इतरांच्या नादी न लागता अस्पृश्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकारायला हवं, अशी मांडणी प्रबोधनकारांनी त्या काळात केली. त्यातून त्यांचं द्रष्टेपण उजळून येतंच. पण त्याही पुढे जात अस्पृश्यांच्या भल्यासाठी स्वतःचं स्थैर्य उधळून लावायलाही त्यांनी मागेपुढे पाहिलं नाही.
– – –
अस्पृश्यांनो, स्पृश्यांपासून सावध रहा हा लेख प्रसिद्ध झाला आणि सातार्याच्या राजकारणात एकच गदारोळ झाला. कारण सातार्यात प्रबोधनकारांच्या शब्दाला फार वजन होतं. विशेषतः अस्पृश्यांमध्ये तर खास. त्यांनीच अस्पृश्यांना बाकीच्या ब्राह्मणेतरांच्या नेतृत्वावर अवलंबून न राहण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे सातार्याच्या निवडणुकीतल्या तिन्ही ब्राह्मणेतर उमेदवारांना धक्का बसला. कारण त्यांना अस्पृश्यांच्या मतांचा फायदा होणार होता. लेख प्रसिद्ध होताच धनजीशेठ कूपर, भास्करराव जाधव आणि ए. व्ही. आचरेकर असे तिन्ही उमेदवार धावत छापखान्यात भेटायला आहे. अहो, ही काय भानगड करून ठेवलीत, असं रागारागाने सांगत आले. पण तोवर धनुष्यातून बाण सुटला होता.
ब्राह्मणेतर चळवळीचं महत्त्व माहीत असताना आणि स्वतः भिक्षुकशाहीच्या विरोधात रान उठवलं असताना, प्रबोधनकार अस्पृश्यांचं नुकसान कुठेच होऊ नये, यासाठी कायम जागृत असलेले दिसतात. शेवटच्या माणसाच्या विकासातच समग्र समाजाचा विकास असल्याचा त्यांचा दृष्टिकोन त्यांच्या लिखाणातून कायम दिसून येतो. त्यामुळे अस्पृश्यांचं हित हे त्यांच्या विचारांच्या केंद्रस्थानी असणं, स्वाभाविकच म्हणायला हवं. या मानसिक जडणघडणीचं श्रेय त्यांनी त्यांच्यावर घरातून झालेल्या संस्कारांना दिलंय. ते लिहितात, वयाच्या आठव्या वर्षापासून अस्पृश्यतेला थोतांड मानण्याची शिकवण मला माझ्या आजीने दिलेली. तेव्हापासून या क्षणापर्यंत अस्पृश्यांच्या उठावाची संधी सापडेल तेथे मी यथामति, यथाशक्ती प्रयत्न करीत आलेला. त्यांना कामापुरते मामा बनविण्याची बामणेतरी हातोटी मला साफ नापसंत होती. या वाक्यातलं या क्षणापर्यंत म्हणजे आयुष्याच्या उतारवयात आत्मचरित्र माझी जीवनगाथा लिहेपर्यंत आहे, हे लक्षात ठेवायला हवं.
