
प्रकरण कोर्टात जाऊ शकतं. तसं झालं तर पुतळा कोर्टाचा निर्णय होईपर्यंत टिकेल, कोर्ट सांगेल त्यानुसारच पुतळ्याची जागा ठरेल.
पुतळा लोकांना नकोसा झाला याचं एक कारण प्रिन्स फिलिप यांचा चेहरा आणि पुतळ्यात दाखवलेला चेहरा यात साम्य नाही. पुतळ्यातला चेहरा मानवी नाही, तो आधुनिक शिल्प शैलीतला आहे.
कोणताही पुतळा निर्माण करताना शिल्पकार प्रथम प्रश्न विचारतो की त्या माणसाचं दिसणं महत्वाचं की त्याचे गुण महत्वाचे. सामान्यत: सार्वजनिक ठिकाणी पुतळा उभारताना त्या व्यक्तीचं दिसणं विचारात घेतलं जातं. भारतीय जनतेला पुतळे आणि पोर्ट्रेट हुबेहूब पाहायला आवडतात. फ्रान्स, इटली, स्पेन इत्यादी देशांत मात्र माणसाचे गुण किंवा वैशिष्ट्यं यांना प्राधान्य देणारे पुतळे उभारले जातात. काहीसं साम्य आणि काहीसं वैशिष्ट्यं असं मिश्रण तिथले शिल्पकार करतात.
रोदाँ या विख्यात शिल्पकारानं बाल्झॅक या फ्रेंच लेखकाचं एक शिल्प केलं होतं. शिल्पात बाल्झॅक यांचा चेहराच दिसत होता, बाकीचा पूर्ण पुतळा म्हणजे बाल्झॅक यांचं वस्त्रात गुंडाळलेलं शरीर होतं. या शिल्पात खरं म्हणजे बाल्झॅक यांच्या साहित्यातलं चैतन्य पुतळ्यात दिसतं. सुवातीला अनेक फ्रेंचांनी त्या पुतळ्यावर टीका केली. रोदाँ दु:खी झाले, त्यांनी पुतळा माघारी घेतला. कालांतरानं कलाजगतानं त्या पुतळ्याचं श्रेष्ठत्व मान्य केलं आणि पुतळा सन्मानानं प्रदर्शित करण्यात आला.
रामकिंकर बैज नावाचे एक नामांकित शिल्पकार होऊन गेले. त्यांनी गांधीजींचं पोर्ट्रेट शिल्प तयार केलं होतं. त्या शिल्पाचा दर्जा अत्युच्च मानला जातो. परंतु रामकिंकर यांची काहीशी आधुनिक आणि बरीचशी रामकिंकर शैली गांधीप्रेमी जनतेच्या पचनी पडली नाही. त्या पुतळ्याला विरोध झाला. काही काळानं तो विरोध मावळला.
रामकिंकर सिमेंटचे पुतळे तयार करत. ते त्यांचं वैशिष्ट्य असे. पुतळे सिमेंटचे केलेले असल्यानं पुतळ्यांचा पृष्ठभाग खडबडीत असे. आसाममधे गांधीजींचं सिमेंटी शिल्प बसवण्यात आलं खरं, पण आसामी पुढार्यांना ते पचलं नाही. त्यांनी पुतळ्याला चंदेरी वर्ख लावून पुतळा चंदेरी केला. रामकिंकर त्यावेळी जिवंत नव्हते म्हणून पुढारी वाचले.
पोर्ट्रेट किंवा पुतळा अगदीच आधुनिक शैलीतला, काहीही साम्य दाखवणारा नसेल तर त्याची जागा सामान्यत: आर्ट गॅलरीत किंवा म्युझियममध्ये असते.
अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये लुसिल बॉल या गाजलेल्या अभिनेत्रीचा डेविड पॉलिन यांनी तयार केलेला पुतळा उभारण्यात आला होता. तो पुतळा लोकांना आवडला नाही.
