पु. ल. देशपांडे व गदिमा पुण्यातल्या डेक्कन जिमखान्याच्या टेनिस कोर्टाजवळच्या रस्त्यावरुन प्रभातफेरीला निघाले होते. रात्रभर प्रभात स्टुडिओत एका चित्रपटाचे चित्रीकरण आटपून मंडळी चालायला निघाली होती. पुलंना फारसे चालायला आवडायचे नाही. मात्र गदिमांना प्रभातफेरीचे प्रचंड प्रेम; नाईलाजाने का होईना पण गदिमांकडून लवकर गीते लिहून घ्यायची असतील तर पर्याय नव्हता! तितक्यात रस्त्यात महानगरपालिकेचे दिवे बंद झाले आणि काय गंमत गदिमांना गीत सुचले,
‘विझले रत्नदीप नगरात, आता जागे व्हा यदुनाथ’
एक मोठा प्रश्न आज सुटला. गदिमा-पु.ल आजच्या काळात का होत नाहीत? तर याचे उत्तर सोपे आहे- अहो, आता अनेकदा महानगरपालिकेचे दिवे सकाळी १०-११पर्यंत बंदच होत नाहीत, तर लोकांच्या प्रतिभा जागृत होणार कशा!
गदिमा व पु.लंचा स्नेह खूप जुना, ज्या काळात आपल्यात लेखनाचे गुण आहेत हे पु.लंना उमगलेही नव्हते तेव्हापासूनचा. तेव्हा पुल गायक होण्याच्या मागे लागले होते. महाराष्ट्रभर फिरून ते भावगीतगायनाचे कार्यक्रम करत असत. कोल्हापूरच्या सोळंकूरकर मास्तरांचा संगीत मेळा त्या काळात खूप प्रसिद्ध होता. मेळ्यात त्या काळात गाणार्याआ गुणवान मुलांची नावे होती सुधीर फडके, राम गबाले, आबासाहेब भोगावकर, पद्मा पाटणकर (नंतरच्या विद्याताई माडगूळकर)! मुंबईत संगीतक्षेत्रात धडपडणारे पण कोल्हापूरला या मुलांसमोर भेट देताना ज्यांची ‘मुंबईचे नामवंत भावगीत गायक’ अशी ओळख करुन दिली जात असे ते पु. ल. देशपांडे या मेळ्याला नामवंत पाहुणे म्हणून भेट देत असत! गदिमांची अनेक गीते त्यांना तिथे मिळत असत आणि त्यांना चाली लावून ते कार्यक्रम करत असत. यातूनच पुढे दोघांची भेट झाली आणि दोघांत स्नेह निर्माण झाला.
१९४८ सालचा ‘वंदे मातरम’ चित्रपट- गदिमांनी आग्रह करून पु.ल. व सुनीताबाईंना या चित्रपटात भूमिका करायला लावली होती. सुनीताबाई माहेरी गेल्या होत्या तर गदिमांनी त्यांना पत्र लिहून त्यांचा होकार मिळवला. ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम’ हे गदिमांचे गाजलेले गीत याच चित्रपटातले (नुकतीच या चित्रपटाची प्रत मिळाली आहे आणि पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे ती उपलब्ध आहे). ‘गुळाचा गणपती’ हा चित्रपट ‘सबकुछ पुल’ अशा नावाने जरी ओळखला जात असला तरी यात गीते होती अर्थातच गदिमांची. ‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची’ हा अभंग याच चित्रपटातला. हा गाणार्या, पं. भीमसेन जोशींनासुद्धा माहिती नव्हते की हे गीत गदिमांचे आहे. अगदी एच.एम.व्ही. कंपनीच्या रेकॉर्डवर त्या काळात ‘एक पारंपरिक अभंग’ म्हणूनच तो प्रसिद्ध झाला होता. शेवटी गदिमांना सांगावे लागले की, अहो हे माझे चित्रपटगीत आहे!
पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटनप्रसंगी एक गीत हवे होते. पुलंनी पंचवटी गाठली आणि गदिमांनी गीत दिले
‘जसा जन्मतो तेज घेऊन तारा!
जसा मोर घेऊन येतो पिसारा!
तसा येई घेऊन कंठात गाणे!
