• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

पौष्टिक स्नॅक सेंटर

सुधीर साबळे पुणे तिथे खाणे...

Marmik Team by Marmik Team
September 12, 2026
in खानपान, चला खाऊया!, विशेष लेख
0
पौष्टिक स्नॅक सेंटर

पुण्याच्या संमिश्र आणि समृद्ध खाद्यसंस्कृतीची चर्चा कायमच होत असते. खवय्यांचे हे शहर कोणत्याही नव्या चविष्ट पदार्थाला मनापासून दाद देते. गरमागरम पोहे, उप्पीट, वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळी, थालीपीठ, भेळ, दावणगिरी डोसा, शेवगावची कचोरी, निलंगा राईस यांच्यापासून दालचा राइसपर्यंत असंख्य पदार्थ पुण्याच्या खाद्यविश्वात स्थान मिळवून आणि टिकवून आहेत. एखादा नवा पदार्थ आवडला की त्याची चर्चा पुण्याच्या कानाकोपर्‍यात पोहोचायला वेळ लागत नाही. अलीकडच्या काळात पुणेकरांच्या खाण्याच्या सवयींमध्ये एक महत्त्वाचा बदल जाणवतो. चव तर हवीच; पण त्यासोबत पदार्थ पौष्टिकही असावा, याकडे अनेकांनी लक्ष दिलेले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने तयार होणारे आणि पोषणमूल्यांनी समृद्ध असलेले पदार्थ शहरात उपलब्ध झाले की अस्सल खवय्ये त्यांचा शोध घेतात. असाच एक हिट झालेला पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थ म्हणजे ‘गव्हाचा चीक!’

गहू भिजवून, त्यापासून तयार केला जाणारा हा पदार्थ साधा असला तरी त्याची पौष्टिकता विशेष आहे. गव्हापासून मिळणारे कार्बोहायड्रेट शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात, तर त्यामध्ये असलेली काही प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक घटक आहाराला अधिक पौष्टिक बनवतात. त्यामुळे पारंपरिक खाद्यपदार्थांमध्ये गव्हाच्या चिकाला वेगळे स्थान आहे. गव्हाचा चीक घरी क्वचितच तयार केला जातो. त्यासाठी लागणारी प्रक्रिया, वेळ आणि मेहनत यामुळे शहरातील अनेकांना हा पदार्थ सहज उपलब्ध होत नाही. पण पुण्यातील एके ठिकाणी दररोज हा पदार्थ मिळतो. गेली बारा वर्षे गव्हाच्या चिकाची ही पौष्टिक परंपरा टिकवून ठेवली आहे. हे ठिकाण आहे सहकारनगरच्या तळजाई टेकडीच्या परिसरात. शिंदे हायस्कूलच्या पुढे तळजाई टेकडीच्या दिशेने जाताना तळजाई उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ डाव्या हाताला रत्नप्रभा आणि बालाजी लोखंडे यांचे ‘पौष्टिक स्नॅक सेंटर’ दिसते. सकाळच्या वेळी इथे पोहोचलात की वेगवेगळ्या वयोगटातील खवय्यांची लगबग सुरू असते. ‘काका, मला एक फुल द्या गव्हाचा चीक’, ‘मला एक हाफ द्या… त्यामध्ये जिरा पावडर थोडी जास्त टाका’, ‘माझ्यामध्ये गूळ कमी ठेवा…’, ‘मला एक चीक पार्सल करा…’, असे एकामागून एक आवाज सकाळपासून कानावर पडत असतात. सकाळी सात वाजता सुरू झालेली ही लगबग दुपारी बारापर्यंत सुरू राहते.

बालाजी लोखंडेही प्रत्येक ग्राहकाची आवड लक्षात घेऊन त्याची मागणी पूर्ण करण्यात व्यस्त असतात. चीक खाण्याची प्रत्येकाची आवडती पद्धत वेगळी, पण गव्हाच्या चिकाची आवड मात्र समान. या ठिकाणाची प्रसिद्धी मोठ्या जाहिरातींमुळे नव्हे, तर ‘माऊथ टू माऊथ’ झाली आहे. एकाने चव घेतली, दुसर्‍याला सांगितले, त्याने तिसर्‍याला आणले आणि अशा प्रकारे गव्हाच्या चिकाची ही पौष्टिक चव अधिकाधिक पुणेकरांपर्यंत पोहोचत गेली. तळजाई टेकडीवर फिरायला जाणार्‍यांसाठी, व्यायामानंतर काहीतरी पौष्टिक खाण्याची इच्छा असणार्‍यांसाठी आणि पारंपरिक चवीचा आस्वाद घेणार्‍या खवय्यांसाठी हे स्नॅक सेंटर एक आकर्षण ठरले आहे.

