• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मराठी व्याकरण दिवस साजरा करू या!

योगेश त्रिवेदी (चौफेर)

Marmik Team by Marmik Team
September 12, 2026
in मोठी माणसं, विशेष लेख
0
मराठी व्याकरण दिवस साजरा करू या!

जन्माने ज्यू, लग्नाने मुस्लिम आणि कर्माने कट्टर मराठी अशा आयुष्याची शतकी खेळी पूर्ण करणाऱ्या साहित्य शारदेच्या पुजारी प्रा. डॉ. यास्मिन शेख या केंद असो वा राज्य सरकार असो दोन्ही सरकारकडून दुर्लक्षितच राहिल्या, असे आवर्जून म्हणावे लागेल. २७ फेब्रुवारी रोजी ज्यांचा जन्मदिवस आपण जागतिक मराठी भाषा अभिमान दिवस म्हणून साजरा करतो त्याच ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित थोर कवी कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांच्या नाशिक याच पावन भूमीत २१ जून १९२५ रोजी जन्मलेल्या पूर्वाश्रमीच्या जेरुषा रुबेन या मूळ ज्यू असलेल्या मराठीच्या कट्टर अभिमानी साहित्यिक विदुषीचा नाशिकमध्येच साहित्यिक वसंतराव कानेटकर यांच्या पुढाकाराने येथील एका चित्रमंदिरात कार्यरत असलेल्या अजीझ अहमद इब्राहिम शेख यांच्यासमवेत १९५० साली ‘निकाह’ लागला. त्यांनी आपला धर्म बदलला नाही. नाव बदलून त्या फक्त यास्मिन शेख झाल्या. त्यांना डॉ. शमा आणि प्रा. रुकसाना अशा दोन मुली आहेत. प्रा. श्री. म. माटे यांच्या विद्यार्थिनी असलेल्या यास्मिन शेख यांनी श्री. पु. भागवत आणि वसंतराव कानेटकर यांच्याबरोबर काम केले. त्यांनी व्रतस्थ वृत्तीने भाषाशास्त्र आणि व्याकरण या विषयांसाठी आपले जीवन वाहून घेतले होते.

प्रा. डॉ. यास्मिन शेख यांनी शालेय व महाविद्यालयीन स्तरावर ३४ वर्षे अध्यापन केले आहे. एसआयईएस महाविद्यालय, शीव, मुंबई येथे सहा वर्षे मराठी विभागप्रमुख म्हणून त्या कार्यरत होत्या. त्यांनी शासनाच्या ‘स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करियर, मुंबई’मध्ये भारतीय प्रशासन सेवेच्या विद्यार्थ्यांना व्याकरण व भाषाशास्त्र याचे दहा वर्षे अध्यापन केले. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचे त्यांनी इतर सदस्यांच्या सहकार्याने सात वर्षे संपादन केले. त्यांचा बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या ‘कार्यात्मक व्याकरणा’च्या पुस्तकनिर्मितीत महत्त्वाचा सहभाग होता. त्या अंतर्नाद मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणून पंधरा वर्षे कार्यरत होत्या. विविध नियतकालिकांमधून त्यांचे व्याकरणविषयक, परीक्षणात्मक व व्यक्तिचित्रणात्मक लेखन प्रसिद्ध झालेले आहे. मराठी शब्दलेखनकोशही त्यांनी प्रसिद्ध केला आहे. राज्य मराठी विकास संस्थेतर्फे मराठी लेखन मार्गदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे.
नाशिक मधील सार्वजनिक वाचनालयातर्फे ४ व ५ ऑक्टोबर २००८ रोजी आयोजित करण्यात आलेल्या नाशिक जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्षस्थान प्रा. डॉ. यास्मिन शेख यांनी भूषवले होते. त्यांना २०१५ सालचा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार, प्रा. डॉ. शेषराव मोरे यांच्या हस्ते १७ ऑगस्ट २०१५ रोजी प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे यास्मिन शेख यांना डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार २७ फेब्रुवारी २०१७ रोजी प्रदान कण्यात आला. मराठी साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार २६ मे २०१७ रोजी देण्यात आला. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ‘शिक्षणप्रेमी शांतारामशेठ शहासने जीवनगौरव पुरस्कार’ २२ फेब्रुवारी २०२६ रोजी देऊन सन्मानित करण्यात आले.

