राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेला उत्तर देताना लोकसभा आणि राज्यसभेत मोदींनी देशातील महत्वाच्या ज्वलंत विषयांना फाटा दिला. काँग्रेस किती नालायक हे सांगण्यात त्यांनी धन्यता मानली. कोरोना, गरिबी, महागाई, बेरोजगारी आदींबाबत विरोधकांचा आणि देशातील कोट्यवधी लोकांचा सामना करू शकत नाही, हे मोदींच्या लक्षात येते तेव्हा पंडित नेहरुंनीच माझी मानगूट पकडली आहे हे सांगण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असतो. आता तर देशात कोरोना पसरविण्यास काँग्रेसच किती जबाबदार आहे हे सांगून त्यांनी ‘आ बैल मुझे मार’ करून ठेवले आहे.
– – –
संसदेत सरकारला गंभीर आणि ज्वलंत विषयांवर चर्चा नको. दरवर्षी दोन कोटी तरुणांना नोकर्या मिळणार होत्या, त्यावर लोकांनी जाब विचारायचा नाही. कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकर्यांनी केलेल्या आंदोलनात ७०० शेतकरी शहीद झालेत, परंतु आमच्याकडे याबाबत माहिती नाही असे उद्धट उत्तर द्यायचे. गंगेच्या पात्रात मृतदेह वाहताना जगाने पाहिले. त्यावर ‘अगा असे घडलेच नाही’ असे देशाला सांगणारे निर्लज्ज सरकार विरोधकांनी काय पाप करून ठेवले हे तासन्तास सांगत सुटले आहेत. आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी लोकशाहीचे पवित्र मंदिर असलेल्या संसदेतून विरोधकांबाबत द्वेष-मत्सर पसरविण्याचे काम नियोजनबद्धरित्या सुरू आहे. कोरोनापेक्षाही भयंकर असलेल्या कांगावखोर खोटारडेपणाच्या विषाणूचे सुपरस्प्रेडर आता संसदेपर्यंत पोहचले आहेत, ही देशाच्या भवितव्यासाठी अत्यंत घातक बाब आहे.
गीतकार प्रसून जोशी यांचे ‘सौगंध मुझे इस मिट्टी की…’ हे गीत २०१४मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपचे थीम साँग होते. मोदींचा आवाज असलेले हे गीत जेव्हा कानावर धडकायचे तेव्हा या देशातील तमाम नागरिकांच्या रोमारोमात राष्ट्रभावना जागी व्हायची. नरेंद्र मोदी हेच सर्वोत्तम पंतप्रधान होऊ शकतात असे देशाचे मत बनवले या गीताने. ‘मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं बिकने दूंगा’ या ओळी मोदींची विश्वासार्हता वाढविणार्या ठरल्या. काँग्रेस भ्रष्टाचारात लडबडली असल्याचे चित्र मोदींनी उभे केले. या बेछूट आरोपांमुळे काँग्रेसही इतकी हताश झाली की त्यांनी निवडणुकी आधीच तलवार म्यान केली होती. मोदीनामाचा गजर भारतातच नव्हे, तर जगभर करण्यात आला. मोदी सत्तेत येऊन आता आठ वर्षे होतील. कोट्यवधी रोजगारांपासून प्रत्येक कुटुंबाला २०२२पर्यंत पक्के घर देण्यापर्यंत आणि स्मार्ट सिटीपासून मेक इन इंडियापर्यंत शंभर घोषणांची यादी असावी. यातील किती गोष्टी पूर्ण झाल्यात? रोजगारांपासून तर शिक्षणापर्यंत सर्वच गोष्टींची ‘वाट’ लावण्याचे श्रेय मोदी सरकारच्या खात्यात जमा आहे. शिकलेल्यांना नोकर्या नाहीत. ज्यांच्या होत्या त्या मंदीमुळे गेल्यात. छोटे उद्योग बंद पडले. अधिकाराबाबत आवाज उठवला तर विद्यार्थ्यांचे डोके फोडले जाते, असे चित्र आहे. मोदींच्या विरोधात भाष्य केले तर तो राष्ट्रद्रोह ठरतो.