छोट्याशा डब्यातून सुरुवात
व्यवसायाची सुरुवात नेहमी मोठ्या भांडवलातून, आकर्षक कार्यालयातून किंवा मोठ्या जाहिरातींतूनच होते असे नाही. अनेकदा एखादी साधी कल्पना, घरातील अनुभव आणि लोकांसाठी काहीतरी चांगले करण्याची मनापासूनची इच्छा यांतून यशाचा प्रवास सुरू होतो. रत्नप्रभा आणि बालाजी लोखंडे हे दोघेजण उच्चशिक्षित आहेत. रत्नप्रभा पूर्वी भारती हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत होत्या. बालाजी हे बी.एस्स्सी (अ‍ॅग्री) आहेत. पूर्वी ते एका कंपनीमध्ये नोकरी करत असत. तळजाईच्या टेकडी परिसरात त्यांचा आवळा कँडी विक्रीचा स्टॉल होता. त्यांच्या मुलाला वारंवार सर्दीचा त्रास होत असे. लोखंडे परिवार शुद्ध शाकाहारी आहे. त्यामुळे गव्हाचा चीक देण्याचा सल्ला त्यांच्या आईने त्यांना दिला होता. त्यानंतर रत्नप्रभा यांनी घरामध्ये गव्हाचा चीक तयार केला, तेव्हा तो कशा प्रकारे तयार करतात याचे तंत्र त्यांना समजले. २०१४-१५च्या सुमारास रत्नप्रभा यांनी एक दिवस घरात केलेल्या गव्हाच्या चिकातील थोडासा चीक एका छोट्या डब्यात भरला आणि बालाजी यांच्या आवळा कँडीच्या स्टॉलवर विक्रीसाठी ठेवला. हा केवळ एक प्रयोग होता. लोकांना हा पदार्थ आवडेल का? त्याची चव कशी वाटेल? पुन्हा मागणी होईल का? असे अनेक प्रश्न मनात होते.  पण पहिल्याच दिवशी त्यांना त्याचे उत्तर मिळाले. अवघ्या काही तासांत तो छोटासा डबा पूर्णपणे रिकामा झाला. ग्राहकांनी उत्सुकतेने हा पदार्थ चाखला. त्याची चव त्यांना मनापासून आवडली. हा अनुभव उत्साहवर्धक होता. दुसर्‍या दिवशी पुन्हा गव्हाचा चीक तयार करून विक्रीसाठी ठेवण्यात आला. यावेळीही प्रतिसाद तितकाच उत्स्फूर्त मिळाला. पुन्हा डबा रिकामा झाला. एका दिवसाचा योगायोग दुसर्‍या दिवशीही तसाच घडला, तेव्हा लोखंडे दाम्पत्याच्या लक्षात आले की या पदार्थामध्ये काहीतरी खास आहे. लोकांना चविष्ट आणि वेगळ्या पदार्थाबरोबरच पौष्टिक पर्यायही हवा आहे.

जवस चटणी, तूप आणि गूळ
सुरुवातीला गव्हाचा चीक प्लेन दिला जात असे. त्यात चटणी, जिरा पावडर, तूप आणि गूळ मिसळले तर चव उत्तम होईल, लोकांना देखील ते आवडेल, असा विचार करून त्याची सुरुवात केली वेâली गेली. ही जवस चटणी, जिरेपूड घरीच तयार केली जाते. गूळ, तूप उत्तम प्रतीचे असते. हे सगळे पदार्थ चिकाची चव वाढवतात. चीक तयार करण्यासाठी गहू टाक्यांमध्ये तीन दिवस भिजवून ठेवावे लागतात. त्यानंतर मशीनमध्ये ते दळायला लागतात. लोखंडे सांगतात, पूर्वी आम्ही हे काम हाताने करत असू. मात्र, आता दररोज चिकाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्यामुळे त्यासाठी आम्ही आता मशीन घेतली आहे.
स्टॉलच्या ठिकाणीच चीक तयार करून ग्राहकांना देण्यात येतो, त्यामुळे त्याचा फ्रेशनेस ग्राहकांना अनुभवता येतो. आपण जे करतो ते कधीच मोजून करत नाही तर मनापासून करतो, त्यामुळे ग्राहकांच्या ते पसंतीला पडले असल्याचे रत्नप्रभा सांगतात.

