नुकतीच आषाढी एकादशी होऊन गेली. अनेकांनी या दिवशी कडक उपवास केला असेलच. उपवास शब्दाची फोड उप + वास अशी आहे. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. देवाजवळ राहण्यासाठी, ध्यानधारणा, पूजा करण्यासाठी मिताहार करणे किंवा अन्नग्रहण न करणे. केवळ पाणी किंवा द्रवपदार्थ घेऊन राहायचं. आजच्या भाषेत डिटॉक्सीफिकेशन करायचं. मात्र सामान्य माणूस एकादशी दुप्पट खाशी या विचारानेच उपास करतो.
लहानपणी आषाढी एकादशी आणि महाशिवरात्र या दोन्ही दिवसांची मी मनापासून वाट पहायचे. उपासाला केले जाणारे अनेक चविष्ट आणि चमचमीत पदार्थ आठवूनच तोंडाला पाणी सुटत असे. आईचा दर गुरुवारी उपास असे, तेव्हा तिच्यासाठी जरा जास्त ठेवावी याचा विचारही न करता साबुदाणा खिचडी आणि उपासाचं चविष्ट थालीपीठही चापून खाल्लं जात असे. मग उपास नाकारायची एक फेज येऊन गेली. कालांतरानं या ‘जडजंबाल’ उपासांमागची गंमत समजली. आता हे दोन दिवस वर्षातील चीट डे समजून उपास करते. नेहमीची साबुदाणा खिचडी, वरीचे तांदूळ, दाण्याची आमटी, भाजणीचं थालीपीठ यासोबतच इतर पदार्थ एक्स्प्लोअर करायला मजा येते. आपल्या उपासाला चालणारे बहुतेक सगळेच पदार्थ मूळचे परदेशी आहेत. पचायला जड आहेत. पित्तकारक आणि वातूळ आहेत. काही घरांत उपासाला ओली हिरवी मिरची चालते, पण लाल तिखट चालत नाही. काहीजणांना कोथिंबीर चालते. जिरं चालतं पण बडीशेप चालेलच असं नाही. तर असा सगळाच गडबडगुंडा आहे. पण चविष्टपणात हे पदार्थ अव्वल असतात हे नक्की.
महाराष्ट्रात आषाढी एकादशीला फार महत्व आहे. नुकत्याच होऊन गेलेल्या या दिवसाच्या निमित्ताने हे उपासाचे थोडेसे अनवट पदार्थ करून बघितले.
राजगिरा धिरडं
राजगिरा आणि दही हा संगम लोहासाठी उपयुक्त असतो. काहीतरी वेगळा प्रयोग म्हणून हे धिरडं करून बघितलं. नाहीतर राजगिरा एरव्ही लाडू/ चिक्की असाच खाल्ला जातो.
साहित्य : दोन वाटी राजगीरा पीठ, दोन टेबलस्पून दही, दोन मिरच्या बारीक चिरून, दोन टेबलस्पून जिरं, चवीनुसार मीठ, कोथिंबीर.
कृती :
१. राजगिरा पिठात दही आणि इतर सगळेच पदार्थ घालून हे मिश्रण थोडं दाटच भिजवायचं.
२. उत्तम नॉनस्टिक तव्यावर डावभर पीठ घालायचं. हे डोशाचं पीठ नसल्याने तेवढ्या तरलतेने पसरत नाही हे लक्षात ठेवायचं. तवा छान तापलेला हवा. पीठ दाटच हवं, पातळ झालं तर ते सैरावैरा पसरतं आणि लगदा खावा लागतो.
३. थोडंसं तेल सोडून धिरडं खरपूस दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचं. कोकम चटणीसोबत गट्टम करायचं.
कोकम चटणी
साहित्य : मूठभर कोकमं, चवीनुसार साखर, तिखट, मीठ, एक टी स्पून जिरं.
कृती :
१. कोकमं थोड्याशा गरम पाण्यात अर्धा तास भिजवून ठेवायची.
२. नंतर कोकमं तिखट, मीठ, साखर, जिरं सगळं एकत्र वाटून घ्यायचं.