भाषाशास्त्र, व्याकरण, शुद्धलेखन, मुद्रितशोधन प्रसिद्ध साहित्यकृती मराठी शद्बलेखनकोश यात प्रा. डॉ. यास्मिन शेख यांचे प्रभुत्व होते. मराठी माणसे बोलतांना भाषेमध्ये परकीय शब्दांचा वापर सहजतेने करतात. मात्र असे करतांना आपणच आपली भाषा प्रदूषित करीत आहोत याचे त्यांनी भान ठेवायला हवे. बोली भाषा कशीही असली, तरी ललित वाङ्मय असो किंवा वैचारिक लेखन, ते करतांना प्रमाणभाषेचाच वापर झाला पाहिजे, असे त्यांचे मत होते. प्रा. डॉ. यास्मिन शेख यांचा अनेक ठिकाणी गौरव करण्यात आला असला तरी या आयुष्याची शतकी खेळी पूर्ण करणाऱ्या मराठी साहित्य शारदेच्या महान विदुषीकडे केंद्र आणि राज्य सरकारने दुर्लक्षच केले असे खेदाने म्हणावे लागते. निवडणुकीच्या तोंडावर मराठी अभिजात भाषा म्हणून घोषित करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी व ज्येष्ठ नेत्यांनी प्रा. डॉ. यास्मिन शेख यांच्या १०१व्या वर्षी झालेल्या देहावसानानंतर भरभरून शोकसंवेदना व्यक्त केल्या, परंतु कुणीही त्यांच्या नावाचा पद्म पुरस्कार आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन मरणोत्तर सन्मान करण्यासाठी पुढाकार घेण्याची नोंद घेतली नाही, याचेच वैषम्य वाटते.

डॉ. यु. म. पठाण, शेख साबिर हाजी करीम उर्फ साबिर शेख, अमरावतीचे दिवंगत हास्यसम्राट कवी डॉ. मिर्झा बेग (ऊर्फ मिर्झा एक्स्प्रेस), अकोला येथील देशोन्नती दैनिकाच्या पत्रकार यास्मिन शेख अशा असंख्य मुस्लिम मराठी साहित्यसेवकांनी मराठी साहित्य शारदेची अहर्निश सेवा केली आहे आणि करीत आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्याची आवश्यकता आहे. आपण २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रजांची जयंती जागतिक मराठी भाषा अभिमान दिवस म्हणून साजरी करतो. त्याचप्रमाणे ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ ही अजरामर काव्यरचना महाराष्ट्राला देणारे कवीवर्य सुरेश भट यांची १५ एप्रिल ही जयंती ‘जागतिक मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरी करण्यात यावी आणि तद्वतच प्रा. डॉ. यास्मिन शेख यांची २१ जून ही जयंती ‘जागतिक मराठी व्याकरण दिवस’ म्हणून साजरी करण्यात आली तर तो त्यांचा यथोचित सन्मान ठरेल.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना विचारण्यात आले होते की, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तीन तीन दिवस साजरी करण्यात येते, असे का? त्यावर त्यांनी सांगितले की, महाराजांचा उत्सव ३६५ दिवस साजरा करायला काय हरकत आहे? अशाच पद्धतीने मराठी भाषेबद्दल कुसुमाग्रज, सुरेश भट आणि प्रा डॉ यास्मिन शेख या तीन विभूतींचे महत्वपूर्ण दिवस मराठी भाषेचा उत्सव म्हणून साजरे करु या आणि त्यांची स्मृती आपापल्या ह्रदयपटलावर चिरंतन जतन करू या!

Previous Post

बाळासाहेबांचे फटकारे

Next Post

पौष्टिक स्नॅक सेंटर

Next Post
पौष्टिक स्नॅक सेंटर

पौष्टिक स्नॅक सेंटर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.