भारतात बहुतांश लोकांना रोटी/ पराठा/ फुलका/ घडीची पोळी/चपाती/ भाकरी यातलं काहीतरी रोज खाल्ल्याशिवाय पोट भरल्याची भावना येत नाही. पराठा हा शब्द परत आणि आटा या शब्दांची संधी आहे. जिथं जिथं गहू हे पारंपरिक अन्न आहे तिथं तिथं पराठा खाल्ला जातो. तेल/ तूप लावून अनेक पापुद्रे असलेली रोटी तयार करणं हा झाला बेसिक प्लेन पराठा. हा पराठा अनेकदा मैद्याचाही करतात. स्टफ्ड पराठा म्हणजे भरलेला पराठा हे अजून चविष्ट प्रकरण. इथं वेगळी भाजी करायची गरजच नाही.
पराठा हा प्रकार मुळात उत्तर भारतातील, त्यातही पंजाबी अधिक आहे. उत्तर भारतातील थंडीला साजेल असं हे खाणं असतं. चविष्ट, मसालेदार भाजीचं सारण गव्हाच्या/मैद्याच्या कणकेत भरून केलेले, भरपूर तेल-तूप लावून खरपूस भाजलेले, सोबत लोणी, लोणचं, दही असणारे चमचमीत पराठे हा खास उत्तर भारतातील नाश्ता असतो.पराठा म्हणल्यावर बहुतेकांच्या डोळ्यासमोर आलू का पराठाच पहिल्यांदा येतो. खरं तर बटाट्याशिवाय मेथी, पालक, मुळा, कोबी, फ्लॉवर, पनीर असे अनेक पराठे केले जातात. पण बटाट्याचा पराठा अतिशय चविष्ट असल्यानं लोकप्रिय झाला. आलू पराठा म्हणजे दोन कार्बोहायड्रेडस एकत्र करून खाणं असतं. जे डायटमधे बसत नाही. सोबत भरपूर अनावश्यक फॅट्स असतातच.
हेल्दी डायटमधेही आपण अनेक प्रकारच्या पौष्टिक रोट्या आणि पराठे करू शकतो. यात गव्हाची कणीक, तांदळाची पिठी, ओटसचं पीठ, ज्वारी, बाजरी, राजगिरा, नाचणी या मिलेट्सचं पीठ आणि प्रोटिन्ससाठी बेसन, सोयाबीनचं पीठ आणि काही भाज्या मिसळून पराठ्यांची गुणवत्ता वाढवण्याचा विचार आहे. माफक तेल, तूप घालून हा पराठा भाजता येतो. सोबत घरचं लोणी, दही, ताक, चटणी, ठेचा असेल तर उत्तम पौष्टिक जेवणच होतं.
कोकी
कोकी हा सिंधी पराठ्याचा प्रकार आहे. काहीजण यात टोमॅटो घालतात. अनारदानाही घालतात. मी दोन्ही घातलं नाही. यात गव्हाचं पीठ असतं. बेसन असतं म्हणजे प्रोटिन्स असतात. कांदा-कोथिंबीर असतात, म्हणजे फायबर असतं.
साहित्य : १. दोन वाट्या कणिक, पाव वाटी बेसन.
२. एक कांदा बारीक चिरून घेऊन, एक हिरवी मिरची बारीक चिरून, कोथिंबीर.
३. ओवा, जिरेपूड एक चिमूटभर.
४. मीठ, तिखट चवीनुसार आणि एक टीस्पून साजूक तूप.
कृती :
१. सगळे घटक पदार्थ एकत्र करून तूप चोळून, कणीक चांगली घट्ट भिजवावी.
२. उंडा तव्यावर जरासाच शेकून घेऊन परत खाली काढून लाटून तुपावर भाजून घ्यायचा. कोकी भाजायची ही पद्धत जराशी वेगळी आहे. त्यानं कोकी खुसखुशीत होते.
गरमागरम कोकी मस्त लागते.
अक्की रोटी
ही कर्नाटकची रेसिपी आहे. दक्षिणेकडील पदार्थात एक प्रकारे साधेपणा असतो आणि तृप्तता देण्याचा गुण असतो. ही अतिशय सोपी रेसिपी आहे आणि चविष्ट रोटी होते. यात तांदळाची पिठी वापरलेली असली तरी तेवढ्याच भाज्याही आहेत.
साहित्य : १. तांदळाची पिठी १ वाटी,
२. एका गाजराचा कीस,
३. एक कांदा बारीक चिरून,
४. दोन मिरच्या बारीक चिरून,
५. एक टेबलस्पून आल्याचा कीस,
६. एक टेबलस्पून जिरं,
७. एक टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरून.
८. मीठ चवीनुसार.
९. एक टेबलस्पून ओल्या नारळाचा चव.
१०. पाणी, एक टीस्पून नारळाचं तेल.
पारंपरिक अक्की रोटीत विशेषतः शेपू बारीक चिरून घातला जातो.
डायबेटिक असाल तर तांदळाच्या पिठीऐवजी नाचणीचं पीठ वापरावं.
