पेट्रोल पंप मिळवण्यासाठी रामरावांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळी प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यांनी सांगितलेल्या मोठ्या रकमाही त्या लोकांच्या खात्यात जमा केल्या. पण पेट्रोल पंप काही त्यांना मिळालाच नाही… आणि या पेट्रोल पंपापायी त्यांच्या लाखो रुपयांचा धूर मात्र निघाला. पेट्रोल, गॅस, एजन्सी मिळवण्यासाठी कोणतीही जाहिरात पाहिली तर ती खरी आहे का? याची खात्री करा.
– – –
रामराव पाटील हे गावातले रुबाबदार व्यक्तिमत्व. कुणाला काही मदत लागली की त्यासाठी धावून जाणारी व्यक्ती अशी त्यांची दुसरी ओळख. भंडार्यापासून काही अंतरावर पाटील यांचे गाव. तिथे त्यांची २० एकर शेती होती. पण त्यातली काही जमीन ही महामार्गाच्या रुंदीकरणात गेली होती, त्याच्या मोबदल्यापोटी त्यांना अडीच कोटी रुपये मिळाले होते. आपल्या जागेत आपण पेट्रोल पंप सुरु केला तर चांगले अर्थार्जन होऊ शकेल, असा विचार त्यांनी केला. रामरावांचा मुलगा तुषार नुकताच शहरातून आयटीआयचे शिक्षण घेऊन गावात आला होता, त्यामुळे पंप चालवण्यासाठी आपल्याला त्याची चांगली मदत होऊ शकते, असा विचार रामराव करत होते.
पंप कसा मिळवायचा, त्याचे लायसन्स कसे काढायचे, त्याची प्रक्रिया काय आहे, याची माहिती काढण्यास त्यांनी सुरुवात केली. घरच्या कम्प्यूटरवर आपण ही माहिती शोधू शकतो, असा विचार करून रामरावांनी गुगलवर सर्च करायला सुरवात केली, तेव्हा एका वेबसाईट्वर त्यांना ‘स्टार्ट युअर न्यू पेट्रोल पंप’ अशी एक ओळ पाहायला मिळाली. त्यावर त्यांनी क्लिक केले. त्यामध्ये लिहिले होते, केंद्र सरकारकडून तुम्हाला पेट्रोल पंपाचे लायसेन्स दिले जाते. त्यानंतर लिहिले होते ‘अप्लाय हियर’.
पंप मिळवण्याची प्रक्रिया फारच सोपी दिसत आहे, असा विचार करून त्यांनी त्यावर क्लिक केले. त्यावर एक फॉर्म आला, रामरावांनी तो लगेच भरला. त्यामध्ये आवश्यक असणारी माहिती, नाव, पत्ता, जागेचा सातबारा, फोटो ही सर्व माहिती भरली आणि ती ‘पेट्रोलपंपडील्स केबीएस डॉट कॉम’ यावर अपलोड केले. त्यानंतर अवघ्या दोन तासांनी रामराव यांना फोन आला, तुम्ही जी माहिती भरली आहे, ती ऑनलाइन पोर्टलवर भरायची आहे, ती देखील चार दिवसांनी. यासाठी तुम्हाला ५५ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करावे लागणार आहेत. त्याचे डिटेल्स तुमच्या मोबाईलवर पाठवले आहेत. आपली सर्व प्रक्रिया ही पारदर्शक असून ती तुम्हाला टप्प्याटप्प्याने पूर्ण करावी लागणार आहे, असे त्यांना सांगण्यात आले. आपल्या जागेचा व्हिडिओ काढून त्याची कागदपत्रे देखील त्यावर पाठवण्यात यावीत, असे त्यांना सांगण्यात आले होते.
रामरावांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळी प्रक्रिया पूर्ण केली होती. दोन आठवड्यांनी त्यांना मोबाईलवर मनोज सक्सेना नावाच्या व्यक्तीचा फोन आला. ‘पेट्रोल पंप घेण्यासाठी तुमचा अर्ज आला आहे, तो मंजुरीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. तो मंजूर करायचा असेल तर दोन लाख रुपये द्यावे लागतील,’ असे सांगण्यात आले. तेव्हा ‘ही रक्कम खूप होते, काहीतरी कमी करा’, असे म्हणत त्यांनी किंमत कमी करण्याची विनंती मनोजला केली. त्याने ५० हजार रुपये कमी केले आणि दीड लाख रुपयांचा व्यवहार ठरला. लगेच मनोजने कोणत्या बँक खात्यात हे पैसे टाकायचे त्याचा तपशील रामराव यांना पाठवला. त्यांनी देखील क्षणाचा विलंब न करता ती रक्कम त्या खात्यामध्ये भरून टाकली होती.
