• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मूल्याधिष्ठित आदर्श उद्योजक

- संतोष देशपांडे (देशकाल)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
February 19, 2022
in देशकाल
0

विमानाने, कारमधून आणि रेल्वेने प्रवास न केलेले बरेचजण असतील पण बजाजच्या स्कूटर आणि रिक्षाने प्रवास केला नाही, असा माणूस या भारतात एकही सापडणार नाही. गेल्या ५० वर्षात या देशातील कोट्यवधी लोकांना रिक्षा नावाचे किफायतशीर सार्वजनिक वाहन उपलब्ध करून देणारे, सामान्यांना परवडेल अशी दुचाकी निर्माण करून देणारे उद्योगमहर्षी राहुल बजाज १२ फेब्रुवारीला, वयाच्या ८३व्या वर्षी पंचत्वात विलीन झाले. भारताला महागडी कार नको तर सर्वसामान्यांना परवडेल अशी रिक्षा, दुचाकी हवी ही मूलभूत गरज ओळखून स्थापन झालेल्या बजाज उद्योगसमूहाला त्यांनी हिमालयाच्या उंचीला नेऊन ठेवले. या देशात कर्तृत्वान उद्योगपती बरेच होऊन गेले आहेत, परंतु, ‘उद्योगपितामह’ म्हणावेत अशा मोजक्या महान व्यक्तींच्या पंक्तीत बसणारे नाव म्हणजे राहुल बजाज. भारतासारख्या गरीब आणि प्रचंड लोकसंख्येच्या देशात मूल्याधिष्ठित आदर्श उद्योजक कसा असावा याचा परिपाठ स्वतःच्या कृतीतून घालून देणारे राहुल बजाज एक दीपस्तंभ होते. लतादीदींच्या जाण्याचे दु:खाश्रू हा देश पुसत असताना राहुल बजाज यांनादेखील देवाज्ञा झाली आणि कलाक्षेत्रासोबत उद्योगजगत देखील पोरके झाले… दोघेही आपल्या महाराष्ट्राचे असल्याने महाराष्ट्राच्या दुःखाला तर आज अंतच उरलेला नाही.
१९६५ला हार्वर्ड या नामांकित विद्यापीठातून एमबीएची पदवी घेऊन आल्यावर देशात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना राहुल बजाज यांनी वयाच्या २७व्या वर्षी बजाज समूहाचा कारभार हातात घेतला. तेव्हा समूहाची उलाढाल होती फक्त ७.५ कोटी. आज हा समूह ८.५ लाख कोटीचे भांडवली मूल्य असणारा देशातील एक अग्रणी उद्योगसमूह आहे. राहुल बजाज हे निव्वळ या अचंबित करणार्‍या आर्थिक यशामुळे तर ‘उद्योगपितामह’ होतेच पण त्याव्यतिरिक्त देखील त्यांचे मोठेपण निर्विवाद होते. ज्या काळात मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत असली घोषणा आलेली नव्हती, निर्यात करण्याचा आत्मविश्वास फारसा दिसत नव्हता, विदेशी चलनाचा सतत तुटवडा असल्याने अनेक बंधने होती. त्याकाळी म्हणजे १९७० साली ‘माझ्या कारखान्यात बनवलेली स्कुटर अमेरिकेतील बाजारपेठेत देखील विकली जाईल, कारण तिच्या गुणवत्तेचा दर्जा सर्वोच्च असून ती परदेशात देखील मी नक्की विकणार’, असा ठाम निर्धार राहुल बजाज यांनी केला. त्यासाठी धोका पत्करत मोठा खर्च करून अमेरिकेतल्या टाइम्स मॅगझिनच्या मागच्या पानावर भारतीय बनावटीच्या या दुचाकीची त्यांनी प्रचंड जाहिरात केली. त्यानंतर ती अभूतपूर्व स्कूटर अमेरिकेलाच नव्हे, तर ७० देशांना सतत ३३ वर्षे विकणारे राहुल बजाज उद्योग जगतातील पराक्रमी भीष्म पितामह होते. त्या स्कूटरमुळेच तर ‘मेड इन इंडिया’ जगाला माहित झाले. