• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मिरवणूक

मिरवणूक- अर्ध्यामुर्ध्या गोष्टी

Marmik Team by Marmik Team
September 12, 2026
in गावगप्पा, गावची गजाल, विनोदी लेख
0
मिरवणूक

चित्र-आशुतोष वाळे

अर्ध्या आणि रवी दोघंही भंडाऱ्यातील पंगत झोडून उठले. सोबत रव्याचा पाहुणा, नातेवाईक आणि सोबती सुभानपण आहे. तिघंही पाण्याचे जार ठेवलेल्या ठिकाणी हात धुवायला गेले. हातातील पत्रावळ्या रस्त्याकडेच्या नालीत तिघांनी भिरकावल्या. तिथं काही कुत्री उरलेली शितं शोधत खात हुंगत होती. अर्ध्यानं कचकड्याचे ग्लास हातात घेऊन सताड वाहणाऱ्या जारच्या नळाला लावून भरून घेतला आणि मोकळ्यात हात धुवून एक घोट पाणी पिऊन तो तसाच खाली फेकून दिला. रवी आणि सुभाननं पण तशीच कृती केली. आणि तिघं मोकळ्यात लावलेल्या मोटारसायकल फतकल मारून बसले.

“काही म्हण उसळ भारी होती, एक नंबर!” अर्ध्या बोलता झाला.
“मी तर नुसती कोरडी उसळच हाणली! केवढा मोठा मसालेभात घेतला आणि वर उसळ.” रवीनं उसळप्रेम जाहीर केलं.
“मी ज्या लाईनीला बसलो तिथं वाढीच यायना. मग मीच एक भाताचं पातेलं घेऊन आलो, अन् तिघं-चौघं मिळून आम्ही दणक्यात टिचवून दिलं. हयगयच नाही.” सुभाननं गर्वानं सांगितलं.

“हा तुम्ही तेवढंच करा! आयते भंडारे झोडा. पण एक कार्यक्रम करायची तुमची दानत नाही.” पलीकडून गोपाळ हात धुवून तिथं आला.
“वले! आपण एकाच गल्लीत राहतो. आपल्या गल्लीत कुठं काय होतं?” रवीनं उलट गोपाळ्याला विचारलं.
“म्हणून तर मी इकडं मेंबर झालो. निदान श्रावणात कोणाच्या मुखी एक घास तरी घातल्याचं पुण्य मिळतं ना?” इति गोपाळ.
“आमच्या गल्लीत असतो संतांचा भंडारा…” अर्ध्यानं चटकन स्वतःला पुण्यवान घोषित केलं.
“आता गावात एक एक गल्लीनं एक एक संत वाटून घेतलाय. आम्हाला एकपण संत उरला नाही. तर काय करावं ब्वॉ?” रवीला प्रश्न पडला.
“हा रे! तिकडं एकनाथ, पलीकडं सावता, कोपऱ्यात गोरा, चौकात तुकाराम…” सुभान्या बोटं मोजायला लागला.
“ते ठीक आहे. पण धर्माचं एक काम तर करावं?” गोपाळनं भरीला घातलं.
“हा नाही संत उरले तर किमान एखाद्या शनिवारी-सोमवारी देवाचा भंडारा ठेवला तर कुठं बिघडलं?” अर्ध्यानं गोपाळच्या सुरात सूर मिसळला.

“इथं पोराचं दफ्तर फाटलं, नवीन घ्यायचंय पण पैशे आहे कुठं? काल आकडा लावला. जेवढी कमाई केली ती रात्रीपर्यंत खर्च झाली. घरी गेल्यावर बायको फक्त उरावर बसायची बाकी राहिली.” रवीनं रडगाणं गायलं.
“यायला तुला पोरं बी झालं? माझं तर अजून लग्न जुळंना! उरावर रातची खिडकी उघडी राहिली तर फक्त बोक्याच येऊन बसतो.” अर्ध्याचं वेगळंच दुखणं उद्भवलं. तसे तिघं हसायला लागले.
“अरे पैशे आपण थोडेच द्यायचे? वर्गणी गोळा करायची. देवाचं काम म्हंटलं का कुणीबी नाही म्हणत नाही.” गोपाळनं आयडिया सांगितली.
“हा आमच्या गल्लीत वर्गणी गोळा करायचं काम माझं! बघ, नाही घरटी हजार-दीड हजार काढले एक दिवसात तर…” सुभान्यानं चॅलेंज घेतलं.

