राळे हे धान्य आजवर ‘काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले’ या ‘टंग ट्विस्टर’ म्हणजे उच्चारकौशल्याची परीक्षा घेणार्या वाक्यापुरते मर्यादित राहिले होते. राळे म्हणजेच ‘फॉक्सटेल मिलेट’ हे खरं तर भारतातील प्राचीन धान्य आहे. अगदी नवरात्रीच्या घटात सप्तधान्ये पेरली जातात, त्यात राळेही असतात. अगदी भुलाबाईच्या गाण्यातही राळ्याचा उल्लेख आहे. ‘सईच्या दारात राळा पेरला बाई, तिथे काऊ आला बाई’ परंतु काळानुसार राळे मागे पडत गेले.
ग्रामीण भागात राळ्याची खीर करायची पद्धत होती. राळ्याचा भात शिजवून दूधगूळ घालून खायची पद्धत होती. विशेषतः सांगली सातार्याकडे भोगीला राळ्याचा भात केलाच जातो. राळ्याला हिंदीत कांगनी म्हणतात. खेड्यात राळ्याचा भात आणि न तापवलेले दूध गरोदर स्त्रीला आवर्जून खायला दिले जाई. अजूनही कर्नाटकात राळे भरपूर वापरले जातात. अगदी राळ्याच्या शेवयाही करून विकल्या जातात. मराठवाड्यात राळ्याच्या गोड पुर्या केल्या जातात.
राळे हे आयुर्वेदानुसार कुधान्य आहे, म्हणजे तृणधान्य, क्षुद्र धान्य. हे कफनाशक आणि उष्ण समजले जाते. कदाचित म्हणूनच भोगीच्या सणाला थंडीत आवर्जून खाल्ले जात असेल. काळानुसार मागे पडलेले हे दुर्लक्षित गरीब धान्य गुणकारी असल्याने आता पुढे आले आहे.
सगळीच बारीक धान्ये डायबेटीससाठी उत्तम असतात. तसंच हे राळे डायबेटिक डायटला उपयोगी आहेत. हे ग्लूटेन फ्री आहेत. राळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स ५०.८ आहे. व्हिटॅमिन बी वन, प्रोटिन्स, भरपूर लोह आणि कॅल्शियमने हे लहानसे धान्य भरलेले आहे. राळ्यातील लायसिन, थियामिन हे घटक कॉलेस्ट्रॉल लेवल योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी उपयोगी ठरतात. पण राळे वात दोष वाढवतात. त्यामुळे ते योग्य प्रमाणात आणि नीट शिजवून खायला हवेत.
सर्वच मिलेट्स खाण्याच्या आधी काही तास भिजवून ठेवून मग ते शिजवून खाणे आवश्यक आहे. राळे हे आपल्याकडे पक्ष्यांचे धान्य म्हणून मिळते. या अभंगातील उल्लेख पाहा-
आम्ही लटिकें न बोलूं वर्तमान खोटें ।।
लटिकें गेलें कटकें तेथें गाडग्याएवढें राळें ।
उडत चिमणी चरत चाले तिचे वाटीएवढें डोळे ।।
राळे स्वच्छ करून घेणे हे कटकटीचे काम असते. त्यामुळे सहसा चांगल्या दुकानात किंवा ऑनलाइन स्वच्छ केलेले राळे मिळतात तेच आणावेत. मी पिवळे राळे मागवले होते. राळे गरम असतानाच चांगले लागतात. त्याचे पदार्थ गार बरे लागत नाहीत. तसेच कुठल्याही नवीन धान्याची चव डेव्हलप व्हायला देखील वेळ द्यायला लागतो. राळ्यानं पोट लवकर भरते आणि लवकर भूक लागत नाही त्यामुळे इंटरमिजिएट फास्टिंगसाठी मदत होते.
डायबेटिक पेशन्ट भाताला पर्याय म्हणून राळ्याचा भात करू शकतो. पण त्या व्यतिरिक्त राळ्याचे इतरही काही पदार्थ केले जातात.
राळ्याचा उपमा
साहित्य :
१. एक वाटी राळे.
२. एक मध्यम कांदा बारीक चिरून. दोन टेबलस्पून मटार.
३. एकदोन हिरव्या मिरच्या, एक टीस्पून आल्याचा कीस, जिरं, तेल. फोडणीचे साहित्य, मीठ.
४. तीन वाट्या पाणी.
५. चार काजू पाकळ्या, कोथिंबीर, ओलं खोबरं सजावटीसाठी.
कृती :
१. राळे स्वच्छ पाण्यात चोळून धुवून घ्यावेत. निदान एक तास तरी भिजत घालावेत.
२. कढईत दोन टेबलस्पून तेल घालून फोडणी करून घ्यावी.
३. त्यात कांदा मटार मिरची आलं घालून नीट परतून घ्यावे. मग भिजवलेले राळे घालून परतून घ्यावे.
४. तिप्पट पाणी आणि चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून शिजवून घ्यावे.
५. राळ्याचा गरमागरम उपमा काजू कोथिंबीर खोबरं घालून सजवून वाढावे.
राळ्याचे कटलेट
साहित्य :
१. एक वाटी राळे.
२. अर्धी वाटी थालीपीठ भाजणी.
३. एक कांदा बारीक चिरून. एक टेबलस्पून फ्रोजन मटार (फ्रोजन मटार आधीच थोडे शिजलेले असतात, म्हणून सोयीचे)
४. तिखट मीठ, जिरेपूड, एक टेबलस्पून दही.
कृती :
१. एक वाटी राळे भिजवून तिप्पट पाण्यात घालून शिजवून घ्यावेत. शिजलेले राळे भरपूर फुगतात.
२. गार झाल्यावर या शिजलेल्या राळ्यात भाजणी घालावी.
३. यातच दही, कांदा, फ्रोजन मटार, तिखट, मीठ, जिरेपूड चवीनुसार घालावे. पाणी घालून नीट मळून घेऊन कटलेट थोड्या तेलावर नॉनस्टिक पॅनवर भाजावेत.
कटलेट्स तयार आहेत.
राळ्याचे डोसे
नेहमीच्या डोशाइतके हे डोसे चविष्ट लागत नाहीत, पण हेल्दी आहेत म्हणून कधीतरी खायला हरकत नाही. डायबेटिक पेशन्टना तर डोश्यांना उत्तम पर्याय आहे.
साहित्य :
१. एक वाटी राळे.
२. अर्धी वाटी उडदाची डाळ.
३. एक टीस्पून मेथ्या.
४. चवीनुसार मीठ. तीन चार लाल मिरच्या, एक टीस्पून जिरं.
कृती :
१. राळ्याचे डोसे सकाळी ब्रेकफास्टला करायचे असतील तर एक वाटी राळे नीट चोळून धुवून रात्रभर पाण्यात भिजत घालावेत.
२. राळ्यातच उडीद डाळ धुवून भिजत घालावी. सोबत एक टीस्पून मेथ्या घालाव्यात.
३. सकाळी हे मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्यावे. वाटताना मीठ चवीनुसार, तीन चार लाल सुक्या मिरच्या आणि एक टीस्पून जीरे घालावे.
४. सणसणीत तवा तापवून डोसे घालावेत.