असा बालगंधर्व आता न होणे!
रतीचे जया रूपलावण्य लाभे!
कुलस्त्रीजसे हास्य ओठात शोभे!
सुधेसारखा साद, स्वर्गीय गाणे!
असा बालगंधर्व आता न होणे!’
पुलंनी याला संगीत दिले आणि उद्घाटन कार्यक्रमात ते बकुळ पंडित यांच्या आवाजात सादर झाले. याशिवाय ‘असे आमुचे पुणे’ ही सुंदर कविताही गदिमांनी दिली होती. तिचेही सादरीकरण याच कार्यक्रमात झाले. आजही बालगंधर्व रंगमंदिरात बालगंधर्वांच्या छायाचित्राखाली या ओळी लावलेल्या आहेत (आधी मोठ्या अक्षरांत असलेल्या या ओळी आता दुर्दैवाने लोकांनी भिंग घेऊन वाचाव्यात इतक्या बारीक करून लावल्या आहेत हे काळाचे दुर्दैव!)
‘नाच रे मोरा’ हे गदिमा-पु.ल. जोडीचे गाजलेले गीत. एकदा मस्ती करता करता पुलंनी गदिमांना सांगितले माडगूळकर ‘नाच गं घुमा कशी मी नाचू’च्या धर्तीवर बालगीत हवे आहे. गदिमा उत्तरले, घे लिहून- ‘नाच रे मोरा, आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच’.
या जोडीने अनेक सुंदर सुंदर गीते आपल्याला दिली. नुसती वानगीदाखल नावे घ्यायची झाली तर ‘इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे’, ‘नाच रे मोरा नाच’, ‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी’, ‘श्रीहरी विदुराघरि पाहुणा’, ‘इथेच टाका तंबू’, ‘ही कुणी छेडिली तार’, ‘जा मुली शकुंतले सासरी’, ‘कबिराचे विणतो शेले’, ‘कुणी म्हणेल वेडा तुला’, ‘सख्यांनो करू देत शृंगार’, ‘माझं ठरल्यालं लगीन मोडलं ग’, ‘दूर कुठे राउळात’, ‘केतकीच्या बनात उतरत्या उन्हात’ अशी अनेक गीते आहेत.
याशिवाय शाकुंतल व अमृतवेल अशा गदिमांच्या सुंदर संगीतिकांना पुलंनी संगीत दिले होते. ‘तुका म्हणे आता’ या पुलंच्या नाटकासाठी गदिमांनी गीते लिहून दिली होती. दोघांनी मिळून केलेल्या अशा अनेक कलाकृती आज पडद्याआड आहेत.
‘त्या तिथे, पलिकडे, तिकडे, माझिया प्रियेचे झोपडे’ ही कविता प्रथम गदिमांच्या तोंडून ऐकल्यावर पु.ल. म्हणाले होते, ‘महाकवी, तुम्ही लकी!, तुमच्या प्रियेच्या झोपड्याकडे वळताना त्या वळणावर आंब्याचे वाकडं झाड होतं. आम्ही वाढलो मुंबईत, त्या वातावरणात वळणावर असते जळाऊ लाकडांची वखार!’
गदिमा व पु.ल. अनेक साहित्यिक कार्यक्रमांना बाहेरगावी एकत्रही जात असत, कधीकधी रात्री भोजनपूर्व रसपानाचा कार्यक्रमही होत असे. प्रथम पु.ल. नको नको म्हणायचे त्यावर गदिमा मित्राला म्हणायचे, ‘आबासाहेब, यांना डोंगरे बालामृत द्या हो!’ (त्यावेळी लहान मुलांसाठी हे औषध प्रसिद्ध होते!)
चेष्टा-मस्करी करीत रसपानाला रंग चढे, पु.ल पुरे, छोटा पेग, छोटा पेग करायचे. ते म्हणायचे, ‘अण्णा, रसपान असे बेताने नि बेमालूम करावे की मासा जसा पाण्यात पाणी पितो. रसपान हेसुद्धा अत्तराप्रमाणे असावे.’
लगेच गदिमा म्हणायचे ‘लावा रे लावा, अत्तराचा फाया याच्या मनगटावर लावा!’
