• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

स्वच्छ बोला, स्पष्ट बोला, घोळ टाळा

- शुभा प्रभू साटम (डोक्याला शॉट)

Nitin Phanse by Nitin Phanse
September 22, 2023
in भाष्य
0

इथे स्वच्छ म्हणजे निर्भेळ, सात्विक असा नसून आपल्याला काय सांगायचे आहे, ते आशय स्पष्ट होईल अशा तर्‍हेने विशद करणे, अशा अर्थाने आहे. आता म्हणाल की ही बाई कुठेही चूक काढते. असेल पण, कारण कोकणी खडूसपणा आणि वयोज्येष्ठता. पण बोलण्यात स्पष्टपणा नसेल तर अर्थाचे अनर्थ होतात.
उदाहरण देते. एका पूजेचे आवतण आले. संध्याकाळची पूजा. एका मराठी घरात सत्यनारायण किंवा तत्सम पूजा सकाळी, आणि निवडक लोकांना जेवण, संध्याकाळी दर्शन प्रसाद असे असते. बरोबर? मी त्या बेताने गेले. दर्शन प्रसाद झाला आणि निघणार तर यजमान म्हणतात, अरे खाना नहीं खाना है क्या? मी बुचकळ्यात. परत आमंत्रण बघितले तर त्यात काही नमूद नव्हते. घरी जेवण तयार होते. बघायला गेल्यास फार काही नाही आणि तसे पाहिल्यास बरेच काही. कार्यक्रम काय आहे, जेवण आहे की नाही, हे स्पष्टपणे लिहायला हवे ना. लिहिले असते, तर स्वयंपाकाचे कष्ट वाचले असते. आता त्यांना नम्र नकार दिला तर तेच म्हणणार, काय बाई शिष्ट आहे. इतका आग्रह करून जेवली नाही.
दुसरे उदाहरण, एका अल्ट्रा पॉश घरातून कम ओव्हर फॉर ड्रिंक्स इवनिंग म्हणजे संध्याकाळी दारू प्यायला या (हे फार चीप वाटते ना?) असे आमंत्रण आले. आता संध्याकाळी पेयपान म्हणजे त्यात नंतर जेवणाचा बेत असणारच, या मध्यमवर्गीय बेताने गेलो. माफक ड्रिंक आणि काही स्नॅक्स, एक तास उलटल्यानंतर पण जेवणाची चाहूल नाही. आम्हाला कळेना की विषय कसा काढावा? शेवटी आम्हीच काढता पाय घेतला. मग उलगडा झाला की इव्हिनिंग ड्रिंक म्हणजे फक्त दारू आणि चकणा इतकेच अशा पॉश घरात असते. जेवण नाही. घरी येऊन अंडा पाव खाल्ले चक्क.
तेव्हापासून मी अतिशय सावध असते. मी जरी कोणाला आवतन दिले तरी शाकाहारी की मांसाहारी? सर्व मासांहार चालतो का? की ठराविक? आणि आता व्हेगन? इतके विचारते. कारण खमंग बिर्याणी केली आणि पाहुणे शाकाहारी असले तर?
मुद्दा काय की आपले बोलणे सुस्पष्ट हवे. मुंबईत बॉम्बस्फोट झाले तेव्हा तत्कालीन गृहमंत्र्यांनी ‘बडे शहरो में ऐसे छोटे छोटे हादसे होते है’ असे विधान केले होते आणि मग ते किती संवेदनाशून्य आहेत, किती फालतू बोलले असा गदारोळ झाला होता. वास्तविक त्यांचे हिंदी म्हणजे ‘हम उंचे जिने से धाडकन पड्या’ असे होते. समोर राष्ट्रीय मीडिया असल्याने ते हिंदीत बोलले आणि अर्थाचा विपर्यास झाला.
मोघम गुळमुळीत बोलणं हे फक्त हुशार राजकारणी लोकांना जमणारे, आपल्यासारख्या अतिसामान्य लोकांनी सरळ बोलावे. नाहीतर डोक्याला शॉट होतात.
