निसर्गमित्र बंधारा हा नावाप्रमाणेच संपूर्ण फोल्डिंगचा असणारा लोखंडी सामुग्रीने बनविलेला असतो. पावसाळा सुरू झाला की हा बंधारा काढून ठेवायचा आणि दिवाळीच्या दिवसात हा बंधारा पुन्हा लावायचा. हा काढता आणि लावता येणार बंधारा जलसाठा वाढवणारा आणि निसर्गसंपदा कायम ठेवणारा आहे. नॅचरल सोल्युशनचे डॉ. अजित गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली घडीच्या बांधाची संकल्पना २०११ साली प्रथम शहापूर तालुक्यात वेहळोली येथे साकारण्यात आली.
—-
महाराष्ट्रात मुबलक पाऊस पडून देखील पुढच्या काही महिन्यांत पाण्याचं संकट समोर उभं ठाकतं. दुर्गम भागात तर पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागते. पालघर जिल्ह्याच्या आदिवासी पाड्यावर मुलींना पाण्यामुळे शिक्षणाला रामराम करावा लागण्याच्या घटना घडल्या आहेत. पाणी हे जीवन असल्यामुळे पाण्यासाठी वाट्टेल ते करण्याची वेळ भविष्यात येऊ शकते. जलसंवर्धनाच्या दृष्टीने विविध ठिकाणी सरकारी यंत्रणेबरोबर काही सामाजिक संस्था पाणी अडवा पाणी जिरवा हा नारा देऊन ठिकठिकाणी बंधारे बांधून जलसाठा वाढवत आहेत. बंधार्यामुळे भूजल पातळी वाढण्यास नक्कीच मदत होत असली तरी काही बंधार्यामुळे गाळ, पालापाचोळा अडकून काहीशी अडचण होते. मोठ्या पावसात डोंगरउतारावर तोडलेली व उन्मळून पडलेली झाडे पुराबरोबर वाहून येतात आणि जिथे बंधारे आहेत तिथे अडकतात. छोट्या फांद्या अडकल्या की बंधार्याच्या वरच्या अंगाला, थोड्या काळासाठी का होईना पूरजन्य परिस्थिती तयार होते. पाण्याला अडथळा तयार झाल्यामुळे ओढ्याच्या बाजूच्या शेतामधून पुराचे पाणी वाहून जाते व त्याचबरोबर शेतातील सुपीक माती वाहून जाते. काही ठिकाणी ओढ्यांचे मार्गसुद्धा बदलले आहेत. या पार्श्वभूमीवर बंधारे जसे फायद्याचे आहेत तसेच कालांतराने ते त्रासदायक ठरू शकतात. परंतु यावर उपाय म्हणून फ्लँज व्हेंटेड बांधांची उपाययोजना जेष्ठ जलतज्ज्ञ डॉ. अजित गोखले आणि त्यांच्या सहकार्यांनी केली. विविध संस्थांच्या मदतीने त्यांनी दोनशेहून जास्त फ्लँज व्हेंटेड बांधांची महाराष्ट्राच्या विविध भागांमधे निर्मिती केली. अशा प्रकारच्या बांधांमधे गाळ रहात नाही. हे खरे असले तरी त्यातील एक मोठी उणीव त्यांच्या लक्षात आली. ती म्हणजे, अशा व्हेंटमधून बाहेर पडताना पाण्याचा वेग अतिशय वाढतो. या वेगाच्या विरुद्ध जाणे माशांना शक्य होत नाही. यामुळे माशांची पैदास कमी होते. पावसाळ्यात नदी-खाडीतून वरच्या दिशेने अंडी घालण्यासाठी येणारे मासे या बंधार्यात अंडी घालू शकत नाहीत, त्यांच्या पुढच्या पिढ्या निर्माण होऊ शकत नाहीत याने माश्यांच्या प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे. परंतु याला निसर्गमित्र साखळी बंधारे (डिटॅचेबल किंवा रिमूव्हेबल) पर्याय म्हणून उत्तम असल्याचे जाणकार सांगतात.
काय आहे निसर्गमित्र बंधारा?