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशीच ही घटना आणि त्याहून अभिमान वाटावे असे दिले गेलेले त्या स्कुटरचे नाव… ‘चेतक’… अखेरच्या श्वासापर्यंत धन्याला साथ देणार्‍या महाराणा प्रताप यांच्या घोड्याचे ‘चेतक’ हे नाव स्वतःच्या उत्पादनाला देण्यापेक्षा मोठा जाज्वल्य देशाभिमान काय असू शकतो? बजाज चेतक बाजारपेठेत एका ध्रुवतारा बनून ही ३३ वर्षे चमकत राहिली. राहुल बजाजना एम क्लास मर्सिडीझसारखी आलिशान गाडी बनवावी का वाटली नसेल? त्यांना ते शक्य देखील होते. पण त्यांनी त्याऐवजी एम क्लास दुचाकी बनवली. बजाज एम ५० आणि एम ८० या मोपेड ग्रामीण भारताला एक दिलासा होता. अत्यंत किफायतशीर आणि भरपूर मायलेज देणारी, मोठी चाके असणारी, खास ग्रामीण भागातील रस्त्यावर धावू शकणारी, सामान्य लोकांसाठी बनवलेली ती एक मोपेड घरातील दोन दोन पिढ्यांनी वापरली होती. दुधाचे कॅन एम८०ला लावून जाणारा शेतकरी बाप कोणी विसरेल का?
पियाजियो या इटालियन कंपनीने १९९१ साली मोनोकॉक तंत्रज्ञान वापरलेली अत्याधुनिक आकर्षक रिक्षा बनवली. तिचा जगभर बराच गाजावाजा झाला. राहुल बजाज अशी रिक्षा का बनवत नाहीत असा प्रश्न त्यांना पत्रकार गौतम सेन यांनी विचारला असता त्यांनी उत्तर दिले होते की ग्राहकांना विनाकारण वस्तू महाग करून विकणे बजाज समूहाच्या तत्त्वात बसत नाही. रिक्षा महाग तर मग तिचा प्रवास पण महाग याची जाणीव ठेवून उत्पादने बनवणे हे राहुल बजाज यांचे द्रष्टेपण नाही का? प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात राहून राष्ट्रसेवा करावी हे गांधीचे तत्व राहुल बजाज आपल्या उद्योगसमूहात कायम सांभाळत आले. त्यांची आजघडीला सर्वात यशस्वी असणारी बजाज फायनान्स ही कंपनी कोणाला हजारो कोटींचे कर्ज देण्याएवजी सामान्यजनांना टीव्ही, मोबाइल, फ्रीज, दुचाकी घेण्यासाठी कर्ज का देते याचा विचार केला तर राहुल बजाज कोणासाठी व्यवसायात होते ते कळते. बजाजच्या रिक्षाने कोट्यवधी लोकांना स्वयंरोजगार मिळवून दिला. आज देखील सर्वसामान्य जनतेच्या खिशाला रिक्षाच परवडते. खेडोपाडी लोकांना दाटीवाटीने बसत का होईना, पण कमीत कमी पैशांत रिक्षामुळेच जा ये करता येते. बजाज उद्योगसमूहाने महिलांसाठी दागिने न बनवता निर्लेप या नावाने सुप्रसिद्ध नॉनस्टिक भांडी बनवली हे देखील लक्षात घ्यायला हवे.
थोडक्यात, राहुल बजाज यांनी भारताला बाजारपेठ न समजता एक विशाल कुटुंब समजले आणि त्या कुटुंबाच्या खर्‍या गरजा ओळखून तशी उत्पादने बनवली. त्यामुळेच तर प्रत्येकाला त्यांचा उद्योगसमूह हा ‘हमारा बजाज’ वाटतो. बरेचदा जाहिरातीत अतिशयोक्ती असते पण ‘हमारा बजाज’ या जाहिरातीत त्या समूहाची भारताबद्दल आपुलकी झळकली आहे त्यात अतिशयोक्ती नाही.
राहुल बजाज यांनी उद्योगसमूहाबरोबरच त्या घराण्याचा मूल्यांचा वारसा देखील जोपासला. आजोबा जमनालाल बजाज आणि वडील कमलनयन बजाज दोघेही गांधीजींचे अनुयायी. प्रचंड संपत्ती पायाशी लोळण घेत असताना देखील बजाज घराण्याने राष्ट्रकार्यासाठी वाहून घेतलेले होते. भानगडी करून तुरूंगात जाणारे आजचे पैसेवाले बघितले तर बजाज घराण्यातील लोक देशासाठी तुरूंगात गेले होते, यावर आज विश्वास बसणार नाही. मोठाले उद्योग उभा करणे हे काही येरागबाळ्याचे काम नसते आणि ते क्वचितच एखाद्याला चांगल्या प्रकारे जमते हे गांधीजी ओळखून होते, त्यामुळेच त्यांना उद्योजकांविषयी आदर होता व ते त्यांना राष्ट्रनिर्माणासाठीचे खरे शिलेदार समजत. उद्योगपतींनी संपत्ती मिळवावी पण तिचा विनियोग विश्वस्त बनून समाजासाठी करावा या गांधीजींच्या धोरणावर आजपर्यंत राहुल बजाज यांनी घराण्याची वाटचाल सुरू ठेवली.
