• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

उंदीर का उड्या मारू लागले?

(संपादकीय २६ जून)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
June 23, 2021
in संपादकीय
0

नुकताच एक विनोद वाचला.
एकजण दुसर्‍याला विचारतो, माझ्या खात्यात १५ लाख रुपये यायचे होते, ते कधी येणार?
दुसरा म्हणतो, अरे धीर धर. आता तिथल्या ठेवींची संख्या तिप्पट झालेली आहे… आता येतील तेव्हा थेट ४५ लाखच येतील, आहेस कुठे!
हा विनोद आहे, हे सांगावं लागतं हल्ली. उपरोधाने, विनोदाने लिहिलेल्या पोस्टींमध्ये काहीही ‘गौरव’पूर्ण, ‘मास्टरस्ट्रोक’युक्त सापडलं की ते खरं मानून सगळीकडे प्रसृत करणार्‍या भाबड्या भक्तजनांची संख्या कमी नाही.
या विनोदाला जो संदर्भ आहे, तो मात्र गंभीर आहे. तो विनोदाने घेण्यासारखा नाही.
स्विस बँकांमधल्या भारतीयांच्या ठेवी २०१९च्या अखेरीपर्यंत ६,६२५ कोटी रुपयांच्या घरात होत्या; त्या २०२१मध्ये जवळपास २०,७०० कोटी रुपयांच्या घरात गेल्या आहेत. ही तिप्पट वाढ आहे, म्हणूनच तो कुप्रसिद्ध काळा पैसा जेव्हा भारतात आणला जाईल तेव्हा भारतीयांच्या खात्यांत तिप्पट रक्कम येईल, असा या विनोदाचा अर्थ.
विनोद रचणारा अर्थशास्त्राचा जाणकार नसावा. कारण, एकतर या रकमांचा एकत्रित आकडा फारच छोटा आहे आणि त्या अधिकृत ठेवी आहेत. स्विस बँकांमध्ये ठेवला जातो तो काही सगळाच काळा पैसा नसतो. हेच आता केंद्र सरकारच्या अर्थ खात्यानेही जाहीर केलं आहे. याला काळाचा महिमा म्हणतात. या बँकांमधलं काळं धन परत आणून प्रत्येकी १५ लाखांचा भरणा करण्याच्या गर्जना केल्या गेल्या, तेव्हा या बँकांमध्ये सगळा काळा पैसा नसतो, हे संबंधितांना माहिती असणारच. पण, तेव्हा जुमलेबाजी सुरू होती. आता वास्तवाचे चटके बसले, जुमले उलटले, तेव्हा सत्य सांगण्याची वेळ आली.
सरकारचा खुलासा काही खोटा नाही. पण त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यांना खुलाशातून उत्तर मिळत नाही.
विदेशांतून फिरवून स्विस बँकांमध्ये जो भरण्यात आला होता, तो लाखो कोटींच्या घरातला काळा पैसा खोदून काढण्याचं काम कुठवर आलं, सर्वसामान्य नागरिकांच्या मोबाइलमध्ये ‘१५ लाख क्रेडिटेड’ हा मेसेज वाजणार कधी, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न त्याहून महत्त्वाचा. अवघ्या दोन वर्षांच्या काळात एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय धनवंतांना भारतीय बँकांऐवजी स्विस बँकांमध्ये पैसे ठेवणं सुरक्षित वाटावं असं काय घडलेलं आहे? सरकार एकीकडे गोरगरिबांना आत्मनिर्भर व्हायला सांगत आहे आणि श्रीमंत भारतीय आत्मभरभर होऊन पैसेही स्विस बँकांमध्ये ठेवतायत आणि परदेशांत नागरिकत्व खरेदी करून तिकडे स्थायिकही होऊ पाहताहेत, हे काय चाललं आहे?
बोट बुडायला लागली की उंदीर सगळ्यात आधी उड्या मारतात म्हणे! भारतीय अर्थव्यवस्थेच्या बोटीच्या भक्कमपणावर या धनवंतांचा विश्वास राहिलेला नाही का?
