‘मार्मिक’ विकत घेऊन वाचायचं शास्त्र बनून गेलं, तेव्हा खरं तर त्याच अंकातील बाळासाहेबांचं तिखट तसंच मर्मभेदी लिखाण वा व्यंगचित्रं यावर नजर गेलेली असणं, अपरिहार्यच होतं. मात्र, तेव्हा त्यातून मुंबईत काही महाभारत घडू पाहत आहे वा बाळासाहेब त्यातून काही राजकारण करू पाहत आहेत, हे लक्षात आलं नव्हतं. खरं तर हा शुद्ध अडाणीपणाच होता आणि तशी कबुली आज द्यायला काहीच हरकत नाही.
खिंचो न कमान को, न तलवार निकालो;
जब तोप मुकाबिल है तो अखबार निकालो!
आयुष्यात नेमक्या कोणत्या वळणावर ‘मार्मिक’ हातात आलं, ते आज या घटनेला जवळपास चार-साडेचार दशकं उलटून गेल्यावरही पक्कं आठवतं.
हवा कॉलेजची होती आणि हिंदी सिनेमाची मोहमयी दुनिया मनावर गारूड करू पाहत होती. सिनेमे मुंबईत रिलीज झाल्यावर नाशकासारख्या गावात वर्तमानपत्रांत आलेली परीक्षणं हाच काय तो त्याबाबतची भूक भागवण्याचा एकमेव मार्ग होता आणि त्या परीक्षणांतही सिनेमाच्या गोष्टीपलीकडे फार काही नसे. अशातच एकदा ‘मार्मिक’ हाती आलं. त्याच्या शेवटच्या पानावर ‘सिनेप्रिक्षान’ नावाचं एक सदर होतं आणि लेखक म्हणून कोणी ‘शुद्धनिषाद’ असं नाव छापलेलं होतं. ते परीक्षण वृत्तपत्रीय परीक्षण-समीक्षणाच्या पुरत्या चिंधड्या उडवून, त्या पलीकडे काही तरी सांगणारं होतं. तेव्हापासून आठवड्याला ‘मार्मिक’ विकत घ्यायचं आणि शुद्धनिषादनं काय लिहिलंय, ते वाचायचा रिवाजच पडून गेला होता.
पुढे फारा दिवसांनी हा ‘शुद्धनिषाद’ म्हणजे साक्षात श्रीकांत ठाकरेच, हेही कळलं. पण ती फार म्हणजे फार पुढची गोष्ट.
‘मार्मिक’ विकत घेऊन वाचायचं शास्त्र बनून गेलं, तेव्हा खरं तर त्याच अंकातील बाळासाहेबांचं तिखट तसंच मर्मभेदी लिखाण वा व्यंगचित्रं यावर नजर गेलेली असणं, अपरिहार्यच होतं. मात्र, तेव्हा त्यातून मुंबईत काही महाभारत घडू पाहत आहे वा बाळासाहेब त्यातून काही राजकारण करू पाहत आहेत, हे लक्षात आलं नव्हतं. खरं तर हा शुद्ध अडाणीपणाच होता आणि तशी कबुली आज द्यायला काहीच हरकत नाही.
कॉलेजची हवा बघता बघता दूरदेशी निघून गेली आणि पत्रकारितेचं नवं वारं अंगात आलं. त्यानंतरच्या दोन-पाच वर्षांतच थेट ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि लगोलग मुंबई महापालिकेचं वार्तांकनही हातात आलं. तेव्हा महापालिकेत शिवसेना विरोधी बाकांवर होती.
वामनराव महाडिक आणि छगन भुजबळ यांच्या हातात शिवसेनेची सूत्रं होती. महापालिकेतील तो सारा खेळ बघताना शिवसेनेविषयीचं कुतुहल वाढत गेलं आणि त्यातूनच पुढे ‘शिवसेनेची गोष्ट’ जाणून घेण्याचा नाद लागला. त्या नादातूनच पुढे ‘जय महाराष्ट्र!‘ हे पुस्तक लिहिलं गेलं.
ही १९९० या दशकातील गोष्ट. त्या पुस्तकाची जुळवाजुळव सुरू असताना तर ही शिवसेनेची खरीखुरी गोष्ट तारीखवार आपल्याला कोण सांगणार, असा प्रश्न उपस्थित झाला आणि एकदम ‘मार्मिक’ची आठवण झाली.
