माझा मानलेला परममित्र पोक्या परवा माझ्या घरी आला आणि मला त्याने ‘हाऊ टू कंट्रोल अँगर’ हे पुस्तक नम्रपणे भेट दिले तेव्हा मी चक्रावलोच. मी ते उलटसुलट करून चाळून, झटकून पाहिले तर त्यातून काहीच खाली पडले नाही. पूर्वी आम्ही धंद्यावर असताना कोणत्याही रद्दीच्या दुकानातील पुस्तकातून एकमेकांना नोटा सप्लाय करायचो. तसे तर या पुस्तकात काहीच नव्हते. शिवाय इंग्रजीशी आम्हा दोघांचा संबंध फायटिंगचे इंग्लिश पिक्चर पाहण्यापुरताच होता. इंग्रजी वाचता यायचे पण त्याचा अर्थ समजेलच याची खात्री नव्हती. तरीही ‘हाऊ टू कंट्रोल अँगर’ हे पुस्तकावरील ठसठशीत नाव आणि त्यावरील रागाने भडकलेल्या व्यक्तीचा चेहरा पाहून पोक्याने मला हे जाडजूड पुस्तक का दिले असावे, असा मोठा प्रश्न मला पडला.
खरे तर माझ्यापेक्षा पोक्याच भडक डोक्याचा होता. त्याने त्या पुस्तकाची पारायणे करून डोके शांत झाल्यास सत्यनारायणाची पूजा घालायला हवी होती. पण सत्याचा आणि त्याचा काहीही संबंध नसल्यामुळे त्याने ते पुस्तक मला भेट दिले असावे किंवा त्याच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झाला असावा हे मी समजून गेलो. मी त्याला एवढेच म्हणालो की तुला ही उपरती केव्हापासून झाली? तेव्हा तो म्हणाला, परवा सत्संग महायात्रेला गेलो होतो, त्यावेळी तिथे सर्वांना ही पुस्तके प्रमुख अतिथी असलेल्या सत्पुरुषाच्या हस्ते वाटण्यात आली. त्या सत्पुरुषाचे त्या विषयावरील प्रवचनही महायात्रेत ठेवले होते. ते प्रवचन ऐकून मी धन्य धन्य झालो.
– काय म्हणाले प्रवचनकार?
– ते म्हणाले, ज्या माणसाला राग येत नाही तो माणूस कसला? जसा हत्तीपासून कोंबड्यांपर्यंत प्रत्येक प्राणी-पक्ष्याला राग येतो तसा माणसालाही तो येणारच. परंतु आपण त्याच्यावर ताबा मिळवायला शिकले पाहिजे. रागाच्या भरात आपण जे अपशब्द वापरतो, किंवा शिव्यांचा भडीमार करतो ते अपशब्द-शिव्या उलटून आपल्याकडेच येतात. आपण घरात, कुटुंबातही वादावादी करतो, भांडण करतो, जेवताना एकमेकांवर भांडी फेकून मारण्यापर्यंत काहीजणांची मजल जाते. पण ही आपली संस्कृती नाही. त्या शेक्सपीयरने काय सांगितलं आहे, तेही तुम्ही वाचा. माझे आताचे दिव्य गुरू नरेंद्रनाथ ठगोर यांनी काय सांगितले आहे ते तुम्ही वाचा. आणि नंतर मी आता वाटप केलेले इंग्रजी पुस्तक वाचा. इंग्रजी येत नसेल तर माझा शिष्य तिरकीट भूमय्या याच्याकडून अर्थ समजून घ्या. तो कितीही भडकला तरी डोके शांत ठेवून ते पुस्तक उशाला ठेवून झोपी जातो आणि त्याचे आत एक एक्स्ट्रा मेंदू असलेले डोके चार्ज करतो. सर्वांना हे भाग्य लाभत नाही.