प्रबोधनकार हे फक्त बोलके सुधारक नव्हते तर कर्ते सुधारक होते. त्यामुळे त्यांनी फक्त अस्पृश्यता विध्वंसनाचा विचारच मांडला नाही, तर ‘प्रबोधन’च्या छापखान्यात ते घडवूनही आणलं होतं. ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप या अस्पृश्य मानल्या जाणार्या महार जातीमधून आलेल्या उच्चशिक्षित तरूणाला त्यांनी छापखान्याचं मॅनेजर नेमलं होतं. प्रबोधनकार त्यांची ओळख `उरूण – इस्लामपूरचे माजी महार कौन्सिलर अशी सांगतात. पण ती ओळख तेवढ्यापुरती मर्यादित नव्हती. प्रबोधनकारांनीच कर्मवीर भाऊराव पाटलांचं आत्मचरित्र लिहिताना कर्मवीरांनी उरूण येथील शाळेत उंबरठ्याबाहेर बसून शिकणार्या अस्पृश्य मुलाला उचलून कोल्हापूरच्या क्लार्क हॉस्टेलमध्ये नेलं आणि त्याला पुढचं शिक्षण दिलं, या घटनेचं दमदार शैलीत वर्णन केलंय. तो मुलगा म्हणजे ज्ञानदेव घोलप. छत्रपती शाहू महाराज, राजर्षि विठ्ठल रामजी शिंदे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरूषांचा सहवास त्यांना लाभला. पुणे आणि मुंबईत त्यांनी उच्चशिक्षण पूर्ण केलं. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीत नोकरी करत केलेल्या अभ्यासाच्या बळावर ते अस्पृश्यतेच्या प्रश्नावर विद्वत्तापूर्ण मांडणी करू लागले. त्यामुळे प्रभावित होऊन बाबासाहेबांनी मूकनायक या त्यांच्या नियतकालिकाचं संपादकपद घोलपांना दिलं. शाहू महाराजांच्या प्रेरणेने बाबासाहेबांनी मूकनायक आधीच सुरू केलं होतं. सुरूवातीला त्यांनी त्याचं संपादकपद पी. एन. भटकर यांना दिलं होतं. पण उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याआधी त्यांनी `मूकनायक’ची पूर्ण जबाबदारी घोलपांवर सोपवली.
‘मूकनायक’ सुरू ठेवण्यासाठी ज्ञानदेव घोलप सातार्याला प्रबोधनकारांकडे आले असावेत. ‘प्रबोधन’च्या १६ मार्चच्या अंकात `मूकनायक’ची जाहिरात आहे, त्यातला मजकूर असा आहे, `पुढचा दुप्पट मजकुराचा `मूकनायक’ ता. २७-३-२४ रोजी प्रसिद्ध होईल. ज्ञा. ध्रु. घोलप, संपादक – मूकनायक, सातारा रोड. पुढे १६ मेच्या ‘प्रबोधन’मध्ये आणखी एक खुलासा आलाय. तो असा, `गेल्या एप्रिलपासून मूकनायक पत्र बंद पडले आहे. त्याचे संपादक श्री. घोलप `फिरतीवर जातो म्हणून गेले, त्यांचा पत्ता आम्हाला ठाऊक नाही. परतभेटीची पत्रे व इतर पत्रव्यवहार विनाकारण आमच्या छापखान्यांत येऊन पडत आहे. त्यांची आमच्यावर जबाबदारी नाही. व्यवसायबंधूंनी मूकनायकाच्या प्रतिभेटीचे अंक बंद करावे, अशी मुद्रक या नात्याने श्री. ठाकरे जाहीर विनंती करतात.’ या दोन चौकटींतून एक गोष्ट स्पष्ट होते की बाबासाहेब आंबेडकरांच्या `मूकनायक’ या ऐतिहासिक मुखपत्राचे प्रबोधनकार काही काळ मुद्रक होते. हे ज्ञानदेव घोलप यांनी घडवून आलं होतं.
सत्यशोधक इतिहासाचे तरूण अभ्यासक सुहास नाईक यांनी घोलप यांच्यावरच्या लेखात म्हटलं आहे, लेखनाची सहज आणि नैसर्गिक शैली आणि संपादन कार्याचा अनुभव असल्यामुळे प्रबोधनकार ठाकरे यांच्या `प्रबोधन’च्या व्यवस्थापकपदाची जबाबदारी घोलप यांच्यावर काही काळ आली होती. वाणिज्याचा अभ्यास असणार्या घोलपांनी `प्रबोधन’ला आर्थिक शिस्त लावली. किंबहुना त्यामुळेच प्रबोधनकार ठाकरे यांना इतर लेखनकार्य करण्यास उसंत मिळाली आणि प्रबोधनकारांच्या खास शैलीतून दांभिकांचा पर्दाफाश करणारे ग्रंथ आकाराला आले. प्रबोधनकारांशी घोलपांचा असणारा हा जिव्हाळ्याचा स्नेहसंबंध अखंड राहिला. घोलप पुढे मुंबई इलाख्याच्या कॉन्सिलमधले पहिले अस्पृश्य सदस्य बनले. शिक्षण, सहकार, शेती, महार वतन, पाणीपुरवठा, कामगार कल्याण अशा अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण भाषणं करत सरकारच्या ध्येयधोरणांवर प्रभाव पाडला. पुढेही ते रयत शिक्षण संस्थेत दीर्घकाळ कार्यरत होते. पण बाबासाहेबांशी मतभेदांमुळे ते सामाजिक जीवनातून दूर गेले. त्यांचा शेवट अत्यंत गरिबीत झाला.
