कोरोनाच्या पहिल्या लाटेचो आमच्या केळुरीवर काय्यक परिणाम न झाल्यामुळे दुसर्या लाटेच्यावेळी शेजारच्या आंबेरी गावात कोरोनाबाधित सापडानसुद्धा सरकारच्यो पंचवार्षिक योजना जशो निश्चिंत असतंत तशेच अगदी निश्चिंत असलेले आमचे केळुरी ग्रामस्थ.
—-
तसा बघूक गेल्यान तर प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत आपल्याक अंमळ उशीराच जाग येता. म्हणजे शाळेत शिकणार्या पोरांपासून ते देशाची व्यवस्था चालवणार्यांपर्यंत प्रत्येकाचो तो स्वभावधर्मच झालेलो आसा. म्हणजे शाळेतली बरीचशी पोरां जशी परीक्षा उद्या आसंय म्हटल्याबरोबर आदल्या दिवशी रात्री पुस्तक पहिल्यांदा उघडतंत आणि परिक्षेचो निकाल लागल्यानंतर पालकांची बोलणीवजा मार खातंत तसाच कोरोनाची दुसरी लाट येऊची आसा, ह्या म्हायत आसूनसुद्धा कुठलांही पूर्वनियोजन न करता किंवा कुठलीही सावधगिरी न बाळगता सरकारच्या मते जनतेने आणि जनतेच्या मते सरकारने जी काय माती केली तेच्यातून आपलो हो स्वभावधर्म आपल्याच लक्षात इल्याशिवाय रवूचो नाय.
आमच्या केळुरीतसुद्धा अगदी ह्याच घडलां. कोरोनाच्या पहिल्या लाटेचो आमच्या केळुरीवर काय्यक परिणाम न झाल्यामुळे दुसर्या लाटेच्यावेळी शेजारच्या आंबेरी गावात कोरोनाबाधित सापडानसुद्धा सरकारच्यो पंचवार्षिक योजना जशो निश्चिंत असतंत तशेच अगदी निश्चिंत असलेले आमचे केळुरी ग्रामस्थ. केळुरीतल्या वयस्क लोकांका कोरोना होऊ नये आणि तेंका सोशल डिस्टंसिंगाचा महत्व कळूक व्हया म्हणान केळुरीतल्या वीस ते पंचवीस पोरांका एकत्र करून केळुरीतल्या प्रत्येक आळीत मोर्चे काढणार्या नाना देसायांच्या मधूकंच जेव्हा कोरोना झालो, तेव्हा मेलेल्या मनांमधे जसो स्वाभिमान जागृत जाता तशेच आमचे केळुरी ग्रामस्थ कोरोनाच्या बाबतीत जागे झाले. आमच्या केळुरीतल्या संगीत रंगभूमीवरचे रिटायर्ड नट आणि आता दिग्दर्शक असलेल्या विसुभाऊंच्या भाषेत सांगायचा तर ‘कुल्याकडे लोंबूक लागल्यानंतर मगे परसाकडे धावतंत.’ तसाच काहीसा त्या झालेला होता. मधूची बातमी समजल्यानंतर सरपंचांनी ‘केळुरीत आज आत्ता ह्या क्षणापासून पूर्ण तीन दिवसांचो लॉकडाऊन’ अशी मॅसेजवजा ताकीद द रावडी केळुरीकर्स या आमच्या गावच्या वॉटसॅप ग्रुपावरती टाकली आणि त्या दिवसापासून केळुरीत तीन दिवसांचो कडक लॉकडाऊन सुरू झालो.