२०२०मध्ये महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीच्या दिवशी जामिया मिलिया विद्यापीठ परिसरातून शांती मार्च काढणार्या विद्यार्थ्यांवर गोळी झाडण्याची हिंमत पुन्हा एका माथेफिरूची होते. लगेच दोन दिवसांनी शाहीनबागमध्ये तळ ठोकून बसलेल्या आंदोलकांवर दुसरा तरूण गोळ्या झाडून मी ‘मर्द हिंदू’ असल्याचे भासवतो. जामियाच्या विद्यार्थ्यांवर गोळीबार करतो त्या राष्ट्रभक्ताचा आम्ही सत्कार करू असे एक संघटना जाहीर करते. कोरोना विषाणूपेक्षाही घातक असा हा ‘नथुराम विषाणू’ डोक्यात सोडण्यात आल्यामुळे भक्तांची विवेकाची दारे बंद झाली आहेत. देशातील कोट्यवधी लोकांचे जगण्याचे महत्वाचे विषय दुर्लक्षित करून आपले अपयश झाकोळण्यासाठी हिंदू-मुसलमान अशा द्वेषाच्या भिंती उभ्या करण्यात ज्यांची प्राथमिकता असते त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा तरी कशी करायची? यापुढे या विषाणूची कीड अधिक पसरलेली दिसेल.
काँग्रेस सरकारने उभारलेले अनेक प्रकल्प व योजना बंद पाडल्याबाबत मोदी सरकारच्या विरोधात ‘ब्र’ काढला तरीही हे ‘नथुराम विषाणू’ डोके वर काढून लोकांना देशद्रोही ठरवत असतात. ‘मैं देश नहीं बिकने दूंगा’ म्हणणार्या मोदींनी एअर इंडिया, रेल्वे, एलआयसी, बीएसएनएल आदी कितीतरी उपक्रम संपविण्याचा धडाका सुरू केला आहे. बीएसएनएलच्या लाखभर कर्मचार्यांना सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात आली आहे. बीएसएनएलची देशभरातील संपत्ती विकली जात आहे. १९७४नंतर देशातील गरीबांची संख्या पहिल्यांदा सर्वाधिक वाढली आहे. दिवसाला दीडशे रुपयेही कमावू शकत नाहीत अशांची संख्या वर्षभरात सहा कोटींनी वाढली आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात विकासदर जितका होता तितकाच या सरकारच्या काळात तो ‘उणे’ गेला आहे. हे या सरकारचे महान यश?
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेला उत्तर देताना लोकसभा आणि राज्यसभेत मोदींनी देशातील महत्वाच्या ज्वलंत विषयांना फाटा दिला. काँग्रेस किती नालायक हे सांगण्यात त्यांनी धन्यता मानली. कोरोना, गरिबी, महागाई, बेरोजगारी आदींबाबत विरोधकांचा आणि देशातील कोट्यवधी लोकांचा सामना करू शकत नाही, हे मोदींच्या लक्षात येते तेव्हा पंडित नेहरुंनीच माझी मानगूट पकडली आहे हे सांगण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असतो. आता तर देशात कोरोना पसरविण्यास काँग्रेसच किती जबाबदार आहे हे सांगून त्यांनी ‘आ बैल मुझे मार’ करून ठेवले आहे. महाराष्ट्र सरकारने रेल्वे सुरू करून उत्तर प्रदेश आणि बिहारातील लोकांना अक्षरश: पिटाळून लावले आणि कोरोना देशभर पसरला, या त्यांच्या वक्तव्याचा देशानेच समाचार घेतला. लोकांनी शोधून शोधून जुने व्हिडीओ आणि ट्विट सोशल मीडियावर टाकले. तत्कालीन रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी गाड्या सोडण्यासंदर्भातील वेळोवेळी केलेले ट्विट लोकांनी जगाला दाखवले. यासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आदींनी लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार ‘आहे त्या ठिकाणीच थांबा’ असे आवाहन मजूर, कष्टकर्यांना केले होते. त्याचेही व्हिडीओ लोकांनी हुडकून काढले. मोदींची लोकसभेतील माहिती सत्यापासून दूर असल्याची चिरफाड करण्यात आली.