ज्यांना हाय नेट वर्थ इंडिव्हिज्युअल्स म्हटलं जातं अशा ७००० अब्जाधीशांनी २०१९ सालातच देशाला रामराम ठोकला आहे आणि कोणत्या मार्गाने देशाबाहेर पडता येईल, याची विचारणा करणार्‍यांच्या संख्येत ६३ टक्के वाढ झालेली आहे. कॅनडा हा देश आधीपासूनच स्थलांतरासाठी प्रसिद्ध आहेच. पण, त्या रांगेत आता पोर्तुगाल, ऑस्ट्रिया, माल्टा, तुर्कस्तान यांसारखे देशही आले आहेत. या देशांमध्ये गुंतवणुकीच्या बदल्यात नागरिकत्व अशी योजना असते. कोट्यवधी रुपये तिथलं सरकार सांगेल तिथे गुंतवायला लागतात. उदाहरणार्थ पोर्तुगालमध्ये तिथल्या बांधकाम क्षेत्रात किमान तीन कोटी रुपयांची गुंतवणूक माणशी करावी लागते, तर गोल्डन परमिट मिळतं. हा खर्च करू, पण भारत सोडून जाऊ, अशी घाई या धनवंतांना का लागली आहे?
या धनवंतांचे व्यवसाय इथेच राहणार आहेत, कारभार इथेच चालणार आहे, पण, भारत हा निवासयोग्य राहिलेला नाही आणि तो गुंतवणूक करण्यायोग्यही राहिलेला नाही, इथल्या बँकाही भरवशाच्या नाहीत, इथली अर्थव्यवस्था गटांगळ्या खाणार आहे, असं त्यांना का वाटू लागलेलं आहे?
खरंतर देशात गेली सात वर्षं एक शक्तिशाली सरकार आहे. हे सरकार स्थापन झालं तेव्हा अनिवासी भारतीयांना भारतप्रेमाचा पान्हा फुटला होता. अखेरीस भारत देश खर्‍या अर्थाने ‘स्वतंत्र’ झाला, असं मानून हे लोक तिकडची सुबत्ता सोडून नवभारताच्या निर्माणासाठी इकडे धाव घेतात की काय, अशी आशा पल्लवित झाली होती. पण, त्यांचा उत्साह हा तिकडेच राहून सोशल मीडियावरून इकडच्या भाकर्‍या भाजण्यापुरता आणि ‘हाऊडी मोदी’ वगैरे पांचट, राजनैतिकदृष्ट्या चुकीचे कार्यक्रम आयोजण्यापुरताच आहे, असं स्पष्ट होत गेलं.
त्यात कोरोनाकाळात महाराष्ट्र, केरळ यांच्यासारखे काही अपवाद वगळता देशभरात कोरोनास्थितीची भयाण पद्धतीने हाताळणी झाली. सनदी अधिकार्‍यांपासून खासगी क्षेत्रातल्या उच्चपदस्थांपर्यंत, परराष्ट्रांच्या दूतावासातल्या कर्मचार्‍यांपर्यंत अनेकांना बेड, ऑक्सिजन, औषधं मिळवण्यासाठी ज्या प्रकारे तडफडावं लागलं, ते पाहिल्यानंतर इथल्या श्रीमंतांचा भ्रमनिरास झालेला दिसतो आहे. शिवाय प्रत्येक व्यावसायिकाला चोर मानूनच वागवणारा कर-दहशतवादही बोकाळला आहेच. त्याची ही अटळ परिणती आहे.
हे सगळं वाचून आपण काय समजायचं?
सावधपणे या काळाच्या हाका समजून घ्यायच्या. हा देश सोडून जाण्याची मुभा आपल्याला नाही आणि आपल्याकडे स्विस बँकांमध्ये ठेवण्याइतके पैसेही नाहीत… आपल्यासाठी ही सोयीनुसार प्रेम दाखवण्याची धर्मशाळा नाही, आपलं घर आहे हे… ते राहण्यालायक राहिलं नसेल, तर ते दुरुस्त करणं हे आपलंच काम आहे, हे लक्षात घेऊन ‘कामाला’ लागायचं.

Previous Post

‘पुल’कित गदिमा

Next Post

भविष्यवाणी २६ जून

Next Post

भविष्यवाणी २६ जून

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.