• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

चायवाला का डरला?

- ऋषिराज शेलार (गावच्या गोष्टी)

Nitin Phanse by Nitin Phanse
May 22, 2025
in भाष्य
0

चोरगाव आणि मोरगाव शेजार शेजारचे गावं. पूर्वीच्या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये दोन्ही गावं सामील होती. पण काहींच्या स्वार्थामुळं चोरगावच्या (?) त्या लहान वस्तीनं वेगळी ग्रामपंचायत थाटली. कारभार हाती घेतल्यावर तो कसा हाकायचा, याची तसूभर कल्पना त्यांना येईना. इकडं मोरगावची ग्रामपंचायत थाटात चालू राहिली. त्यांचे नवीन कारभारी उमद्या मनाचे धडाडीचे होते. त्यांनी ग्रामसभा भरवून आवश्यक मंजुर्‍या घेऊन गावचा कारभार अधिकृतरित्या लोकांच्या वतीने बघण्यास सुरुवात केली. त्यांचा कारभार लोकाभिमुख, लोकानुनयी, लोककल्याणकारी असा होता.
त्याउलट चोरगाव. त्यांना इच्छा असूनही ते मोरगावची नक्कल करू शकले नाही. त्यांनी लोकोपयोगी शासनाचे दावे करून देखील त्यांचा कारभार मूठभरांचे पोटं भरणाराच राहिला. त्यातून चोरगाव अस्थिर झालं नि करड्या शिस्तीच्या जवानांच्या हाती त्यांचा कारभार गेला. मधूनअधून मोरगावमधील लोकशाही बघून तिथेही तसे करायचा प्रयत्न झाला. पण करड्या शिस्तीच्या जवानांच्या प्रती तिथल्या प्रजेचा भरोसा जास्त. त्यामुळे लोकशाही राबवली गेली तरी ती दिखाव्यापुरती! तिथल्या सरपंचाला साधा येशीचा पहारेकरी बदलण्याचा अधिकार राहिला नाही. पण त्याचा आव अख्ख्या पंचक्रोशीतल्या ग्रामपंचायतीत वट असल्याचा.
मोरगाव जात्याच शांतताप्रेमी तर चोरगावचा जन्मच वादविवादातून, भांडणातून झालेला. त्यांचा दावा उत्तरेच्या टेकडीवर. अर्थात त्या टेकडीवर गवतही उगवत नाही. पण टेकडीवर डोळा दोन्हीकडच्या क्रशरवाल्यांचा. तिथं उत्तम खडी मिळेल हा त्यांचा दावा. त्यातून वाद इरेला पेटला. चोरगावकडे मनुष्यबळ बेताचे. त्यात जाणकार कुणी नाही, म्हणून त्यांनी लाडावकरची संगत धरलेली. त्याच्या पाठिंब्यावर मोरगावसोबत त्यांचा झगडा चालू.
ह्यादरम्यान मोरगावच्या सरपंचपदी चायवाला डरू बसला. त्याच्यामते त्यानं अख्ख्या गावाला चहा पाजलेला. पण गावची मेमरी कमी! त्यांना काहीही आठवत नाही. तरीही त्यांचा डरूवर अपरंपार विश्वास. त्यांनी एक जुन्या जाणत्या मास्तराला हरवून बोलघेवड्या डरूला सत्ता सोपवलेली. डरूचा एक गुण असा की इलेक्शनच्या हंगामात त्यास कंठ फुटतो नि तो रानोमाळ डराव डराव करत फिरतो. पण लाडावकर वगैरे मंडळीनी लाल डोळे दाखवले की डरू मौनात जातो. त्याच्या हंगामानुसार डराव डराव करण्याच्या आणि भिण्याच्या वृत्तीमुळे शिक्षितजन त्याला डरू म्हणू लागले. तो जितका बोलघेवडा तितकाच खोटारडा. भंपक आणि थापाड्या. अगदी उदाहरणार्थ, तंबाखू मळण्यास कुणाशेजारी तो बसला तरी त्याचं वाक्य येई, ‘काय तुला माहीत आहे? गावात पहिल्यांदा तंबाखू आणली कुणी? तो मीच! मी असा द्राक्षबागेत पान चोळत बसलो असताना भुकटा करण्याची पद्धत शोधली नि तंबाखूचे पान मळून तंबाखू बनवण्याची रेसिपी संबंध जगाला मिळाली, म्हणून मित्रो..!’