मोदींनी अचानकपणे घोषित केलेल्या टाळेबंदीने किती हाहा:कार उडाला होता. ते दिवस आठवले तरी अंगाचा थरकाप उडतो. केवळ चार तासांची वेळ देऊन सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करणारे मोदी मजुरांना सुरक्षित ठिकाणी पोहचवू शकले नाहीत. एक प्रसंग आठवतो… अहमदाबादहून बिहारच्या कटिहारला निघालेल्या श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये अर्चना बाळासह बसली होती. मुझफ्फरपूरला पोहोचण्याआधीच तिचा मृत्यू झाला. उपासमार आणि तीव्र उष्णतेने तिचा बळी गेला. ती मृत झाल्याचे लक्षात आल्यावर तिचा देह एका स्टेशनवर उतरविण्यात आला होता. तिचा दीड-दोन वर्षाचा मुलगा आईच्या अंगावरचे पांघरूण ओढतो. लगेच तिच्यापासून दूर जातो, परत येतो. आईसोबतचा त्याचा हा लपंडाव नित्याचा असावा बहुतेक; परंतु यावेळी आई त्याला नेहमीसारखा प्रतिसाद देत नाही. आपल्याला ती अंगाखांद्यावर का खेळवत नसेल, नेहमीसारखी अलगद उचलून लाडिक चुंबन का घेत नसेल, डोक्यावरून मायेचा हात का फिरवत नसेल, रडायला लागल्यावर भूक लागली असे समजून तोंडात बिस्कीट कोंबणारी, पाणी देणारी, उपलब्ध असेल ते ममतेने खाऊ घालणारी आपली आई अशी स्तब्ध का? या गोष्टी मनात येण्यासाठी त्या निरागस जिवाचे वय तरी कुठे होते. त्या बाळाचे हे सर्व अधिकारच देशातल्या क्रूर प्रशासनाने हिरावून घेतले होते. अमानवीयतेचा कळस गाठलेल्या त्या टाळेबंदीने अर्चनाचा बळी घेतला असे म्हणावे लागेल.
रेल्वेगाडीत प्राण सोडणारी अर्चना एकमेव नाही. अन्वर काझी, दया बक्श अशा जवळपास शेकडो प्रवाशांनी रेल्वेमध्ये अंतिम श्वास घेतला आहे. ज्या रेल्वेगाडीमध्ये अर्चना मरण पावली त्याच गाडीत अडीच वर्षांचे अन्य एक बालकही मरण पावल्याचे वृत्त होते. मुंबईहून बनारसला पोहोचलेल्या रेल्वे गाड्यांतून दोन श्रमिकांचे मृतदेह काढण्यात आले होते. नागपूरहून निघालेल्या गाडीमध्ये एकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. तिकिटांसाठी तासनतास उभ्या राहून मृत्यूला जवळ केलेल्या विद्योत्मा शुक्ला या एकट्याच नाहीत.
मोदीजी, याला जबाबदार कोण? काँग्रेस की तुम्ही?
मोदीजी, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. (केंद्राच्या अखत्यारीत रेल्वे प्रशासन असताना) महाराष्ट्राने रेल्वेगाड्या सोडल्याचे सांगून गंभीर विषयाला अनुचित विनोदाची झालर दिलीत. परंतु तत्कालीन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ५० लाख श्रमिकांना सन्मानाने त्यांच्या राज्यात पोहोचविण्यात आल्याची माहिती ट्विटरवर दिली होती. तुमची ही स्पेशल गाडी किती ‘स्पेशल’ होती हे देशाने पाहिले. जी गाडी २५ ते ३० तासांत पोहोचायला पाहिजे त्या गाड्यांना ८० ते ९० तास लागत होते. भर उन्हात ८-१० तास गाड्या वाटेत उभ्या केल्या जात होत्या. शेकडो गाड्या मार्गावरून भटकल्या.
ट्रॅफिकमुळे गाड्या अन्य मार्गांवरून वळविण्यात आल्यात, हा तुमच्याच सरकारचा खुलासा होता. दररोज १२ ते १३ हजार गाड्या चालवणार्या रेल्वेने अशी भटकंती केल्याची उदाहरणे नगण्य असतील. श्रमिकांच्या मोजक्या गाड्यांना रेल्वे प्रशासन हाताळू शकले नव्हते. दुप्पटीपेक्षा अधिक वेळ घेत असल्याने श्रमिकांसाठी जेवणाची व्यवस्था नव्हती. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. त्यांची शुश्रूषा करायला डॉक्टर नव्हते आणि वरून भाजपचे सरकार नसलेल्या राज्यात सहकार्य मिळत नसल्याचा कांगावा करण्यात सरकार मागे नव्हते.
टाळ्या, थाळ्या वाजवा आणि ‘मालवून टाक दीप’ असे सांगत घराबाहेर दिवे उजाळणीचे विदेशी इव्हेंट इथे करण्यात आले. भक्तांनी तर कहरच केला. मोदी किती अंतर्ज्ञानी आहेत अशा सोशल मीडियावर पोस्ट टाकत आता कोरोना भारतातून कायमचा निघून जाईल असे अकलेचे तारे चमकवले. टाळेबंदीची सक्ती असतांनाही ढोलताशे बडवत आणि आगीचे टेंभे घेऊन मिरवणुकी काढण्यात हौशी ‘कलाकार’ मागे नव्हते.