एकदा शरदरावजी पवार दोघांना बारामतीला सांस्कृतिक कार्यक्रमाला घेऊन गेले होते. कार्यक्रम सुंदर झाला, परत निघताना त्यावेळी पवारांकडे गाडी नव्हती (नव्हती अहो! विश्वास ठेवा!) तेव्हा त्यांनी एका व्यापारी मित्राची गाडी घेतली, त्याच वेळी त्या मित्रालाही काम निघाले आणि तोही यांच्यासोबत निघाला. गाडीत पवारांनी या गृहस्थांशी ओळख करून दिली. ‘हे ग. दि. माडगूळकर- हे महाकवी आहेत. गीतरामायण यांनीच लिहिले आहे आणि पु. ल. देशपांडे हे महाराष्ट्राचे महान विनोदी लेखक आहेत.’
समोरच्या महाशयांचा साहित्याशी अगदी बादरायण संबंधही नव्हता ते अगदी निष्पाप आणि निरागसपणे विचारते झाले, ‘व्हय! पर हे करत्यात काय?’
त्या प्रसंगावर नंतर या दोघांची जी हास्यरेस सुरू झाली ती लवकर थांबेचना. गदिमा म्हणाले, आमची अजून महाराष्ट्रात अशी कुणी जिरवली नव्हती!
पु.लं, चष्मा काढून हसत होते. त्यावर गदिमा म्हणाले, ‘पुरश्या, चष्मा घाल. चष्मा काढल्यावर तू चोरासारखा दिसतोस! तू नाटक लिहितोस ना? असा ‘अँटिक्लायमॅक्स’ कधी लिहिला आहेस? असा कनवाळू माणूस आम्ही कुठे बघितला नाही. आपल्या पोटापाण्याची कोण रे चौकशी करतंय!’
पुलंचे बंगाली भाषेवर खूप प्रेम होते. त्यावर गदिमांनी ए. क. कवडा या टोपण नावाने बिंगचित्र लिहिले होते,
‘पाया पडती राजकारणी, करणी ऐसी थोर
मराठीतला तू बिनदाढीचा रवींद्र टैगोर’
गदिमा-विद्याताई आणि पुल-सुनीताबाई यांचेही खूप चांगले संबंध होते. अनेकदा रात्री उशिरापर्यंत गप्पा रंगत. मग लक्षात येई, उशीर झाला. मग गप्पात खंड न पडता गदिमा-विद्याताई हे पुल-सुनीताबाईंना सोडण्यासाठी त्यांच्या घरापर्यंत जात आणि तिकडे पोहोचल्यावर कधी पुल-सुनीताबाई या दोघांना सोडायला पंचवटीत परत येत. कधीकधी तर असे रात्रभर चाले! किती ही रसिकता व स्नेह!
सात-आठ डिसेंबर १९७७. पु.ल. रवींद्रनाथांची दोन गीते घेऊन पंचवटीत आले, ‘माडगूळकर बाबा आमटे यांच्या आनंदवनात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे, त्यासाठी या गीतांच्या तर्जुम्यावर गीतरचना हवी आहे.’ गदिमा खूप आजारी होते, तरीपण मित्राच्या प्रेमाखातर त्यांनी लगेच दोन गीते लिहून दिली,
‘येई रे प्राणा, सर्वात्मका!
उंच उडव या मरुभूमीची गगनी विजयपताका!’
आणि दुसरे होते
‘कोवळ्या रोपट्या, आज तू पाहुणा
भूषवी अंगणा येऊनिया’
१४ डिसेंबर १९७७. गदिमा आपल्याला सोडून गेले आणि पुलं, बाबा आमटे यांच्यासाठी लिहिलेली ही गीते गदिमांची शेवटची गीते ठरली. पु.लं १२ जून २००० रोजी आपल्याला सोडून गेले. असे हे दोन जिवलग मित्र. गीतरामायणातील ‘त्रिवार जयजयकार रामा’ गीतातल्या ओळी जणू गदिमांनी पु.लं.साठीच लिहून ठेवल्या आहेत…
‘पुलकित पृथ्वी, पुलकित वायु’ तसे हे होते ‘पुल’कित गदिमा…