कृती :
१. सगळे घटक पदार्थ एकत्र करून छान मळून घ्यायचं.
२. या पिठाची कन्सिस्टंसी साधारणतः आपण थालीपीठाचं पीठ भिजवतो, त्याहून जराशी सैलसर असावी. पण अगदीच पातळ नको.
३. पाण्याचा हात लावून तव्यावर पातळसर अक्की रोटी थापून घ्यावी.
४. एक टीस्पून नारळाचे तेल सोडावे.
५. अक्की रोटी खरपूस भाजून घ्यावी. गरमागरम छान लागते.
मेथी घातलेले धपाटे
धपाटे हा आपला महाराष्ट्रातला पारंपरिक पदार्थ आहे. यात ज्वारीचं पीठ असतं. मेथी घालून केलेले धपाटे अधिक पौष्टिक होतात.
साहित्य : १. एक वाटी बारीक चिरलेली मेथी.
२. एक वाटी ज्वारीचं पीठ. एक टेबलस्पून बेसन.
३. एक टेबलस्पून लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट.
४. एक टेबलस्पून दही.
५. एक चिमूटभर हिंग, चिमूटभर ओवा, चिमूटभर जिरेपूड, अर्धा टीस्पून हळद, मीठ चवीनुसार. तेल एक टीस्पून.
कृती :
१. सगळे घटक पदार्थ एकत्र करून नीट मळून घ्या.
२. पाण्याचा हात लावून नॉनस्टिक तव्यावर पातळ धपाटे थापा. एक टीस्पून तेल घाला.
३. धपाटे खरपूस भाजून घ्या.
बीटरूटचा पराठा
साहित्य : १. एक वाटी बीटाची प्युरी, बीटाचं साल काढून ते किसून मिक्सरमधून वाटून घ्या. एखादं टेबलस्पून पाणी घाला.
२. एक वाटी गव्हाची कणीक.
३. अर्धा टीस्पून मीठ, हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट एक टीस्पून.
४. चिमूटभर जीरेपूड, एक टीस्पून भाजके तीळ, एक टीस्पून तेल.
कृती :
१. सगळे घटक पदार्थ एकत्र करून कणीक भिजवून घ्या. नीट मळून घ्या. एक टीस्पून तेल लावून कणीक पंधरा मिनिटं ठेवा.
२. नेहमीसारखे या कणकेचे प्लेन पराठे लाटा. मधे घडी घालून तेल/तूप लावायचे नाही.
पौष्टिक बीटरूट पराठे तयार आहेत. हे पराठे जरा गोडसर होतात. लहान मुलांना द्यायचे असतील, तर मिरची घालू नका.
याच पद्धतीनं पालक, गाजर, लाल भोपळा, काकडी याचेही पौष्टिक पराठे करता येतात.
राजगिरा पराठा
हा पराठा उपासालाही चालेल.
साहित्य : १. एक वाटी राजगिरा पीठ.
२. एक उकडलेलं रताळं.
३. एक टेबलस्पून हिरवी मिरची-आल्याची पेस्ट. एक टेबलस्पून दाण्याचा बारीक कूट.
४. जिरेपूड एक टीस्पून, मीठ चवीनुसार. तूप एक टीस्पून.
कृती :
१. उकडलेलं रताळं सोलून गर काढून घ्या. त्यात हिरवी मिरची आल्याचा पेस्ट, जीरेपूड, कूट, मीठ घालून कुस्करून घ्या.
२. त्यात राजगिरा पीठ घालून मळून घ्या. पाणी फारसं लागणार नाही. लागलंच तर दोन तीन टेबलस्पून पाणी घाला.
३. पराठे लाटून घ्या. एक टीस्पून तूप लावून भाजून घ्या.
रताळ्यानं या पराठ्याला नैसर्गिक गोडसर चव येते.
मिक्स व्हेज ओट्स पराठा
साहित्य : १. एक वाटी ओट्स कोरडेच भाजून गार झाल्यावर मिक्सरमधून पीठ करून घ्यावेत.
२. एक वाटी मिक्स भाज्या, बारीक किसलेला कांदा, गाजर, सिमला मिरची. एक टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरून.
३. अर्धा टीस्पून मिरपूड, एक टीस्पून जिरेपूड, एक चिमूटभर ओवा, एक टीस्पून हळद, एक टेबलस्पून तिखट, मीठ चवीनुसार.
४. कोमट पाणी. एक टीस्पून तेल.
कृती :
१. भाजलेल्या ओट्सचं पीठ, मसाले आणि सगळ्या किसलेल्या भाज्या एकत्र करून मळून घ्यावे. कोमट पाणी थोडे थोडे घालून भिजवावे. एक टीस्पून तेल लावून दहा मिनिटं ठेवावं.
२. हलक्या हातानं पराठे लाटावेत. हे गव्हाचं पीठ नसल्यानं ग्लुटेन नसतं. त्यामुळे पराठे लाटणं जरासं अवघड जाऊ शकतं. तसंच हे पराठे फारसे सुबक दिसणार नाहीत.
३. नॉनस्टिक तव्यावर ओट्स पराठे खरपूस भाजून घ्यावेत.