चीनच्या वुहानमध्ये डिसेंबरमध्येच कोरोनाची लागण झाली. सात जानेवारी २०२०ला पहिला बळी गेला. हा विषाणू अत्यंत जलद गतीने पसरतो आहे याबाबत भारताला जाणीव नव्हती असे नाही. वुहान ते भारताचे अंतर साडेतीन हजार किलोमीटर आहे. हा विषाणू हवेतून पसरत नसला तरी भारत आणि चीनचे व्यापारी संबंध लक्षात घेता भारत सरकारच्या देखरेख समितीची बैठक आठ जानेवारीला पार पडली. या बैठकीचे सार्थक काय झाले ते गुलदस्त्यात आहे. कोरोनावर मोदी सरकार का गाफील होते? तब्बल अडीच महिने कोरोन्ाावर सरकार दरबारी केवळ कृतीशून्य चर्चा झाली. चीननंतर अनेक देशात कोरोना झपाट्याने पसरत होता, तेव्हा सरकार वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये व्यस्त होती. लाखो लोक विदेशातून भारतात येत गेलेत. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचारकी भारत दौरा या बाबी सरकारच्या डोक्यावर होत्या. अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू असतानाच कोरोनाने भारताची मानगुट पकडली. पंतप्रधान मोदींना मात्र इकडे राजकीय लालसा खुणावत होती. मध्य प्रदेशातील सरकार पाडून, घराणेशाहीला उत्तेजन देऊन भाजपचे सरकार बनवणे त्यांना लोकांच्या जिवापेक्षा महत्वाचे वाटले. स्वत:ला महाराजे म्हणवणार्या ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही लोकांच्या जिवापेक्षा स्वत:च्या पुनर्वसनाला महत्व दिले.
केंद्र सरकार निष्क्रीय बसले म्हणून महाराष्ट्र, दिल्ली, केरळ आदी राज्यातील मुख्यमंत्र्यांनी स्वत:च पुढाकार घेत नियोजन केले. राहुल गांधी कोरोनाची देशात त्सुनामी येईल असे सुरुवातीपासून सांगत होते. परंतु सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. विरोधकांना जराही दाद द्यायची नाही आणि नैसर्गिक आपत्ती येते तेव्हाही त्यांच्याशी विचारविमर्श करायचा नाही हा मोदी सरकारचा स्वभाव असल्याने त्यातही आता नावीन्य उरले नाही.
‘मनरेगा’स्त्र उलटले!
स्वत:ची रेष मोठी करण्याची सोडून काँग्रेसला किती तुच्छ लेखता येईल यातच मोदींचं सगळं कौशल्य कुंठित झालं आहे. परंतु ही बाब त्यांच्याच अंगावर नेहमी उलटते. मनरेगाबाबतही असेच झाले. २७ फेब्रुवारी २०१५ रोजी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला अनुमोदन देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन मिनिटे मनरेगावर बोलले. केवळ बोललेच नाही तर काँग्रेसला वाईट पद्धतीने झोडलेही. केवळ ४४ सदस्य असलेल्या काँग्रेसवर मोदी तुटून पडलेत, या आनंदात भाजपच्या सदस्यांनी जोरदार बाके वाजवली. प्रचंड हास्यकल्लोळ झाला. मोदींच्या चेहर्यावरचा आसुरी आनंद ओसंडून वाहत होता. विरोधी बाकावर बसलेल्या काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव, काँग्रेसचे लोकसभा नेते मल्लिकार्जुन खरगे जराही विचलित न होता मोदींचे भाषण ऐकत होते. मोदींचे मनरेगावर आकलन शब्दश: पुढीलप्रमाणे होते, ‘मेरी राजनीतिक सूझबूझ कहती है कि मनरेगा कभी बंद मत करो, मैं ऐसी गलती नहीं कर सकता हूं. क्योंकि मनरेगा आपकी विफलताओं का जीता जागता स्मारक है. आजादी के ६० साल के बाद आपको लोगों को गड्ढे खोदने के लिए भेजना पड़ा, यह आपकी विफलताओं का स्मारक है और मैं गाजे-बाजे के साथ इस स्मारक का ढोल पीटता रहूंगा. दुनिया को बताऊंगा कि ये… ये गड्ढे जो तुम खोद रहे हो ये उन ६० साल के पापों का परिणाम है. मनरेगा रहेगा, आन बान शान के साथ रहेगा और गाजे-बाजे के साथ दुनिया में बताया जाएगा… लोगों को पता चले भाई… ये ऐसे-ऐसे खंडहर करके कौन गया है?’ दिवस कसे पालटतात बघा. त्यावेळी मनरेगाची जी खिल्ली उडवण्यात आली त्याच मनरेगापुढे साष्टांग दंडवत घालायची वेळ मोदींवर आली आहे. मोदींच्या काळात लाखो लोकांना मनरेगांच्या कामावर खड्डे खोदायला पाठविण्याशिवाय पर्याय उरला नाही. टाळेबंदीमुळे देशातील कोट्यवधी लोकांचा रोजगार गेला आहे. त्यात ९० टक्के लोक हे असंघटित क्षेत्रातील आहेत. देशातील दोन कोटींवर लघुउद्योग बंद पडलेत. अनेक ठिकाणी शिक्षकही मनरेगाच्या कामावर गेल्याच्या नोंदी आहेत.