३. कोकमं भिजवलेलं पाणी वाटताना वापरायचं किंवा नंतर आमटीत वापरायचं.
दही साबुदाणा
साहित्य : एक वाटी साबुदाणा, अर्धी वाटी दाण्याचे कूट, दोन तीन वाट्या गोड ताक, एक वाटी छान घट्ट गोड दही, दोनतीन हिरव्या मिरच्या, चमचाभर साजूक तूप, एक टेबलस्पून जिरं, चवीनुसार मीठ, साखर, कोथिंबीर.
कृती :
१. साबुदाणा दोन मिनिटे मायक्रोव्हेवमधे हलवत भाजून घ्यायचा. नाहीतर गॅसवर मंद आचेवर वीस मिनिटं भाजून घ्या. पाण्यानं धुवून घ्यायचा.
२. नंतर थोड्याशा पाण्यात कमीत कमी चारपाच तास साबुदाणा ठेवावा. ताकात भिजवून ठेवला तर अधिक उत्तम.
३. लागेल तसे ताक आणि दही, दाण्याचे कूट, मीठ, साखर, एक हिरवी मिरची वाटून घालून साबुदाणा गुरगुट्या हलवून घ्यावा.
४. अर्ध्या तासाने दोन टेबलस्पून साजूक तुपाची जिरे आणि एक हिरवी मिरची बारीक चिरून घालून चुरचुरीत फोडणी करावी. ती या कालवलेल्या साबुदाण्यावर घालावी.
दही साबुदाणा तयार आहे.
टिपा :
– आधी मिरची वाटून कालवल्याने हिरव्या मिरचीची चव उतरते.
– फोडणीतली मिरची जिर्यासहीत दाताखाली येते ते छान वाटतं.
– आतून वरून कोथिंबीर सढळ हस्ते घालावी.
– थंडगार दही साबुदाणा पोटभरीचा होतो. पुढे किमान चार तास भूक लागत नाही.
– भाजून घेतल्याने साबुदाणा पचायला बरा पडतो, तुपाच्या फोडणीचंही तेच काम आणि अर्थातच उत्कृष्ट चव येते.
– साबुदाणा ताक पितो त्यामुळे बाजूला वेगळं जास्तीचं ताक/दही काढून ठेवा.
उपवासाचा दहिवडा
साहित्य : उकडून घेतलेले बटाटे मध्यम आकाराचे तीनचार, दीड वाटी उपवासाची भाजणी, राजगिरा व शिंगाडा पीठ प्रत्येकी एक टीस्पून, बारीक वाटलेलं दाण्याचं कूट एक वाटी, दही चार पाच वाट्या, हिरव्या मिरच्या दोन वाटून, जिरेपूड, आल्याचं वाटण एक टीस्पून, तिखट, मीठ, साखर, चिरलेली कोथिंबीर, तूप/तेल तळणीसाठी.
कृती :
१. एका परातीत उकडून सालं काढलेले बटाटे, दाण्याचं कूट, सर्व पीठं, मीठ, वाटलेल्या मिरच्या घ्या.
२. सर्व पदार्थ एकजीव मळून घ्या. या मिश्रणाचे लहान लाडूच्या आकाराचे लहानसर गोळे करा.
३. कढईत तूप/तेल गरम करा. हे गोळे मध्यम आचेवर लालसर रंगावर छान तळून घ्या.
४. एका पसरट बाऊलमध्ये दही घ्या. त्यात साखर, आल्याचं वाटण, मीठ घाला. हे दही पाणी न टाकता रवीने घुसळून घ्या. हे दही काही वेळ फ्रिजमध्ये ठेवून गार करून घ्या.
५. खाताना तळलेले वडे बाऊलमध्ये घ्या. वरून थंड दही घाला. वरून चिरलेली कोथिंबीर पेरा, तिखट आणि जिरेपूड भुरभुरवा.
– जुई कुलकर्णी
(लेखिकेला पारंपरिक अन्नपदार्थांविषयी उत्सुकता आहे आणि पाककलेत रुची आहे.)