हिंजवडीपासून येतात ग्राहक
हा चीक खाण्यासाठी हिंजवडी, हडपसरवरून ग्राहक येतात. आठवड्यातून तीन वेळा इथे येत असल्याचे विशाल तपस्वी यांनी सांगितले. ते म्हणाले, गव्हाच्या चीक आरोग्याला खूपच पोषक असतो. त्यामुळे त्यासाठी थोडे जास्त कष्ट घ्यावे लागले तर काय हरकत आहे? चीक खायला लागल्यापासून त्याचे चांगले फायदे झाले असल्याचे तपस्वी यांनी सांगितले. आयटीमध्ये काम करणार्‍या कविता यांना देखील या चिकाची चांगलीच गोडी लागली आहे. त्या म्हणाल्या, मला आठवड्यातून दोन वेळा बाहेर खायला आवडते. सुरवातीला मी मांसाहारी पदार्थ खाण्यावर भर द्यायची. इथे गव्हाचा चीक मिळतो हे माहित झाल्यानंतर माझे बाहेरचे खाणे बंद झाले आणि मी आठवड्यातून दोन वेळा इथे येऊन मनसोक्त ताव मारत असते.

गुळातला शिराही टेस्टी…
पौष्टिक स्नॅक सेंटरमध्ये पोहे, उप्पीट, मुगाची भजी, साबुदाणा खिचडी या पदार्थांबरोबरच गुळातील आणि तुपामध्ये तयार केलेला शिरा देखील मिळतो. गूळ वापरून तयार केलेल्या शिर्‍याची चव गव्हापासून तयार केलेल्या लापशीसारखीच लागते. साजूक तुपातला शिरा देखील काही क्षणात जिभेवर विरघळतो. इथे मिळणारे अन्य पदार्थ चविष्ट आहेतच. मात्र, इथे येणारे ग्राहक इथे येतात ते गव्हाचा चीक खाण्यासाठीच.

ग्राहक समाधान महत्त्वाचे
आमच्याकडे मिळणार्‍या गव्हाच्या चिकाची प्रसिद्धी ही ग्राहकांनीच केलेली आहे. आम्ही त्याची कोणतीही जाहिरात केलेली नाही. आमच्याकडे मिळणारा पदार्थ त्यांना उत्तम वाटल्यामुळेच दूरदूरच्या भागातून लोक खास चीक खाण्यासाठी इथे येत आहेत. त्यामुळे आमच्याकडे येणार्‍या ग्राहकांना उत्तम दर्जाचे पदार्थ देऊन त्यांना समाधानी ठेवणे हेच आमचे परमकर्तव्य असल्याचे आम्ही समजतो, असे बालाजी लोखंडे सांगतात. तळजाईच्या टेकडी परिसरात आज ग्राहक गव्हाच्या चिकाची चव घेण्यासाठी येतात. पण प्रत्येकाच्या हातात येणार्‍या त्या चिकाच्या वाटीत केवळ गहू, गूळ, तूप आणि मसाल्यांचा स्वाद नसतो. त्यात एका कुटुंबाची मेहनत, प्रयोगशीलता, गुणवत्तेची निष्ठा आणि ग्राहकांच्या विश्वासाची गोडी मिसळलेली आहे. कधी कधी आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या संधीची वाट पाहण्याची गरज नसते. आपल्या हातात असलेल्या छोट्याशा संधीला मनापासून आकार दिला, तर तीच संधी उद्याचा मोठा प्रवास बनते. रत्नप्रभा आणि बालाजी लोखंडे यांच्या हातातील गव्हाच्या चिकाच्या त्या छोट्याशा डब्यानेही हेच सिद्ध केले आहे.

Previous Post

मराठी व्याकरण दिवस साजरा करू या!

Next Post

मिरवणूक

Next Post
मिरवणूक

मिरवणूक

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.