तर सांगायचा हेतू हा की डोके शांत ठेवा. तोंडावर मनावर आणि खाण्यावर ताबा ठेवा. भजी कितीही आवडत असली तरी तिचा फक्त वास घेऊन बाजूला ठेवा. अशाने मोह, माया, मद, मत्सर आणि माज हे पाच पंचरिपु तुमच्या ताब्यात येतील. हे मी स्वानुभवावरून सांगतो. पूर्वी मला खूप राग यायचा. तोंड उघडले की विषय काहीही असला तरी उर्मटगिरी नसानसात असल्यामुळे शिवीशिवाय एक शब्दही बाहेर पडायचा नाही. माझी डोळे वटारण्याची स्टाइल आणि डायलॉगबाजी तर चित्रपटातील कोणत्याही व्हिलनपेक्षा जबरदस्त होती. कमरेवर एक हात ठेवून बोलण्याची माझी पोज लोकप्रिय होती. मी बोलत असताना कोणी तोंड उघडलेले मला चालत नाही; मग तो कितीही मोठा असो- अमेरिकेचा अध्यक्ष असो वा तालिबानचा प्रेसिडेन्ट असो. कारण मी म्हणतो ते ब्रह्मवाक्य असते. तुमच्यासारख्यांना ब्रह्म म्हणजे काय समजणार? तुम्ही ब्रह्मकमळ कधी पाहिलंय का? त्याची एकेक पाकळी म्हणजे ज्ञानाचा सागर. तर ते दिव्य ज्ञान मला माझ्या पूर्वजांकडून परंपरेने प्राप्त झालेय. बालवयापासून खुराड्यासारख्या कोंदट जागेत राहून जी प्रगती केलीय त्याचीच गोडगोड फळं मला मिळाली. पण जास्त गोड खाणं केव्हाही वाईटच. त्यामुळे शुगर वाढते, डायबिटीस होतो. त्यातून डोके भडक असेल तर ब्लडप्रेशर वाढते.
मी या सगळ्या चक्रातून गेलोय. तरी कधी कधी जिभेवरचा ताबा अचानक सुटतो आणि पूर्वीची दमदाटी करण्याची आणि अपशब्द बोलण्याची सवय उफाळून येते. मग मी विधात्याला आणि माझ्या गुरूंना शरण जातो आणि त्यांची क्षमा मागतो. त्यावेळी तेही त्यांना येणार्या रागाचे आणि गुर्जर लिपीत अपशब्द बोलण्याचे अनुभव सांगतात तेव्हा कुठे हायसे वाटते. ते, ‘सौ चुँहे खाके बिल्ली हजको चली’ असे म्हणतात पण ते चुकीचे आहे. कारण हजला जाऊन बिल्ली पवित्र होत नाही की तिची पापे नाहीशी होत नाहीत. कारण मुळात एकदा पापी म्हणून शिक्का बसला की तो पुसला जात नाही. म्हणूनच दुसर्यांशी प्रेमाने वागा, कुणाला अपशब्द बोलू नका, फक्त माझ्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करा. मग ईश्वर तुमचे भले करील. आमचे हे गुरुदेव एकदा बोलू लागले की त्यांची पांढरी शुभ्र दाढी कुरवाळत ऐकत राहावेसे वाटते. आज जगात त्यांचे इतके अनुयायी आहेत की मग ते त्यांच्याशी आठवड्यातून एकदा रेडियोवरून बाता मारतात. त्यावेळी मी रेडिओचा आवाज मोठा करून मनात साठवून घेतो.
तर सांगायची गोष्ट काय, तुमच्या मनाचे संतुलन कायम ठेवलेत तर तुम्हाला कधीच वेड्यांच्या इस्पितळात जावे लागणार नाही. त्याची पहिली पायरी म्हणजे आपल्या मतांवर ठाम असणे, पूर्वी कितीही पापे आणि गैरकृत्ये केली असली तरी त्याची कधीही कबुली न देणे, आपल्या भल्यासाठी उपकारकर्त्यांना शिव्या देऊन कुठेही लाचारी करून स्वाभिमान गहाण ठेवणे आणि एखादी गोष्ट अंगाशी आली की विश्वामित्रासारखी पाठ फिरवून गुरूंचा धावा करणे यालाच साष्टांग योग म्हणतात. या महायात्रेत आपणास पुस्तकांबरोबर जी ‘पाकिटे’ मिळाली आहेत त्यातील मौल्यवान कागदी मूल्यांचा सायंकाळी सातनंतर क्षुधाशांतीसाठी प्रमाणात वापर करून मनःशांती मिळवा. जय नरेंद्रनाथ!
या महायात्रेची आणि सत्संगी सत्पुरुषाची कहाणी पोक्याकडून ऐकल्यावर मलाही उद्यापासून रोज त्यात सामील व्हावेसे वाटू लागले आहे.