तर तिकडे चोरगावात चोरमार्गाने ज्याला राजरस्ता म्हणवतात, त्याने चहाबाज गरीब सरपंच झालेला. मोरगावातला चहा वाहून चोरगावात पोहोचला तर आणि तरच चहाबाजची तल्लफ भागू शकते. हे माहीत असूनही चहाबाज पूर्वसूरींसारखा भांडखोर, चुगलखोर, कागाळ्या करणारा भित्रट बदमाश वृत्तीने वागत असतो. अगदी सत्ता मिळवण्यासाठी देखील त्याने प्रसिद्ध फळीपटूला पोलीस पाटील नशीब फुगीर याच्याकडून पकडून कुठंतरी डांबलं, तेव्हा कुठे सरपंचाची खुर्ची त्याला मिळाली. पण ती टिकवण्यासाठी मोरगावात काही खोड्या केल्या तर लोकांचं लक्ष वळवता येईल, हा विचार करून तो गावातल्या खुनशी पोरांना हाती धरून टेकडावर हाणामार्‍या वा रक्तपात करी.
आता ही चोरगाव आणि मोरगावची पुढारी मंडळी केवळ उसापुरात एकत्र येत. उत्तरेचा लाडावकर त्यांचा बांध बंधू. पण त्यावर दोघांचाही काडीचा विश्वास नाही. विश्वास तसा त्यांचा कुणावरही फार नाहीच. पण उसापूरचा टप्पू तात्या सरपंच झाल्यावर किमान उसापूरच्या परंपरेनुसार आपल्याला वाडगंभर भीक देईल ह्या आशेने चोरगावचा चहाबाज गरीब ओशाळ्या नजरेनं टप्पू तात्याच्या दाराकडं सताड बघत उभा असतो. तर मोरगावच्या डरूची मित्र खदानीला जुन्या चोरीत टप्पू तात्याकडून माफी मिळावी, म्हणून आशाळभूत नजर ढवळ्या महालाकडं लागून असलेली. त्यामुळं दोघांसाठी ढवळा महाल येरुसळेमपेक्षा अधिक पवित्र! मग भले टप्पू तात्या तिथे सार्‍याच पवित्र पशूंचं मांस तूप ओतून का खाईना!
तसा हा उसापूरचा टप्पू तात्या हे भारी प्रकरण! त्याला एकाच वेळी तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या पंचायतींचा सुवर्णकाळ एकाच वेळी आणावयाचे स्वप्न पडलेले. अर्थात पहिल्या टर्मनंतर पडून उठताना ‘पुन्हा उठुया! भरारी घेऊया’ च्या धर्तीवर ‘उसागावला मोठं करू पुन्ह्यांदा!’ घोष देत टप्पू तात्या मस्के पाटलाच्या जिवावर निवडून आलेला. त्याला एकाचवेळी प्लादिमिर ऊतीनपुढं ‘झुकेन, झुकेन!’ची स्वप्न पूर्ण करायचीय, धजा उद्ध्वस्त करायचाय. सगळ्यांचं सगळं मोठं करण्याच्या नादात आणि फंदात त्यांना मस्के पाटलांच्या सल्ल्याने जो आकडा मिळालाय त्यानुसार शेजारपाजारच्या गाववाल्यांनी खरेदी विक्री केली तर ठीक, नाहीतर जकात बसवूचा नारा पण दिलेला. त्यात दुसर्‍या गाववाल्यांना हुडकून गावाबाहेर घालवायला त्यानं सगळ्या पिवळ्या गाड्या लावलेल्या. त्यात त्यानं डरूच्या कुशीची ऊब विसरून मोरगावची लोकं हात बांधून बाहेर घालवलेली. मोरगाव, लाडावकर अश्या सगळ्यांवर दुप्पट तिप्पट जकात लावलेली. उसापुरात शिरणार्‍या गाड्यांच्या त्यामुळं रांगाच रांगा! त्यामुळं उसापुरात जे येई ते महाग! पण टप्पू तात्या मस्के पाटलाच्या पोराचं डायपर बदलण्यात बिझी! तो बघणार कुठं? तर मस्के पाटील जे दिसंल ते विकत घेण्याच्या मूडमध्ये! अश्यात लाडावकर आणि टप्पू तात्याची जुंपलेली. कोण जकात जास्त घेतो त्याबद्दल!
