आम्हाला मिळालेली जागा आयताकृती आहे. एका बाजूस सुंदर, बारमाही वाहणारी काळू नदी, एका बाजूस खडवलीकडे जाणारा रस्ता, दोन बाजूस रुंदी गावातील शेते असं सुंदर लोकेशन. या प्लॉटमध्ये छोट्या छोट्या टेकड्या आहेत, कमी उंचीच्या. पण उतार बरेच आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी वेगाने वाहते आणि बरोबर मातीही वाहून नेते. प्रकल्पाची पूर्वतयारी म्हणून पर्यावरण दक्षता मंडळाच्या मामणोली येथील केंद्रात जंगली झाडाची नर्सरी तयार करण्यात आली. वृक्षारोपणाच्या वेळी दोन वर्षे वाढलेली रोपे तयार होती. यामुळे लावलेली रोपे जगण्याचे प्रमाण वाढले. रोपांना पाणी घालण्याचा कालावधी कमी झाला.
– – –
देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेलं जंगल. ही आपली परंपरा आहे. गावाच्या लागत असलेला जंगलाचा तुकडा किंवा भाग देवाच्या नावाने राखून ठेवायचा. तिथली झाडं तोडायला बंदी असायची. ती तोडली तर देवाचा कोप होतो अशी समजूत होती. त्या भीतीपोटी ते जंगल राखलं जायचं आणि त्याचा फायदा स्वाभाविकपाने त्या गावाचं पर्यावरण राखायला व्हायचा. देवराई हा स्थानिक पर्यावरण राखण्याचा एक अत्यंत प्रभावी परंपरिक उपाय किंवा पद्धत आहे. हळूहळू ही भीती नाहीशी झाली आणि जंगल राखलं पाहिजे, ते पर्यावरण सुरक्षित ठेवण्याचा प्रमुख आधार आहे, हा आधुनिक विचारही लोकांपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे अनेक देवराया नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था गेली २२ वर्षे पर्यावरण पर्यावरण शिक्षण व जनजागरण हे मुख्य उद्दिष्ट घेऊन काम करते आहे. वनीकरण, निसर्गायणसारखे ग्रामीण भागातील पर्यावरणावर काम करणारे केंद्र, प्लास्टिकचे रिसायकलिंग अशी अनेक कामे संस्थेने केली आहेत. मंडळाचा देवराई हा वनीकरण प्रकल्प टिटवाळा रेल्वे स्टेशनजवळील रूंदे गावात गेली पाच वर्षे म्हणजे १२ जानेवारी २०१७पासून चालू आहे. महाराष्ट्र शासनाच्या वन विभाबरोबर हा प्रकल्प केला जात आहे. वन खात्याने मंडळाला या प्रकल्पासाठी १९ हेक्टर म्हणजेच ५० एकर जमीन दिली आहे. सात वर्षांत या जागेवर जंगल उभे करून जमीन वनखात्याला परत करावयाची आहे.
आम्ही म्हणजे आमच्या पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेने वृक्षारोपणचे बरेच कार्यक्रम केले आहेत. झाड लावण्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणारे वर्ग आम्ही गेली अनेक वर्षे चालवत आहोत. हिरवाईचे प्रेम असणारे व शहरातल्या छोट्याशा जागेतही ती जपणारे अनेक लोक आहेत. त्यांच्या प्रयत्नाचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गेली १५ वर्षे नंदनवन घरगुती बाग स्पर्धांचे आयोजन करत आहोत. पण प्रत्यक्ष वनीकरण किंवा जंगल तयार करणं याचा अनुभव आम्हालाही नव्हता. त्यामुळे हे आमच्यापुढे मोठं आव्हान होतं.
जी जागा आम्हाला देण्यात आली तिची आम्ही पाहणी केली. देवराईवर भरपूर अभ्यास असलेले डोंबिवलीचे उमेश मुंडले, माहीम निसर्ग उद्यानाच्या उभारणीत मोलाचा वाटा असलेले अविनाश कुबल यांच्यासारख्या तज्ज्ञांनी या जागेला भेट दिली, पाहणी केली. जागेचा चढउतार कसा आहे, माती कशा प्रकारची आहे, अशा अनेक गोष्टीवर त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या जागेत दोनतीन वेगवेगळ्या प्रकारची माती आहे. चिक्कणमाती, मुरमाड माती व रेतीयुक्त माती, जिच्यात पोषक घटकांची कमतरता आहे. याचा झाडे कोणती लावायची याची निवड करताना फार उपयोग झाला.
हा प्रकल्प मिळाल्यावर आम्ही भरपूर विचारमंथन केलं. खूप लोकांशी चर्चा केली. नुसते वनीकरण म्हणून या प्रकल्पाकडे न पाहता) त्या जागेवरील स्थानिक परिसंस्थेचे पुनरुज्जीवन करणे (इकोरिस्टोरेशन) असे या प्रकल्पाचे उद्दिष्ट ठरवले. त्या दृष्टिकोनातून अनेक गोष्टी केल्या गेल्या. परिसंस्थेतील वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक इ सजीवांचाच नाही तर माती, पाणी या सगळ्याचाच विचार करून म्हणजे एकात्मिक पद्धतीने विचार करून प्रकल्पाची आखणी केली गेली.