जमनालाल बजाज यांनी १९३८ साली काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून गांधीजींच्या इच्छेविरुद्ध माघार घेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे समर्थन केले. अशा निर्भीड त्यागमूर्तीचा वारसा त्यांच्या नातवाला आला होता. २०१९ला मोठ्या उद्योगपतींच्या एका सभेत राहुल बजाज यांनी स्वतः जमनालाल यांचेच वारस असल्याचे दाखवून दिले. त्या सभेत मोदी सरकारच्या ताकदवान गृहमंत्र्यांवर राहुल बजाज गरजले होते. देशातील एकजात सारे उद्योजक मोदी सरकारची जी हुजुरी करत असताना राहुल बजाज यांनी मात्र मोदी सरकारला खडे बोल सुनावले, ‘तुमचे सरकार लोकांचे ऐकत नाही आणि बापूंवर गोळ्या घालणार्‍या नथुरामचे उदात्तीकरण झाले तरी शांत बसते, माजी अर्थमंत्र्याला गुन्हा न नोंदवता शंभर दिवस तुरुंगात डांबले जाते. या बोलण्याने माझ्या उद्योगावर सरकारची नाराजी होऊ शकते, पण प्रस्थापितांविरुद्ध मी कायमच आवाज उठवला होता आणि पुढे देखील उठवत राहीन.’ राहुल बजाज गरजल्यानंतर लगेच माजी अर्थमंत्री पी. चिदंमबरम यांची सुटका झाली हा काही योगायोग नसणार.
जमनालाल बजाज फाऊंडेशनसारख्या सामाजिक संस्था, विविध शैक्षणिक संस्था राहुल बजाज यांच्या समाजाभिमुख व्यक्तिमत्वाची साक्ष देत आहेत. निर्भीडता, सचोटी, अनुकंपा, उद्योजकता, महत्वाकांक्षा या सद्गुणांना एक जे मानवी नाव देखील होते ते म्हणजे राहुल बजाज. नावात काय आहे असे शेक्सपिअर म्हणाला होता, पण काही नावे शेक्सपिअरचे अजरामर वाक्य खोटे ठरवतात, कारण त्या नावात प्रचंड सामर्थ्य असते, त्या नावातून आशेचे किरण रंजल्यागांजल्यांचे जीवन प्रकाशमान करत असतात, त्या नावात नवीन पिढीला दिशा दाखवण्याची क्षमता असते. भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या नेत्याने बजाज यांना त्यांचे ‘राहुल’ हे नाव दिले होते, ही गोष्ट स्वतः राहुल बजाज यांनीच एका मुलाखतीत शेखर गुप्ता यांना बडेजाव न करता सांगितली होती. पंडितजींनी स्वतःच्या नातवासाठी राखून ठेवलेले नाव बजाज यांना दिल्याने इंदिराजींना आपल्या मुलांची नावे राजीव आणि संजीव अशी ठेवावी लागली होती. पंडितजींच्या या मोठेपणाची परतफेड म्हणून मग राहुल बजाज यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे इंदिराजींच्या मुलांवरून राजीव आणि संजीव अशी ठेवली. इंदिराजींनी मग नातवाचे नाव बजाज यांच्यासारखेच राहुल ठेवले नसते तर नवलच. रक्ताच्या नात्यापलीकडले नाते, मग ते नेहरू-गांधी घराण्यासोबत असेल, ग्राहकांसोबत असेल, उद्योगसमूहातील साठ हजार कर्मचार्‍यांसोबतचे असेल, सामाजिक दायित्वाचे, संस्थांचे विश्वस्त म्हणून असेल; ते प्रत्येक नाते प्रामाणिकपणे आणि मनापासून जपणारे राहुल बजाज आज आपल्यात नाहीत पण नव्या पिढीतल्या राजीव, संजीव आणि इतर सर्वांनीच उद्योगाला संपत्ती अथवा सत्ता मिळवण्याचे साधन न समजता राष्ट्रनिर्माणाचे साधन समजून वाटचाल करणे हीच राहुल बजाज यांना खरीखुरी श्रद्धांजली ठरेल.

Previous Post

खोटारडेपणाच्या विषाणूचे सुपरस्प्रेडर!

Next Post

कितीही रेटून बोला, खोटं ते खोटंच!

Next Post

कितीही रेटून बोला, खोटं ते खोटंच!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.