प्रत्येक लग्न झालेल्या नवीन जोडप्याचो जसो उमेदीचो काळ आसता, तसाच केळुरीतल्या लॉकडाऊनाचोसुद्धा हो उमेदीचो काळ होतो. तीन दिवसाचो लॉकडाऊन आता सात दिवसांवरती येऊन थांबलो होतो. नवीनच लॉकडाऊन सुरू झाला, तेव्हा देशातल्या पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी मुंबईच्या रस्त्यांवरती जशे मोर पिसारा फुलवून नाचताना दिसलेले होते तशेच मोर केळुरीच्या रस्त्यांवरतीही दिसूक व्हये अशी काही मंडळींची अगदी मनापासून इच्छा होती. केळुरीतल्या त्या निर्मनुष्य रस्त्यावरती जनू नाडकर्णी तेवढो एकदा बायकोच्यो साड्यो अंगणात वाळत टाकताना दिसलो होतो. त्याव्यतिरिक्त मोर वैगेरे पिसारो फुलवताना काही कोणाक दिसले नाय. पण दाजीकाकांनी मोर दिसण्याची इच्छा वॉटसॅपावरती बोलून दाखवल्यान तेव्हा खालच्या आळीतलो पांडू गावकर म्हणे, ‘काय तरी काय हो दाजी काका? आ? आहो मोर पळवले मोरणीन! आता खंयचे हो मोर? आता आसंत ते सगळे चोर! काय हो सरपंच बरोबर ना?’ सरपंचांनी ग्रुप सोडलो. मगे परत तेची समजूत काढून तेका ग्रुपात अॅड केलो. जगात झालेल्या पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी युरोपातल्या खंयच्याशा देशात लॉकडाऊनाचा पालन कडक शिस्तीत होऊक व्हया, कोणीच रस्त्यावर फिरकू नये म्हणून थयसर रस्त्यांवरती वाघ सोडलेनि होते, खरे वाघ. मोर नाय त नाय पण निदान हेचो तरी अनुभव केळुरी ग्रामस्थांका येऊक व्हया, असा प्रत्येकाक वाटत होता. पण आता केळुरीत वाघ हाढूचो खंयसून? हो मोठो प्रश्न होतो. म्हणून मग सदा गावड्याचो मारको बैल केळुरीतल्या रस्त्यावरती सोडलो.
आता सरपंचांनी सात दिवसांवरून पंधरा दिवसांपर्यंत लॉकडाऊन वाढवल्यानी होता. ह्या काळात म्हणजे निवडणुकीत निवडून येऊच्यासाठी नेते लोक जेवढी आश्वासना जनतेक देतंत तेवढीच, अंमळ तेच्यापेक्षा जास्तंच मेसेजेस आमच्या केळुरीतल्या वॉटसॅप ग्रुपावरती धावलेल्यो होत्यो. सर्वप्रथम त्यात त्या कोरोनाच्या बाबतीतल्यो घोषणा. म्हणजे जसा ‘जाऊ थंय खाऊ’ किंवा ‘रोग थंय योग’ तसाच ‘भिती थंय क्षती’ ह्या कोरोनाची भिती घालवूसाठी किंवा ‘जाईन थंय धुवीन’ म्हणजे हात किंवा ‘मी थंय मास्क’ ह्या म्हणजे कोरोनापासून बचाव करूसाठी. त्याव्यतिरिक्त घरातून कोणीही भायर येऊ नये म्हणून, ‘इलात बाहेर तर मिळंत आहेर’ म्हणजे जर घरभायर इलात तर तुमका आहेर मिळात. आता तो कोरोनाचो की सदा गावड्याच्या मारक्या बैलाचो त्या जेचा तेना ठरवूचा किंवा आणखीन एक ‘पडूचा नाय खर्चात तर जाऊ नका परसात’ म्हणजे घराभायर म्हणजे अगदी आपल्या परसात पण जाऊ नको असा.
या परसातल्या घोषणेवर जनू नाडकर्ण्यान आपलो आगाऊ प्रश्न विचारलो, ‘परसात जाऊचा नाय पण परसाकडे गेल्यान तर चालात ना?’
ह्या म्हणींव्यतीरिक्त कोरोनावर खंयचा औषध गुणकारी आसा हेच्यावरती म्हणजे अगदी तुडुंब मेसेजेस पडल्यो होत्यो. कोण म्हणे धन्या जिर्याचा पाणी प्या, तर कोण म्हणे ‘ओ नाय नाय त्यापेक्षा कडुलिंबाचा सरबत बरा’ तर कोणी म्हणे ‘अहो कडुलिंब खंयचो काढलोत? त्यापेक्षा गायीचा धारोष्ण ताजा दूध प्या. काय समजले?’ कोणी थांबतंच नव्हतो. शांतू भट आधीच त्या वॉटसॅपच्या मेसेजींक वैतागलो होतो. तेना म्हणजे कहरंच केलो, ‘त्यापेक्षा एक काम करा सगळेजण बशीभर शेण खाया.’ असो मेसेज त्याने टाकल्याबरोबर पुढचे दोन दिवस केळुरीतल्या वॉटसॅप ग्रुपावर साधी गुडमॉर्नींग किंवा गुडनाईटचीसुद्धा मेसेज पडली नाय.