कोणत्याही राजकीय पक्षाचा इतिहास हा खरं तर त्या पक्षाच्या बैठका, अधिवेशनं, त्यातील वक्त्यांची भाषणं, तेथील राजकीय वा आर्थिक ठराव यांच्यात बंदिस्त असतो. त्यामुळेच काँग्रेस वा भारतीय जनता पक्ष वा साम्यवादी किंवा समाजवादी अशा पक्षांच्या बखरी आपोआपच तयार झाल्या आहेत. मात्र, शिवसेनेनं हा सारा रिवाज पुरता फाट्यावर मारलेला होता. दसरा मेळावा आणि त्यातील बाळासाहेबांची भाषणं यातूनच शिवसेनेचा इतिहास शब्दबद्ध करावा लागणार होता. पण त्यापलीकडे मग वर्षभरात शिवसेना काहीच करत नव्हती का? शिवसेनेवर टीका तर पहिल्या दिवसापासूनच होत होती. मग बाळासाहेबांसारखा आक्रमक नेता त्या टीकेला काहीच उत्तरं देत नव्हता का? -आणि मग ती उत्तरे तपशीलवार कुठं मिळणार? या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं ही ‘मार्मिक’च्या फायलींमध्येच सापडू शकतात, असं ध्यानात आलं.
आता तीन दशकांपूर्वीपासूनच्या या फायली कुठं मिळणार, असा प्रश्न सुनील कर्णिक यांच्यासारख्या काही मित्रांनी चुटकीसारखा सोडवला. दादर पूर्वेस असलेल्या बंबखान्याजवळच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वास्तूत अशी अनेक घबाडं दडलेली आहेत. तेव्हा आठ-पंधरा दिवस तिथं रोज जाऊन बसण्याचा निर्णय घेतला आणि ‘मार्मिक’च्या पहिल्या अंकापासूनच्या फायली तेथील एक अत्यंत उत्साही ग्रंथसेवक शशिकांत भगत यांनी अगदी आपुलकीनं हातात ठेवल्या.
एक मोठा खजिनाच हाती लागल्याचा तो आनंद अगदीच दुर्मिळ असा होता.
संयुक्त महाराष्ट्रासाठी मराठी माणसानं केलेल्या उग्र आंदोलनानंतर एक मे १९६० रोजी मराठी भाषकांच्या या स्वतंत्र राज्याची स्थापना झाली आणि नंतरच्या तीन महिन्यांतच ‘मार्मिक’ हे मराठी भाषेतील पहिलं-वाहिलं व्यंगचित्रात्मक साप्ताहिक स्टॉलवर झळकलं. ‘मार्मिक’चा पहिला अंक हा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील एक बडे नेते आणि प्रख्यात साहित्यिक आचार्य प्र. के. अत्रे यांच्या १३ ऑगस्ट या वाढदिवसाचा मुहूर्त साधून प्रकाशित झाला होता. अत्रे यांची गणना प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्याबरोबरच संयुक्त महाराष्ट्राच्या ‘पंचायतना’त होत होती आणि बाळासाहेबही तेव्हा आचार्यांना आपले गुरू किंवा ज्येष्ठ स्नेही-मार्गदर्शक मानत होते. मात्र, राजकारण कशी अघटित वळणं घेतं बघा!
पुढच्या वर्ष-दोन वर्षांतच अत्रे आणि ठाकरे यांच्यात मतभेद झाले. त्याचं कारण हे बहुधा अत्र्यांच्या कम्युनिस्टप्रेमात होतं, असं त्या काळातल्या अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी तेव्हाच सांगितल्याचं आजही स्पष्ट आठवतं. त्यांचे वादविवाद ‘मार्मिक’ आणि ‘मराठा’ यातून गाजू लागले. पुढे ‘मार्मिक’ हे असे वाद आणि बाळासाहेबांची घणाघाती भाषा याबद्दलच चर्चेत आलं.