“अरे हा! पण कोणाच्या नावानं कार्यक्रम करायचा?” गोपाळला प्रश्न पडला.
“आठवलं! गांजानंद बाबाच्या नावानं करू या!” रवीनं जाहीर केलं.
“आता हा कोण बाबा?” अर्ध्याला प्रश्न पडला
“अरे गाव सोडल्यावर ती छोटी देवळी आहे ना? ती त्या बाबाची आहे. तेचं नाव फक्त गजानंद असंय! काही बोलू नका. नाहीतर लोकं आपलाच कार्यक्रम लावायचे.” गोपाळनं मागं-पुढं बघत हसत सल्ला दिला.
“मी जास्त काही ऐकेल नाही पण!” अर्ध्यानं अजून माहिती पाहिजे.
“फार चमत्कारी बाबा होता तो! एकच शब्दात निदान करायचा.” रवी सांगायला लागला.
“म्हणजे?” अर्ध्याला सगळं जाणून घ्यायचंय!
“तो प्रकट झाला पोळ्याला. बाभळीच्या झाडामागून ‘आलो, आलो!’चा आवाज झाला अन् बाबा अर्ध्या तासानं बुडाला अवतरला.” गोपाळ अवतार कथा सांगायला लागला.
“त्या साली अख्ख्या भारतभर कडक दुष्काळ पडेल होता. पण ऐन उन्हाळ्यात बाभळीखाली बाबा बशेल असताना तो वर बघून ये, ये म्हणला अन् जोरदार पाऊस झाला. अख्ख्या भारतात दुष्काळ फक्त आपल्या गावात नदीला पाणी! ते बघून इंग्रजांनी नदीवरून खापरी पाईपलाईन थेट दिल्लीला निली. माहित्येय का?” रवीनं अवतार कथेतला दुसरा चमत्कार ऐकवला.
“बाबाचं नाव ऐकून बाभळीखाली बाबाचा दरबार भरायला लागला होता. आपल्या गावचा पहिला उपसरपंच होता ना? त्याच्या बापाचं नाव त्यानं ठेवलं होतं.” सुभान्या मागं राहील कसा?
“काय सांगतो?” अर्ध्याला आश्चर्य वाटायला लागलं.
“तर मग! त्या म्हातारीला आधी तीन पोरं झाले, तिन्ही मेले. हे चवथं झालं तसं ती बाभळीखाली घेऊन गेली बाबाला म्हणली. याचं नाव ठेवा! तसा बाबा जोरात ओरडला, ऊई मा! मग त्यावरूनच त्या उपसरपंचाच्या बापाचं नाव ठेवलं, ऊईमाजी!” रवीनं कथेचं पुढलं पान वाचलं.
“हे तर काहीच नाही! इंग्रज कुणामुळे गेले?” गोपाळनं अर्ध्याला सवाल केला.
“गांधीमुळं? का आझाद हिंद सेनेमुळं? नक्की आठवत नाही!” अर्ध्यानं डोकं खाजवलं.
“गजानंद बाबानं फक्त फौजदाराला बघून जा, जा म्हंटलं, आणि अख्खे इंग्रज दहा दिवसात देश सोडून निघून गेले.” गोपाळनं खरा इतिहास खर्रा खात खात सांगितला.
“ठरलं बाबाचा प्रकटदिन पोळ्याला असतो ना? त्याच दिवशी भंडारा आणि मिरवणूक ठेऊ! चालंल ना?” रवीनं प्रस्ताव मांडला.
“चालंल! पण भंडारा नको! लोकांच्या घरी तशाही पुरणपोळ्या बनलेल्या असत्या. कोण खाणारे? त्यापेक्षा फक्त मिरवणूक काढू!” गोपाळनं प्रस्तावात दुरुस्ती सुचवली!
“मग माझ्या ग्रुपचा डीजे आहे. तो आणू. माझ्यामुळं ते हजारेक सहज कमी करतील. अन् मलाबी काम मिळंल!” सुभानचं पुढलं नियोजन!
“हे भारी होईल. एकाला बाबासारखं लंगोट आणि पोलकं घालून बसवू रथात. चिलीम देऊ हातात. आणि अख्ख्या गावभर मिरवणूक काढू! मस्त डीजे-बीजे लावून!” रवीनं नियोजन संपवलं.
“डीजे नको! कानाला दडे बसतील. त्याच्यात दुपारचं बैलं मिरवायचे चालू राहतील. त्यात मिरवणूक काढली तर बैलं बीफरतील ना?” अर्ध्यानं आक्षेप नोंदवला.
