
पोहे हा म्हटलं तर साधा पदार्थ. घरोघरी बनणारा. पण, त्याचे मराठी पद्धतीचे ‘कांदेपोहे’ बनतात तेव्हा ते महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत अढळ स्थान निर्माण करतात. कांदेपोहे हा केवळ नाश्त्याचा एक पदार्थ नाही; तो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, आदरातिथ्याचा भाग आहे. मराठी माणसांचं पारंपरिक पद्धतीने लग्न जुळवलं जाताना मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात (शक्यतो तिने बनवलेले किंवा इतर कुणीतरी बनवून तिनेच बनवले आहेत असं सांगितलेले) कांदेपोहे असणं हे मस्ट असायचं एकेकाळी. पोह्यांच्या बशीत तो सगळा सरंजाम योग्य रंगसंगतीने समोर आला, त्याचा पहिला चमचा वरमाईंच्या तोंडात पोहोचल्यावर त्यांची समाधी लागली आणि त्यांनी ‘वा, छान झालेत पोहे’ असं म्हटलं की वधूपिता आणि वधूमातेच्या कानांमध्ये सनईचे सूर आणि चौघड्याचा निनाद सुरू झालाच म्हणून समजायचा… मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमालाच ‘कांदेपोह्यांचा कार्यक्रम’ म्हटलं जातं मराठीत. असा मान किती खाद्यपदार्थांना मिळत असेल?
अगदी साध्या साहित्यापासून तयार होणारे पोहे जेव्हा जमतात, तेव्हा बहार आणतात. फोडणीत तडतडणारी मोहरी, सुवासिक कढीपत्ता, तिखटसर हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला कांदा, मऊसर पोहे, कुरकुरीत भाजलेले शेंगदाणे, ताजी कोथिंबीर आणि लिंबाची फोड (वर किसलेल्या खोबर्याचा थर, त्यावर पखरलेली शेव आणि त्यात डाळिंबाचे दाणे म्हणजे तर शाही थाटच) या सगळ्या मिलाफातून तयार होणारे कांदेपोहे प्रत्येक घासागणिक मन जिंकतात. पाहुण्यांचे स्वागत करायचे तर पोहे, सकाळचा पौष्टिक नाश्ता करायचा असो की संध्याकाळच्या गरमागरम चहासोबत हलकी फुलकी डिश- म्हणजे पोहे. शिवाय हे आपल्या इतर पदार्थांच्या तुलनेत फास्ट फूड. एकीकडे फोडणी करून, कांदे चिरायला घ्यायचे, फोडणीत कांदेमिरची पडल्यानंतर पोहे धुवून निथळायला ठेवायचे. एक वाफ काढून पोहे टाकले आणि झाकण ठेवलं की प्लेटी काढेपर्यंत गरमागरम पोहे तयार.

पुण्यात सर्वच मराठी पदार्थ उत्तम चवीचे मिळतात, महाराष्ट्रातल्या सगळ्या चवी ओरिजिनल स्वरूपात चाखायला मिळतात. तरीही इथे पोह्यांची महती जरा वेगळीच आहे. हे राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या कानाकोपर्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांचं शहर आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी दर १०० मीटरवर कोणता ना कोणता नाश्ता मिळत असतोच. २० ते ४० रुपयांत नाश्त्याची भूक भागवणारे पदार्थ या स्टॉल्सवर मिळतात. त्यात सर्वात जास्त प्रमाणात असतात ते पोहे, उपमा, शिरा यांचे स्टॉल. पोहे-उपमा किंवा पोहे-शिरा असं काँबिनेशन इथे मिळतं. पोह्यांवर सांबाराची किंवा सँपलची म्हणजे तिखट रश्शाची धार ओतून मिळते. काही ठिकाणी इंदौरचे वाफेवरचे खास जिरावन भुरभुरलेले पोहेही मिळतात. सकाळी सकाळी उत्तम पोहे मिळणारी किमान १० ठिकाणं कोणत्याही भागात दाखवता येतील. पण काही ठिकाणं एरियाच्या, पेठेच्या पलीकडेही प्रसिद्ध झालेली आहेत. त्यातले एक म्हणजे ‘साखरयुक्त पोह्यांचे कारखानदार’ अशी एक भन्नाट ओळख मिरवणारे सुशील पोहे.
लाल बहादूर शास्त्री रस्त्यावरून सेनादत्त पोलीस चौकीकडून लकडी पुलाच्या दिशेने निघाल्यावर रस्त्यालगतचा बसस्टॉप दिसतो. त्याच्या शेजारीच नजरेत भरणारा ‘सुशील पोहे’ हा लहानसा दिसणारा स्पॉट आहे. सकाळपासूनच येथे ग्राहकांची रांग लागते.