निसर्गमित्र बंधारा हा नावाप्रमाणेच संपूर्ण फोल्डिंगचा असणारा लोखंडी सामुग्रीने बनविलेला असतो. पावसाळा सुरू झाला की हा बंधारा काढून ठेवायचा आणि दिवाळीच्या दिवसात हा बंधारा पुन्हा लावायचा. हा काढता आणि लावता येणार बंधारा जलसाठा वाढवणारा आणि निसर्गसंपदा कायम ठेवणारा आहे. नॅचरल सोल्युशनचे डॉ. अजित गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली घडीच्या बांधाची संकल्पना २०११ साली प्रथम शहापूर तालुक्यात वेहळोली येथे साकारण्यात आली. त्यानंतर २०१६ साली मुरबाड तालुक्यात आंबेमाळी येथे एक व २०१९मध्ये कडवई येथे ३ बंधारे बनवले. २०२०मध्ये बदलापूर बेंडशीळ गावात कृषिभूषण राजेंद्र भट यांच्या शेताशेजारून वाहणार्या ओढ्यात असे तीन बंधारे बांधलेले आहेत. यातील एका बांधासाठी नीरजा संस्थेचे यशवंत मराठे आणि सुधीर दांडेकर यांनी पुढाकार घेऊन, तब्बल साडेतीन लाख रुपये मदत दिली आहे. या बंधार्यामुळे वाहत्या पाण्याला कोणताच अडथळा होत नाही. कमी वेळात तो बांधता आणि काढता येतो. निसर्गमित्र बंधारा पावसाळ्यात काढला जातो, त्यामुळे प्रवाहात कोणतीच बाधा उरत नाही. सर्व गाळ वाहून गेल्यानंतर पावसाळा संपत येतो, त्यावेळी हा बंधारा बांधल्यावर बांधामागे फक्त पाणी साचून भूगर्भात पाण्याची पातळी वाढण्यास मदत मिळते. पाण्याच्या कमी प्रवाहात हा बंधारा जोडता येऊ शकतो.
वलगणीचे किंवा चढणीचे आणि उतरणीचे मासे म्हणजे काय?
पावसाळ्यात समुद्र, खाडी अथवा नदीतील मासे अंडी घालण्यासाठी डोंगराच्या दिशेने येतात. मात्र परत जाताना सिमेंट क्राँक्रीटचे बंधारे त्रासदायक ठरतात. यासाठी निसर्गमित्र बंधारे (डीटॅचेबल किंवा रिमूव्हेबल) भरपूर फायदेशीर ठरू ठरतो आहे.
पाऊस आला की माशांच्या प्रजननाचा काळ असतो आणि अनेक माश्यांचे प्रजनन हे डोंगरांमधील छोट्या ओढ्यामध्ये आणि शेतांमध्ये होते. हे ‘वलगणी’चे मासे पावसाळ्याच्या सुरुवातीला पाण्यातून उताराच्या विरुद्ध बाजूस वर चढतात. समुद्रातील मासळी खाडीमध्ये, खाडीतील मासळी नदीमध्ये, नदीतील मासळी छोटे ओढे-नाले यांच्यामध्ये प्रवाहाच्या उलट दिशेने प्रवास करून येते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक किनारा, केरळ किनारा तसेच पूर्व किनार्यावरील सर्व खाड्यांमधून मासे वर वर जात असतात. वर्षातून केवळ एकच वेळ, म्हणजे सुरुवातीच्या पावसातच वलगण सापडते. त्यानंतर वलगण दुर्मिळ होते. असे मासे खाण्यासाठी चविष्ट असतात. अनेकदा शेतामध्ये वलगणीची शिवडा, वाम, मल्याचे मासे, कटला, मुरे, डाकूमासे ही मासळी मिळते. यात पिल्लेही असल्यामुळे शेतातील किडींचा ही पिल्ले नाश करतात. ही पिल्लं थोडी मोठी झाल्यावर उत्तरा नक्षत्रात पाण्याच्या प्रवाहाबरोबर नदी खाडी किंवा समुद्रात जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र परतीच्या प्रवासात पक्के बंधारे अडथळा ठरतात. आणि अनेक माशांचे जीवन तिथेच समाप्त होतं आणि या माशांच्या जाती कमी होतात. निसर्गमित्र बंधारा पावसाळ्यात बांधत नसल्यामुळे या माशांसाठी संजीवनीदायक राहतो.