ह्यादरम्यान फुगीरच्या खुनशी टोळक्याने टेकडीवर उभ्या मोरगावकरांवर लपून हल्ला केलेला. त्यानं मोरगावात संताप उमटलेला. तीनेकशे पावलं चालत येत काही जण इतका भयानक हल्ला करतात आणि बोलघेवडा डरू त्यांना पकडू शकत नाही, त्याला त्यांच्या येण्याचा मागमूस लागत नाही. यामुळं सगळं मोरगाव त्याला बोल लावू लागलं. पण त्याचे पंटर ‘थांबा, घरात घुसून मारू’ म्हणत लोकांना शांत करू बघत. त्या दरम्यान डरूचा डावा हात चोरगावात जाणारा पाट अडवायची धमकी देऊन आला. बाकी आपापल्या वकुबानुसार धमक्या देत होते. त्यामुळं दोन्ही गावच्या शिवावर रोज रात्री दोन्ही बाजूची पोरं भिडली. डोकी फुटली. दिसेल त्या गोष्टीचं नुकसान करत सुटली. आणि एक दिवस मोरगावच्या धाडसी पोरांनी उडत्या रॉकेटला फटाक्यांच्या लडी लावून खुनशी कार्ट्यांच्या लपायच्या ठिकाणी फेकली. तिथं मोठी जाळपोळ झाली. त्यामुळं शिवावर दोन्ही बाजूची पोरं भिडली. मोरगावची पोरं चोरगावच्या पोरांना पकडून पकडून झोडपत होती. तोच टप्पू तात्या ‘अय बंद करा रे!’ म्हणत मधी पडला. चायवाला डरू त्यासरशी गाडीत बसून घरी गेला. जिंकत असलेली मोरगावची पोरं हिरमुसून गप्प उलट फिरली. चोरगावची पोरं वाचलो म्हणून गावाकडं धावली, पण गावात शिरताना जिंकून आल्याच्या बढाया मारू लागली. इकडं जिंकत असलेली मोरगावची पोरं माघारी का फिरलो याचं कारण धुंडाळत घर गाठत होती.
ते सगळं यधुळपर्यंत बघणारा म्हातारा काठी टेकत चायवाल्या डरूच्या दारापर्यंत गेला, तर दारात चायशक्कर उभा.
‘पोरा, मधी डरू आहे का?’ म्हातार्‍यानं विचारलं.
‘का करायचंय?’ चायशक्करचा उलट सवाल.
‘त्याला विचारायचंय, जिंकत असताना का थांबला रे बाबा!’ म्हातार्‍यानं सांगितलं.
‘आपुन जिंकलोच ना बाबा! ही काय मिठाई आहे हातात,’ चायशक्कर उसनं हसला.
‘खोटं नको बोलू पोरा! तो टप्पू मधी आला आणि डरूनं ढुंगणाला पाय लावून पळ काढला. वर पोरांना परत फिरायला भाग पाडलं. डरू टप्पूला घाबरत तर नाही ना?’ म्हातारा मुद्द्याला हात घालू लागला.
‘छे, नाही, नाही! टप्पूकडं चहाबाज रडत गेला होता, आपण नाही. त्यानं मध्यस्थी केली, का ब्वॉ एकमेकांकडे बाजारहाट करा. वैर विसरा म्हणून! पण आपुन पाणी अजून अडवलेलंच आहे. सोडलेलं नाही. पोरं अजून पण टेकडीवर दबा धरूनच बसलीय. कुणी हललेलं नाहीय…’ चायशक्करचं थातुरमातुर उत्तर.
‘व्यापार कसला करायचा? आपल्या रक्ताचा का त्याच्या हत्यारांचा? तू विचारायचं की? तू कश्यासाठी आहे इथं? आणि पाणी सोडणार नाही म्हणतो, मग अवसान का सोडलं? का लंगोट सुटला? पोरं हललेली नाहीत आणि हलणार पण नाही. हरलेली नाहीत आणि हरणार पण नाहीत. पण चायवाला डरू का हरला? की डरला, घाबरला?’ म्हातार्‍याच्या प्रश्नाने चायशक्करने पळ काढला.

Previous Post

आता लढाई निवडणुकांची!

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

बाळासाहेबांचे फटकारे...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.