“मग रातची काढू! बैलं मारुतीला दिवसा सलामी देऊन जातील, आपण रात्री मिरवणूक काढू! पण डीजेशिवाय मिरवणूक होणार नाही. तो पहिले लागंल!” रवी मिरवणुकीवर ठाम आहे
“अरे पण रात्रीचा एवढा आवाज?” अर्ध्या बोलायचा प्रयत्न करायला गेला.
“वर्षात एकच दिवस तर मिरवणूक काढायची आहे ना? त्याच्यात आपण पहिलाच प्रकटदिन साजरा करायचा आहे आपल्याला.” रवी ऐकेना.
“अरे पण…” अर्ध्या पुन्हा काही बडबडू लागला.
“हे पहाय! प्रत्येक गल्ली एक एक संत वाटून घेऊन कार्यक्रम घेतीय. आम्हाला एकपण संत उरेल नाही. त्यात कुठून का होईना एक शोधला. त्याचा आम्ही आमच्या समाजातर्फे एक सण साजरा करायला जातोय तर लगेच नाही काय?” रव्या बीफरला.
“हां ना! त्याच्यात एवढेजण वाजवून जात्या, आम्ही एक दिवस वाजवलं तर काय बिघडलं? त्याच्यात त्या माणसामुळं आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. त्याच्या नावानं आम्ही काही करतोय तर लगेच तुमच्या पोटात दुखायला लागलं.” गोपाळ मागे राहील कसा?
“अरे पण गाणी…” अर्ध्यानं पुन्हा बोलायचा प्रयत्न केला.
“गाणी काय? मागच्या सरपंचाच्या बायकोचं नाव शिलावंती होतं, अख्खे पोरं शीला की जवानी गाणं वाजवत त्याच्या घरापुढं नाचले. ते बी त्याच्याच विजयी मिरवणुकीत! हे तर काहीच नाही! मागच्या साहेबांच्या मिरवणुकीत अख्खे भोजपुरी गाणे वाजवून पोरं नाचले. त्याला काय होतं? नाचायला पोरांना बीट पाहिजे. शब्द नाही! आणि आता गजानंद बाबाचे रात्रीतून कोण गाणे बनवील? तिथं सरळ पोरी जपून दांडा धर वाजलं तरी आपली श्रद्धा कमी थोडीच होती काय?” गोपाळनं मुद्दे बनवून अर्ध्याला सुनावलं.
“तेच मरू दे! पावती पुस्तकं मी छापायला टाकतो. वर्गणी गोळा झाली का, त्याचं पेमेंट देऊ. घरटी दीड हजार काढू. आणि कार्यक्रम फिक्स करून टाकू.” सुभाननं तातडीने रूपरेषा मांडली.
“ठरलं, एक रथ, बाबाच्या वेषात एक पोरगं. एक डीजे, लेजर शो आणि रात्रभर मिरवणूक! आपली जात, आपला माज!” रवीनं कॉलर उडवली.
“पण पोलीस?” अर्ध्यानं चाचरत भेव दाखवलं.
“इथं काय सिनेमा असतो का? गावात फारतर फिरला तर एखादा शिपाई फिरतो नाहीतर फार झालं तर हवालदार. इथं इन्स्पेक्टर आला तर थेट झेंडावंदनला. अधीमधी फिरकत नाहीत. त्यात शिपाई आला तर मिरवणुकीत उरलेली एखादी चपटी त्याला द्यायची. का गडी खुश! मग येतंय कोण?” रवीनं हसत अर्ध्याला विचारलं. अर्ध्या गप्प झाला. अर्ध्याला कुठं फाडफाड मराठी इंग्रजी येते? तेव्हा त्याचं कोणी ऐकेल? आणि वर्षभर निघणाऱ्या एवढ्या मिरवणुकीत एक मिरवणूक वाढल्यानं किती फरक पडायचा आहे? म्हणत अर्ध्या गपचूप घराकडे निघाला. रवी आणि बाकी तिघांचं नियोजन जोरात चालू झालं आहेच.

Previous Post

पौष्टिक स्नॅक सेंटर

Next Post

…इथे पिकांसोबत पक्षीही वाढतात!

Next Post
…इथे पिकांसोबत पक्षीही वाढतात!

…इथे पिकांसोबत पक्षीही वाढतात!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.