जलसंधारणाचे विविध प्रकार
कोल्हापूर प्रकारचा बंधारा हे धरणाचे छोटे रूप असते. कोल्हापूर संस्थानचे अधिपती असलेल्या छत्रपती श्री राजाराम महाराजांनी या प्रकारच्या बांधांची सुरुवात कोल्हापूरजवळील कसबा बावडा येथे १९०८ साली केली. हा दगडी बांधणीचा आणि पूल म्हणूनही वापरण्याजोगा असा बांध आहे. पुलाखालचे पावसाळी पाणी वाहू देण्याचे गाळे लाकडी फळ्यांच्या दोन ओळी व त्यांच्यामधे ठासून भरलेली माती यांनी बंद केले म्हणजे तो बांधाचे अथवा छोट्या धरणाचे रूप घेतो. हा बंधारा गेली एकशे तेरा वर्षे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा किंवा केटीविअर या नावाने अखिल भारतीय प्रसिद्धी पावला आहे. त्याचा विविध ठिकाणी विविध प्रकारे वापर करून आजवर जलसंधारण केले गेले आहे.
कोल्हापूर परिसरात यशस्वी ठरलेला हा बंधारा प्रकार कोकणात फारसा यशस्वी होत नाही. याचे कारण कोकणातील मातीतले खेकड्यांचे वैविध्य आणि वैपुल्य. ते थोड्याच दिवसांत बांधात भरलेली माती पोखरून टाकतात.
लूज बोल्डर, गॅबियन व सिमेंट नाला बंधारे
वरील सर्व प्रकार पाणी अडवतात आणि त्यांचा वेग कमी करतात. असे पाणी मग भूगर्भात मुरावे अशी अपेक्षा असते. परंतु तसे केले की त्या प्रवाहाची गतिज ऊर्जा कमी होते. त्याची गाळ दगडगोटे वहन करण्याची क्षमता घटते. त्यामुळेच गाळ साठत जातो. कुठे कुठले बंधारे बांधायचे याचे तारतम्य असायला हवे.
कमी पावसाच्या कमी उताराच्या नाल्यांमधे पाण्याला वेग कमी असतो. अशा ठिकाणीच फक्त लूज बोल्डर बांध म्हणजे स्थानिक उपलब्ध सुट्यासुट्या दगडांनी बनवलेला बांध घालावा हे शास्त्र आहे. पण आजकालच्या कॉपी पेस्ट जमान्यात कुठल्याही परिस्थितीत असे बांध घातलेले पाहायला मिळतात.
लोखंडी जाळीच्या सांगाड्यात नदी-ओढ्यातील उपलब्ध दगड भरून जो बांध घातला जातो, त्यास गॅबियन बंधारा असे म्हणतात. ज्या ठिकाणी पर्जन्यमान जास्त असेल आणि नाल्याच्या तळाचा उतार जास्त असेल, अशा ठिकाणी प्रवाहामुळे मोकळ्या दगडांचा बांध- लूज बोल्डर बांध टिकू शकत नाही. अशा ठिकाणी गॅबियन बंधारे उपयुक्त ठरतात.
गॅबियन बंधारे पाणी व माती सुधारणांसाठी जिथे बांधायचे त्या नाल्याची रुंदी दहा मीटरपेक्षा अधिक असू नये. सर्वसाधारण बंधार्यांप्रमाणेच नाल्याच्या वळणावर हे बंधारे बांधू नयेत. सर्वसाधारणपणे अशा बंधार्याची उंची एक मीटरपेक्षा जास्त नसावी. पण बर्याच ठिकाणी दोन तीन किंवा चार मीटरचेही गॅबियन बांधले जातात. बंधार्यामुळे पाण्यासोबत वाहून येणारी माती बंधार्यांच्या वरच्या बाजूला अडविली जाते. गॅबियन स्ट्रक्चर मूलतः मृद्संधारणासाठी असल्याने त्यात माती, दगडगोटे, गाळ अडकून राहतोच.
यापुढची पायरी म्हणजे सिमेंट नाला बांध. ही छोटीशीच पण मजबूत धरणेच असतात. ती पाणी अडवतात आणि त्याचा वेग तोडतात. त्यामुळेच वर लिहिल्याप्रमाणे लवकरच हे सर्व प्रकारचे बांध गाळ व गोट्यांनी भरून जातात व त्यांची उपयुक्तता शून्यावर येते. याकरता अशा सर्व ठिकाणी काढता-घालता येण्याजोगे निसर्गमित्र बंधारे बनवण्याची गरज आहे.
(या लेखासाठी डॉ. अजित गोखले (ज्येष्ठ जलतज्ज्ञ) व अक्षय खोत (जल अभ्यासक) यांच्याकडून माहिती मिळाली आहे.)