आता पंधरा दिवसांचो लॉकडाऊन एकवीस दिवसांपर्यंत नेलो. पण या सगळ्या लॉकडाऊनात अगदी जमेची बाजू म्हणजे, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून दर दिवशी केळुरीकर मास्तर वेगवेगळ्यो नांदी, नाट्यसंगीता तसाच भजनां पेटीवरती रेकॉर्ड करायचो आणि ग्रुपावरती पाठवायचो. तसाच विसुभाऊ, हरिभाऊंसारखी मंडळी जुनी नाट्यसंगीतां आपल्या आवाजात म्हणून रेकॉर्ड करून पाठवायचे. तसाच दाजीच्या कवितांपासून केळुरी ग्रामस्थांची सुटका नव्हती. तसाच ह्याबाबतीत केळुरी महिला मंडळही काही कमी नव्हता. बायलो म्हणजे रोज नव-नवीन पदार्थ करायच्यो आणि तेचे फोटो ग्रुपावरती टाकायच्यो. धर्मा धाकणकराच्या बायलेन टाकलेल्यो फोटोत एक रिकामी प्लेट आणि धर्मा धाकणकराचा वाढलेला पोट याव्यतीरिक्त दुसरा काही दिसत नव्हता. पण ह्या सगळा जरी आसला तरी आता आमच्या केळुरी ग्रमस्थांका वैताग आलो होतो. कारण आता उमेदीचो काळ संपलेलो होतो आणि लगिन होऊन बरीच वर्षां झाल्यानंतर जवळ-जवळ प्रत्येक जोडप्याचा जा होईत ताच आमच्या केळुरी ग्रामस्थांचा झालेला होता. आता तेंका घराच्या बाहेर पडूचा होता. एकवीस दिवसांच्या लॉकडाऊनचा व्रत पाळणा म्हणजे तेंका ते ब्रह्मचर्याच्या व्रतापेक्षासुद्धा खडतर वाटत होता.
असा असतानाच सरपंचांचो परत एक मेसेज इलो ‘लॉकडाऊन आजून दहा दिवस वाढवल्यानी हं.’ ही मेसेज वाचताक्षणीच सगळे केळुरी ग्रामस्थ म्हणजे पेटलेच अगदी. द रावडी केळुरीकर्सवर मेसेजेसचो भडिमार होऊक लागलो. पण सरपंच काय बधले नायत. दोन दिवस सलग ह्यो मेसजेस ग्रुपावरती नाचत होत्यो. सरपंच ह्या मेसेजींका दाद देत नायत ह्या बघून सगळे केळुरी ग्रामस्थ म्हणजे हट्टाकंच पेटले. वास्तविक मोर्चा किंवा आंदोलना ह्या रस्त्यावर उतरून केल्या जाता. पण आमच्या केळुरी ग्रमस्थांनी मात्र घराच्या कौलांवरती, तर कुणी गच्चीवरती चढान आन्दोलन केल्यान. सरपंचांविरुद्ध नको नको त्यो घोषणा दिल्यो. दाजी काका फडणीसंनी तर गच्चीवरती साऊंड सिस्टीम लावली आणि माईकावर कविता म्हणूक सुरूवात केली,
मधूक होतो कोरोना, पण बरो झालो मधू
बैल तुजो घरी घेऊन, जा निवांत सदू
सरपंच तुमचो मान ठेवून, बोलतंय मी स्पष्ट
लोक केळुरीतले आसंत साधे, म्हणान वागू नका दुष्ट
सांगता तुमका कळला आमका
सोशल डिस्टंसींगनेच देऊची हा,
प्रत्येकान प्रत्येकाची साथ
आमका रस्त्यावरती एकदा सोडून तर बघा
लागूक पण नाय देणार एकमेकाच्या कातीक कात
शेवटी सरपंचांनी या आन्दोलनापुढे डोक्या टेकला. आता त्या आंदोलनापुढे टेकल्यान की दाजीच्या कवितेपुढे ता सांगणा जरा कठीण होयत, पण डोक्या टेकल्यान ह्या सत्य, आणि शेवटी एका महिन्याचो लॉकडाऊन पंचवीस दिवसांवरती आटोपतो घेतलो.
– शिवप्रणव आळवणी
(लेखक प्रशिक्षित अभिनेते आहेत)