व. पु. काळे यांची एक कथा आहे, त्यात लग्नाच्या स्वागत समारंभात एक पाहुणा नवरीला बघून म्हणतो, अरे हिच्याशी लग्न झाले, काही खरे नाही याचे. आणि गर्दीत गायब होतो. सुमार रूपाच्या नवर्‍यात मग आपल्या देखण्या बायकोबद्दल टिपिकल पुरुषी किडा वळवळतो आणि पुढील अनेक दिवस तो त्या माणसाला शोधत असतो, हैराण होतो. शेवटी उलगडा होतो की असे बोलणे हे त्या माणसाची लकब आहे. पण हा उलगडा झाला नसता तर?
‘ध’चा ‘मा’ होणं सर्वांना माहीत आहे, भिक्षा पाचजणांत विभागून घ्या, असे कुंतीने सांगितल्यावर ‘माता वाक्यं प्रमाणं’ मानून पुत्रांनी काय केले ते सर्व जाणतात.
स्पष्ट आणि स्वच्छ बोलणे हे हल्ली फार दुर्मिळ होतेय आणि मला मग नक्की कळत नाही. संध्याकाळी या गप्पा मारायला म्हटले की नुसत्या गप्पा चहासोबत की जेवण असणार? ड्रिंक असेल का? हे विचार येऊन मी हैराण होते. कारण चहा घेऊन आला असालच, हे विचारणारे शहर मुंबईच्या नजिकच आहे.
तुम्हाला हवे ते/तसे/तुम्ही सांगाल ते, हे विधान तर माझ्या सरळ बुद्धीला जबर शॉट देणारे. मला नक्की कळत नाही की नक्की काय ठरवावे? मग ते जेवण असो, गप्पा असोत, हॉटेलात जाणे असो की ट्रिप सहल असो. अनेक जण मला सांगतात की तू फॉर्म तयार ठेव, आम्ही भरू. विनोद सोडा पण खरंच असं वागलं तर पुढील सर्व सोप्पं होतं.
लग्न म्हणजे आपल्याकडे फक्त दोन माणसांचं लग्न नसून अनेक दिवस, वर्षे, चालणारे कौटुंबिक मानापमान नाटक असते, तिथे मिळालेल्या साडी ते जेवण ते फोटो इथपर्यंत कशावरून सुद्धा पाहुणे, नातेवाईक यांचा पापड मोडू शकतो. याचं मुख्य कारण- यजमानांनी स्पष्ट न विचारणे आणि पाहुण्यांनी स्पष्ट न सांगणे. पण आपल्याकडे कुंपणावर बसणार्‍या जमातीचे लोक मुबलक असल्याने वाद वाढून त्यातून कटुता येते.
एका घरात आईच्या दागिन्यांचे वाटप होते. आता प्रत्येक बाईला वेगवेगळे आवडणार. पण स्पष्ट कसे बोलणार? लोक काय म्हणतील? ही भीती. शेवटी मी सुचवले की सरळ सांगा तुम्हाला काय हवे? आणि जमत नसेल तर दागिन्यांना नंबर देऊन त्याची लॉटरी/ सोरट काढा. नशिबात असेल ते मिळेल. आणि मग आपापसात बदलून घ्या. पण असे करायला लोक बघत नाहीत. रोखठोक, पण नम्र संवाद भारतीय लोक करत नाहीत, कारण लहानपणापासून त्यांना स्वत:चे मत मांडणे हा आगाऊपणा आहे, लोक नावे ठेवतात, असला बाष्कळ विनय संस्कृतीच्या नावाखाली शिकवला जातो.
पत्त्यातही लग्न किंवा तत्सम समारंभ अथवा घरगुती, स्थळ पत्ता देताना, ठिकाणं जणू ताजमहाल वा राष्ट्रपती भवन या तोलाचे असल्यागत दिला जातो. सर्वांना माहिताr असणारच ही समजूत. त्यावरही कळस म्हणजे ‘अरे स्टेशनवर उतरून आमचे घर विचार, बारके पोर पण आणून सोडेल’ ही मखलाशी. यात अजून शॉट म्हणजे आजकाल अगडबंब गृहसंकुले असतात, त्यातील विंग वा फ्लॅट नंबर चुकलात अथवा पत्ता स्पष्ट नसेल तर ‘तू छुपा है कहां?’ म्हणत शोधाशोध सुरू होते. पत्ता ऐकीव माहिती असतो अथवा कोणालाही विचारा असे सांगितलेलं असते. एकदा असे सांगितलेल्या माणसाला जाता जाता म्हटले की ‘अरे त्या दूधवाल्याचे तीन महिन्याचे बिल थकले आहे, त्यानेच पत्ता दिला, मेरा पैसा नहीं देता, आऊर लोगों को खाना खिलाता है’ असे म्हणून, बघ जरा. थंड सूड अधिक चवदार!!