अशा ज्ञानदेव घोलपांना प्रबोधनकारांनी आपल्या छापखान्यावर मॅनेजर नेमलं होतं. अर्थात यात कर्मवीर अण्णांनीही आपल्या या विद्यार्थ्यासाठी शब्द टाकला असेलच. एकटे घोलपच नाहीत तर व्हर्नाक्युलर फायनलपर्यंत शिकलेले आणखी पाच सहा अस्पृश्य तरूण ‘प्रबोधन’ छापखान्यात काम करत होते. त्यामुळे एकदा धनजीशेठ कूपरने हसत म्हटलं होतं, आमच्या अण्णासाहेबांचा (म्हणजे प्रबोधनकारांचा) छापखाना आता अगदी महारवाडा बनला आहे. धनजीशेठने हे जरी कुत्सितपणे म्हटलं असलं, तरी प्रबोधनकारांसाठी ती निश्चितपणे अभिमानाची गोष्ट असणार होती.
प्रबोधनकारांच्या अस्पृश्यांविषयीच्या खुल्या विचारांमुळे सातारा परिसरातले अस्पृश्य नेते त्यांना भेटायला येत असत. अस्पृश्यांनो, स्पृश्यांपासून सावध रहा’ हा लेख छापून आल्यानंतर असेच शेजारच्या सात आठ खेड्यांमधले जबाबदार अस्पृश्य नेते पंचवीसेक सहकारी घेऊन प्रबोधनकारांना छापखान्यात भेटायला आले. तेव्हा या विषयावर त्यांची बरीच चर्चा झाली. प्रबोधनकारांनी या चर्चेतही त्यांना स्पष्ट इशारा दिला, तो असा, तुम्ही माझ्यावरही विश्वास ठेवू नका. येडपटांनो, तुमच्या भाग्याने तुम्हाला डॉ. आंबेडकरांसारखा तरणाजवान तुमच्या हाडारक्तामासाचा पुढारी लाभला असताना, तुम्ही आमच्यासारख्यांच्या मागे का लागावे? अहो, मेंढ्यांचा पुढारी दाढीवाला बोकड असावा, लांडगा चालेल काय? त्या आंबेडकरांना जाऊन भेटा. तोच तुमचे कल्याण करणार. बाकीचे आम्ही सारे बाजूचे पोहणारे. समजलात? जा आता.
या चर्चा धनजीशेठच्या कारखान्याच्या आवारातच सुरू असायच्या. त्यामुळे धनजीशेठना असा स्वतंत्र विचारांचा माणूस आपल्या कामाचा नसल्याचं समजलं असेलच. प्रबोधनकार लिहितात तसं, या माझ्या करणीमुळे कूपरने मनोमन गाठ मारली की हा ठाकरे आपल्या पचनी पडण्यासारखा नाही. प्रबोधनकार खरं तर सातार्याला येऊन अडकले होते. परतीचा मार्ग खूप कठीण होता. त्यामुळे नमतं घेऊन धनजीशेठ कूपरच्या सोयीची मांडणी करण्यात व्यावहारिक शहाणपण होतं. पण अस्पृश्यांचा कैवार घेण्यासाठी त्यांनी या कशाचाच विचार केला नाही. छत्रपती शाहू महाराजांनी १९२० साली झालेल्या माणगाव अस्पृश्य परिषदेत बाबासाहेबांच्या नेतृत्वावर मोहर उमटवली होती. तोच विचार प्रबोधनकार पुढे नेत होते. ते करताना त्यांनी त्याचे दुष्परिणाम काय होतील, याचा त्यांनी विचार केला नाही.