आम्हाला मिळालेली जागा आयताकृती आहे. एका बाजूस सुंदर, बारमाही वाहणारी काळू नदी, एका बाजूस खडवलीकडे जाणारा रस्ता, दोन बाजूस रुंदी गावातील शेते असं सुंदर लोकेशन. या प्लॉटमध्ये छोट्या छोट्या टेकड्या आहेत, कमी उंचीच्या. पण उतार बरेच आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी वेगाने वाहते आणि बरोबर मातीही वाहून नेते. प्रकल्पाची पूर्वतयारी म्हणून पर्यावरण दक्षता मंडळाच्या मामणोली येथील केंद्रात जंगली झाडाची नर्सरी तयार करण्यात आली. वृक्षारोपणाच्या वेळी दोन वर्षे वाढलेली रोपे तयार होती. यामुळे लावलेली रोपे जगण्याचे प्रमाण वाढले. रोपांना पाणी घालण्याचा कालावधी कमी झाला.
जागा मिळाली तेव्हा तिथे माणूस लपेल एवढे तण, गवत, रान माजले होते. खाजखुजली भरपूर प्रमाणात होती. काही प्रमाणात झाडे लावलेली होती. हे सगळं स्वच्छ करण आवश्यक होतं. त्याशिवाय किती झाड लावता येतील, कुठे लावता येतील हेच कळत नव्हतं. ३०/३५ मजूर लावून सगळं प्लॉट स्वच्छ केला आणि काय गंमत, अनेक झाडं त्यातून निघाली. गवताने त्यांना झाकून टाकलं होतं. या मूळच्या झाडांचा सांभाळ केला गेला. त्यांचं सिंगलिंग केलं गेलं, म्हणजे झाडाची सगळ्यात जोमाने वाढणारी फांदी ठेवायची आणि बाकीच्या छोट्या, खुरटलेल्या फांद्या छाटून टाकायच्या. त्यामुळे राखलेली फांदी जोमाने वाढते. एकूण ५० एकर जमीन होती. दोन वर्षांत वृक्षारोपण पूर्ण करायचं होतं. त्यामुळे २५ एकर पहिल्या वर्षी तर उरलेली २५ एकर दुसर्या वर्षी करायची असे ठरवले. भारतीय, स्थानिक झाडे लावायचे असे ठरले. एकूण १५० प्रजातींची यादी तयार केली होती. पुण्यापासून शहापूरपर्यंत अनेक रोपवाटिकांना भेट दिली. आतापर्यंत १२५ प्रजातींची रोपे लावून झाली आहेत. सुरुवातीला गवात काढताना एका ठिकाणी मोरांची घरटी दिसली. मोर, त्यांची पिल्ले माणसांना बघून पळू लागले. तो भाग तसेच ठेवावा असे ठरवले आणि तसेच आज पाच वर्षे झाली तरी तो तसाच राखला गेला आहे.
नवीन रोपे लावण्यापूर्वी आधीच्या झाडाची गणना केली. ५० प्रजातींची झाडे आहेत असे आढळून आले. ती राखली गेली. पक्षीगणनाही करण्यात आली. ५२ प्रकारचे पक्षी दिसून आले. लोकसहभागातून वृक्षारोपणाची कल्पना होती. समाजाचा पुरेपूर सहभागातून हा प्रकल्प उभा राहावा, ज्यामुळे तयार झालेले जंगल लोकांना आपले वाटेल, समाजाकडून ते सात वर्षांची मुदत संपली तरी राखले जाईल. अनेक शाळा, महाविद्यालये, एनसीसी, एनएसएस, कॉर्पोरेट कंपन्या, विविध मंडळे, संस्थांचे कार्यकर्ते अशा अनेक लोकांच्या सहभातून रोपे लावली गेली. त्यांची या प्रकल्पात किती भावनिक गुंतवणूक झाली, याचा प्रत्यय लॉकडाऊनच्या काळात आला. वृक्षारोपणात सहभागी झालेल्या लोकांनी, शाळांनी फोन करून विचारले की प्रकल्प कसा चालू आहे, झाडांना पाणी कोण घालतंय? घरातील झाडांना पाणी घालतो, सांभाळतो, त्यांच्यासाठी कष्ट करतो म्हणून आपल्याला त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण होते तशीच भावना इथे दिसून आली.
पावसाळ्यात वाहून जाणारी माती थांबवण्यासाठी उतारावर चार खणले. दर पावसाळ्यात ते भरून जातात, पावसाळ्यापूर्वी माती काढली जाते. १४ दगडी बंधारे घालून जागोजागी पाणी अडवलं आहे. यामुळे मातीची धूप थांबते आणि जमिनीत पाणी मुरून भूजलपातळी वाढली जाते. जमिनीचा एक छोटा तुकडा तसाच ठेवला आहे. प्रयोग म्हणून. आपोआप त्यात काय परिवर्तन होतं ते पाहण्यासाठी. आता प्रकल्पाला ५ वर्षे झाली आहेत. लावलेली रोपे आता १५/२० फूट उंच वाढली आहेत. काही ठिकाणी तर एवढी दाट झाली आहेत की सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहचत नाही. आधुनिक युगातली ही देवराई फुलते, फळते आहे.