दुसर्या दिवशी पुन्हा मनोजचा रामराव यांना फोन आला, तुम्ही पेट्रोल पंपाचे बँक अकाउंट कोणत्या बँकेत उघडले आहे, तुमचा जीएसटी नंबर याचा तपशील घेतला. तुम्हाला निवड झालेल्या पेट्रोल पंपांची यादी ही ‘सँक्शनपेट्रोलपम्प डॉट कॉम’ या वेबसाईटवर पाहायला मिळेल असे त्यांना सांगितले. त्यासाठीची लिंक रामराव यांना त्यांच्या व्हॉट्सअपवर पाठवण्यात आली होती. रामराव त्यावर गेले तेव्हा इथे अकाऊंट तयार करण्यासाठी तुम्हाला २५ हजार ५०० रुपये भरावे लागणार आहे, ते कुठे आणि कसे भरायचे याचा तपशील त्यामध्ये देण्यात आला होता. रामराव यांनी ती रक्कम देखील भरली, त्यानंतर आपला अॅप्लिकेशन नंबर टाकला, तेव्हा आपले पेट्रोल पंपाचे लायसेन्स तयार झाल्याचे त्यांना दिसले, पण ते डाऊनलोड होत नव्हते. त्यामुळे रामराव यांनी मनोजला फोन केला, पण तो बंद होता, म्हणून त्यांनी वेबसाइटवर देण्यात आलेल्या कस्टमर केअर नंबरवर फोन केला. मात्र, तिथून देखील काहीच प्रतिसाद आला नाही.
या सगळ्या प्रकारामुळे रामराव अस्वस्थ झाले होते. इतक्यात दुसर्याच एका नंबरवरून त्यांना फोन आला आणि आपण कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे समोरच्या महिलेने सांगितले. रामराव यांनी पेट्रोल पंपाचे लायसेन्स मला वेबसाइटवर दिसत आहे, पण ते डाऊनलोड होत नाही, त्यासाठी काय करावे लागेल विचारले. तेव्हा ती म्हणाली, ‘तुम्हाला हे लायसेन्स घेण्यासाठी दिल्लीला जावे लागेल. तिथे मंत्री महोदयांच्या हस्ते तुम्हाला ते देण्यात येईल. पण त्यासाठी आवश्यक असणारा स्क्रोल नंबर आपल्याकडे असणे आवश्यक आहे. तो मिळवण्यासाठी तुम्हाला एक लाख रुपये भरावे लागणार आहेत. बँकेच्या खात्यात ते ऑनलाइन ट्रान्सफर केले की लगेच नंबर तुम्हाला मिळेल.’ रामराव यांनी आंधळा विश्वास ठेवून पुन्हा एकदा ते पैसे भरले. पण तेव्हा आपल्याला सारखे असे पैसे का भरावे लागत आहेत, अशी शंका त्यांच्या मनात आली होती. पण आता आपण पैसे गुंतवून बसलो आहोत, आता जर पैशाचा विचार करून तो अर्धवट सोडून दिला तर मिळालेला पंप हातातून जाऊ शकतो, असा विचार त्यांच्या मनात आला. आपल्याला लायसेन्स घेण्यासाठी दिल्लीला जावे लागणार आहे, त्यामुळे रामराव यांनी मुलाचे आणि त्यांचे दोघांचे विमानाचे तिकीट बुक केले.
पुन्हा एकदा दुसर्या दिवशी सकाळी पेट्रोल पंपाच्या कॉल सेंटरमधून रामराव यांना फोन आला. ‘तुम्हाला लायसेन्स घेण्याच्या अगोदर जीएसटीची रक्कम अॅडव्हान्स भरावी लागणार आहे, त्याची लिंक तुम्हाला पाठवते असे म्हणून त्या महिलेने फोन ठेवून दिला. आता हा सगळा प्रकार रामराव यांना संशयास्पद वाटत होता, म्हणून त्यांनी जीएसटी विभागात काम करणार्या त्यांच्या एका मित्राला फोन करून आतापर्यंत घडलेल्या सगळ्या प्रकारची कल्पना दिली. तेव्हा हा सगळा प्रकार फसवा असून तुमची फसवणूक झाली असल्याचे त्यांना सांगितले. हे ऐकल्यावर रामराव यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी तातडीने या प्रकाराची तक्रार सायबर पोलिसांकडे केली. ज्या वेबसाईट्वर पेट्रोल पंप मंजूर झाल्याचे पाहिले होते, तिथे पुन्हा लॉगिन करण्यासाठी पैसे भरावेत असा मेसेज येत होता.
पोलिसांनी हा सगळा प्रकार तपासला तेव्हा तो पश्चिम बंगाल, ओरिसा इथल्या मोबाईल नंबरवरून झाल्याचे आढळून आले होते, तर रक्कम भरलेले बँक खाते हे दिल्लीमधील होते. या सगळ्या वेबसाईट तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आल्या होत्या. रामरावांनी कोणतीही शहानिशा न केल्यामुळे ते यामध्ये फसले होते. फक्त पेट्रोल पंपाच्या बाबतीत नाही तर मोबाईल टॉवर, गॅस एजन्सी मिळवून देण्यासाठी असे प्रकार होत असतात.
हे लक्षात ठेवा…
पेट्रोल, गॅस, एजन्सी मिळवण्यासाठी कोणतीही जाहिरात पाहिली तर ती खरी आहे का? याची खात्री करा. त्याची शहानिशा झाल्यानंतरच आपली माहिती द्या. सरकारी वेबसाईट या ‘जीओव्ही डॉट कॉम’ या डोमेनच्या असतात, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. एजन्सी मिळवण्यासाठी पैसे भरत असताना ते बँक खाते कोणते आहे, कुणा खासगी व्यक्तीचे तर नाही ना, याची खात्री करूनच पैसे भरा.