मोदी आक्रमक का झालेत?
मोदींचे दोन्ही सभागृहात भाषण होण्याआधीचे लोकसभेत राहुल गांधींचे भाषण जरूर ऐका. राहुल गांधींनी सरकारपुढे अनेक चांगल्या गोष्टी मांडल्यात. त्यांच्या भाषणात गरिबी होती, बेरोजगारी, महागाई, सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग होते. भांडवलशाही, अर्थव्यवस्था आणि कृषी क्षेत्र या सगळ्यांची वस्तुस्थिती मांडण्यात आली होती आणि सरकारने काय करायला हवे याकडे लक्ष वेधले होते. राहुल गांधींचे भाषण हे टीव्ही चॅनलसाठी प्राइम टाईमवर चर्चेचा विषय झाले. त्यावर मंथन व्हायला लागले. राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या मुद्दयांवर मोदींना उत्तर देता आले असते. त्यांनी केलेल्या सूचनांचा आदर केला असता तर ५६ इंचामध्ये अजून थोडी भर पडली असती. परंतु तसे झाले नाही. काँग्रेस संपवायला निघालेल्या मोदींनी संपूर्ण वेळ काँग्रेसला लक्ष्य करून काँग्रेसचेच महत्व वाढवले आहे. त्यांच्या भाषणाचा केंद्रबिंदू काँग्रेस-नेहरू हा होता. जर काँग्रेस नसती तर भारतातील लोकशाही कुटुंबवादापासून मुक्त झाली असती आणि भारताने परदेशी संकल्पनांऐवजी स्वदेशी संकल्पांचा मार्ग अवलंबला असता. काँग्रेस नसती तर आणीबाणीचा कलंक लागला नसता. काँग्रेस नसती तर जातीवाद बोकाळला नसता. शिखांची कत्तल झाली नसती. काँग्रेस नसती तर तंदूरमध्ये मुली जाळण्याच्या घटना घडल्या नसत्या. मोदींच्या जर तरच्या या भाषणाने देशातील आजचे प्रश्न सुटणारे नाहीत. त्यामुळे कोरोनाची स्थिती हाताळण्यात निष्क्रियतेचा कलंक धुवून निघणार नाही. गंगेतील प्रेते यांचा पिच्छा करण्याचे थांबवणार नाहीत. उन्नाव, हाथरसमध्ये कोण सहभागी होते? लखीमपूरला शेतकर्यांना कोणी चिरडले?, दर वर्षी दोन कोटी रोजगाराचे स्वप्न दाखवून असलेल्या नोकर्या कोणी घालवल्यात? महागाईसाठी जंतरमंतरवर धरणे देणारे सरकार हजार रुपयांचे गॅस सिलिंडर कसे विकते? ११० रुपये लिटरचे पेट्रोल आणि डिझेल कोण विकते? धर्माचे राजकारण कोण करीत असते? आदी कितीतरी प्रश्नांपासून मोदी सरकार कधीही सुटू शकत नाही. लोकांना याच प्रश्नांची उत्तरे हवीत. लोकांना सरकारकडून अन्न, वस्त्र, निवारा हवाय. सन्मानाने जगण्यासाठी रोजगार हवा. जातीधर्मांतील भेद नको, भगवा-हिरवा यात युद्ध नको आणि नथुराम गोडसेचा खोटारडेपणाचा विषाणू तर नकोच नको.