कॉलेजचे विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, दूरवरून खास चव चाखण्यासाठी आलेले खाद्यप्रेमी, अशी सर्व स्तरांतील माणसे इथे पोहे खाण्यासाठी गर्दी करत असतात. गरमागरम, मऊसर पोहे, कांदा, कुरकुरीत शेंगदाणे, कोथिंबीर, लिंबाच्या रसाची हलकीशी झाक या सगळ्यांचा प्रत्येक घास जिभेवर रेंगाळत राहतो. साध्या कांदेपोह्यांनाही ठरवलं तर वेगळी ओळख कशी देता येऊ शकते, याचा अनुभव ‘सुशील पोहे’ येथे आल्यावरच येतो.
सिव्हिल इंजीनियरिंगचे अधुरे स्वप्न
प्रत्येक यशस्वी व्यवसायामागे एक स्वप्न, अनेक अपयशं आणि अथक प्रयोगांची कहाणी दडलेली असते. सुशील जाधव यांच्या मनात सिव्हिल इंजिनिअर बनून रोड कॉन्ट्रॅक्टर बनायचे एक मोठे स्वप्न होते. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी हार्डवेअर आणि नेटवर्किंगचा डिप्लोमा केला. त्यानंतर बारावीनंतर दूरशिक्षणातून सिव्हिल इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाला प्रवेश घेतला. मात्र, काही अपरिहार्य अडचणींमुळे हा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नाही. आयुष्याने त्यांना वेगळ्याच वळणावर आणून उभे केले. दरम्यानच्या काळात त्यांनी विविध ठिकाणी नोकर्या केल्या. पण नोकरी करताना त्यांच्या मनात सतत एकच विचार घोळत राहिला…’दुसर्यांसाठी काम करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय उभारला तर?’ याच विचारातून त्यांच्यामध्ये उद्योजकतेचे बीज अंकुरले.
सन २००७च्या दिवाळीत त्यांनी पुण्यातील लॉ कॉलेज रोडवर एका छोट्याशा स्टॉलमधून पोहे विकण्यास सुरुवात केली. परिसरात अनेक महाविद्यालये असल्यामुळे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर येतील आणि व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, वास्तव अपेक्षेपेक्षा वेगळे ठरले. ग्राहकांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. अनेक जण अशा परिस्थितीत व्यवसाय गुंडाळून बसले असते; पण सुशील यांनी हार मानली नाही. त्यांनी ठिकाण बदलून आपला मुक्काम नवी पेठेत हलवला. आज ज्या ठिकाणी ‘सुशील पोहे’ आहे, त्याच परिसरातील फुटपाथवर या यशस्वी प्रवासाची सुरुवात झाली. त्या वेळी एका प्लेट पोह्याची किंमत होती फक्त ‘पाच रुपये’. आजूबाजूला अनेक नाश्त्याचे स्टॉल होते. स्पर्धा मोठी होती. पण एक दिवस आपल्या स्टॉलवरही ग्राहकांची रांग लागेल, असा विश्वास सुशील यांना होता.
कोल्हापूरची कढई
सुरुवातीच्या काळात घरातील साध्या कढईत पोहे तयार केले जात होते. मात्र, सुशीलच्या मनात एकच ध्यास होता. ‘आपले पोहे इतरांपेक्षा वेगळे कसे होतील?’ यासाठी त्यांनी अनेक प्रयोग सुरू केले. त्याने खास कोल्हापूरहून मोठी कढई आणली. पोहे तयार करताना साखरेचा अतिशय संतुलित वापर करण्याचा एक वेगळा फॉर्म्युला त्यांनी तयार केला. याच प्रयोगामुळे पोह्यांना एक आगळीवेगळी चव मिळाल्याचे सुशील सांगतात. १३ फेब्रुवारी २००८ हा दिवस त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. त्या दिवसांपासून त्यांच्या व्यवसायाची घडी बसू लागली. अवघ्या सहा महिन्यांत ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढू लागली. एकदा आलेला ग्राहक पुन्हा पुन्हा यायला लागला.
प्रयोग करत माप निश्चित केले…
पोहे तयार करत असताना त्यामध्ये सुरुवातीच्या काळात अनेक प्रयोग केले गेले. त्यातून कच्च्या मालाचे माप निश्चित करण्याचे काम सुशील यांनी केले. घरोघरी किंवा अगदी नामांकित स्टॉलवरही पोहे बनतात ते नजरेच्या अंदाजाने आणि हाताच्या मापाने. आपल्याकडे अमुक ग्रॅम हे आणि तमुक इंच ते अशा मापाने पदार्थ बनवण्याला फार किंमत दिली जात नाही. सुशील यांनी मात्र काटेकोर मापाचं चवीच्या सातत्यातलं महत्त्व जाणून घरी एक वजनकाटा आणला आणि त्यात नेमके मोजमाप करून पदार्थाचे नियोजन केले जाऊ लागले. त्यामुळे पोहे तयार करताना त्यामध्ये कोणताही पदार्थ कमी जास्त होत नाही आणि पोहे चवीला एकसारखे लागतात.
