फरीद आणि कबीर दोघे समकालीन.
एकदा फरीद कबिराच्या गावातून प्रवास करणार होता. दोघांच्या शिष्यांनी आग्रह केला की एकमेकांना भेटा. तुम्ही दोघे एकमेकांशी जे बोलाल, ते ऐकूनच आम्हाला मोठी ज्ञानप्राप्ती होईल.
दोघे एकमेकांना भेटले. एकमेकांबरोबर हसले, रडले. पण, दोन दिवसांच्या फरीदच्या मुक्कामात एकमेकांशी काहीच बोलले नाहीत.
मुक्काम हलल्यावर फरीदच्या शिष्यांनी त्याला विचारलं, तुम्ही का नाही बोललात कबिराशी?
फरीद म्हणाला, आम्ही काय बोलणार? कबीर जाणता नसता, तर काही ना काही चर्चा होण्याची शक्यता होती. मी जिथे आहे, तिथेच तोही आहे. तसाच. जणू मी म्हणजेच तो. त्याच्याशी काय बोलणार? कबिराच्या शिष्यांनीही त्याला विचारलं, तुम्ही काहीच बोलला नाहीत एकमेकांशी?
कबीर म्हणाला, जिथे मौनाचा अर्थ समजत नाही, तिथेच शब्दांचा वापर करावा लागतो. दोन प्रबुद्धांमध्ये मौनच इतकं अर्थवाही, संपूर्ण, सखोल आणि सुंदर बनतं की भाषा निरर्थक होऊन जाते.