आमच्या नव्या मुंबईत तर एबीसी प्लस आकडे अशी बिल्डिंग रचना आहे, त्यात परत सेक्टर. एक डिजिट चुकले की बोंबला. फक्त दहापर्यंत पाढे येणारी मी अशावेळी हतबुद्ध व्हायचे. माझाच पत्ता सुरुवातीला विसरून जायचे.
असो. हे नसेल तर पत्ता विंग्राजित असतो. इथे ‘येस’, ‘नो’, ‘ओके’ इतपत इंग्रजी येणार्‍यांची संख्या जास्त असली तर?? माझ्या बिल्डिंगचे नाव रेनकोटसारखे सनकोट आहे हे मी स्पष्ट सांगायचे. लफडे नको. बट नाव आहे सनकोस्ट!!
समारंभाला येणार्‍या लोकांची भाषा, समजण्याची कुवत, बोलू शकणार्‍या भाषा, त्यांच्या आवडीनिवडी हे न बघता एकसारखा मजकूर पत्ता देतात लेकाचे. या बाबतीत पुणेरी लोक मात्र शास्त्रशुद्ध. आलेल्या पाहुण्यांना लवकर पाठवायची घाई असल्याने (१ ते चार वामकुक्षी) सरळ सांगतात. इतकी वेळ, इतक्या वाजेपर्यंत.
जी-पे नंबर, पत्ता – नकाशा.
विनोद भाग सोडा, पण स्पष्ट सांगणे इथे दिसते. या आरामात, कोणीही पत्ता सांगेल असले ‘नरो वा कुंजरो वा’ नसते.
आपले मत शुद्ध, स्वच्छ मांडणे, आपल्याला काय अपेक्षित आहे हे सांगणे, न पटणार्‍या गोष्टी सांगून पर्याय मागणे, हे होत नाही. आजही भारतीय घरात बायकांना मत आवडी न विचारता निर्णय घेतले जातात, बायका मग मनातील राग टोमणे देऊन काढतात, भांडणे होतात आणि शेवटी या बायका अशाच, जातील तिथे भांडतील हे ऐकून घेतात. आता अगडबंब कुटुंब नाहीयेत. घरातील चार-पाच माणसे एकमेकांत सरळ बोलू शकत नसतील तर कुटुंब कसले बोडक्याचे?
अर्थात स्पष्ट बोलणे आणि फाडफाड उर्मट बोलणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. नोकरी, व्यवसायात अगदी रामशास्त्री बाण्याने बोलले तर ते योग्य ठरत नाही. परिस्थिती बघून शांत बोलावे लागते, पण
कॉमन सेन्स इज मोस्ट अनकॉमन! मग तूच सांगितले होतेस स्पष्ट बोल म्हणून, बघ काय झाले ते?? हे ऐकावे लागते.
तर मुद्दा काय की गुळूमुळू न बोलता सरळ तथापि नम्र बोला. समोरचा समजून घेईल हे गृहीत धरू नका. मग तो पाहुणा असो अथवा नातेवाईक. कारण आमच्यात काहीही वाद भांडण नाही, आम्ही एकत्र कुटुंबातील आहोत, काका पुतण्या आहोत हे राजकारणी धुरीण करू जाणे. ते येरा गबाळ्याचे काम नोहे. आपण सर्व येरू आहोत बाप्पा!!!

Previous Post

दोन नवरे, फजिती ऐका!

Next Post

पेट्रोल पंपापायी लाखोंचा धूर!

Next Post

पेट्रोल पंपापायी लाखोंचा धूर!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.