लोक त्या पुतळ्यातल्या लुसिल बॉलला ‘धडकी भरवणारी लुसिल’ म्हणत. लोकांनी आंदोलन करून तो पुतळा हटवला. मग
कॅरोलिन पाल्मर यांनी दुसरा पुतळा तयार केला. लोकांना तो आवडला, तो पुतळा बसवण्यात आला. तिथं एक गंमतच झाली. लोकांनी पॉलिन यांना एवढं ट्रोल केलं की त्यांनी शिल्पकारीच सोडून दिली.
विन्स्टन चर्चिल यांचं पोर्ट्रेट करण्याची जबाबदारी चर्चिल यांच्याशी सल्लामसलत करून एका ब्रिटीश चित्रकाराला देण्यात आली. चर्चिल यांच्यासमोर बसून त्यांनी पोर्ट्रेट तयार केलं. चर्चिल भडकले. त्यांनी ते पोर्ट्रेट नष्ट केलं.
चर्चिल त्यांच्या घरात एका छोट्या जलाशयाच्या काठावर मॉडेल म्हणून बसले होते. त्याच तळ्यात त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. चित्रकार रेखाटन करत असताना चर्चिल यांना तो दु:खद प्रसंग आठवत होता. चर्चिल यांच्या डोळ्यात आणि चर्येत दु:ख आणि उद्विग्नता होती. चित्रकरानं नेमकी ती पकडली.
चर्चिलना वाटलं की आपण असे दु:खी दिसणं आपल्या राजकीय प्रतिमेशी सुसंगत नाही. चर्चिल स्वत: चित्रकार होते. त्यांना चित्रकला समजत होती, पारंपारिक चित्रकला आणि आधुनिक चित्रकला या दोन्ही गोष्टी त्यांना समजत होत्या. त्यामुळे चित्र नष्ट करण्याचा त्यांचा विचार बुचकळ्यात पाडणारा आहे.
प्रत्येक समाजाची दृश्यकलेबद्दल एक जाणीव असते, एक समज असते. दृश्यकलांशी आलेल्या अनेक शतकांपासूनच्या संबंधातून ती तयार झालेली असते. युरोपात लोकांना इसवी सनाच्या आधीपासून शिल्पं आणि चित्रं पाहण्याची सवय आहे. चित्रशैलीमध्ये झालेले बदल युरोपीय नागरिकांना पाहिले आहेत. प्रत्येक नवी चित्र शैली वादळं आणि टीका घेऊन जन्मली, कालांतरानं रुजली. आज युरोप, ब्रिटनमध्ये सामान्य माणसाला आधुनिकता परिचयाची झाली आहे. एखादं शिल्प अगदी हुबेहूब नसलं तरीही त्यातली आधुनिकता त्याला काहीशी समजते. भारतात युरोपच्या तुलनेनं दृश्यकलेबद्दलच्या जाणीवा फारशा विकसित झालेल्या दिसत नाहीत. असो.
प्रिन्स फिलिप पुतळ्याच्या गोष्टीला एक वेगळीच कलाटणी नुकतीच मिळालीय. पुतळ्याच्या दर्जावरून वाद झाल्यावर पत्रकार पाब्लो एच्युगेरी या शिल्पकाराकडे पोचले. एच्युगेरींनी सांगितलं की तो पुतळा आपण केलेला नाही, पुतळ्याचं जनकत्वच त्यांनी नाकारलं.
मग केंब्रिजच्या पालिकेनं कंत्राट कोणाला दिलं होतं? केंब्रिजचे लोक कोणाला भेटले? पुतळा कोणी पाठवला? पैसे कोणी घेतले? एखादं भूत वगैरे होतं काय? की एच्युगेरी यांचा कोणी तोतया होता? की कोणी तिसर्याच माणसानं पुतळा केंब्रिजच्या गळ्यात घालून पैसे मिळवले?
माणसं वादग्रस्त होणं समजू शकतं, पुतळेही वादग्रस्त होतात म्हणजे गंमत आहे.