मात्र, प्रत्यक्षात ‘मार्मिक’चं प्रकाशन सुरू करण्यापूर्वी दस्तुरखुद्द बाळासाहेबांची या साप्ताहिकाबाबतची कल्पना अगदीच वेगळी होती आणि ती त्यांनी स्वत:च अनेक ठिकाणी अनेक वेळा सांगितलेली आहे. मराठी वाचकाचा आठवडाभराचा शीण दूर व्हावा आणि त्याचा रविवार ‘सुखद’ जावा, एवढ्याच मर्यादित हेतूनं बाळासाहेबांनी हे साप्ताहिक सुरू केलं होतं. ‘मार्मिक’मधील मजकूर बोजड, जडजंबाल राहणार नव्हता. प्राध्यापकी थाटाच्या क्लिष्ट मजकुराऐवजी खुसखुशीत, चटपटीत शैलीतील प्रासंगिक टिपणी आणि सोबत प्रसन्न-रंजक अशी व्यंगचित्रं हे ‘मार्मिक’चं ध्येय होतं. आठवड्यातून एकदाच वाट्याला येणार्या रविवारी वाचकाला सुखद असा श्रमपरिहारात्मक ‘रिलीफ’ द्यावा, एवढीच साधी सोपी कल्पना ‘मार्मिक’च्या मुळाशी होती, असं स्वत: ठाकरे यांनीच स्पष्ट केलं होतं. ‘मी पोट भरण्यासाठी मार्मिक सुरू करतोय!’ असंही संपादकीयात बाळासाहेबांनी आपल्या मिश्किल शैलीत नमूद केलं होतं.
अर्थात, ‘मार्मिक’ची ही गोष्ट मला ‘मार्मिक’च सांगत होतं.
त्यातून शिवसेनेचा जन्म कसा झाला, ती कहाणी माझ्यापुढे साकार होत गेली.
।।। ।।। ।।।
मात्र, बाळासाहेबांनी ‘मार्मिक’च्या पहिल्या अंंकाचं प्रकाशन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते करून सर्वांनाच धक्का दिला होता. तरीही अल्पावधीतच मुंबईतील मराठी माणसाच्या एका समुहात ‘मार्मिक’ दिसू लागलं.
एक नवं साप्ताहिक नव्या राज्याबरोबरच मराठी माणसाच्या हाती आलं होतं. या साप्ताहिकामुळे मराठी माणसाचे विरंंगुळ्याचे चार क्षण मजेत जरूर जात होते. पण हळूहळू त्याला परिस्थितीतील बदलही जाणवू लागला होता. ‘मार्मिक’च्या वाचनानं त्याला आनंद नक्कीच मिळत होता; पण त्यामुळे त्याचे भौतिक पातळीवरील अन्न-वस्त्र-निवारा हे प्रश्न सुटू शकत नव्हते. आपल्या आंदोलनामुळे आणि मुख्य म्हणजे १०६ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मराठी राज्य स्थापन झालं, याचा आनंद त्यास जरूर होता. मुंबई महाराष्ट्रातच राहिली, ही घटना तर त्यास अपरंपार आनंद देऊन गेली होती. मात्र, त्यासाठी रक्त सांडाव लागलं, यामुळे त्याच्या मनात निर्माण झालेली चीड त्याच्या मनातून जायला तयार नव्हती. मुंबई महाराष्ट्राला जरूर मिळाली होती; पण मुंबईत मराठी माणसाचं दर्शन उघडपणे होत नव्हतं.
त्याची कारणं अनेक होती. ब्रिटिश राजवटीत टोपीकर इंग्रजांनी मुंबईला दिलेल्या अपरंपार महत्त्वामुळे देशभरातील व्यापार-उदिमाचं केंद्रीकरण मुंबईत झालं होतं आणि त्याचबरोबर रोजी-रोटीसाठी मुंबईत देशभरातून येणार्या लोकांमुळे या शहराचं रूपडं ‘कॉस्मोपॉलिटन’ होऊन गेलं होतं. स्वातंत्र्यास दहा-बारा वर्षं उलटल्यावरही आणि मुख्य म्हणजे मराठी भाषकांच्या स्वतंत्र राज्याची राजधानी असं बिरूद लाभल्यानंतरही ही परिस्थिती कायमच होती.
संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर यशवंतराव चव्हाणांनी ‘मुख्यमंत्री मराठा असला तरी राज्य मर्हाठीच असेल!’ अशी ग्वाही जरूर दिली होती. मात्र, मुंबईत तरी तसं चित्र दिसत नव्हतं. मुंबईतील व्यापार-उदीमाच्या नाड्या या प्रामुख्यानं अ-मराठी माणसाच्या हातात होत्या आणि रोजगार उपलब्ध झाल्यावर ते कोणाला द्यायचे, तेही त्याच अ-मराठी माणसाच्या हातात होतं. साहजिकच तो आपल्या भाषेच्या, आपल्या प्रांताच्या, आपल्या जातीच्या माणसालाच तेथे नेमत होता. हे चित्र मुंबईतील मराठी माणसाला बापुडवाणा चेहरा होऊन बघावं लागत होतं. राज्यातील सरकारनं त्यासंबंधात काही पावलं उचलावीत, अशी त्याची अपेक्षा होती; पण ती फोल ठरत होती.
मराठी माणसाच्या मनातील ही खदखद आणि त्यातून निर्माण होणारा असंतोष यांना वाचा फोडण्याचं काम अखेर ‘मार्मिक’नंच केलं.
शिवसेनेची गोष्ट मला सांगायला अखेर ‘मार्मिक’नं सुरुवात केली होती!
‘मार्मिक’ सुरू होऊन साधारणपणे एक वर्ष झाल्यानंतर बाळासाहेबांनी मुंबईतील मोठे कारखाने, बडे उद्योगसमूह, तसंच सरकारी आणि निमसरकारी उपक्रमांमधील वरिष्ठ पदांवर काम करणार्या व्यक्तींच्या नावाच्या याद्या कोणत्याही टीका-टिपणीविना प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. ‘वाचा आणि थंड बसा’ या शीर्षकाखाली अशा याद्या नियमितपणे प्रसिद्ध होऊ लागल्या.
शिवसेनेची मुळं या सदरानं पेटून उठलेल्या मराठी तरुणांमध्ये होती आणि ‘मार्मिक’च ही गोष्ट मला सांगत होतं. ‘मार्मिक’च मला सांगत होतं की या याद्यांना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आणि त्यातूनच पुढे ‘मार्मिक’नं मराठी तरुणांना नोकर्या तसंच सरकारी गृहनिर्माण वसाहतींमध्ये ८० टक्के जागा राखीव असल्या पाहिजेत, परप्रांतीयांचं वर्चस्व वाढता कामा नये, अशा मागण्या केल्या जाऊ लागल्या.
‘मार्मिक’ला १९६५ च्या ऑगस्टमध्ये पाच वर्षं पूर्ण झाली. मात्र, तोपावेतो ‘मार्मिक’वरील टीकेचा सूरही टीपेला पोचला होता. त्यास बाळासाहेबांनी या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त प्रकाशित झालेल्या अंकात झणझणीत उत्तर दिलं होतं. ‘उपर्या परप्रांतीयांची हकालपट्टी करा, म्हणून ‘मार्मिक’नं सुरू केलेल्या प्रचारास ‘संकुचित प्रादेशिकता’ असं म्हटलं जात आहे. मात्र, सारे भारतीय हे आमचे देशबांधव आहेत; पण आमचेच बांधव जर आमच्यावरच कुरघोडी करून मराठी माणसाच्या तोंडचे हक्काचे अन्न तोडत असतील, तर त्याचा तेवढ्यापुरता अवश्य प्रतिवाद केला पाहिजे… अन्य राज्यातील देशबांधवांवर आम्ही महाराष्ट्र हिताच्या दृष्टीनं टीका करत असलो, तरी आमच्या मनात त्यांच्याबद्दल आकस नाही. त्यांनी जर काही चांगलं केलं, तर त्याचा गौरवही आम्ही केला आहे,’ असं संपादकीयात स्पष्ट नमूद करण्यात आलं होतं.
पाचव्या वर्धापनदिनाच्या या अंकातील संपादकीयात बाळासाहेबांनी पुढे म्हटलं होतं : ‘मार्मिक’ची भूमिका ही स्वच्छपणे महाराष्ट्रप्रेमी आणि भारतनिष्ठेची आहे. तसंच ती शुद्ध राष्ट्रीयत्वाचीही आहे… आणि सामान्यांचा कैवार घेऊन आम्ही सतत लढणार आहोत… कोणी वंदा, कोणी निंदा… महाराष्ट्रहिताचा आमचा धंदा!