सुशील सांगतात, आपल्याकडे एक डॉक्टर येतात. ते आठ पोहे पार्सल घेऊन जातात, त्यातले दोन पोहे ते क्लिनिकला गेल्यावर खातात आणि उरलेले सहा पोहे ते फ्रिजमध्ये ठेवतात. २४ तासानंतर ते पोहे खाताना त्यांना त्याच्या चवीमध्ये कोणताही फरक जाणवत नाही. सुशीलकडे मिळणारे पोहे हा मऊसूत असतात, त्यामुळे त्याचा स्वाद दुसर्या दिवशी देखील तसाच टिकून राहतो. शिवाय सुशील यांचं म्हणणं असं आहे की पोह्यावर सांबार, चटणी, शेव असे इतर पदार्थ टाकले की त्या पोह्याची चव शून्य होऊन जाते. म्हणूनच सुशीलकडे मिळणारे पोहे हे प्युअर पोहे म्हणजे फक्त कांदेपोहे आहेत. त्यामुळेच ते आपल्याला आवडतात, अशी प्रतिक्रिया इथे नेहमी येणार्या अमित देशपांडे यांनी दिली.

जादूचे प्रयोग नाहीत…
आपल्याकडे मिळणारे पोहे युनिक कसे, असा प्रश्न आपल्याला अनेकजण विचारतात. मात्र, ते करताना मी कोणतेही जादूचे प्रयोग करत नाही, असे सुशील आवर्जून सांगतात. कांदेपोह्यांसाठी लागणारा कच्चा माल म्हणजे पोहे, मिरची, कोथिंबीर, असा सगळा कच्चा माल आपण पुण्यातूनच खरेदी करतो. इथे जे उपलब्ध आहे, त्याचा वापर करून उत्तम पदार्थ तयार करण्याचे आपले तत्व राहिलेले आहे. सुशीलच्या पोह्यामध्ये स्पॅनिश शेंगदाणा वापरण्यात येतो. त्याला थोडे मीठ लावून तो भट्टीवर भाजला जातो. आपल्याकडे पोहे आणि इतर हे उत्तम प्रतीच्या फिल्टर्ड शेंगदाणा तेलामध्ये तयार केले जातात, हेही सुशील सांगतात.
चिंचवडच्या सुहास एकबोटे यांच्याकडे एकदा पार्सलच्या स्वरूपात सुशीलचे पोहे पोहोचले आणि हे पोहे चाखल्यावर ते त्यांच्या प्रेमातच पडले. आता पुण्यात आलो की सुशीलकडे पोहे खायला जायचंच, या परिपाठात अनेक वर्षांत कोणताही खंड पडलेला नाही, असं ते सांगतात.
सुरत, कोल्हापूरचे ग्राहक
सुशील सांगतात की आपल्याकडे पोहे खाण्यासाठी येणार्या ग्राहकांमध्ये सुरत, कोल्हापूर परिसरातील लोकांची संख्या सर्वाधिक आहे. या भागातील लोक काही कामाच्या निमित्ताने इथे आले की वाट वाकडी करून पोहे खाण्यासाठी सुशीलकडे येतात. गुजरात, मध्य प्रदेश या भागात अनेक ठिकाणे पोह्यांसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, तिथले ग्राहकही आपल्या पोह्यांचं कौतुक करतात, असं सुशील सांगतात.

खर्डा पोह्याचा प्रयोग…
एकदा शाळेमध्ये असताना मला आईने खर्डा पोहे तयार करून दिले होते. त्यात आईने मिरचीचा खर्डा टाकला होता, ते पोहे अप्रतिम चवीचे झाले होते. काही दिवसांपूर्वी आपण तशाच प्रकारच्या खर्डा पोहे तयार करण्याचा विचार करत आहोत. आईच्या हातची सेम टु सेम चव आणण्यासाठी आता प्रयोग सुरू आहेत, लवकरच सुशीलकडे हेही पोहे खायला मिळतील, यात शंका नाही.
पायनॅपल शिर्याची चव भारी…
पोहे सुशीलच्या नावातच आहेत, पण त्यांच्याकडे मिळणारा पायनॅपलचा शिरा देखील ग्राहकांच्या आवडीचा आहे. एकदा घरी अननस आणला होता, त्याच्या दोन फोडी शिल्लक होत्या. त्याचा वापर करून शिरा तयार केला, तो उत्तम झाला होता. पोह्याच्या जोडीला त्याची विक्री सुरू केली तर? असा विचार करून त्याला सुरुवात केली. काही दिवसांतच पोहे खाण्यासाठी येणारे लोक त्या शिर्याची चव देखील चाखू लागले. लोकांना त्याची चव खूपच आवडली, असे सुशील सांगतात.
त्यामुळे पुण्याची फेरी झाली की वाट वाकडी करा, सुशीलचे पोहे आणि पायनॅपल शिरा यांचा आवर्जून आस्वाद घ्या. नेहमीचा, रोजचा, घरीच बनणारा पदार्थही एखाद्या ठिकाणी किती स्वादिष्ट बनतो, याचा अनुभव निश्चित येईल.