बाळासाहेबांनी दाक्षिणात्यांच्या विरोधात उघडलेली आघाडी दिवसेंदिवस अधिक मजबूत कशी होत गेली आणि ते ‘मार्मिक’मध्येच २९ ऑगस्ट १९६५च्या अंकान प्रसिद्ध झालेल्या एक़ा लेखानं मला सांगितलं. या लेखाचं शीर्षक होतं : ‘मराठी पुढारी नि मराठी सरकार महाराष्ट्राशी बेईमान!’
ही असली शीर्षकं आणि त्याचबरोबर घणाघाती मर्मभेदी भाषा यामुळे मराठी माणसाची अस्मिता जागृत होऊ लागली होती. आता शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या घराभोवती तसंच ‘मार्मिक़’च्या कचेरीभोवती मोठ्या संख्येनं गर्दी जमा व्हायला सुरुवात झाली होती.
यापुढचा अपरिहार्य टप्पा या ‘मराठी माणसांची संघटना’ हाच होता. ‘मार्मिक’मधून मराठी माणसाच्याच रेट्यातून सुरू झालेल्या या ‘कॅम्पेन’नं तुफान उठवलं होतं.
-आणि अचानक एके दिवशी प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना विचारलं : बाळ! व्याखानं, भाषणं असं सगळं तुझं सुरू आहे. हे असंच चालू ठेवणार की त्यास काही संघटित स्वरूप देणार?
हा विद्रोह संघटित व्हायला पाहिजे याबाबत बाळासाहेबांचंही काही दुमत नव्हतंच. ‘मार्मिक’नं उभ्या केलेल्या परिवारात तेव्हा दादर परिसरातील विचारवंत धोंडो विठ्ठल देशपांडेही सामील झाले होते. राजकीय पक्षच का स्थापन करू नये, असा विचारही तेव्हा झाला होता. मात्र, राजकीय पक्षाची कल्पना बाळासाहेबांनी झुरळासारखी झटकून टाकली आणि त्याऐवजी मराठी माणसांची संघटनाच स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
प्रबोधनकारांनी हा निर्णय होताच तत्काळ नाव सुचवलं :
शि व से ना!
-आणि ‘मार्मिक’च्या पाच जून १९६६ च्या अंकात एक चौकट प्रसिद्ध झाली.
यंडूगुंडूंचे मराठी माणसाच्या
हक्कावरील आक्रमण
परतऊन लावण्यासाठी
‘शिवसेने’ची
लवकरच नोंदणी सुरू होणार!
विशेष माहितीसाठी
‘मार्मिक’चा पुढील अंक पहा!
-सं.
शिवसेनेची १९ जून १९६६ रोजी रीतसर स्थापना झाली. त्यानंतर ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवसेनेचा पहिला-वहिला जाहीर मेळावा झाला आणि त्यात नेमकं काय घडलं, ते ‘मार्मिक’च मला सांगत गेलं. शिवसेनेच्या स्थापनेला एक महिना उलटल्यावर १९ जुलै १९६६ रोजी प्रसिद्ध झालेल्या अंकात संघटनेत दाखल होऊ इच्छिणार्यांसाठी काही मार्गदर्शक सूत्रं जाहीर करण्यात आली होती. त्या पहिल्या वर्षी संघटनेत दाखल होणार्यांना एक शपथ घ्यावी लागत असे. त्या शपथपत्रातही या सूत्रांचाच प्रामुख्यानं उल्लेख होता. ‘मार्मिक’च्या याच १९ जुलै १९६६ च्या अंकात ती ११ कलमी शपथ प्रसिद्ध करण्यात आली होती.
त्यानंतरचे ‘मार्मिक’चे सारं अंक म्हणजे शिवसेनेची ‘बखर’च म्हणावी लागेल. आजच्या राजकीय विश्लेषकांना आणि महाराष्ट्राच्या अभ्यासकांना, भले ते शिवसेनेचे टीकाकार का असेनात, ते सारे अंक डोळ्याखालून घातल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही, असं त्या अंकांचं मोल आहे.
पुढे १९७९ मध्ये नाशिकहून थेट मुंबईलाच स्थलांतर झालं आणि बातमीदारीसाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने मुंबई महापालिका हाच बीट दिल्यामुळे शिवसेना अगदीच जवळून पाहता आली.
मात्र, त्यापूर्वीची शिवसेना आणि शिवसेनेची स्थापना यांची गोष्ट मला ‘मार्मिक’नंच सांगितली. मी त्याबद्दल ‘मार्मिक’चा ऋणी आहे.